दोन महाराष्ट्र आहेत. पुणे-मुंबई नावाचा एक भाग आहे- जो जाणिवेने आणि सांस्कृतिक दृष्टीने इतर महाराष्ट्रापेक्षा वेगळा पडतो. आणि मग विस्तृत आणि विविध असा उरलेला महाराष्ट्र आहे. आत्ता दोन आहेत तसे सत्तर ते नव्वद या दशकांत आमच्या लहानपणी तीन भाग होते. पुणे आणि मुंबई ही शहरे जीवनाचा वेग, आकारमान आणि स्थलांतरित माणसांचे अस्तित्व याबाबतीत एकमेकांपेक्षा वेगवेगळी होती. पुणे, मुंबई आणि उरलेला विशाल आणि वैविध्यपूर्ण महाराष्ट्र असे लहानपणी आमच्या भावजीवनाचे ढोबळमानाने तिहेरी स्वरूप होते. तो जो उरलेला महाराष्ट्र आहे, तिथे आपले नातेवाईक राहतात. ज्यांच्याकडे आपण सुट्टीला जातो आणि पुण्यात परत येतो, किंवा मग गणपती-गौरीला ते आपल्याकडे येतात. आपली आणि त्यांची भाषा थोडीशी वेगळी आहे. त्यांची पदार्थ करायची पद्धत वेगळी आहे हे समजायचे. पण पुण्या-मुंबईत जसे घरी असल्यासारखे वाटायचे तसे इतर महाराष्ट्रात गेले की वाटायचे नाही. आणि तसे का वाटते, ते कधीच कळायचे नाही. मुंबई अजब होती. तिथे अनेक प्रकारच्या अनेक भाषा बोलणारे लोक होते. पण तरीही ते शहर कधी परके वाटले नाही, कारण ते शहर होते. त्याचा आकार आणि वेग पुण्यापेक्षा वेगळा असला तरी इतर कुठेही वाटते त्यापेक्षा जास्त सवयीचे आणि सोयीचे काहीतरी असे मुंबईत वाटायचे. त्या वयात निवांतपणा आणि झाडेझुडपे, आकाश, निसर्ग अशा गोष्टींचे आकर्षण कुणाला असते? शहरातच जन्मून मोठय़ा झालेल्या मुलांना वेग, वैविध्य आणि सतत बदलत्या मोठय़ा अजब गोष्टींचे गारुड हवे असते.
शहरात जन्मून मोठे होत असताना आमच्या स्वत:च्या जाणिवेचे आणि आमच्या आजूबाजूला घडणारे आम्हाला सांगणारे असे मराठी साहित्यात काहीच नव्हते. मराठी साहित्य जाणिवेने जास्त वयस्कर आणि मुख्यत: ग्रामीण होते. जयवंत दळवी, अरुण साधू, विजय तेंडुलकर या रक्ताने शहरी जाणिवेच्या असलेल्या लेखकांचे मन समजून घ्यायचे वय अजून पक्व झाले नव्हते. त्याला अजून वेळ होता. आणि मराठी पाठय़पुस्तकांत आणि वाचनालयात जी पुस्तके असायची ती खूप आवडायची, पण त्यात आपले आणि आजचे असे काही सापडायचे नाही. इंग्रजी वाचता यायचे नाही. वर्तमानकाळाचे आणि मराठी जाणिवेचे कधीच फारसे पटत नसल्याने ही परिस्थिती होती, की शहरात जन्मलेली आणि मोठी झालेली पिढी अजून लिहिती व्हायची होती म्हणून पुस्तके वयस्कर होती, हे नक्की कळायचे वय नव्हते. कुटुंबातले लोक आणि आई-वडील ज्या पुस्तकांनी भारावून जातील त्या पुस्तकांनी आपणही भारावून जायचे, हे ठरून गेले होते. समोर ‘मिस्टर इंडिया’ चालू आहे आणि हातात ‘पिंगळावेळ’ आहे अशा गोंधळाच्या अवस्थेत आम्ही कसेनुसे हसत, नीट भांग पाडून, मराठीत चांगले मार्क मिळवत आमचे बालपण रेटत की काय म्हणतात ते होतो.
त्यात अनेक पेच होते. मराठी माणूस ही काय एक गोष्ट आहे का? त्याला कितीतरी प्रकारचे आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पापुद्रे असतात. तुम्ही वाढत्या वयात असताना तुमची सगळे काही समजून घ्यायची भूक अफाट असते. नारायण सुर्वे, जयंत पवार यांचे लेखन सावकाशपणे समोर येत गेले आणि त्यात डोकावून पाहिले असताना आपल्या आजूबाजूचे काहीतरी पुसटसे दिसू लागले तरी एखाद्या पुस्तकावर हात ठेवून, ‘‘हो, मी शपथ घेऊन सांगतो की, हे माझे मन मांडणारे मराठी पुस्तक आहे,’’ असे कधी वाटायचेच नाही. हिंदी सिनेमाकडे मोठय़ा प्रमाणावर आकर्षित होण्याचे कारण तो सिनेमा अतिशय बटबटीतपणे का होईना, पण शहरी जाणिवेच्या तरुण माणसाचे मन आणि त्याची स्वप्ने मांडत होता. आमची शेतीवाडी नव्हती. काळी जमीन कोल्हापूरला देवीच्या दर्शनाला जाताना बसमधून पाहिली. त्याउप्पर कधी पाहिलेली नव्हती. आता आमचे कसे लोणचे घालायचे, हा एक प्रश्नच होता.
मी पुस्तकांचा फडशा पाडणारा मुलगा होतो. सतत वाचत बसायचो. आणि इंग्रजी वाचता येत नव्हते त्यामुळे ओघानेच जे समोर येईल ते मराठी पुस्तक वाचून संपवणे यात मला फार आनंद वाटायचा. ताटातले जेवण संपवल्यावर होतो तसा शहाण्या मुलाला होणारा आनंद. इंजेक्शन देताना सुई आत जाते तेव्हा जशी वेदना होते तशी अचूक खाजगी वेदना अजुनी कोणत्याही कथेने मला दिली नव्हती. मराठी लेखन हे सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहिल्यासारखे होते. सुंदर, अर्थगर्भ, मनावर सखोल परिणाम करणारे; पण दूरचे.
एका दिवाळीत घरच्या कोपऱ्यात बसून अंक हातात घेऊन वाचत बसलो होतो तेव्हा ती कथा माझ्यासमोर आली. त्या कथेचे नाव होते- ‘यंत्र’! आणि त्या लेखकाचे नाव होते- मिलिंद बोकील. प्रत्येक माणसाला त्याच्या पिढीचे, त्याच्या भाषेतील आणि त्याच्या वयाचे पुस्तक, संगीत, चित्रपट आणि नाटक मिळाले की त्या माणसाचे भावविश्व सुंदर आकार घ्यायला लागते. तुम्ही आणि तुमच्या हातातील कथा किंवा तुमच्या डोळ्यांसमोरील चित्रपट हे एकाच वयाचे असायला लागतात. एकाच काळात लहानाचे मोठे झालेले असायला लागतात. मग वाचक किंवा प्रेक्षक म्हणून आपल्या सुखाला मर्यादा उरत नाही.
एका मोठय़ा गिरणीतील एक यंत्र बंद पडले आहे. एक कामगार अनेक प्रकारे ते सुरू करायची खटपट करतो आहे. मला माझे अख्खे शहर, माझा संपूर्ण काळ आणि माझे इंजेक्शन त्या कथेत सापडले.
माझे वडील एका कंपनीत मोठाल्या यंत्रांच्या दुरुस्त्या करायचे. मी त्यांना दिवसांमागून दिवस एखाद्या महाकाय यंत्राशी झुंजताना लहानपणीपासून अनेक वेळा पाहिले आहे. संध्याकाळी ते घरी परत आले की घरातल्या अंगणात असलेल्या वर्कशॉपमध्ये फ्रीज आणि एअरकंडिशनर दुरूस्त करत बसायचे. रात्र रात्र जागून एखादे यंत्र दुरूस्त करायची प्रमाणाबाहेर खटपट करायचे. सकाळी मग लवकर उठून चहा बनवायचे आणि मला आणि माझ्या भावाला आपण तो फ्रीज कसा दुरूस्त केला याची छोटी गोष्ट सांगायचे. ती यंत्रे त्यांच्यासाठी माणसासारखी होती. नाठाळ, आडमुठी. त्यांना ते आंजारून गोंजारून, कधी वेळ पडली तर फटके मारून वठणीवर आणताना मी कितीतरी वेळा अनुभवले होते. हात ऑइलने बरबटलेले, गळ्यात अनेक वायरींचे वेटोळे, जेवणाखाण्याची शुद्ध हरपलेली.. असे ते तासन् तास बंद पडलेल्या यंत्रांना जिवंत करायचा खटाटोप करत बसायचे. ‘यंत्र’ या कथेने माझ्या मनाचा ताबा घेतला. माझं असं काहीतरी लिहिणारा लेखक मला पहिल्यांदा सापडला.
मिलिंद बोकील हा कोण मुलगा आहे हे शोधायला हवे. आपल्या मोठय़ा भावाचे जे स्मार्ट आणि तरतरीत मित्र असतात, जे आपल्याला दहावीतच चोरून बीअर पाजतात, तसा कुणीतरी हा मुलगा असणार असे मला वाटले. आयआयटीमध्ये शिकत असावा. जीन्स आणि टी-शर्ट घालत असावा आणि आपण जे संगीत वॉकमनवर ऐकत असतो तेच हा मिलिंद ऐकत असावा. त्याच्या खोलीतल्या भिंतीवर सिनेमातल्या नटांचे फोटो असतील.. आणि आई- वडिलांना न सांगता हा बाइक काढून लांब लांब एकटा उंडारायला जात असणार अशी माझी सगळी स्टोरी तयार झाली. या मुलाची पुस्तके शोधायला हवीत, हे मी ठरवले.
शांत स्वभावाचे असे बोकील मला प्रत्यक्ष भेटण्याआधी मी ‘झेन गार्डन’, ‘उदकाचिये आर्ती’ हे त्यांचे कथासंग्रह आणि ‘शाळा’ ही त्यांची कादंबरी वाचली होती. वाचून संपवली नाही. मी कॉलेजात जात होतो. मी सिनेमा शिकत होतो. मी सिनेमा बनवू लागलो तेव्हा हा माझा लेखक माझ्या आजूबाजूला होता, माझ्या शहरात होता आणि सतत ताजे, चांगले लिहून वाचकांसमोर आणत होता. म्हणजे इंग्लंड- अमेरिकेतील वाचकांना जसे त्यांच्या वयाचे, जिवंत आणि त्यांच्या शहरात राहून ताजे लिहिणारे लेखक असतात, तसा मला माझा लेखक मिळाला याचा आनंद मला अजूनही नीट लिहून व्यक्त करता येत नाही. शिवाय असा लेखक- जो कधीतरी सकाळचा फेरफटका मारायला शांतपणे तुमच्या घरासमोरून चालत जातो. मराठीत माझ्या पिढीला हे अनुभवायला मिळाले, हे माझे नशीब आहे. यापुढील पिढय़ांना आणि प्रत्येकाला हे अनुभवायला मिळो.
सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com