स्वयंपाक आणि घरकाम शिकण्याचा एक मोठा परिणाम माझ्यावर झाला तो म्हणजे ‘गृहिणी’ नावाची जी एक भारतीय जमात आहे, ज्या घरकाम आणि स्वयंपाकाचे प्रचंड भांडवल करून घरात सतत आपली पत जपत बसलेल्या असतात आणि भयंकर मोठय़ाने बोलून आपले म्हणणे लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांना चक्राकार सांगत बसलेल्या असतात, त्यांच्याविषयी उगाच दाटून आलेला माझा आदर कमी होऊन रसातळाला गेला. ‘‘मी तुमच्यासाठी इतके केले, मी होते म्हणून हे घर वर आले, मी हाडाची काडे करून, कोंडय़ाचा मांडा करून तुम्हाला वाढवले, मी होते म्हणून चार पैसे बाजूला तरी पडले, नाही तर तुझ्या वडिलांच्याने काही होणार नव्हते, मी एका साडीवर आणि चार काळ्या मण्यांवर हा संसार ओढला, मी खमकी निघाले म्हणून घरातील चांदीची का होईना, चार भांडी तुझ्या नावावर झाली, मी रात्री-अपरात्री पन्नास-पन्नास पोळ्या करून ह्यंनी जमवलेल्या गर्दीला जेवायला घातले आहे, मी कधी बाजारातून हळद आणली नाही, हळकुंडे फोडून माझे हात फाटले म्हणून ही चव आहे जेवणाला.. उगीच नाही, तुझ्या वडिलांचे काही सांगू नकोस, ते दिसतात तसे साधे नाहीत, तुम्ही लहान असताना मी कशाकशातून गेले याची कल्पना नाही तुम्हाला..’’ अशी अनेक सुंदर वाक्ये माझ्या लहानपणी आजूबाजूला दुपारच्या रिकाम्या शेकडो घरांमध्ये तरंगत असत- ती हळूहळू काळानुसार विझून गेली. तशा गृहिणी आता पुन्हा होणे नाही हे आता लक्षात येते. दोघांनी नोकऱ्या करून घराचे आणि गाडीचे हप्ते फेडणे हा उद्देश असलेल्या या काळात पूर्णवेळच्या सोशीक की काय म्हणतात त्या गृहिणी दिसेनाशा झाल्या. हातात दिलेली चकली किंवा करंजी मुकाटय़ाने चाखत आपल्या आया दुपारी एकटीने घरात जी बडबड करतात, ती बडबड ऐकणारी आमची पिढी ही शेवटचीच असावी. घरगुती स्त्रियांविषयी आदर, त्यागमूर्तीची भावना आणि त्यांच्या भावनिक राजकारणाला सहानुभूती असण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे असते, ते म्हणजे त्यांना येते ते तुम्हाला न येणे. त्यांना येते ते सगळे तुम्हाला येऊ लागले की तुमचे स्त्रीविषयक भावनिक राजकारण बदलून जाते. जसे माझे झाले. स्वयंपाक आणि घरकाम येणे ही क्रिया वयात येण्याच्या क्रियेइतकी महत्त्वाची आणि तुमच्यात अंतर्बा बदल करणारी ठरते. मी लहानपणीच्या समाजात स्त्रीत्यागाचा आणि मग सुमित्रा भाव्यांकडे कामाला गेल्यावर तरुणपणी स्त्रीवादाचा चकली खात बसलेला पूर्णवेळ श्रोता होतो, तो उठून, पळून अंगणात खेळायला निघून गेलो. सोबत लहानपणी ऐकलेली त्याग, त्रास, अपमान, पाणउतारा, जाच, टोचणी, काळे मणी ही सगळी शब्दसंपत्ती घेऊन निघालो. आणि मग लिहू लागलो. ‘हक्क, मोर्चे, जाणीव, भान, आत्मसन्मान’ अशी स्त्रीवादाने शिकवलेली शब्दसंपत्ती माझ्या लिखाणात अजून तरी येऊ शकलेली नाही. पण प्रवृत्ती कशी बदलेल हे सांगता येत नाही. कदाचित ती पुढे येईलसुद्धा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा