आपल्या राहत्या घराची नीट काळजी घेणे आणि आपण जिथे आहोत तिथे आवडीने आपले रोजचे घरचे जेवण बनवून खाणे, याची सवय लागून आता कित्येक वष्रे होऊन गेली. मी आज एक चांगला होम मेकर आहे असे स्वत:ला म्हणू शकतो. गेल्या अनेक वर्षांत एकटय़ाने किंवा कुणाहीसोबत कमी वा दीर्घकाळ राहताना मी घर चालवायचे काम नेहमी आवडीने स्वत:कडे घेत आलो आहे.
मला घरातली छोटी कामे करायला मनापासून आवडतात. आपण राहतो ती जागा शांत, नीटनेटकी आणि प्रसन्न ठेवण्याची ही कला मी अनेक लोकांचे वर्तन पाहून शिकलो. त्यात स्त्रियाही होत्या आणि पुरुषही. संपूर्ण स्वयंपाक करणे आणि घरकाम करणे ही कामे कुणा एकाची आहेत अशी माझी समजूत लहानपणापासूनच नव्हती. माझ्या आजूबाजूला वावरणारी अनेक जोडपी, राहणारी माणसे कधीही घरकाम या गोष्टीचा बाऊ करताना मी लहानपणापासून पाहिले नाही. माझे वडील नेहमी घरात काम करताना, स्वयंपाकाची तयारी करून देताना मी वर्षांनुवष्रे पाहत आलो. मला स्वयंपाक करायला माझ्या एका मित्राने शिकवले. त्यानंतर मी माझ्या आईकडून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. मी जिथे प्रवासाला गेलो तिथे राहताना तिथल्या चालीरीती, सजावटीची जाणीव, पाकक्रिया या गोष्टी कोणत्याही प्रकारचा आवाज न करता मी गुपचूप शिकून घेत राहिलो. पण त्यासोबत मला हेसुद्धा लक्षात आले की, स्वयंपाक करणे आणि घरकाम करणे याची आवड असावी लागते. त्यात मुलगा किंवा मुलगी असा भेद नसतो. ती आवड असली की ते केले जाते, आणि नसली की केले जात नाही- इतके ते सोपे आहे. आणि त्यामुळे मी उत्तम घर चालवतो याबद्दल मला माझे स्वत:चे कधीच कौतुक वाटले नाही. त्याचप्रमाणे एखाद्या मुलीला जेवण बनवता येत नाही याचे मला कधीच आश्चर्य वाटले नाही. प्रश्न फक्त आवडीचा असतो. आणि आपला दिवसातला वेळ कुणी कोणत्या गोष्टीवर घालवावा, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न बनतो.
मला नुकतेच पुण्यातल्या एका भाडय़ाच्या घरातून केवळ माझे लग्न झालेले नाही या कारणामुळे हाकलून देण्यात आले. मी चाळीस वर्षांचा असल्याने घराचा व्यवहार करताना माझे लग्न झालेच असेल असे मालकीणबाई समजून चालल्या होत्या. त्यांना या गोष्टीची सोसायटीच्या नियमावलीत आधी खात्री करून घ्यावीशी वाटली नाही. कारण चाळीस वर्षांचा माणूस बिनालग्नाचा कसा असेल, असे त्या सगळ्यांना वाटले. पण त्या सोसायटीच्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने हा माणूस तसला निघाला.
मी जागेचे डिपॉझिट भरून, सामानसुमान हलवून, नवा रंग लावून, नीट स्वयंपाकघर मांडून, नवे पडदे शिवून मग एका सहलीसाठी घर बंद करून निघून गेलो. तिथे मला मालकीणबाईंचा दोनच दिवसांत फोन आला. तो फोन थोडा विनोदी होता. मी काय ऐकतो आहे यावर माझा विश्वास बसेना. त्यांना माझे लग्न झाले नाही हेच माहीत नसावे. त्या म्हणाल्या की, आमच्या सोसायटीचा नियम आहे की- फक्त कुटुंबांना जागा द्यायची. मी म्हणालो, ‘‘मग तर ठीकच आहे. माझे कुटुंब आहे.’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘कुटुंब म्हणजे लग्नाचे कुटुंब.’’ तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. मी त्यांना म्हणालो, ‘‘अहो बाई, तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलेत? मी तुमच्याशी व्यवहार केलाच नसता. तुमच्या सोसायटीइतक्या गोड आणि निष्पाप माणसांमध्ये मलाही राहायचे नाही. पण एक विचार करा, की अशी विचित्र अट घालताना ती अट आपण ज्याला घालत आहोत ती व्यक्ती कोण आहे, कशी आहे, याचा विचार नको का करायला? सगळीच अविवाहित माणसे सिगरेट फुंकत, लुंग्या वर करून बाल्कनीत येऊन बायकांवर नजर ठेवणारी नसतात. काही अविवाहित माणसे नेटकी, शांत आणि मुख्य म्हणजे कामात व्यग्र असतात. जसा की मी आहे. मी घर घेतले आहे ते उन्हाळ्यात पापड वाळत घालायला नाही, किंवा पत्त्यांचे डाव मांडून अड्डा गोळा करायला नाही. मला खूप काम आहे. ते मी बाहेर जाऊन करतो. आणि रात्री झोपायला घरी येतो.
अजूनही लग्नाच्या बायकाच घर नीट ठेवतात, त्या शांतच असतात, नेटक्या असतात, आपल्या सोसायटीने इतके पसे खर्च करून घसरगुंडय़ा आणि जंगलजिम उभारली त्यावर खेळायला त्या बायका बालगोपाळ निर्माण करतील, सणावाराला नऊवारी साडय़ा नेसून, नथ घालून इकडे तिकडे हळदीकुंकवे करत फिरतील अशी काही तुमची समजूत आहे का? पुरुष स्वयंपाक करतात, घर आवरतात, स्वत:ची काळजी घेतात, हे तुम्हाला माहीत नाही का? माहीत नसेल तर यानिमित्ताने तुम्हाला मी एक डेमो दाखवू का? एकटय़ा माणसाची तुम्हाला भीती का वाटते?
हल्ली कुणीही तरुण माणसांनी घर भाडय़ाने घेतले तरी त्या घरातली सगळी माणसे दिवसभर बाहेर जातात आणि कामे करतात. हल्ली घरे शांत आणि निर्मनुष्य असतात. मोलकरणी आपापल्या किल्ल्यांनी घरे उघडून, ती साफ करून, स्वयंपाक करून जातात. घरातली माणसे फक्त रविवारी घरी असतात. कारण मुलींनासुद्धा बाहेर नोकऱ्या असतात. त्या कष्ट करतात. लहान मुलेसुद्धा मोठय़ा माणसांच्या वरताण बिझी असतात. तुमचे घर मी तितकेच सुंदर ठेवेन- जितके एखादी मुलगी ठेवेल. टापटीप आणि नेटकेपणा याचा लग्नाशी काय संबंध आहे? मी ते घर शांत, सुंदर, पुस्तकांनी आणि चित्रांनी भरलेले ठेवणार आहे. सगळी मराठी घरे ही मराठी मालिकांमध्ये असतात तशी त्यातल्या कुटुंबांसारखी बाष्कळ आणि ठासून भरलेली असावीत असे वाटते का? गृहिणी ही संस्था आता लिंगवाचक राहिलेली नाही. काही ठिकाणी बायका भक्कम नोकऱ्या करतात, देशभर प्रवास करतात नि नवरे घरी बसून फ्रीलान्स जॉब्स करतात. असे जोडपे तुमच्याकडे आले तर पुरुष घरी बसून राहणार म्हणून त्या जोडप्याची पण तुम्हाला भीती वाटणार का? कुटुंब म्हणजे काय? त्याची तुमची आजच्या काळाची व्याख्या काय? मराठी मालिकेतली कुटुंबे हीच तुमची कुटुंबाची व्याख्या आहे का? तसे असेल तर मी एखाद्या नटीला दर संध्याकाळी कानात रिंगा, घट्ट साडीपदर आणि लांब वेणी असलेल्या सुनेसारखे वागायला आणि डोळे मोठे करून कट-कारस्थाने करायला तुमच्या सोसायटीच्या बागेत सोडले तर तुम्हास बरे वाटेल काय? अमेरिकेत राहणाऱ्या तुमच्या गोमटय़ा मुलाने किंवा गोमटय़ा मुलीने लग्न नाही केले तर तुम्ही त्यांना घरात घेणार नाही काय? त्यांना कुणी तिथे ते घाणेरडे भारतीय आहेत म्हणून घर नाकारले तर तुम्हाला कसे वाटेल? तुम्ही माझ्याशी आर्चीच्या आई-वडिलांसारख्या का वागता?’’
कोणत्याही ठिकाणचे नियम पाळावे असे मला आवर्जून वाटते. आमच्या मालकीणबाई वागायला अतिशय शांत आणि सज्जन होत्या. मला त्यांना दुखवावे असे वाटले नाही. माणसाची मूल्यव्यवस्था आपण इतक्या पटकन् बदलू शकत नाही. त्यांना माझी बाजू घेऊन सोसायटीशी संवाद करता आला असता. पण तो त्यांना करायचा नव्हता. मी सामान हलवून आíथक व्यवहार रद्द करायची संमती दिली. या सगळ्यात मला आणि माझ्या कुटुंबाला खूप मनस्ताप झाला. आमच्या वेळेचा अपव्यय झालाच, पण मनालाही वाईट वाटत राहिले, की इतक्या साध्या गोष्टीमुळे आपण कोणत्यातरी माणसांच्या समूहात राहायला नालायक ठरलो. आपल्याच मूळ शहरात.
लग्न केले असले की आपल्याला ती जोडपी एकदम चांगली वाटत असतात. आणि लग्न केले नसले की ती माणसे अचानक खुनी वगैरे वाटत असतात की काय? आजच्या काळात असे नियम असणे किती विनोदी आहे!
एकटे किंवा दुकटे- कसेही असोत; माझे अनेक मित्र आणि मत्रिणी आज आपापली घरे सोडून वेगळ्या शहरांत कामाला, कष्ट करायला, आपली स्वप्ने पुरी करायला जाऊन राहतात. बहुधा हा ओघ छोटय़ा शहरांमधून महानगरांकडे असतो. महाराष्ट्रात तो पुणे आणि मुंबई या दोन शहरांत असतो. कधीतरी घडलेल्या बेजबाबदार वागण्यामुळे, आधीच्या भाडेकरूंनी दिलेल्या मनस्तापामुळे, कधी भाडेकरूच्या विशिष्ट जातीमुळे त्यांना घर मिळत नाही, कधी ते मांसाहारी असतात म्हणून त्यांना घर नाकारले जाते. कधी त्यांचे लग्न झालेले नाही आणि त्यामुळे ते आजूबाजूच्या समाजाला घातक वाटतात, त्यामुळे त्यांना कुणी भरपूर भाडे भरायची तयारी असूनही घर देत नाही.
अशी मूल्यव्यवस्था तयार करणाऱ्या प्रस्थापित आणि सुसंस्कृत लोकांनी कधी विचार केला आहे का, की तुमची स्वत:ची मुले इंग्लंड-अमेरिकेत जातात. तिथे राहणाऱ्या मूळ रहिवाशांना कधी सहज तुमच्या मुलांचा राग येऊ शकतो आणि स्थलांतरित भारतीयांचा कंटाळा येऊ शकतो. असे घडले आणि एखाद्या माथेफिरूअमेरिकन किंवा ऑस्ट्रेलियन तरुणाने तुमच्या मुलांना गोळ्या घातल्या तर तुम्हाला काय आणि कसे वाटेल? असे काही तिथे घडले असे आपण जेव्हा वाचतो तेव्हा घर सोडून कामासाठी बाहेर राहणाऱ्या तरुण माणसांविषयी आपली नक्की काय आणि कशी भावना तयार होते?
सुरक्षितता आणि शांतता हे दोन नियम पूर्ण पाळून जी माणसे तुमच्या आजूबाजूला राहू बघत आहेत, अशा बाहेरगावाहून येणाऱ्या स्थलांतरित माणसांना आपण थोडय़ा मोकळ्या संवेदनेने आणि चांगल्या जाणिवेने वागवू शकत नाही का?
सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com