मी काल तुला पाहून हरखून गेलो. कारण तू अतिशय सुंदर दिसत होतीस. आपण दोघे वेगळे झाल्यानंतर तू आनंदी नसशील, एकटी राहत असशील, आणि तुला तुझ्या वयापेक्षा अकाली मोठेपण आले असेल असे मला सुप्तपणे आतून अनेक वर्षे वाटत होते. पण तू तर पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त सुंदर दिसत होतीस. आपल्या दोघांमध्ये चांगले कोण दिसते याची चढाओढ आहे, असे मित्रमंडळी आपल्याला म्हणत असत. आजही आपल्याविषयी तेच म्हणता येईल. मला तुझ्या शरीराची ठेवण, तुझी नवी हेअर स्टाईल, तुझे सुंदर लांब पाय पाहून फार असूया उत्पन्न झाली. माझ्या स्वप्नात मी तसाच फिट् आणि देखणा आणि तू वजन वाढलेली, कंबर सुटलेली, दमलेली बाई होतीस. ते माझं स्वप्न मोडून पडले.
तू आज हॉटेल सोडून जाणार आहेस, असे लॉबीत विचारले तेव्हा कळले. परत कधी दिसशील याची खात्री नाही. तुझ्यासाठी हे पत्र लॉबीत सोडून जातोय. आपण एका मजल्यावर शेजारच्या खोल्यांमध्ये काल रात्री राहिलो, हा प्रसंग ताबडतोब एखाद्या सिनेमात जायला हवा.
दहा वर्षांनी मी तुला पहिल्यांदा पाहिले. निराळे होण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून पहिल्यांदा. आपण निराळे झालो आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आपल्याला वेगळे होण्यापासून कितीतरी लोकांनी परावृत्त केले. आपल्या कुटुंबीयांच्या हे लक्षात येत नव्हते, की आपले नाते संपले आहे, आणि ते उगाच टिकवण्यात काही अर्थ नाही. आपल्या दोघांना ते उमजले होते. त्यांना नाही. माणसांनी काही काळानंतर वेगळे होण्याची आपल्या कुटुंबात कुणालाही सवय नव्हती. आज हे आठवले की मला हसू येते. दोन माणसांचे जमत नसेल तर त्यांना वेगळे होण्यास मदत करणे आपल्या आजूबाजूच्या कुणालाही जमले नाही. आपल्याला ती एकच तर मदत हवी होती.. कुटुंबाकडून, मित्रांकडून. पण त्यांना वेगळे होणे म्हणजे दु:ख आणि दुर्दैव वाटत होते. आपल्याला हे लक्षात आले होते की, आपल्याला आता एकमेकांची आठवण येणे बंद झाले आहे. आपल्याला एकमेकांचे वास नकोसे झाले आहेत. आपण साधी-सोपी जनावरे आहोत. कुणीतरी एकाने जंगल सोडून जाणे गरजेचे आहे.
प्रेम होते म्हणूनच वेगळे व्हायचे होते.
तू सोडून गेल्यावर माझे अवसान गळाले आणि आयुष्यात माझी फार फरफट झाली. तो काळ आपल्या विलग होण्याने मला अनुभवायला मिळाला, याबद्दल मी आज आभार मानतो. कारण मी आईच्या मांडीवरून तुझ्या मांडीवर आलेला साधा भारतीय मुलगा होतो. एकदा पडलो तेव्हापासून वणवण सुरू झाली आणि त्यातून जगण्याचे काहीतरी चांगले सूत्र गवसले. मी खूप निवांत आहे आणि मला काहीही झालेले नाही असे मी दाखवत बसलो तरी आतून मी पार मोडकळीला आलो होतो. मला निर्णय घेता येत नव्हते. कारण एक माणूस म्हणून मी जगण्याचे निर्णय एकटय़ाने घेतले नव्हते. सतत निर्णय घोळक्याने घ्यायचे आणि त्यातल्या कुणीही त्या एकाही निर्णयाची जबाबदारी घ्यायची नाही, अशी सवय मला कुटुंबात राहून लागली होती. ती जायला वेळ लागला.
मी फार बेताल, पण रंगीत निर्णय त्या काळात घेतले. मी आज जो आनंदी आहे त्याचे कारण त्या रिकाम्या काळात एकटय़ाने घेतलेले बरे आणि वाईट निर्णय आहेत. मी भरपूर प्रवास केले. एकटय़ाने प्रवास केले. त्यामुळे अनेक अनोळखी माणसे मला भेटली. अनेक माणसे माझ्या आयुष्यात आली आणि निघून गेली आणि मला तात्पुरत्या नात्यांचे महत्त्व कळले. आपण दोघांनी आपल्या नात्यात इतर काही घडायला जागाच ठेवली नव्हती, हे मला लक्षात आले. मी एका अनोळखी मुलीसोबत फक्त एक संध्याकाळ समुद्रकिनाऱ्यावर चालण्यात घालवली. आणि तिच्याशी मी ज्या गप्पा मारल्या, त्या अगदी जवळच्या मित्राशीही किंवा तुझ्याशीही मारू शकलो नव्हतो. तात्पुरत्या नात्यात कोणतीही भीती आणि असुरक्षितता नसते. मी मनाला त्रास होत असूनही आणि अपराधी वाटत असूनही अनेक नवी शरीरे आणि नवीन मने त्या काळात हाताळायला शिकलो. जे मी याआधी कधीच केले नव्हते. माझ्या मनाचा अनेक वेळा जाळ झाला, पण त्यानंतर अनेक शरीरांनी माझ्या मनावर फुंकरही घातली. मी घट्ट आणि पूर्ण होत गेलो. आयुष्यात फार लवकर आपण दोघांनी एकमेकांना चुकीची आणि अनावश्यक आश्वासने देऊन एकमेकांची वाढ खुंटवली होती असे मला अनेक वेळा प्रकर्षांने वाटत राहिले. तुला तसे वाटले का? आपण दोघे आपापल्या आई-वडिलांच्या आयुष्याची आणि प्रेम करायच्या पद्धतीची झेरॉक्स मारत बसलो होतो. आणि आपण आपल्या आयुष्याची फार महत्त्वाची वर्षे त्या फालतूपणात घालवली, हे तुला कधी लक्षात आले का? आपल्याला या महाग आणि प्रदूषित काळात दोन मुले होऊन आत्ता आपण एकमेकांना शिव्या घालत आणि रात्री दोन दिशांना तोंडे करून झोपत आयुष्य काढण्यापेक्षा पंचविसाव्या वर्षी सरळ भांडून मोकळे झालो, याइतके सुसंस्कृत वागणे मी जगात दुसरे पाहिले नसेल.
गेल्या वीस वर्षांत मी जागेपणी एक आयुष्य जगत आलो आणि झोपेमध्ये एक संपूर्ण वेगळे. पहिली काही वर्षे तू माझ्या स्वप्नात आली नाहीस; पण नंतर अनेक उग्र आणि सौम्य स्वरूपात सातत्याने येत राहिलीस. अनेक दु:खी क्षणांना मी तुझ्या कुशीत येऊन झोपलो. मी एकदा तुला ट्रेनमधून ढकलून दिले. एकदा तू माझ्या घरी तुझ्या मावसबहिणींचा मोर्चा घेऊन आली होतीस. सगळ्या बायकांचा तोच एक भांबावलेला चेहरा होता. पुढे तू होतीस. मी सिगरेट पीत होतो आणि तो मोर्चा येतोय असे म्हटल्यावर मी गच्चीतून तुमच्यावर गरम पाणी ओतले होते.
पण एक अनुभव तुला सांगायलाच हवा. मी दूरच्या एका देशात समुद्रकिनाऱ्यावर बसून एक अप्रतिम तळलेला मासा खात होतो. मला त्यावेळी तुझी फार जोमाने आठवण आली. शाकाहारी घरातून आलेली तू- माझ्यामुळे काय काय खायला, प्यायला लागलीस, याची मला सरसरून आठवण आली आणि तुझ्याविषयी फार चांगले काहीतरी वाटून गेले.
याचा अर्थ असा नाही, की मी तुला आणि तुझ्या आठवणींना कुरवाळत बसलो. तुझ्याविषयी खूप वाईट बोलून मी अनेक प्रकारची सहानुभूती मिळवली आणि खूप नवी व आकर्षक नाती जोडली. ती सर्व नाती तयार होताना मी- तू कशी कंटाळवाणी आणि वाईट आहेस आणि मी किती चांगला, बिचारा आहे, अशा कहाण्या तयार करून सांगितल्या. अनेक लोकांची मी अशा गोष्टींनी खूप करमणूक केली.
मला तुझा पहिल्यांदा कंटाळा आला होता तो क्षण अजूनही शांतपणे आणि नीट आठवतो. त्याक्षणी सगळे बदलले. आपण दोघे एका रेस्टॉरन्टमध्ये बसून शांतपणे जेवत होतो. तू उठून बाथरूमला जाण्यासाठी वळलीस आणि तुझी पर्स खाली पडली. तू घाईने त्यातून सांडलेल्या वस्तू जमिनीवर बसून गोळा करत बसलीस. तुला तसे पाहताना मला पहिल्यांदा तुझा कंटाळा आला होता. त्या दृश्याने मला का कंटाळा आला होता, हे मला आजही कळलेले नाही. मला त्यावेळी तुला सोडून जावेसे पहिल्यांदा वाटले. सर्व नात्यांच्या मुळाशी घट्ट शारीरिकता असते. मी हे सत्य गेल्या काही वर्षांच्या प्रवासात शिकलो. आणि मी शरीराशी खोटे बोलायचे नाही, हे जसे शिकलो तसेच शरीराच्या मागणी आणि पुरवठय़ाकडे दुर्लक्ष करायचे नाही, हेसुद्धा शिकलो. मला खात्री आहे, की तूसुद्धा हेच शिकली असणार. तसे नसेल तर तू आज सकाळी जशी दिसत होतीस तशी दिसली नसतीस.
आपण वेगळे होणार हे कळल्यावर आपल्या कुटुंबीयांनी जी आगपाखड केली, जी रडारड केली ते पाहून आपण दोघेही हसलो होतो. तुझे सामान न्यायला तुझा येडा भाऊ आला होता, तेव्हा त्याने माझ्याकडून सिगरेटी मागून घेतल्या आणि आम्ही दोघांनी त्या गच्चीत जाऊन फुंकल्या. त्याला माझ्या ऑफिसात नोकरी हवी होती आणि आपण वेगळे झालो तरी मी वशिला लावू शकेन का, असे त्याने मला विचारले.
आत आणि बाहेर अनेक गोष्टी घडल्या. जखमा झाल्या. आपण एकमेकांचे विषारी अपमान केले. पण त्याला कारण कुटुंबव्यवस्था, परंपरा आणि आपल्या आई-वडिलांनी उभे केलेले विषारी वकील आहेत. आपण दोघे नाही. आपण दोघे तेजस्वी आणि निष्पाप होतो. पंचवीस वर्षांची तरुण मुले होतो. आपण एकमेकांना आवडेनासे झालो होतो, त्यात आपला नक्की काय दोष होता?
सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com