स्वयंपाक आणि घरकाम शिकण्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला तो म्हणजे ‘गृहिणी’ नावाची जी एक भारतीय जमात आहे, ज्या घरकाम आणि स्वयंपाकाचे प्रचंड भांडवल करून घरात सतत आपली पत जपत बसलेल्या असतात आणि भयंकर मोठय़ाने बोलून आपले म्हणणे लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांना चक्राकार सांगत बसलेल्या असतात, त्यांच्याविषयी उगाच दाटून आलेला माझा आदर कमी होऊन रसातळाला गेला. ‘‘मी तुमच्यासाठी इतके केले, मी होते म्हणून हे घर वर आले, मी हाडाची काडे करून, कोंडय़ाचा मांडा करून तुम्हाला वाढवले, मी होते म्हणून चार पैसे बाजूला तरी पडले, नाही तर तुझ्या वडिलांच्याने काही होणार नव्हते, मी एका साडीवर आणि चार काळ्या मण्यांवर हा संसार ओढला, मी खमकी निघाले म्हणून घरातील चांदीची का होईना, चार भांडी तुझ्या नावावर झाली, मी रात्री-अपरात्री पन्नास-पन्नास पोळ्या करून ह्यंनी जमवलेल्या गर्दीला जेवायला घातले आहे, मी कधी बाजारातून हळद आणली नाही, हळकुंडे फोडून माझे हात फाटले म्हणून ही चव आहे जेवणाला.. उगीच नाही, तुझ्या वडिलांचे काही सांगू नकोस, ते दिसतात तसे साधे नाहीत, तुम्ही लहान असताना मी कशाकशातून गेले याची कल्पना नाही तुम्हाला..’’ अशी अनेक सुंदर वाक्ये माझ्या लहानपणी आजूबाजूला दुपारच्या रिकाम्या शेकडो घरांमध्ये तरंगत असत- ती हळूहळू काळानुसार विझून गेली. तशा गृहिणी आता पुन्हा होणे नाही हे आता लक्षात येते. दोघांनी नोकऱ्या करून घराचे आणि गाडीचे हप्ते फेडणे हा उद्देश असलेल्या या काळात पूर्णवेळच्या सोशीक की काय म्हणतात त्या गृहिणी दिसेनाशा झाल्या. हातात दिलेली चकली किंवा करंजी मुकाटय़ाने चाखत आपल्या आया दुपारी एकटीने घरात जी बडबड करतात, ती बडबड ऐकणारी आमची पिढी ही शेवटचीच असावी. घरगुती स्त्रियांविषयी आदर, त्यागमूर्तीची भावना आणि त्यांच्या भावनिक राजकारणाला सहानुभूती असण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे असते, ते म्हणजे त्यांना येते ते तुम्हाला न येणे. त्यांना येते ते सगळे तुम्हाला येऊ  लागले की तुमचे स्त्रीविषयक भावनिक राजकारण बदलून जाते. जसे माझे झाले. स्वयंपाक आणि घरकाम येणे ही क्रिया वयात येण्याच्या क्रियेइतकी महत्त्वाची आणि तुमच्यात अंतर्बा बदल करणारी ठरते. मी लहानपणीच्या समाजात स्त्रीत्यागाचा आणि मग सुमित्रा भाव्यांकडे कामाला गेल्यावर तरुणपणी स्त्रीवादाचा चकली खात बसलेला पूर्णवेळ श्रोता होतो, तो उठून, पळून अंगणात खेळायला निघून गेलो. सोबत लहानपणी ऐकलेली त्याग, त्रास, अपमान, पाणउतारा, जाच, टोचणी, काळे मणी ही सगळी शब्दसंपत्ती घेऊन निघालो. आणि मग लिहू लागलो. ‘हक्क, मोर्चे, जाणीव, भान, आत्मसन्मान’ अशी स्त्रीवादाने शिकवलेली शब्दसंपत्ती माझ्या लिखाणात अजून तरी येऊ  शकलेली नाही. पण प्रवृत्ती कशी बदलेल हे सांगता येत नाही. कदाचित ती पुढे येईलसुद्धा.

लहानपणापासून तसा आतून मी बऱ्यापैकी स्त्रीद्वेष्टा माणूस आहे. सौम्य नव्हे, अगदी कडकडीत. बायकांच्या भावनिक साम्राज्याचे मला एका बाजूला अतिशय गूढ आकर्षण आणि दुसऱ्या बाजूला तीव्र कंटाळा आहे. माझ्यात असलेली ती निसर्गदत्त जाणीव आहे. स्वयंपाकाची आवड असल्याने आणि नंतर स्वयंपाक येऊ  लागल्याने मला हे उमजत गेले, की मला खरे तर  स्त्रियांचा कंटाळा नसून ‘गृहिणी’ नावाच्या आवाजी फटाक्यांचाच अतिशय तिटकारा आहे.काम करून आनंदाने जगणाऱ्या आणि केलेल्या कष्टाचे भांडवल न करणाऱ्या बायकांशी माझी प्रमाणाबाहेर मैत्री होते. स्वत:च्या निर्णयाची आणि आपण ज्यातून गेलो त्या चांगल्या-वाईट अनुभवांची शंभर टक्के जबाबदारी स्वत: घेणाऱ्या अनेक मुलींच्या सहवासात मी राहतो आणि काम करतो. त्यामुळे जुन्या गृहिणी या माझ्या समजुतीच्या बाहेरच्या प्राणी आहेत. कारण त्या कधीच आनंदी नसतात आणि सतत कुरकुर व बडबड करतात. इतकी, की मला अनेकदा ‘‘कशाला मग लग्न केलेत तुम्ही आणि मुले जन्माला घातलीत?’’ असे त्यांना विचारावेसे वाटते.

Baba abuses young girl on the name of treatment touches badly in front of her parents shocking video viral
“आई वडिलांना पोटच्या मुलीचा त्रास कळत नाही?” उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाचा तरुणीला अश्लील स्पर्श! VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Prenatal diagnosis of well developed fetus in fetu
महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटात बाळ!.. काय आहे ‘फिट्स इन फिटू’ हा दुर्मिळ प्रकार?
Mother left her children on road and ran away motherhood shocking video viral on social media
“त्यापेक्षा जन्मच नव्हता द्यायचा ना”, तिला पोटच्या मुलांचीही नाही आली दया, निष्ठूर आईचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Father Disappointed After Seeing Daughters English In Whatsapp Chat Viral on social media
PHOTO: वडिलांनी मुलीला ४० हजार पाठवल्याचा मेसेज केला; यावर मुलीचा रिप्लाय पाहून वडिल झाले शॉक; व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
Baby Girl Sharing food with Dad
‘म्हणून लेकीला घरची लक्ष्मी म्हणतात…’ उपाशी बापासाठी चिमुकलीने केलं असं काही की… VIDEO पाहून डोळे पाणावतील
viral video shows how Womens life change after marriage
‘आज तो फक्त एक कागद’ लग्न, मूल झाल्यानंतर महिलांच्या करिअरला लागतो फुलस्टॉप…; VIDEO तील एकेक शब्द वाचून भारावून जाल
Parents congratulated their children for not coming home on time
‘पप्पा, मला माफ करा…’ मुलं वेळेवर घरी आली नाहीत म्हणून आई-वडिलांनी केला सत्कार… VIDEO पाहून येईल हसू

आमच्या लहानपणी खूप गृहिणी असत. आता पूर्णवेळ गृहिणी हा प्रकार तसा कमी होत जातो आहे. आमच्या लहानपणी गृहिणी हा प्रकार मोठय़ा शहरांत मराठी समाजात पुष्कळ होता. अगदी गुजरात- राजस्थानात असतील तितक्या गृहिणी पूर्वी महाराष्ट्रात असत. मी जात्याच बैठा आणि बाहेर जाऊन क्रिकेट वगैरे कधी न खेळलेला असल्याने माझ्या बालपणातील रिकाम्या वेळेत अशा गृहिणी नावाच्या वाघिणी मला पुरेपूर भेटल्या आणि त्यांनी माझे बालपण रंगीत आणि साजरे केले. माझ्या हातून लिहून होणाऱ्या जवळजवळ सर्व कथांना माझ्या आयुष्यातील या काळाची एक लिंबू पिळल्यासारखी चव आहे. जी. ए. कुलकर्णी मला फार लहानपणी आवडायला लागायचे महत्त्वाचे कारण- त्यांचा स्त्रियांच्या राजकारणाविषयीचा अगदी सोपा आणि पारदर्शक दृष्टिकोन आहे. संपूर्ण कंटाळ्याचा. त्यात त्यांना लाज वाटत नाही. अगदी आजच्या पुरोगामी की काय म्हणतात त्या काळात  हा स्त्रीविषयक दृष्टिकोन अगदी हेटाळणीचा ठरावा. पण तो असला तर तुमच्या लिखाणात तो आपसूक येतो. जसा तो त्यांच्या लिखाणात आहे. आणि तो वाचून मला अगदी लहानपणी हुश्श झाले आणि एखादा खेळगडी मिळावा तसे वाटले. अगदी बालवयाचा असल्यापासून आजूबाजूच्या मुलींनी आणि घरातल्या गृहिणींनी केलेल्या फालतू तक्रारी आणि घरगुती राजकारणाचे फाजील लाड मी कधी मनावर घेतले नाहीत. प्रत्येक जण आपल्या निर्णयाला जबाबदार असतो, ही साधी गोष्ट भारतीय बायकांना कळेल असे मला कधीच वाटले नाही. निदान माझ्या आजूबाजूच्या घरी बसून राहिलेल्या बायकांना पाहून तर ती खात्रीच झाली. अगदी नंतरच्या आयुष्यात पक्क्या स्त्रीवादी म्हणून नावाजल्या गेलेल्या व्यक्तींच्या बालेकिल्ल्यात, त्यांच्याच ताटात जेवून लहानाचा मोठा झालो तरी मनात निसर्गत: वस्तीला असलेला हा स्त्रियांच्या घरगुती भावनिक राजकारणाचा कंटाळा माझ्या मनातून जाता जाईना. मला सत्यजित राय यांची ‘चारुलता’ सोडल्यास इतर खऱ्या आयुष्यातील पूर्णवेळ गृहिणी फार कंटाळवाण्या वाटतात.

चारुलता ही एकच गृहिणी भारतात कमालीची अफलातून आहे. ठाकूर आणि राय या जोडगोळीने तिला असे कमालीचे साकारले आहे, की वाटते, गृहिणी व्हावे तर बंगालच्या मोठय़ा हवेल्यांमध्ये. गुजराती, मारवाडी, मराठी गृहिणी होणे हे अतिशय तुपकट, चिकट आणि बोजड काम असते. मुख्य म्हणजे या गृहिणींना कामे खूप करावी लागतात; जसे बंगालमधील भद्रलोकी गृहिणींचे होत नाही. जुन्या बंगालमधील तो संथ, सुंदर रिकामा वेळ, ते कामासाठी दूर दूर गेलेले नवरे, ते बुद्धिमान, देखणे, रिकामटेकडे कविमनाचे बंगाली दीर, त्या सुंदर रेशमी साडय़ा, कमरेला अडकवलेले किल्ल्यांचे जुडगे, ते चौसोपी पलंग, ते पानाचे डबे आणि मोठय़ा हवेल्यांमध्ये भरून राहिलेला रिकामा काळ. नुसता वेळ नाही, तर काळ. इथे महाराष्ट्रात नुसताच वेळ असतो. काळ नसतो. इथल्या अंधाऱ्या सामायिक न्हाणीघरे असलेल्या छोटय़ा घरांमध्ये गृहिणी होणे फार कंटाळवाणे असते, हे मी लहानपणी हजारो बायकांची लाखो गॉसिप्स ऐकून शिकलो आहे. मोलकरणी सोडून त्यांची बडबड ऐकणारे त्यांना कुणी नसते. हल्ली तशा निवांत मोलकरणी नसल्याने अशा सर्व गृहिणींचा ताफा फेसबुकवर दुपारभर बसलेला असतो.

आजूबाजूच्या जाणत्या आणि जवळच्या व्यक्तींनी घालूनपाडून बोलून, मला ओरडून, सल्ले देऊनही माझ्या मनातील तो सोपा आणि छोटा टोकदार असा स्त्रीद्वेष्टेपणा जाता जाईना. शांता गोखले मला एकदा माझी नाटके वाचून या विषयावर इतक्या बोलल्या की मला माझी भीती वाटू लागली. काही दिवस हातून लिहून झाले नाही. सुमित्रा भाव्यांनी तर माझ्यापुढे आता अगदी हात टेकले असतील. ‘कुठून या सापाला आपल्या स्त्रीवादी घरात दूध पाजले मी इतकी वर्षे?’ असे त्यांना दरवेळी वाटते आणि त्या मला बोल बोल बोलतात. पण चांगली गोष्ट ही की, सगळी माझी आवडती माणसे अजूनही हिरीरीने माझ्याशी बोलायला, भांडायला आणि माझे कान उपटायला तत्पर असतात. त्यामुळे मी चोरून एक कथा लिहायला घेतली- ज्यात मी गृहिणी असलेल्या बायकांविषयी अतिशय हेल्दी दृष्टिकोन ठेवला. ती अजून लिहून होतेच आहे. तिला काही आकारच येत नाहीए.

मराठी स्त्रियांवर कर्तृत्ववान होण्याची सक्ती आहे तशी सुप्त सामाजिक सक्ती भारतात इतर प्रांतांत नसते. घरी निवांत लोळत पडलात की हल्ली तुम्हाला कुणी गांभीर्याने घेत नाही, हा सगळ्यात मोठा जाच मेल्या पुरोगामी समाजाने करून ठेवला आहे. त्यामुळे कसली मजाच उरलेली नाही. काही नाही तर निदान भाषांतराचे काम तरी गृहिणींना करावेच लागते. आमच्या पुण्यात इंग्रजीतून मराठीत महिन्याला जी शेकडो पुस्तके पापड लाटल्याप्रमाणे भाषांतरित होतात त्याचे कारण हेच आहे. खांडेकर-फडके वाचणारी माझी आजीसुद्धा त्यामुळे शोभा डे वाचू लागली. रिकामा वेळ जरा म्हणून नाही. आणि मोलकरणीशी तासन् तास मारायच्या गप्पा तर अजिबातच नाहीत. ही कसली जगण्याची सक्ती आपण गृहिणींवर केली? मराठी भाषेतील मोठी शब्दसंपदा या जाचाने अगदी आटून जात आहे याचे कुणाला काहीच वाटत नाही. या भयंकर पुरोगामी जाचाने अगदी भक्कम उत्पन्न असलेल्या घरातील बाईलादेखील हल्ली पूर्णवेळ गृहिणी म्हणवून घेणे नकोसे वाटते. त्यामुळे अशा अनेक घाबरलेल्या गृहिणी मराठी उच्चभ्रू समाजात वावरताना दिसतात आणि पटकन् काहीतरी होण्यासाठी त्या धावपळ करतात. त्यांच्या सहवासाने आणि परिचयाने मला खूप ऊर्जा आणि गमतशीर कथासूत्रे मिळतात. त्याविषयी पुढे सांगतो..                          (क्रमश:)

सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com

Story img Loader