मी आपल्या भाषेत तुला नोट लिहिते आहे, कारण मला असे कळले की, तू ज्या मुलांसोबत घर शेअर करतोस ती सगळी अभारतीय मुले आहेत. त्यामुळे इंग्लिशमध्ये लिहिणे सेफ नाही. त्यामुळेच आपल्या भाषेत लिहिते आहे.

पहिला मुद्दा संपवते.. ज्यासाठी ही नोट लिहिते आहे. कालच्याबद्दल खूप सॉरी. मी काल पार्टीमध्ये खूप वेडय़ासारखी वागले. मला कुणीतरी सांगितले की तुला गाणे आवडते. आपापल्या ओरिजिनल भाषेत प्रत्येकाने गाणे गायचे, ही आइडिया मान्युएलाची होती. तिने इटालियन भाषेत गाणे म्हटले म्हणून मी मराठीत म्हणाले. खरे तर मी ते गाणे तुला इम्प्रेस करायला म्हटले होते. पण तू मी गायला लागले तसा हातातला बियरचा ग्लास टेबलवर ठेवून बाहेर निघून गेलास तेव्हा मला फार स्ट्रेंज वाटले आणि तुझा रागही आला होता. मी उगाच तुला इम्प्रेस करायला गेले.

मला तुझ्याशी बोलायचे आहे. युनिव्हर्सटिीबाहेर कोपऱ्यावर ‘जिमी’ नावाचा एक जुना पब आहे. उद्या संध्याकाळी तिथे येशील का? मी सहा वाजता तिथे तुझी वाट पाहीन. आणि घाबरू नकोस.. मी ‘धुंदी कळ्यांना’ हे मराठी गाणे म्हणणार नाही. आमच्या घरी एक मराठी गाण्यांची सीडी आहे. माझे बाबा ती रोज वितळून जाईपर्यंत ऐकतात. त्यात ते गाणे होते. म्हणून मी ते म्हणाले. सी यू. होप, की तू येशील.

– नीरा

मी काल तुला एव्हढीच नोट ठेवून जाणार होते, पण खालचा कागद कोरा होता आणि उगाच तुला माझ्याविषयी नवीन प्रॉब्लेम तयार व्हायला नकोत म्हणून अजून लिहिते आहे. माझे नाव आमच्या गावाजवळून जाणाऱ्या नदीचे नाव आहे. मी ती नदी पाहिलेली नाही, पण माझ्या आजीचे नाव पण तेच होते. मला आपली भाषा आवडते. आमच्या घरी आम्ही सगळे ती आवडीने बोलतो. इतकेच नाही तर मला माझे नावही आवडते. त्याचा साऊंड फार आवडतो. मला तुझ्याही नावाचा साऊंड आवडतो. तुझे नाव महाभारतामधील एका माणसाचे नाव आहे, हे तुला माहीत आहे का? तो माणूस फार शूर होता. मला मराठीत लिहायची सवय माझ्या आईने लावली आहे. मी खूप लहान असल्यापासून ती मला रोज एक पान मराठीत लिहिले की खाऊ द्यायची.

तू गाणे शिकला आहेस, असे माझी क्लासमेट म्हणाली. मला तुझे सगळे स्वेटर फार आवडतात. इथे असे मिळत नाहीत. इंडियामधून येताना तुझ्यासाठी घरी कुणी ते बनवले आहेत का? म्हणजे विणले आहेत का? तू कसले गाणे गातोस? मराठी गाणे अजून कोणते आहे? मला माहीत नाही. मी तुला मोकळेपणाने डेटवर यायला विचारते आहे आणि तुझे कौतुक करते आहे, त्यामुळे तू उगाच स्मार्टपणा करू नकोस. कारण तो माझ्यासमोर चालणार नाही. मी माझ्या घरच्यांना आणि एकंदरच सगळ्यांना पुरून उरणारी मुलगी आहे, असे माझी आई म्हणते. मी तुला डेटवर बोलावते आहे, ते तू मराठी आहेस म्हणून नाही. मला तुझा रिसर्चचा विषय कळला आहे. आणि मला तुला अजून काहीतरी विचारायचे आहे म्हणून बोलावते आहे. जसे की- आत्ता चालू असलेले इंडियातले म्युझिक. तुला त्याची माहिती असेल. शिवाय बुक्स. आमच्याकडे पाच हजार नऊशे जुनी मराठी बुक्स आहेत. माझे आई-बाबा पुण्याला गेले की तीच तीच पुस्तके घेऊन येतात आणि तेच तेच रायटर्स वाचत बसतात. ते फनी आहेत. पण गोड आहेत.

माझी आई मराठी नाटकांत पूर्वी मुंबईत कामे करायची. ती फार आठवणी काढत बसते. तू मराठी नाटके पाहिली आहेस का? या थॅन्क्स गिव्हिंगला आमच्याकडे मराठी लंच आहे. तुला मराठी माणसांना भेटण्याचा पेशन्स असेल तर तू आमच्या घरी येऊ शकतोस. तुझ्याकडे काही नवीन बुक्स असली तर मला तू ती देऊ शकशील. खरं तर तू उद्या येताना घेऊन आलास तर फार बरे होईल. काही सीडीज् आणि काही बुक्स. शिवाय मला तुला विचारायचे आहे की, तुझे हेअर कुणी सेट केले? ते तुला फारच चांगले दिसतात. मी फार मोकळेपणाने स्तुती करणारी मुलगी आहे. पण मी तितकीच रागीट आणि उद्धट आहे असे मला माझी आई म्हणते. ते तुला उद्या मला भेटल्यावर कळेलच.

मला तुझे डोळे आवडले. आणि तू फूटबॉल खेळताना मी चारही वेळा ग्राऊंडवर बाजूला उभी राहून तुझा गेम पाहत होते. तुला ते लक्षात आले का? तुझे डोळे किती शांत आहेत. तू गेल्या वीक एंडला इंडियन स्टोअरमध्ये मसाले घ्यायला आला होतास तेव्हा मला कळले, की तुला उत्तम स्वयंपाक येतो. मला येत नाही. मला शिकायला आवडेल. बाय द वे- मला तुला हे सांगायला आवडेल, की ते इंडियन स्टोअर आमचे आहे. माझे बाबा तीस वर्षांपूर्वी इथे आले आणि त्यांनी खूप कष्ट करून इथे अनेक बिझनेस सुरू केले. त्यातले काही चालले, पण काही काही नाही. पण त्यांनी कधी हार मानली नाही. मला ते फारच आवडतात. त्यांची एकच गोष्ट कंटाळवाणी आहे. ती म्हणजे वर्षांतून एकदा खूप मराठी माणसे एकत्र जमतात त्या संमेलनाला मला आणि माझ्या बहिणीला ते घेऊन जातात. तिथे गाणी, नाटके आणि भाषणे करायला महाराष्ट्रातून तीच तीच माणसे येतात. ती माणसे तेच तेच बोलतात आणि आपल्याला झोप येईल अशी गाणी म्हणतात. अनेक माणसे साडय़ा घालून जुनी नाटके पण करतात. त्याचे व्हिडीओ मी काढले आहेत. मी तुला ते दाखवेन. पण खरे सीक्रेट हे आहे, की ती संमेलने म्हणजे मुलामुलींची लग्ने जमवायचा चान्स असतो. त्यासाठी आम्हाला नेतात आणि मराठी माणसांसारखे वागायला लावतात. मराठी बायका कधीच नथ घालत नाहीत. पण ते आम्हाला नथ घालायला लावतात. ते सगळे फार बोअर असते. तुला तिथे कुणी नेले तर आधी तू नाही म्हण. खरे तर तुला काही लागले, किंवा प्रश्न असतील तर तू यापुढे आधी मलाच विचारत जा. मला वेळ असेल तर मी तुझी मदत करेन. मला आवडेल. मला इथे रात्री बाहेर पडून पहाटेपर्यंत कुठे कुठे जाऊन पार्टी करता येते, ते माहीत आहे. तुला काही लागले तर मी आहेच. तू नवा आहेस. घाबरू नकोस. आपला रिसर्चचा विषय एक नसला तरी फार वेगळा नाही. आपण एकमेकांसोबत जास्त वेळ घालवायला हवा.

‘बेंड इट लाइक बेकहॅम’ ही एक अमेझिंग इंडियन फिल्म तू पाहिली आहेस का? मला ती फार आवडते. तुझ्या आवडत्या फिल्म्स कोणत्या, ते मला उद्या न विसरता सांग. मी गेल्या समरला न्यू जर्सीमध्ये ज्या कॉफी शॉपमध्ये नोकरी करत होते तिथे दोनदा अरिवद स्वामी आला होता आणि त्यामुळे मी दोनदा मरून दोनदा जन्मले आहे. मी त्याला माझ्या हाताने कॉफी पाजली आहे. तुला त्याचा ‘रोजा’मधील लाल स्वेटर आठवतो का?

मी खूप बोलून गेले का? सॉरी. लिहीत बसले आणि लक्षातच आले नाही, की ही माझी रोजची डायरी नाही. तुला लिहिते आहे ही नोट आहे. मी गाणे तुझ्या आवडीचे म्हटले नाही, ते ठीक आहे. पण माझा आवाजसुद्धा तुला आवडला नाही का? आपण दोघेच तिथे भारतीय होतो, तरी तू माझ्याशी नीट का बोलला नाहीस? मला हे सगळे तुझ्याशी बोलायचे आहे. तू उद्या येऊन स्वतला इंट्रोडय़ूस केले नाहीस तरी चालेल. मला तुझ्याविषयी बरीच माहिती आहे. तू लेफ्टी आहेस. आणि तुला क्रिकेट आवडत नाही. बरोबर आहे की नाही?

– नीरा

p .s.  मी न्यूयॉर्कला एका नाटकात काम करते आहे. मी हे तुला उद्या सांगणारच होते. पण या नोटमध्ये लिहिले की तुला तू नक्की किती हुशार मुलीला भेटणार आहेस हे लक्षात येईल आणि तू आपली डेट विसरणार नाहीस. आमच्या नाटकाचा पहिला प्रयोग आहे सप्टेंबरमध्ये. तारीख आत्ताच नोट करून ठेव. अकरा सप्टेंबर २००१.

उद्या भेटू.

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com