आमच्या घरासमोरच्या अतिशय जुन्या अशा अलका चित्रपटगृहात मी अनेक वर्षांनी पाऊल ठेवले तेव्हा मला बाल्कनीकडे जाणारा जिना चढताना वरून सिनेमाचे आवाज ऐकू येऊ लागले. मनामध्येच. इंग्रजी जुन्या चित्रपटांचे आवाज. सुट्टीत दर आठवडय़ाला इथे पाहिलेल्या इंग्रजी सिनेमांचे आवाज. किंग कॉंग, गन्स ऑफ नेव्हरोन, घोस्ट, व्हेअर ईगल्स डेअर. मी आज अनेक वर्षांनी आतमध्ये जात होतो. दुपारची वेळ होती. आणि वरच्या प्रेक्षागृहात पंधरा-वीस प्रेक्षक विखरून बसले होते. एका इंग्रजी चित्रपटाचा हिंदीमध्ये डब केलेला शो चालू होता. त्यात नट नव्हते, न दिग्दर्शक होता. तंत्राचे खेळ चालू होते. मोठमोठय़ा गाडय़ा तुडवल्या जात होत्या. बाकी काही घडत नव्हते. मी आजूबाजूला पाहिले. खुच्र्या होत्या तशाच राहिल्या होत्या. लालबुंद रेक्झिनची आवरणे असलेल्या. मी माझ्या आयुष्यातला पहिला चित्रपट या ठिकाणी पाहिला होता. का कोण जाणे, मला ती रात्र अजूनही नीट आठवते. चित्रपटगृहाच्या बाहेर तिकिटांचा काळाबाजार करणारा एक अपंग माणूसही आठवतो. लहानपणी इथे मी सिनेमे पाहायला सुरुवात केली आणि नंतर कॉलेज संपेपर्यंत इथेच येऊन सिनेमे पाहत राहिलो. आयुष्यातील सुरुवातीच्या अनेक वर्षांच्या भावविश्वात या जागेला फार महत्त्व आहे. मला माझ्या नव्या चित्रपटात हेच चित्रपटगृह हवे होते. कारण हा चित्रपट माझ्या शहराची कथा सांगतो. इथल्या जुन्या पेठांमध्ये राहणाऱ्या माणसांचे आयुष्य दाखवतो. स्वयंपाक आणि पाककृतींच्या द्वारे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लहानपणी मी अलकाचा जिना चढून वर जायचो तेव्हा जिन्याजवळच्या भिंतीवर अनेक मोठमोठय़ा हॉलीवूड स्टार्सचे फोटो लावलेले असत. ते मी डोळे विस्फारून पाहत, हळद-मीठ लावलेले पॉपकॉर्न खात वरती जात असे. ते सगळे फोटो नाहीसे झाले होते. ते कुठे गेले, कधी, कुणी पळवले, याचा व्यवस्थापकांना पत्ता नव्हता. जिन्यावर सगळीकडे पानाच्या पिचकाऱ्या होत्या. मी माझ्या कलादिग्दर्शिकेला सांगून संपूर्ण जिना साफ करवला. त्यावर लाल वेल्वेटचा सुंदर गालिचा अंथरला. जिन्यावर माझ्या लहानपणी होते तसे सगळे जुने फोटो तिने फ्रेम करून आणून लावले. एक सुंदर, जुने झुंबर तिने जिन्यावर आणून अडकवले. संपूर्ण जिन्याला तिने रोषणाई केली. चित्रपटात सोनाली जे पात्र साकारते आहे तिला सिनेमे पाहायची भारी हौस असते. त्या दिवशी मी माझ्या लहानपणी होते तसे सुंदर, भव्य, श्रीमंत एकपडदा चित्रपटगृहाचे स्वरूप आमच्या चित्रीकरणासाठी तिथे साकार केले. सोनाली आपल्या वेशभूषेत त्या जिन्याच्या पायऱ्या चढून वर गेली तेव्हा माझ्या मनाला फार बरे वाटले.
दुसऱ्या दिवशी मी माझ्या मनाला हे सांगितले की, यापुढे मी सिनेमातल्या प्रसंगांसाठी अशा पद्धतीने काळ मागे फिरवत बसणार नाही. असे करणे दमवून टाकते. आणि शिवाय असे करत बसल्याने आपल्या शहराला वर्तमानातील स्वरूपात आपण बहुधा स्वीकारत नाही आहोत. यापुढे असे नको करायला. यापुढे आपल्याला आपल्या नष्ट झालेल्या वास्तुरचना अंगावर घेऊन उभ्या असलेल्या नव्या ओबडबोधड शहरातच काम करावे लागेल.
ऐंशी-नव्वद सालापर्यंत भारतीय शहरांतील वास्तुरचनेचा साज आणि बाज ज्यांनी अनुभवला आहे, त्या माझ्यासारख्या लोकांना सध्या उभारल्या गेलेल्या नव्या इमारती बघवतही नाहीत. सिनेमात त्यांचे चित्रीकरण करणे ही फार लांबची गोष्ट झाली. माझ्या सौंदर्यदृष्टीच्या व्याख्येत त्या बसत नाहीत. दरवेळी शहरात चित्रीकरण असले कीमी माझ्या सहकाऱ्यांच्या सोबतीने जुनी घरे, जुने वाडे शोधत फिरतो. कधी ते मिळतात. जेव्हा मिळत नाहीत तेव्हा त्यांची प्रतिरूपे तयार करत बसतो. कॅमेऱ्याच्या डोळ्याला नवी वास्तुरचना काही केल्या चांगली दिसत नाही.
आयुष्यात इतर सर्व बाबतीत भूतकाळ आणि स्मरणरंजन याबाबत बेफिकीर असणारा मी वास्तुरचनेच्या बाबतीत फार संवेदनशील आहे. किती निर्बुद्ध, सामान्य आणि साचेबद्ध असावेत आपल्या शहरातील वास्तुरचनाकार! भारतातील एकामागून एक सर्वच्या सर्व शहरांतील दृश्यात्मकता या माणसांनी गेल्या वीस वर्षांत संपूर्ण नष्ट करून टाकली. फक्त अतिश्रीमंत माणसांची फार्म हाऊसेस बांधताना ती जपली गेली. आपली सगळी शहरे केराच्या टोपलीत या माणसांनी फेकून दिली. काळाचे फिरणारे चक्र नव्या वास्तुरचनेमुळे उग्र, भेसूर आणि भीषण वाटू लागले. पैसा आणि सौंदर्य याचा थेट संबंध नव्या पिढीच्या वास्तुरचनाकारांनी तयार केला आहे. पैसा फेकाल तरच सौंदर्य मिळेल, ही व्यवस्था या लोकांनी नकळतपणे रुजवली. अनेक वेळा भरपूर पैसे फेकून जे काम हे लोक उभे करतात, तेसुद्धा अनेक वेळा बटबटीत आणि नवश्रीमंती भेसूर असते. या कामाच्या पद्धतीचा परिणाम म्हणजे आपली आजची शहरे आहेत. वास्तूरचनाकारांचे चुकीचे निर्णय शहराच्या शरीरावर कायमचे घाणेरडे डाग उमटवतात. प्रत्येक वेळी एक नवीन घर बांधताना ही मंडळी शहराच्या दृश्यात्मकतेचे अपरिमित नुकसान करत असलेली आपल्याला गेल्या वीस वर्षांत दिसतात. ही माणसे कुठे शिकतात? यांना शिकवणारी मंडळी कोण असतात? यांना कोणत्याही प्रकारची व्यावसायिक नीतिमत्ता आणि किमान सौंदर्यदृष्टी असते का? असे प्रश्न नव्या भारतीय शहरांमध्ये फिरताना आपल्याला पडतात.
प्रत्येक कलाकाराच्या मनात एक शहर वसलेले असते. मग तो गायक असो, कवी असो, लेखक असो किंवा चित्रकार असो. ते शहर, त्याचे स्वरूप, तिथला प्रकाश, तिथले आवाज त्याच्या मनात उजळलेले असतात. आपले काम सुरू करताना, कथा सांगताना, गाणे किंवा कविता मांडताना त्याचे मन त्याच्या मनातील शहरातून प्रवास करीत असते. अगदी गायकाचे मनसुद्धा. कारण गाण्याला अंतर्गत आणि बा अशा दोन्ही स्वरूपाची दृश्यात्मकता असते. भारतीय शहरांच्या सद्य:स्वरूपाचे कोणतेही प्रतिबिंब कोणत्याही सुज्ञ आणि शांत कलाकाराच्या मनामध्ये पडणार नाही. भारतात स्वच्छता आणि शांतता या दोन्ही अतिशय महाग गोष्टी आहेत. त्या भारतात मिळवायच्या असतील तर खूप पैसे मोजायची तयारी ठेवावी लागते. किंवा कोणतेही काम करण्यासाठी इतर देशात जाऊन राहावे लागते.
या सगळ्याचा परिणाम हा, की चित्रपट बनवताना स्टुडिओमध्ये खोटे सेट उभारावे लागतात. किंवा आपल्या मनातील शहराचा शोध घेत इमारती आणि खोल्यांमध्ये बदल घडवीत चित्रीकरण पार पाडावे लागते. गेल्या आठवडय़ात मला एका प्रकल्पासाठी श्रीलंकेच्या शासनाची हाक आली- की जुन्या वास्तू आणि जुने रस्ते आम्ही आमच्या देशात नीट जपले आहेत, तुम्ही आमच्याकडे येऊन चित्रीकरण करा. हे रस्ते अगदी भारतातील ब्रिटिशांनी बांधलेल्या रस्त्यांसारखे सुबक आणि पक्के आहेत. आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य आणि तांत्रिक मदत देऊ.
मला यामुळे फार वाईट वाटले. बहुसंख्य देशांमध्ये शहरांची दृश्यात्मकता फार काळजीने जपून ठेवलेली असते. काळाने आपली शहरे गिळून टाकली आहेत असे म्हणताना तो काळ म्हणजे आपल्या शहरातील नवे बिल्डर आणि त्यांच्या पदरी काम करणारे वास्तुरचनाकार आहेत, हे आपल्या लक्षातच येत नाही. सुबकता आणि सौंदर्य जपायला नेहमी भरमसाठ पैसे पडतात असे नाही.
यावेळी पुण्यातील जुन्या पेठांमध्ये चित्रीकरण चालू असताना अनेक लोकांनी फार मोकळेपणाने आपली जागा कामासाठी देऊ केली. काही घरमालकांनी आपले घर चित्रपटात कायमचे टिकून राहील, या भावनेने कामाला परवानगी दिली. काही घरे येत्या काही महिन्यांत पाडली जाणार होती. तिथे इमारती उभ्या होणार होत्या. एक म्हातारे जोडपे आपल्यानंतर आपले घर टिकणार नाही, पाडले जाईल, या विवंचनेत होते. ‘पुढील अनेक वर्षे आमच्या घराचे आणि अंगणाचे स्वरूप तुमच्या चित्रपटात नीट जपून राहील,’ असे ते म्हणाले.
एका जुन्या पेठेत काही दिवस काम करताना समोर राहणारे एक आजोबा आम्हाला रोज धमक्या देत. ‘तुम्हाला मारून टाकेन. तुमचे सामान फेकून देईन. किती माणसे येतात आणि दिवसभर कलकल करतात. समजता काय तुम्ही स्वत:ला?’ आम्ही रोज जाऊन त्या आजोबांच्या पाया पडून येत असू. मग उरलेला दिवस शांत जाई. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी एक नवीन धमकी येत असे. त्या आजोबांची नातवंडे सेटवर आनंदाने शूटिंग पाहायला येत. नटांसोबत सतत फोटो काढून घेत. आजोबांना सिनेमा पाहायला फार आवडत असे. सिनेमा जर पाहायला आवडतो तर आम्ही काय तो चंद्रावर जाऊन बनवून आणू का? आम्ही तुमचे वैरी आहोत का? सगळ्यांनी आम्हाला हाकलले तर आम्ही काय जंगलात जाऊन प्राण्यांचे सिनेमे बनवू का? असे प्रश्न मला रोज पडत. गाणे आवडते, पण रोज रियाज करणारा गायक कुणालाच शेजारी नको असतो, तसे असते हे.
चित्रीकरण संपता संपता मी स्वत:ला पुन्हा समजावत राहिलो की, आता आपल्या मनातील आणि स्मृतीतील हे शहर पुन्हा उभारण्याचा आपला अट्टहास आपण आता थांबवू. नव्या काळाशी हातमिळवणी करून घेऊ . नव्या कुरूप दृश्यात्मकतेला शरण जाऊ. यापुढे आपल्या चित्रपटात जमिनीवर पडलेले उन्हाचे कवडसे नसतील. धुलीकणांनी भरून गेलेले. मला असे कवडसे शूट करायला फार आवडते. मी अनेक चित्रपटात असे शॉट्स घेतलेले आहेत. मला यावेळी पुण्यात महिनाभर राहून हे लक्षात आले, की लहानपणी त्या कवडशामध्ये धरून ठेवलेला हात आता काढून घेण्याची वेळ आली आहे.
सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com