सकाळी चालायला गेलेले दाभोलकर उडून फुटपाथवर पडले, त्यांची राख केली गेली, तेव्हा मी सुन्न होऊन बसून होतो. घरामध्ये कसला तरी कार्यक्रम चालू होता. मी काही बोलत नाही म्हणून मला विचारले तेव्हा मी माझ्या खिन्नपणाचे आणि उदास असण्याचे कारण सांगितले. एकही क्षणाचा विलंब न लावता माझ्या कुटुंबातील तीन-चार तरुण मंडळी असे म्हणाली की, ‘एक न् एक दिवस असे होणारच होते. दाभोलकरांनी जरा जास्तच चालवले होते. तुम्हाला लोकांच्या श्रद्धांना हात घालण्याचा काय अधिकार आहे? तुमचे ते अंधश्रद्धेचे काम आहे ते तुम्ही करा नं!’ ‘मला तरी जे झाले त्यात काही आश्चर्य वाटत नाही..’ असे अजून एक जण म्हणाला.
मला त्या सगळ्यांच्या पाठीला डोळे आले आहेत हे दिसू लागले. मला लहानपणापासूनच कुटुंबात जे एकटे आणि परके वाटते, ते त्या दिवशी जास्तच वाटू लागले. माणसाला संपवून टाकायला त्याचा खून करणे हा एक मार्ग असतो. त्याचा दुसरा मार्ग- एखाद्या वेगळ्या माणसाला कुटुंबातून आणि समाजातून अनुल्लेख आणि आठवणींमधून पुसून टाकणे, हा होतो. आणि असे घडताना किंवा घडवताना माणसाची पारंपरिक वैचारिक मूल्यव्यवस्था कसा आकार घेईल, हे सांगता येत नाही. दाभोलकर गेले तेव्हा मला या ना त्या प्रकारे माझ्यासारख्या एकलकोंडय़ा आणि कुंपणावर सरकवल्या गेलेल्या माणसाचा कुटुंबातील खून नीट दिसू लागला. मला जास्तीत जास्त एकटे आणि खिन्न वाटू लागले. माझा कौटुंबिक पारंपरिक उद्योगांमधील आधीच आटत चाललेला उत्साह गेल्या चार वर्षांत संपूर्ण संपून गेला आणि मी सणवारांना टाळून वेगळ्याच ठिकाणी भटकंती करायला जायला लागलो.
मला माझ्या कुटुंबाचा कधी राग किंवा कंटाळा आला नाही. मला त्यांनी चालू ठेवलेले उपक्रम बंद व्हावेत आणि त्यांचा आनंद संपावा असे कधी वाटले नाही. पण दाभोलकरांना मारणे झाले त्या दिवशी मी कुंपणावरून उतरलो आणि माझ्या निवडलेल्या बाजूला गेलो. मला लक्षात आले की, आपण कुंपणावर बसून जे पटत नाही आणि जे आवडत नाही त्या गोंधळात सामील होणे चुकीचे आहे. मी प्रामाणिकपणे या सगळ्या धार्मिक, पारंपरिक पूजा, सणवार यांतून लुप्त व्हायला हवे आहे. मी आता यापुढे खोटे बोलून, हसून गोष्टी साजऱ्या करणार नाही. देव, धर्म आणि फक्त त्यातूनच उत्पन्न होणारे आनंद मला यापुढे होणार नाहीत.
दाभोलकर अतिशय विवेकी, बुद्धिमान आणि शांत होते. मी त्यांना दोनदा भेटलो होतो. त्या भेटी मी कधीही विसरू शकणार नाही. मी त्यांच्यामुळे प्रभावित झालेला मुलगा नाही. माझी देव आणि धर्म यांच्यावरची श्रद्धा उडून जायला फार लहानपणीच सुरुवात झाली होती.. जेव्हा मी चित्रपटकलेचा अभ्यास करायला लागलो. त्यात उमेदवारी करायला पर्यायी विचार करणाऱ्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्याकडे मी काम करायला लागलो. मी ज्ञान, प्रवास, आहार, संगीत आणि शब्द या गोष्टींच्या नित्यनवीन स्वरूपांना सामावून घ्यायला सश्रद्ध बनलो. धार्मिक श्रद्धा असायला तुम्हाला मूल्य आणि परिणामांच्या सातत्यतेवर विश्वास असायला लागतो. माझा कोणत्याही गोष्टीच्या सातत्यतेवरील विश्वासच चित्रपटाचे शिक्षण घेताना आणि प्रवास करताना संपून गेला. धर्म आणि धार्मिक परंपरा आणि हिंदू ब्राह्मण कुटुंबात जन्मलो असल्याने करायला लागणाऱ्या सर्वच्या सर्व गोष्टींना मी वेगाने प्रश्न विचारायला सुरुवात केली. माझी शांतता, माझे पावित्र्य, माझी शिस्त आणि माझे साकल्य मला माझ्या कामातून मिळू लागले. मी जिवंत आहे आणि माझे अस्तित्व पक्के आहे याची खात्री मिळायला मला धार्मिक उपचार आणि परंपरा पुरे पडेनाशा झाल्या. त्यामुळे मी ज्या कुटुंबाच्या धार्मिक परंपरेतून आलो त्या कुटुंबाच्या चालीरीती आणि त्यांचे धार्मिक समज आणि आनंद यापासून मी दूर गेलो. मी दाभोलकर होते तसा विवेकी आणि धाडसी माणूस नाही. मला मी वैयक्तिक पातळीवर काय करायचे होते, ते माहिती होते. मला इतरांचे काय करायचे, हे कधीच कळत नव्हते. विसाव्या वर्षी तुमच्या मनात इतकी आंदोलने आणि विचारांची तेजस्वी भाऊगर्दी असते, की त्यात संयमाला आणि विवेकाला जागा असतेच असे नाही. माझ्या आजूबाजूच्या वातावरणात शांतपणे, धाडसाने आणि आपल्या कामावरील असलेल्या घट्ट विश्वासाने समाजात चांगले काम करणारी जी माणसे पाहत होतो त्यात दाभोलकर होते. पण माझ्या आजूबाजूच्या समाजाला ते चुकीचे वाटत होते याची मला कल्पनासुद्धा नव्हती. ती कल्पना येऊन मला माझ्या वातावरणाचे कोरडे भान यायला त्यांचा खून घडावा लागला. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयी लांबलचक आणि तापदायक चर्चा त्या खुनामुळे घडू लागल्या.
तर्कट आणि कर्मठ, जुना, बुरसटलेला सनातनी धर्मविचार आणि आधुनिक विज्ञानवादाने येणारी मोकळी दृष्टी या दोन्हीच्या मधे दोरावर लोंबकळणारे आमचे कुटुंब आहे. घरामध्ये जुन्या काळी ज्या प्रथा, कर्मकांडे आणि पूजा चालू होत्या त्या कोणत्याही प्रकारे कधीही थांबवल्या गेल्या नाहीत. इतक्या, की मी कितीही वेळा साधकबाधक आणि शांत चर्चा करूनही सत्यनारायणाची पूजा नावाचा एक भ्रामक प्रकारही कुटुंबात अनेक जणांकडे केला जातो. आणि सध्या धार्मिक कृत्यांचे असे काही स्वरूप होऊन बसले आहे, की त्या जितक्या गोंगाटात आणि गोंधळात कराल आणि त्याची जितकी जाहिरात कराल, तितकी माणसाची अस्तित्वाची शाश्वती बळकट होते. आणि त्याविषयी काहीतरी वेगळे बोलू बघणाऱ्या माणसाला कुटुंबात थोबाडीत मारून गप्प केले जाते. वाचन, प्रवास, नवी मूल्ये, जगातील तांत्रिक आणि आर्थिक बदल या कशाचाही परिणाम आपल्या विचारप्रक्रियेवर आमच्या विस्तृत कुटुंबातील कुणीही केलेला मला आजपर्यंत दिसलेला नाही. बदल घडवणे आणि तो वागण्यात आणि आचारात आणणे यापेक्षा जे चालू आहे ते प्रश्न न विचारता चालू ठेवणे आणि उलटपक्षी त्याचे स्वरूप अधिकाधिक गोंगाटाचे आणि मोठे करणे याकडे समाजात सर्वाचा कल दिसतो आहे. आपण आपल्या परंपरा पाळल्या नाहीत किंवा आपण त्यांना उगाच प्रश्न विचारले तर आपण अस्तित्वाने नष्ट होऊ किंवा फिके पडू अशी भीती अजूनही तरुण मुलांना वाटते. आमच्या कुटुंबात अजूनही मुलांची मुंज केली जाते. वास्तविक पाहता मुंज या संस्काराची गरज नव्या शहरी सामाजिक वातावरणात आणि नव्याने स्वीकारलेल्या शिक्षणपद्धतीत असायचे कारण नाही. आमच्या घरात अजूनही लग्न करण्याआधी साखरपुडा केला जातो. तो करून माझ्या घरातले लोक काय मिळवतात, हे मला कळू शकत नाही. प्रेमविवाह करणारी तरुण माणसेसुद्धा निमूटपणे साखरपुडा करतात. प्रश्न न विचारता आणि काळानुसार बदल न घडवता जी श्रद्धा आणि ज्या ज्या परंपरा आपण पाळतो त्याबद्दल विचार करावा असे माझ्या समाजातील फार कमी माणसांना वाटते. त्यांना अंधश्रद्धा म्हणणे किंवा न म्हणणे ही पुढची गोष्ट झाली. सुशिक्षित आणि संपन्न परिस्थितीत राहूनही माणसाची ही परिस्थिती आहे. बंगले आहेत, मुलेबाळे अमेरिकेत आहेत. विचार करायला शांतता आणि स्थैर्य आहे. पोट हातावर अवलंबून नाही. रोज मजुरीला बाहेर जावे लागत नाही. तरीही विचार करून योग्य तो बदल घडवणे आणि आचारांमध्ये कालसुसंगतता आणणे माणसाला इतके अवघड का वाटत असावे? इतके अवघड, की असे करा किंवा असे काही करून बघा, असे म्हणणाऱ्या माणसाचा खून झाला हेच बरे झाले असे आपल्याला वाटावे? या घटनेला चार वर्षे झाली आणि तो खून कुणी केला याचा अद्याप शोध लागलेला नाही, याबद्दल आपल्याला काहीच वाटू नये?
माझ्यावरील प्रेमामुळे आणि माझ्या काळजीमुळे मला जे वाटते ते करायला, करून पाहायला, स्वीकारायला आणि नाकारायला मला कुणीही मज्जाव केला नाही. पण त्यामुळे माझ्या विस्तृत कुटुंबातील भावंडांमधील आणि माझ्यातील सवयींची आणि आवडीनिवडींची वैचारिक दरी वाढायला फार लहानपणीच सुरुवात झाली. दाभोलकर गेले तोपर्यंत मी कुटुंबाच्या प्रेमाखातर धार्मिक, भावनिक सणवारांना ‘सगळ्यांना निदान भेटता तरी येते’, ‘उगीच कुणाचे मन कशाला दुखवा?’ या भावनेने जात असे. दाभोलकरांना मारले त्या दिवसापासून माझा या सगळ्या गोष्टींमधील रस संपला. मी माझ्या माणसांना सणवार आणि धार्मिक कृत्ये यांच्या बाहेर भेटायचे ठरवले.
आणि आता गणपती येत आहेत..
मी काही बोलत नाही म्हणून मला विचारले तेव्हा मी माझ्या खिन्नपणाचे आणि उदास असण्याचे कारण सांगितले.
सचिन कुंडलकर kundalkar@gmail.com