काही दिवसांपूर्वी मुंबई ते पुणे असा ट्रेनने प्रवास केला. याआधी हा प्रवास ट्रेनने केला त्याला पंधराएक वर्षे उलटून गेली असतील. मी सध्या बनवत असलेल्या चित्रपटाच्या एका प्रवासाच्या भागाचे चित्रीकरण आम्ही फोनवरील कॅमेऱ्याने करायचे ठरवले. चित्रपटातील एक पात्र हा प्रवास करणार होते; ज्याचे टेस्ट शूटिंग करायला हवे होते. मुख्य शूटिंग आम्ही नंतर करणार होतो.

सकाळी सात वाजता सीएसटीहून सुटणारी डेक्कन एक्स्प्रेस सुरू झाल्यावर माझा नट मला म्हणाला, ‘मी, म्हणजे माझे पात्र ट्रेनने का प्रवास करते आहे? मी पुण्याला जायचे आहे तर सरळ टॅक्सी घेऊन एक्स्प्रेस-वेने का जात नाही?’ माझ्याकडे त्या प्रश्नाचे लगेच उत्तर सापडले नाही. पण काही वेळाने मी विचार करून त्याला असे म्हणू शकलो की- ‘ट्रेनमधून प्रवास करताना माणसांचे विचारमग्न चेहरे जास्त सुंदर दिसतात. ट्रेनच्या खिडकीशी बसून शांतपणे प्रवास करताना विचार करणारे चेहरे कॅमेऱ्यात पकडायला फार चांगले वाटते. टॅक्सीमधून वेगाने जाणारा माणूस विचार करताना दिसेल, त्यापेक्षा खूप वेगळं काहीतरी ट्रेनमधून जाणाऱ्या माणसाला पाहून वाटेल, हे त्यामागचे कारण असावे.

central railway loksatta
प्रवासी सेवेतून रेल्वेच्या तिजोरीत खणखणाट; अत्याधुनिकीकरणामुळे खानपान सेवा व गैर-भाडे महसुलात…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
thane station disabled coaches
ठाणे : अपंगांच्या डब्यात धडधाकड प्रवाशांची घुसखोरी, तीन वर्षांत नऊ हजारहून अधिकजणांवर कारवाई
Technical work Sindhi railway station, trains cancelled,
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘या’ ९ रेल्वे रद्द…
India railways meaning of h1 h2 a1 written on train
India Railways : ट्रेनच्या डब्यावर H1, H2, A1 का लिहिलेले असते? याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या
number of disabled coaches in Central Railways suburban journeys has increased in recent years
रेल्वेतील अपंगांच्या डब्यात घुसखोरी, तीन वर्षांत ९ हजार जणांवर कारवाई
indian Railways viral video Passenger fight with tte
“तुला माहितीये का मी कोण”, विनातिकीट प्रवाशाची धमकी, टीटीईने काही क्षणांत उतरवला माज; video viral
Kumbh Mela Special Railway Pune, Kumbh Mela Prayagraj ,
कुंभमेळ्यानिमित्त पुण्यातून विशेष रेल्वे… कोणत्या मार्गे आणि केव्हा धावणार ?

माणसाच्या मनातील वेदनेला सचित्र स्वरूप देणे सोपे नसते. लिखित साहित्यामध्ये माणसाच्या मनातील वेदनेचे नेमके स्पष्ट वर्णन करून त्या वेदनेचे सूक्ष्म स्वरूप साकारणे शक्य होते. पण असा चेहरा जेव्हा सिनेमाच्या कॅमेऱ्यासमोर येतो तेव्हा त्या चेहऱ्यावर उमटणारी वेदना साकार करायला प्रकाश आणि अंधाराच्या साहाय्याने वातावरणनिर्मिती करावी लागते. वेदनेचा माहोल असतो. तो संवेदनशीलतेने साकारावा लागतो. गुरुदत्त यांचे सिनेमे पाहताना आपण प्रेक्षक म्हणून हे पाहिलेले असते की- वेदनेचे किती जिवंत आणि नेमके स्वरूप त्यांनी साकार केले. वहिदा रेहमान आणि गुरुदत्त यांच्या चेहऱ्यावर उमटणारी गर्भश्रीमंत वेदना पाहायला मी नेहमी पुन्हा पुन्हा त्यांच्या चित्रपटाकडे वळतो. कोणत्याही  नटाची गुणवत्ता तो वेदना कशी साकारतो यावर अवलंबून राहते. कारण हसरे चेहरे सगळेच एकसारखे दिसतात. पण विचारमग्न आणि वेदनेने ठसठसणारा प्रत्येक चेहरा वेगळा असतो. ‘माचीस’ या चित्रपटात ‘पानी पानी रे.. खारे पानी रे’ हे गीत अतिशय संयत वेदनेने म्हणणारी तब्बू आपल्याला हे सांगत असते, की मी नुसती नाचगाणी करणारी नटी नाही. मी त्यापेक्षा खूप काही जास्त आहे.

माझी स्वत:ची वेदना मांडायची शैली आहे.

कितीतरी चित्रपटांमध्ये आणि कितीतरी आवडत्या पुस्तकांमध्ये रेल्वेने प्रवास करणारी पात्रे आपल्याला भेटतात. माझा आवडता ‘इजाजत’ हा चित्रपट गुलजारसाहेबांनी रेल्वेच्या अंगाखांद्यावर खेळवत ठेवला आहे. प्रकाश संतांच्या लंपनच्या अंगातून एखाद्या रक्तवाहिनीसारखे गावातले रेल्वेचे रूळ गेले आहेत. ‘स्वदेस’मधील मोहन भारतात येतो तेव्हा रेल्वेने प्रवास करताना त्याला आपल्या देशाचे भान येते. ‘पाथेर पांचाली’मधील रेल्वेचे भगभग करत जाणारे इंजिन आपल्याला काळ बदलणार आहे याची धास्ती देते. यंत्रयुगाची आणि शहरीकरणाची तसेच स्थलांतराची जाणीव करून देते.

माझ्या कॅमेरामनच्या हातातील फोनमधील छोटय़ा, पण अतिशय ताकदवान कॅमेऱ्यावर मी माझ्या नटाचा चेहरा टिपत राहिलो. माझे पात्र ट्रेनमध्ये बसले होते. त्याला ती थांबवता येणार नव्हती. मध्येच उतरून जाता येणार नव्हते. तो त्या प्रवासात बंदिवान झाला होता. त्याला प्रवास पूर्ण करावा लागणार होता. प्रवास करण्याचा त्याने घेतलेला निर्णय आता बदलता येणार नव्हता. ट्रेन बोगद्यात शिरली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर छायाप्रकाशाचे फार सुंदर खेळ सुरू झाले. त्याच्या मनातील विचारांना ट्रेनच्या तालबद्ध आवाजाची लय आली. चेहरा बोगद्यातून प्रकाशात येई आणि पुन्हा काही क्षणांनी अंधारात लुप्त होत असे.

मी अनेक वर्षांपूर्वी असा प्रवास कितीतरी वेळा केला आहे. दोन्ही दिशांना केला आहे; जेव्हा माझ्या आयुष्यात खूप संभ्रम होते. मी घेतलेले निर्णय पुढे कसे ठरतील याची खात्री नव्हती. सिनेमा-नाटकाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व मराठी माणसांची आयुष्ये ही पुणे आणि मुंबई या दोन शहरांमधील प्रवासाच्या दोरीवर लटकत असतात. मी एकेकाळी स्वप्नांनी भारलेला आणि स्वत:ला कामात झोकून दिलेला मुलगा होतो. मी महिन्याचा पास काढून रेल्वेने पुणे- मुंबई प्रवास करीत असे. मला त्या प्रवासात कधी कधी सई परांजपे दिसत असत. त्या डेक्कन क्वीनच्या चेअर-कारमध्ये शांतपणे वाचत बसलेल्या असत. माझ्या फार आवडत्या दिग्दर्शक. त्या जे काम करतात तेच मला पुढे करायचे होते. आणि मला कधी त्या प्रवासात असल्या की चांगले वाटत राही. माझे त्यावेळी मुंबईत घर नव्हते. मुंबईत राहायला घर असलेली आणि तिथे आयुष्याला स्थैर्य असलेली माणसे मला त्या काळात फार सुदैवी वाटत असत. काही दिवस माझ्या बहिणीकडे राहून कोणत्याही  शूटिंगचे एक शेडय़ुल संपले की मी परत पुण्याला निघून येत असे. माझे आणि मुंबई-पुणे रेल्वेप्रवासाचे फार लहानपणीपासून नाते होते. मला ही शहरे कधीच दोन स्वतंत्र शहरे वाटली नव्हती. अगदी लहान असल्यापासून मी या दोन्ही शहरांत विभागून राहत आलो. त्या दिवशी ट्रेनमध्ये शूटिंग करताना मला त्या सगळ्या दिवसांची आठवण झाली.

भारतातील रेल्वेला एक विशिष्ट वास असतो. तो चांगल्या-वाईटाच्या पलीकडे असतो. तो वास अजूनही बदललेला नाही. या दोन्ही शहरांमध्ये नेमाने प्रवास करणाऱ्या लोकांना वाटेत खायला मिळणारा रुचकर मेवा माहीत असतो. त्याची चवही तशीच आहे. त्यातले अनेक पदार्थ ट्रेनमधील उपाहारगृहात ताजे बनतात आणि काही गोष्टी फलाटावरून विकायला गाडीत येतात. आपण कुठेतरी निघून गेलो तरी या मार्गावरचे सगळे होते तसेच चालू आहे. चिक्की आहे. ट्रेनमध्ये ताजी बनणारी कटलेट्स आहेत. घाटात मिळणारी जांभळे-करवंदे आहेत. दिवाडकरांचे कर्जतचे वडे आहेत.

ट्रेनने प्रवास करणाऱ्या माणसांचे चेहरे आपापले उतरायचे स्टेशन जवळ येऊ  लागले की सावकाश बदलू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर पुढील दिवस उमटू लागतो. पोटापाण्यासाठी आणि नोकरीसाठी कित्येक लोक हा चार आणि चार असं मिळून आठ तासांचा प्रवास दररोज करतात. घरापेक्षा जास्त ती माणसे या मार्गावर धावणाऱ्या ट्रेन्समध्ये असतात.

माझा एक मुंबईचा मामा होता- जो फार पूर्वीच गेला. साधा होता. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करून घराचा गाडा ओढणारा. दहिसर ते चर्चगेट असा ट्रेनने रोज प्रवास करणारा. त्याला रेल्वेची खूप माहिती तोंडपाठ होती. आणि त्याला कोणत्या स्टेशनचा फलाट कोणत्या बाजूला येणार आहे, हे पाठ असायचे. मला लहानपणी त्याचे कौतुक वाटायचे. आणि मला त्याचे कौतुक वाटते याचे त्याला बरे वाटायचे. मोठे झाल्यावर आपल्याला अशा सामान्यज्ञानाची कौतुके वाटणे बंद होते आणि घरातली आपली माणसे सोपी आणि कंटाळवाणी वाटू लागतात. पण परवा खंडाळ्याच्या बोगद्याच्या अंधारात माझा तो मामा माझ्याशेजारील खिडकीबाहेर चमकून गेला. अंधारात काही वेळ त्याने माझ्यासोबत प्रवास केला. तशीच आमच्या नात्यातील एक मुलगी चमकून गेली.. जी फलाटावर सामान वाहून न्यायला हमाल करायची. लहानपणी आमच्याकडे इतके पैसे कधीच नसत. आणि पैसे असले तरी आपले सामान वयाने खूप मोठय़ा असलेल्या आजोबांच्या डोक्यावर द्यायला मनाला फार संकोच वाटायचा. ती मुलगीसुद्धा परवा खिडकीबाहेर काही काळ चमकून गेली.

बोगद्यात गाडी शिरल्यावर नक्की किती अंधार होतो हे मला तपासून पाहायचे असायचे. मी लहान असताना बोगद्यात गाडी शिरली की आजूबाजूच्या माणसांना जीभ बाहेर काढून वेडावून दाखव.. असले उद्योग करत त्यांना नक्की किती दिसते याचा अंदाज घेत बसायचो. आणि चेहऱ्यावर प्रकाश यायच्या आत पुन्हा चेहरा साळसूद करून शांत व्हायचो.

ट्रेन सुटते तो क्षण अतिशय नाटय़मय असतो. इतर कोणतेही वाहन इतक्या भावनिक नाटय़मय रचनेने सुटत नाही. हातातून काहीतरी सुटून चालल्याची भावना आपल्याला ट्रेन देते. एक शिट्टी होते; ज्याने मन सतर्क होते. आणि आपण सगळ्यांनी आयुष्यात नेहमी अनुभवलेला तो पहिला धक्का बसतो आणि सावकाश फलाट मागे सरकू मागतो. बाहेर सोडायला  आलेली माणसे सावकाश मागे पडतात. आणि आपण पुढे जात असल्याबद्दल आपल्याला काही काळ स्वत:विषयी काहीतरी महत्त्वाचे वाटून जाते.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com

Story img Loader