‘‘ती मुलगी काहीच करत नाही..’’ सावंतकाकूंनी केलेल्या पोह्य़ाचा बकाणा भरत निळ्या जोरात ओरडला. ‘‘नाही. काहीच करत नाही..’’ विक्रम मान खाली घालून म्हणाला. त्याने मान खाली घातली होती ते लाज वाटून नाही, तर सावंतकाकूंनी केलेल्या कुरडय़ा आणि पापडय़ा मनापासून कुरतडून खायला. सगळ्यांच्याच माना खाली होत्या. सिमरन, सोनम, प्राजक्ता, विक्रम, निळ्या आणि मयूरेश. सगळे मनापासून सावंतकाकूंच्या अंगणात बसून पोहे चापत होते. सावंतकाकू म्हणजे मयूरेशची आई.
विक्रमचे लग्न ठरले होते. त्याच्या आजीची शेवटची इच्छा होती, की त्याने लग्न करावे. आणि त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा होती, की त्याने एक तरी मुलगा नक्की होऊ द्यावा. अशा दोन्ही महत्त्वाच्या इच्छा व्यक्त करून ते दोघे मेले होते. त्या दोन्ही शेवटच्या इच्छा पूर्ण कराव्या लागणार म्हणून लग्न करावं लागतंय,असे तो म्हणत असला तरी त्याला आतून फार गुदगुल्या होत होत्या. रोमांचकारी वाटत होते. अख्ख्या आयुष्यात त्याला एकाही मुलीने ‘हो’ म्हटले नव्हते. साधे त्याचे फूलही कुणी ‘रोज डे’ला घेतले नव्हते. त्याचे पहिले कारण- त्याची लग्न केलेली, पण सासरी कधीही न जाता घरीच बसून सगळ्यांना त्रास देणारी बहीण. तिचे सासर पलीकडच्या गल्लीत होते. यात तिची काय चूक? दुसरे लग्न न होण्याचे कारण त्याची आई हे होते. त्याची आई बँकेत होती आणि आता रिटायर झाली होती, हे कारण नव्हते; तर ती संध्याकाळी फेसबुकवर भलेमोठे निबंध लिहून सामाजिक विषयांवर बोलत असे, हे होते. त्यात त्यांना कुणीतरी सामाजिक जाणिवेबद्दल रोटरीचा पुरस्कारही दिला होता. त्यांचे असे फेसबुक क्वीन असणे हे फार कंटाळवाणे होते. कारण त्यांना त्या फार महत्त्वाच्या वाटू लागल्या होत्या. सकाळी टेकडीवर जाऊन त्या रोज दोन झाडे लावीत. आणि ही पर्यावरणसेवा करून झाली की नंतर घरी बसून असत. त्यांनी- आपण विक्रमला कसे जाणीवपूर्वक वाढवले, यावर फेसबुकवर लिहायला घेतले तेव्हापासून त्यांच्या भीतीने किंवा कंटाळ्याने विक्रमला मुलीच सांगून येत नव्हत्या. हे लग्न अॅरेंज मॅरेज होते आणि मुलगी गृहिणी होती. गृहिणी बायका मराठी सीरियलमध्ये असतात.
त्यांच्यापैकी कुणालाही सध्या काहीच न करता घरी बसून असणारी मुलगी माहीत नव्हती. मुली निदान पार्ट टाइम तरी काहीतरी काम करतात. विक्रमची बहीणसुद्धा पोहायला शिकवायला सकाळी आणि संध्याकाळी बाहेर जायची. दुपारी कसल्या तरी परीक्षेची तयारी करायची. सिमरनने पोह्य़ातील शेंगदाणा खाता खाता आपण अशी तरुण गृहिणी शेवटची आणि कुठे पाहिली होती ते आठवले. तिला एक मुलगी आठवली; पण नंतर तिला आठवले, की ती मुलगी खरी नव्हती. राजश्री प्रॉडक्शनच्या नव्या रिलीज झालेल्या सिनेमात ती होती. तिला विक्रमच्या बायकोचा फार हेवा वाटला. कुठे सकाळी मरत ट्रॅफिकमधून गाडी चालवत कामाला जा आणि पैसे कमवा..!
पूर्ण घरी बसून असलेली मुलगी म्हणजे चंगळ होती. या तरुण मुलांच्या पिढीत हे कधी घडले नव्हते. विक्रमच्या नशिबावर सगळे भाळले होते. सावंतकाकू येऊन पुन्हा पोहे वाढून गेल्या. ‘चहा घेणार का रे बाळांनो?,’ असेही विचारून गेल्या. सगळे एका सुरात ‘हो’ म्हणाले. सावंतकाकू म्हणजे सावंतकाकूच. काय तो त्यांचा स्वयंपाक. काय ते त्यांचे अगत्य. काय विचारायची सोय नाही. सगळ्यांच्या आया नोकरी करत. पण प्रेमळ सावंतकाकू घरीच असत. त्यामुळे मयूरेशकडे जमायचे असले की सगळ्या ग्रुपची चंगळ असायची.
मयूरेशला आपल्या एअर होस्टेस मैत्रिणीची आठवण झाली. किती कामात असते ती! आपल्याला भेटायलाही तिला वेळ मिळत नाही. ती मुंबईत आली की हॉटेलची खोली घेऊन दोघांना रात्र काढावी लागते. एवढी सुंदर मैत्रीण असून आपल्याला किती फ्रीडम आहे! जरी लग्न केले तरी ती घरी बसणार नाही. खूप महत्त्वाकांक्षी मुलगी आहे ती. आणि मुख्य म्हणजे विक्रमप्रमाणे आपल्याला मुलेबिले जन्माला घालायची सक्ती आई-वडिलांनी केलेली नाही. बापरे! अवघड आहे विक्रमचे. घरी बसणारी बायको म्हणजे डोक्याला शॉट होणार याच्या.. असे त्याच्या मनात काहीबाही चालले होते. कारण हाऊसवाइफ बायका मुले मोठी झाली आणि करायला काही उरले नाही की डोक्याने गंडतात, हे त्याला माहीत होते. मुलांच्या आयुष्यात प्रमाणाबाहेर ढवळाढवळ करतात. किंवा आपल्या आईप्रमाणे आयुष्यातले सगळे झोल स्वयंपाकात काढतात आणि आल्या-गेल्याला सतत खाऊ पिऊ घालत बसतात.
सोनमचे काही म्हणणे नव्हते. तिला इथे राहायचेच नव्हते. जिथे राहायचे नाही, त्याबद्दल कशाला मते देत बसा? तिचा बॉयफ्रेंड टेक्सासला होता आणि तो दिवाळीत आला की लग्न करून तिला तिथे नेणार होता. त्यांची कंपनीही एक होती. त्यामुळे तिला तिथे जर प्रोजेक्टवर घेतले तर मग दोघांची फारच सोय होणार होती. प्रोजेक्ट नाही मिळाले तरी प्रॉब्लेम नव्हता. कारण सोनमने आत्तापर्यंत नोकरी करून इतके पैसे साठवले होते, की दोन-तीन वर्षे तिने काम नाही केले तरी तिला चालणार होते. घरातच बसायचे असेल तर तिथे अमेरिकेत बसू. इथे भारतात नको. भारतात घरात बसले की काय होईल, या भावनेने तिला भीती वाटत असे. कारण तिची एक आत्या हाऊसवाइफ होती. तिची मुले मोठी झाली आणि घर सोडून गेली, तेव्हा तिला करायला काही उरले नाही म्हणून ती वेडी झाली होती. आणि एका स्वामींच्या नादी लागून तिने शाकाहार वगैरे स्वीकारला होता. असे सगळे पाहिल्याने भारतात घरात बसून राहणे किती कंटाळवाणे असेल असे तिला वाटले. आपण किती सुखी आहोत हे लक्षात येऊन तिने सावंतकाकूंकडून आत जाऊन अजून थोडय़ा कुरडया आणून खाल्ल्या. सावंतकाकू पुन्हा बाहेर आल्या आणि आग्रह करून गेल्या. ‘काय तुम्ही सगळे मोठे झालात की काय? काही खातच नाही तुम्ही. आवडले नाहीत का पोहे? काय ग प्राजक्ता? काय रे निळ्या? घ्या की अजून! तुमच्यासाठी केले न रे?’ पोरांना काकूंचा प्रेमळ आग्रह मोडवेना.
निळ्या या चर्चेमुळे जरा घाबरला होता. त्याची आई आणि त्याची बहीण दोघी कट्टर फेमिनिस्ट होत्या. त्यामुळे या प्रसंगात काय बोलायचे आणि कुणाची बाजू घ्यायची, हे त्याला कळेना. आपण कुठेही काहीही बोललो तरी ते आई आणि बहिणीला कळतेच असे त्याला बालवाडीपासून वाटत असे. त्यामुळे तो फारच काळजीपूर्वक आणि कुंपणावरचे बोलत असे. त्याला बिचाऱ्याला खरे तर काही मत नव्हतेच. निर्णय घेण्याची सवय आईने लावली नव्हती. त्याने काही ठरवले की त्याची आई त्याला अपराधी वाटवून बरोबर उलटा निर्णय घ्यायला लावत असे. त्यामुळे हल्ली त्याला काही ठोसपणे वाटायचीसुद्धा भीती वाटत असे. त्याला लहानपणापासून असे वाटत होते की आपल्याला एक उद्धट, पैलवान भाऊ हवा होता. आई बोलली की तिला ओरडून गप्प करणारा. पण त्याला तसा भाऊ झालाच नाही. उद्धट बहीण मात्र झाली. त्याला एक मैत्रीण होती. शांत आणि बोलक्या डोळ्यांची. हुशार. ती डॉक्टर होती. तिच्या अंगाला दिवसा एक अॅन्टिसेप्टिकचामादक वास येत असे; ज्यामुळे निळ्या तिच्या प्रेमात वेडा झाला होता. ती कितीही कामात असली तरी ती सतत आपल्यासोबत आहे असे निळ्याला वाटायचे. तिचा मऊ, हलका आवाज त्याला ऐकू यायचा. क्लिनिक बंद झाले की ती निळ्याला जवळ घेऊन बसायची आणि त्याला गप्पांमधून सुंदर स्वप्ने दाखवून पागल करून सोडायची. आपल्या मैत्रिणीसारखी मुलगी कुणाच्या आयुष्यात असली की मग कुणी घराबाहेर जाऊन काम केले काय आणि नाही काय, असा कितीसा फरक पडतो? कुणाला करायचे असेल काम- तर त्याने करावे. ज्याला घरी बसायचे आहे त्याने मस्त घरी बसावे. आपली आई इतकी कामात असायला हवी होती, की तिला घरी यायला महिनाभर वेळच मिळू नये असे त्याला वाटायचे. पण त्याची आई त्यांच्या बंगल्याच्या गच्चीवर मासिक चालवायची आणि त्यांच्या संपूर्ण बंगल्यावर राग, दु:ख, आगपाखड आणि अन्याय यांचा पाऊस पडत असायचा. समाजात आनंद आणि शांतता निर्माण झाली की आपल्या आईचे करीअर संपेल, हे निळ्याला माहीत होते. त्यामुळे तो असे होण्याची मनापासून वाट पाहत होता.
प्राजक्ताला मात्र या सगळ्यापेक्षा वेगळे काहीतरी वाटत होते. तिने सगळ्यांचे सगळे बोलणे होऊ दिले आणि मग बोलण्यासाठी तोंड उघडले. ‘तुम्ही सगळे मूर्ख आहात..’ असे ती म्हणाली. आणि सावंतकाकू चहाचा ट्रे घेऊन अंगणात आल्या.
(क्रमश:)
सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com