ज्या दिवशी रिक्षाचा संप होतो तो दिवस शहरात बहुतेक लोकांसाठी सुटकेचा आणि शांततेचा दिवस असतो. वाहतूक एरवीपेक्षा सुरळीत आणि शिस्तीत सुरू असते. वाहनांचे भोंगे कमी वाजत असतात आणि त्या सतत पान-तंबाखू थुंकणाऱ्या आणि सामान्य प्रवाशांची गळचेपी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या मुंगळ्यांपासून शहराची एक दिवस तरी सुटका होते. असा संप होतो तेव्हा मला एक नाव नेहमी आठवते, ते म्हणजे बाबा आढाव. माझ्या लहानपणी हे नाव पुण्यात वरचेवर ऐकू येत असे. ते हल्ली ऐकू येत नाही. या गृहस्थांना मी प्रत्यक्ष कधी भेटलो किंवा पाहिलेले नाही. पण जेव्हा असे रिक्षाचे संप ऐंशी- नव्वदच्या काळात शहरात होत असत आणि रिक्षा सोडून वाहतुकीचा दुसरा पर्याय आम्हाला उपलब्ध नव्हता तेव्हा बाबा आढाव मधेच रिक्षाचा संप करवून आणून सगळ्या शहराचा जीव वेठीला धरायचे. मी ‘पिरदा’ सिनेमातला नाना पाटेकर पाहिला तेव्हा मला असे वाटले, की दिवसा बाहेर न पडणारा हा असा कुणी खलनायकी पावरबाज रिक्षावाल्यांचा हिरो अण्णा असणार. माझी आज्जी बोटे मोडून त्या माणसाला शिव्या देत असे. ‘‘त्याला रिक्षात घालून वेगात वेडावाकडा गावभर फिरवून आणला पाहिजे, म्हणजे ढुंगण दुखायला लागले की रिक्षावाल्यांचा पुळका उतरेल त्याचा!’’ असे ती म्हणायची.
मध्यमवर्गीय पांढरपेशा माणसाला सामाजिक कामे आणि समाजोपयोगी शिस्तशीर कामे यांमधील फरक न कळल्यामुळे डावी किंवा उजवी कोणतीही बाजू घेता येत नाही आणि त्यामुळे तो एका कशानुशा हसऱ्या संभ्रमात मधेच तरंगत उभा राहिला आहे. याची सुरुवात बाबा आढाव यांच्यासारख्या माणसाच्या कामामुळे फार पूर्वीपासून आणीबाणीनंतरच्या काळात महाराष्ट्रातील शहरांमध्ये होत राहिली. दुर्दैवाने आमच्यासारखी जी माणसे हमाल किंवा रिक्षावाले नव्हती, जी माणसे शेतकरी नव्हती, किंवा स्त्रीवादी चळवळीसाठी लागणारी दुर्दैवी बाई नव्हती, त्यांच्याशी कोणतीही चळवळ कधीही बोलायला किंवा ओळख करून घ्यायला गेली नाही.
ऐंशीच्या दशकात या लोकांचा दरारा इतका मोठा होता! आणि दुर्दैवाने आमचा जन्म उच्चवर्णीय, पण मध्यमवर्गीय कुटुंबात झाल्याने जो सेलोटेप नियतीने आमच्या थोबाडावर चिकटवून ठेवला होता, त्या सेलोटेपमुळे आमचे म्हणणे कधी कुणाच्या कानावर गेले असेल असे मला वाटत नाही. कारण निरनिराळ्या पर्यायी विचारांच्या सभांना जाणे आणि घरी येऊन सोळा सोमवार, नाहीतर कृष्णजन्माची तयारी करणे यांत आमच्या आई-वडिलांची पिढी इतकी रममाण झालेली होती, की आपण स्किझोफ्रेनिक आहोत हे त्यांना कळतच नव्हते. धर्म ही एक अफूची गोळी होती, तशीच एक नवीन अफूची गोळी आमच्या आई-वडिलांच्या पिढीला सापडली होती, ती म्हणजे.. समाजसेवा. पण समाजसेवा हे एक गांजाप्रमाणे स्वस्त ड्रग होते. त्यापेक्षा जास्त महाग आणि नशिली गोष्ट होती ती म्हणजे चळवळ! ती फार लोकांना जमत नसे. कारण आमच्यासारख्यांच्या घरात मुलींची लग्ने, बाळंतपणे, पहिले सण अशी खूप कामे असत. त्यामुळे परवडेल इतकीच नशा करावी, या विचाराने समाजसेवेची नशा आमच्या आई-वडिलांच्या पिढीने फार उत्तमपणे पार पाडली. त्या नशेची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. मी ‘आणीबाणी बेबी’ आहे. आणीबाणी संपताच जन्मलेला. इंग्रजी माध्यमात आपल्याला जायला हवे होते असे वाटणारा. मुंजीच्या दिवशी टक्कल करायला लावतात म्हणून राग येणारा आणि लाज वाटणारा. घरात सत्यनारायण वगैरे असेल तेव्हा खोलीचे दार बंद करून टीव्ही पाहत बसणारा. आणि अनिल अवचटांची पुस्तके दिवाळीच्या सुटीत प्रेमाने व नेटाने बसून वाचून काढणारा मराठी मुलगा. सायकल किंवा स्कूटरने फिरणारा. फक्त हॉस्पिटल किंवा स्टेशनवर जातानाच रिक्षा वापरणारा. सगळ्या शिष्यवृत्त्या मिळवून वर्गात चांगले मार्क मिळवणारा मुलगा. जो आता वेस्ट कोस्ट, ब्रायटन किंवा बांद्रय़ात राहतो आणि आपण कष्ट करून चांगले पैसे मिळवतो याची लाज (जी त्याच्या आई-वडिलांना वाटत असे!) त्याला वाटत नाही. जो उजवा नक्कीच नाही. आणि डावे होण्यात त्याला इंटरेस्ट नाही. त्याच्या आई-वडिलांची पिढी जशी संभ्रमात जगली तसा संभ्रम नाही; पण तसे लोंबकळलेपण नशिबी असलेला एक मराठी मुलगा. ज्याला हे समजते, की आपली जात सोडून इतर सर्व जातींविषयी उगीच दिवसभर पुळका वाटणे हे तितकेच धोकादायक आहे; जितके आपल्या जातीशिवाय इतर कुणी जगूच नये, असे वाटणे आहे.
मी पुण्यात ज्या शाळेत गेलो तिथे हे वाक्य लहानपणी सतत कानावर पडलेले मला आठवते. ‘स्वतच्या जातीविषयी अपराध आणि इतर सर्व जातींविषयी पुळका ज्यांना असतो त्यांना ‘पुणेरी समाजवादी’ असे म्हणतात.’ हे वाक्य कुणी एक म्हणत नसे, तर अनेकदा ते कानावर पडलेले असे. त्या वाक्याचा रोख समाजवादी नावाची जी मंडळी आहेत त्यांची चेष्टा करण्याचा होता, हे उघडच होते. पण ती चेष्टा ऐकून आम्ही मुले संध्याकाळी अर्ध्या खाकी चड्डय़ा घालून, हातात लाठय़ा उडवत शाखेत येऊ, असे जे शाळेत अनेकांना वाटत असे ते पूर्णपणे चुकीचे होते. या कोणत्याच बाजूकडे जाण्यात आम्हाला रस नव्हता. सेक्स आणि पैसे या दोनच विचारांनी त्या तरुण वयात माणसाचे मन मुसमुसलेले असते. आम्ही घरात टीव्ही बघणारी आणि जाहिराती पाहून वस्तू विकत घ्यावीशी वाटणारी साधी तरुण पिढी होतो. आणि आमच्या आजी-आजोबा किंवा आई-बाबा यांना जगण्याचे जे दोनच विचार माहिती होते- ‘संघ’ किंवा ‘सामाजिक क्रांती’- ते दोन्ही आमच्यासाठी कंटाळवाणे आणि निर्थक होते. ‘तेजाब’ सिनेमा ज्यांच्या काळात हिट् होतो ती मुले आपल्याला पहिला सेक्स कधी करता येईल आणि आपल्याला मिळणारा पहिला पगार किती आकडय़ांचा असेल, एवढाच विचार नववी-दहावीत करीत असतात. बाकी सगळे झूठ असते. आम्हाला हे जे वाटत होते ते त्यावेळीसुद्धा आमच्या आजूबाजूला कुणाला कळत नव्हते आणि अजूनही कळत असेल असे वाटत नाही. कारण आमच्या आई-वडिलांची पिढी अजूनही या दोनच ध्रुवांच्या मधे सागरगोटे खेळत बसलेली दिसते आहे.
मी मोठा होत गेलो तसे हे लक्षात आले, की बाबा आढाव हे ‘पिरदा’मधील अण्णा नव्हते, तर तो पु. ल. देशपांडे यांच्या ‘असा मी असामी’मधील नानू सरंजामे होता. तो नानू आता मोठा होऊन ऐंशीच्या दशकात त्याचा बाबा झाला होता. तोच तो लाल डगला घालून क्रांतीच्या घोषणा देणारा नानू. त्याने आणीबाणी संपल्यावर आणि डाव्या पक्षांची राजकीय ताकद महाराष्ट्रात संपूर्ण उतरल्यावर अशा पद्धतीच्या क्रांतिपूर्ण समाजसेवेत आपले करीअर केले. कारण क्रांती करायला इंग्रज उरले नव्हते. आणीबाणी लादायला इंदिराबाई नव्हत्या. त्यामुळे पर्यायी विचारांचे आणि समाजसेवेचे हे जे वादळ युवकांमध्ये पेटले होते आणि क्रांतीची जी चटक लागली होती, ती शांतता आणि समृद्धी असलेल्या समाजात भागवायची कशी? शहरात साधा पारंपरिक मध्यमवर्ग होता. किर्लोस्कर, टाटा, गोदरेज या उद्योगजगतात बुद्धीने आणि कष्टाने नाव मिळवलेली, तसेच वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी आनंदाने काम करून रिटायर होणारी माणसे होती. विद्यापीठ असल्याने खंडीभर प्रोफेसर होते. मध्यमवर्गीय माणसाला त्याच्या जातीविषयी आणि आर्थिक स्थर्याविषयी अपराधीपणाची भावना निर्माण केली की तो आधी प्रमाणाबाहेर घाबरेल आणि मग क्रांतीला टाळ्या वाजवेल. त्यातली दोन-पाच मुले कदाचित लाल डगले घालूही शकतील, असे नानूला वाटले नाही तर नवलच!
अनिल अवचट यांच्या साहित्यामुळे पहिल्यांदाच आपण ज्या परिघात जगतो त्या परिघाबाहेरील जगण्याची सचित्र जाणीव माझ्या मनाला फार नेमकेपणाने झाली. चांगल्या साहित्याचा तो परिणाम असतो. तुमचे मन सजग होते आणि नेमकेपणाने विचार करून स्वत:ला प्रश्न विचारू लागते. सेक्स आणि पैसे या दोन प्रश्नांचे वादळ त्या वयात जे मनात घोंगावत होते, त्यापलीकडे विचार करायला काही आयाम आहे याची जाणीव अवचटांच्या लिखाणामुळे मनाला झाली. लेखक प्रत्यक्ष भेटला की त्याच्याविषयीचा आदर कमी होत जातो, याचा अनुभवही अवचटांनीच पहिल्यांदा मला प्रत्यक्षपणे दिला. एका नाटकाला ते आले होते आणि पहिल्या रांगेत बसून नाटक सुरू असताना ते हातातले लाकूड कोरत बसले होते. समोर चाललेल्या नाटकातील नटांना काय वाटत असेल याची पर्वा न करता त्यांचा स्वत:चा एक अभिनय पहिल्या रांगेत चालू होता. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझा आवडता लेखक पाहिला होता आणि त्यांच्या या वागण्याने मी अगदी कंटाळून गेलो होतो, हे मला आठवते.
(क्रमश:)
kundalkar@gmail.com