प्रा. विजय तापस
मराठी रंगभूमीच्या इतिहासात काही शापित नाटककार आहेत. ते शापित आहेत की त्यांना त्या अवस्थेला नेणारे आपण क्षुद्र मनोवृत्तीचे आहोत, असाही प्रश्न पडतो. या नाटककारांचं नाटय़कर्तृत्व थिटं आहे किंवा त्यांचं नाटय़लेखन सामान्य दर्जाचं आहे म्हणून मी त्यांना शापित म्हणतोय असं नाही. हे नाटककार विपुल आणि सकस लेखन करणारे आहेत. त्यांच्या नाटकांचे शेकडो, हजारो प्रयोग झालेले आहेत. मध्यवर्ती मराठी रंगभूमीवरील नाटकांच्या प्रवाहाला समांतर जाणारा दुसरा एक नाटय़प्रवाह निर्माण करून तो सलग पंचाहत्तर- शंभर वर्ष जोरकसपणे वाहता ठेवणारे हे प्रतिभावंत नाटककार आहेत. मात्र असं असूनही मराठी साहित्याच्या तसेच मराठी रंगभूमीच्या इतिहासात या नाटककारांना फार सन्मानाने वागवलं गेलं नाही. या नाटककारांकडे अग्रपूजेचा तर सोडाच, पण साध्या पूजेचाही मान कधी चालून आलेला नाही. या नाटककारांपैकी एखाद् दोन अपवाद सोडले तर यांच्या नाटकांचा समावेश विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातही कधी फारसा झालेला नाही किंवा त्यांच्या नाटकांवर फार मोठय़ा उत्साहाने कोणी पीएच.डी. पदवीसाठी संशोधन केलेलंही (अपवाद वगळता) आढळत नाही. या साऱ्या प्रकाराकडे नीट पाहिलं तर असं म्हणता येईल की, एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उदयाला येऊन उत्तम काम करणारे कामगार, आदिवासी, स्त्रीवादी, दलित रंगभूमी हे मराठी रंगभूमीचे विविध अवतार म्हणजे मराठी मध्यवर्ती रंगभूमीने रंगकुसाबाहेर ठेवलेल्या समाजांचा उठाव आहे. एका अर्थाने या अवतारांनी मध्यवर्ती रंगभूमीचं थिटेपण अधोरेखित केलेलं आहे.
हेही वाचा >>> ‘कस्तुरीगंध : ‘माईसाहेब’ : काळ्या मनाच्या आईचं पोर्ट्रेट
या नाटककारांमध्ये आबासाहेब आचरेकर, वसंत दुधवडकर, वसंत जाधव, आत्माराम सावंत, प्रेमानंद तोडणकर यांचा प्रामुख्याने समावेश करता येईल. या शापित नाटककारांचा सम्राट म्हणजे ला. कृ. आयरे- अर्थात लाडकोजीराव कृष्णाजी आयरे! बहुजन समाजाच्या जीवनाचा नाटय़-भाष्यकार म्हणा किंवा त्या समाजाच्या कथा-व्यथांचा महापट मांडणारा खेळिया म्हणा; काहीही म्हटलंत तरी आयरे हा मोठा आवाका असणारा चिंतनशील नाटककार होता! आयुष्यात सणसणीत तीस नाटकं लिहून कामगार रंगभूमीला नवी दृष्टी देत तिला सामर्थ्य देणारा हा मूळचा लांजा-रत्नागिरीचा आणि कर्मभूमी मुंबई हाडीमांसी पचवलेला नाटककार होता. ‘कामगार रंगभूमी’ म्हणून जी रंगभूमी साधारणपणे १९८०-१९९० पर्यंत प्रचंड जोमाने कार्यरत होती, तिला केवळ ‘कामगार रंगभूमी’ म्हणणं अन्यायकारक ठरेल. ही रंगभूमी मुख्य धारेतल्या पांढरपेशा वा उच्चवर्णीय रंगभूमीला शह देणारी बहुजनवादी रंगभूमी होती. तिला ‘काऊंटर थिएटर’ म्हणणंच योग्य ठरेल.
कष्टकरी समाजाच्या विविध पाख्यांतलं जीवन चित्रित करणं हाच या रंगभूमींचा ध्यास होता, तीच तिची आकांक्षा होती. या आकांक्षेचं अतिशय अर्थपूर्ण रूप साकारणारा मोठा नाटककार म्हणून ला. कृ. आयरे हे कामगार रंगभूमीचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड होते, हे नि:संशय! आयरे यांच्या नाटकांनी लालबाग, परळ, लोअर परळ, नागपाडा, भायखळा, वरळी, आगारबाजार, शिवडी, काळाचौकी हे प्रदेश आपले मानले आणि त्यांनी तिथलं जीवन नाटकाच्या फलकावर आणलं. हे एका प्रकारे ‘थिएट्रिकल इन्व्हेन्शन’च होतं हे आता आता कुठे आपल्या लक्षात यायला लागलं आहे.. असो. या प्रकारातलं आयरेंचं एक महत्त्वाचं नाटक म्हणजे ‘मंगलदिव्य’! नाटक आहे १९४९ चं! या नाटकाचा ‘स्वस्तिक नाटय़ मंदिर’ने दामोदर हॉलच्या मंचावर प्रयोग सादर केला, तोही मार्च १९४९ मध्येच. म्हणजे आता या नाटकाला झाली त्र्याहत्तर वर्ष! अजूनही हे नाटक स्वत:चा रेलेव्हन्स गमावून बसलेलं नाही याची साक्ष कोकणातला मराठा ( मराठी नव्हे!) ज्ञाती समाज नक्कीच देईल!
हेही वाचा >>> कस्तुरीगंध : ‘दंडधारी’ : बाळासाहेबांची षोडशोपचार पूजा
‘मंगलदिव्य’ या संगीत नाटकाचा कथाविस्तार चांगला तीन अंकांचा आहे. नाटकात एकूण तेरा पदे असून, या पदांना प्रो. एकनाथ यांनी संगीत दिलं आहे. मनोहर, दामोदर, पद्माकर, वनमाळी आणि हैबतराव ही या नाटकातली अत्यंत महत्त्वाची पुरुष-पात्रं. ही पुरुष-पात्रं आपल्या कृती-उक्तींनी नाटकाचा ग्राफ गुंतागुंतीचा, नाटय़पूर्ण आणि गतिशील ठेवतात. मात्र, हे नाटक आदि-अंती स्त्रीकेंद्री आहे. हे नाटक कहाणी उभी करतं ते ‘सुंदर’ या कोकणातील स्त्रीची. या स्त्रीचा जन्म ब्राह्मण, सारस्वत, प्रभू वा चांद्रसेनीय कायस्थांतला असता तर तिच्या आयुष्याची जी फरफट झाली ती झाली नसती, असं खुद्द नाटककारच म्हणतो. ती कोकणातल्या मराठा जातीत जन्माला आली आणि त्यातही अत्यंत कोवळ्या वयात तिच्या पदरी वैधव्य आलं, हीच तिच्या आयुष्याची फरफट होण्यामागची कारणं आहेत असं नाटककार म्हणतो. कोकणातल्या मराठा समाजात विधवांच्या पुनर्विवाहाला इतर उच्चवर्णीय जातींत जशी मान्यता होती तशी मान्यता असती तर सुंदर, सुलोचना आणि त्यांच्यासारख्या हजारो तरुण विधवा आपल्या आयुष्यात तिरस्कृत ठरल्या नसत्या. कुटुंबाच्या पसाऱ्यात त्या मोलकरणी ठरल्या नसत्या. चारित्र्याच्या दृष्टीने घसरणीला लागल्या नसत्या, किंवा घरातल्या आणि घराबाहेरच्या पुरुषी वासनांधतेचं सहजप्राप्त भक्ष्य ठरल्या नसत्या, असा नाटककार आयरे यांचा विचारव्यूह आहे.
या विचारव्यूहाला अनुसरूनच त्यांनी नाटकात सुंदर-सुलोचनाच्या आयुष्यातले पेच आणि गुंते साकारले आहेत. प्रत्येक ज्ञातीत जसे समाजसुधारक निर्माण झाले आणि त्या, त्या जातीतील स्त्रियांचं सर्वागीण शोषण थोपवण्याचा, त्याची तीव्रता कमी करण्याचा, स्त्रियांना त्यांचे स्वाभाविक नैसर्गिक हक्क मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तसा प्रयत्न नाटकाच्या अवकाशात नाटककार ‘मनोहर’ या पुरुषाच्या माध्यमातून करतो असं दिसतं. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा हा भारतातील समस्त हिंदू विधवा स्त्रियांची काळजी घेणारा कायदा ईस्ट इंडिया कंपनीच्या नियमांतर्गत १८५६ मध्ये संमत केला गेला. पारंपरिक हिंदू समाजात तत्पूर्वी विधवा स्त्रियांना कोणतीही प्रतिष्ठा वा हक्क नव्हते. माजघर ओलांडायची त्यांना मुभा नव्हती. इतकेच नव्हे तर अशा स्त्रियांना चोळी घालण्याचीही परवानगी त्याकाळी नव्हती असे म्हणतात. १८४८ ते १८५६ या काळात भारताचा गव्हर्नर असलेल्या जनरल लॉर्ड डलहौसी याने या कायद्याचा मसुदा तयार केला होता. त्यानंतरचा भारताचा गव्हर्नर जनरल असलेल्या लॉर्ड कॅिनग याने १८५७ च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या अगोदर हा कायदा प्रत्यक्ष कार्यरत केला. लॉर्ड विल्यम बेंटिक याने १८२९ मध्ये केलेल्या सती निर्मूलनाच्या कायद्यानंतरचा हा अतिशय मोलाचा असा सामाजिक सुधारणा घडवून आणणारा कायदा मानायला हवा. गंमत अशी की, कायदा वगैरे अस्तित्वात असूनही काही अपवाद वगळता अगदी १९९० च्या दशकापर्यंत कोकणातल्या मराठा समाजात विधवा पुनर्विवाहाला मान्यता नव्हती असं म्हणतात. हे खरं असावं. कारण नाव न सांगण्याच्या हमीवर मराठा समाजातल्या अनेकांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. समजा, ते म्हणतात ते प्रत्यक्षातलं वास्तव मानलं तर राजकीयदृष्टय़ा पॉवरफुल असणारा हा समाज सामाजिक न्यायाच्या पातळीवर असंवेदनशील, कर्मठ होता आणि आजही आहे असं म्हणावं लागेल. हे सामाजिक वास्तव जमेला धरलं तर १९४९ साली ‘मंगलदिव्य’ साकारणाऱ्या नाटककाराचं आधुनिकत्व सहज लक्षात येण्यासारखं आहे. नाटकातला मनोहर हा सुधारणावादी तरुण केवळ नाइलाजाने एका मवाल्याच्या आश्रयाने राहणाऱ्या आणि सारी अवहेलना सोसणाऱ्या त्याच्या बालपणीच्या विधवा मैत्रिणीशी- म्हणजेच सुंदरशी लग्न करतो आणि मराठा समाजाने कोणत्या दिशेने वाटचाल केली पाहिजे ते दाखवून देतो.
हेही वाचा >>> कस्तुरीगंध : कालचा आणि आजचाही ‘महारवाडा’
‘मंगलदिव्य’ या शब्दाकडे मराठा ज्ञातीत विधवेच्या पुनर्विवाहाला असलेला विरोध लक्षात घेऊन नीट पाहिलं तर असा विवाह करणं हेच एक दिव्य ठरतं. मात्र हे दिव्य एका स्त्रीला पुनप्र्रतिष्ठा देणारं असल्याने ते दिव्य मंगल ठरणारं आहे. मनोहरने अध:पतित जीवन पदरात आलेल्या सुंदरशी विवाह करून तिला जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणलं. नाटकात सुंदर आणि सुलोचना यांच्या अध:पतित जीवनाचा एक आलेख नाटककार रंगवतो. त्यांना अध:पतित करणारे जे पुरुष आहेत तेही सारे एकजात व्यसनी, टाकाऊ, बाईबाज, जुगारी, दारूबाज असल्याने तेही अध:पतितच आहेत. आयरे यांनी समाजाच्या व्यापक पातळीवर नगण्य, टाकाऊ असणारा पुरुष आपल्या पुरुष असण्याच्या एकमेव गोष्टीचा आधार घेऊन स्त्रियांचं लैंगिक शोषण कसं करतो हे अनेक तऱ्हेच्या घटना-प्रसंगांच्या बांधणीतून प्रभावीपणे दाखवून दिलं आहे. मराठा समाजाच्या कर्मठ, पारंपरिक आचार-विचार-समजुतींची दशा-दिशा नाटककार त्याचा प्रवक्ता असणाऱ्या मनोहरच्या तोंडून साकार करत राहतो. मनोहरचे वडील हैबतराव एके ठिकाणी म्हणतात की, ‘‘तुम्हा सुधारकांचा धर्म, जात बुडवायचा विचार आहे. आजकालच्या सुधारक पोरांनी कसलं ताळतंत्रच ठेवलेलं नाही.’’ यावर मनोहर म्हणतो, ‘‘आम्ही आमचं ताळतंत्र बरोबर ठेवलं आहे; पण सनातनी, धर्मरक्षक, जातीभिमानी म्हणविणाऱ्या लोकांनीच धर्माच्या आणि नीतीच्या नावाखाली वाटेल ते छचोर चाळे चालवले आहेत. अनाथ अबलांची अब्रू लुटून लांडग्यांच्या तडाख्यात सापडलेल्या शेळीसारखी त्यांची गत करावी आणि त्यांनी हंबरडा फोडलाच तर त्यांच्या नरडीला नख लावून त्यांचा प्राण घ्यावा किंवा लाथ मारून त्यांना घराबाहेर हाकलून त्यांचे िधडवडे काढावेत, त्या अबलांनी समाजरूपी राक्षसांना घाबरून नदीचा आश्रय घ्यावा, जीविताचा अंत करावा, हेच ना तुमचं ताळतंत्र?’’ हाच मनोहर नाटकात मराठा जातीतल्या विधवेबद्दल म्हणतो, ‘‘मराठा समाजातली विधवा म्हणजे हमरस्त्यावर धूळ खात पडलेली अभागी धोंड! वाटेल त्यानं लाथेनं तुडवावी, ठोकरीने उडवावी! अरेरे! काय ही आमच्या समाजातली विधवांची स्थिती? बाप जेवू घालीना, दीर भीक मागू देईना, समाज जवळ करीना.. कुठं जायचं त्यांनी?’’
मनोहर जे बोलतो किंवा नाटककार आयरे जे बोलतात, मराठा समाजाच्या असंवेदनशीलतेची आणि विवेकहीन कर्मठपणाची जी मांडणी करतात, त्यातून त्यांची जी वैचारिक परिपक्वता समोर येते ती खरोखरच वेगळी आणि धाडसीही आहे. हीच मांडणी मुख्य धारेतल्या मराठी नाटकाला करता आली नसती का? अर्थात त्या रंगभूमीला ते कदाचित जमलंच नसतं, कारण आयरेंसारखं जातीपल्याड जाणारं, आतून तुटणारं आतडं त्यांच्या नाटककारांपाशी होतंच कुठे?
vijaytapas@gmail.com