प्रा. विजय तापस
‘वामन मल्हार जोशी’ हे एका व्यक्तीचं नाव आहे असं तुम्हाला वाटलं तर मी तुम्हाला दोष देणार नाही. कारण तसं समजण्यात तुमचा काही दोष नाही. मात्र ते तेवढंच आहे असं तुम्ही मानत असाल तर तो मात्र तुमचा मोठाच दोष ठरेल. खरं पाहता तो गुन्हाच ठरेल, कारण ‘वामन मल्हार जोशी’ हे एका विचारधारेचं किंवा ‘थॉट स्कूल’चं नाव आहे, याचंच भान तुम्हाला नसेल तर तो गुन्हाच म्हणायला हवा. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस, १८८२ मध्ये कुलाबा जिल्ह्यतल्या तेव्हाच्या तशा अगदी क्षुल्लकशा तळे या गावात जन्माला आलेल्या या माणसाने १९४३ पर्यंत, म्हणजेच मृत्यूपर्यंत मराठी साहित्यात जी सर्वागीण आणि गौरवास्पदही कामगिरी केली. त्यातून ‘वामन मल्हार’पुरस्कृत ‘नवमतवाद’ ही विचारधारा अधिक उजळली असं मानता येईल. त्यांच्या अगोदरचे जे ‘सुधारक’ होते त्यांची परंपरा खचितच खूप मोठी होती. त्याच परंपरेचे संस्कार अंगी मुरवलेल्या वामन मल्हारांनी तीच परंपरा साहित्याच्या क्षेत्रात अधिक पुढे नेली. तिला भक्कम पाया दिला आणि ‘नवमतवाद’म्हणून हीच परंपरा त्यांनी विद्यापीठीय शिक्षणाने पावन झालेल्या तरुण-तरुणींमध्ये अधिक विस्तारून तिची लोकप्रियता वाढवली. ‘‘तुम्ही काही म्हणा रावसाहेब, तुमची देशनिष्ठा वगैरे थोर आहेच, पण भारत भूमध्ये जर कोणी न्यायाचं, माणसाची बूज राखणारं राज्य आणलं असेल तर ते साहेबानं आणलं हे त्रिकालाबाधित सत्य! अहो, देशात साहेब न येता तर आपल्या बालविधवा घराघरांतल्या अंधारात फक्त अंगवस्त्र म्हणूनच ओळखल्या गेल्या असत्या, नाही तर तरण्या पोरी सतीच जात राहिल्या असत्या. ही परिस्थिती नाकाराल की काय?’’ साधारणपणे असे उद्गार राजरोसपणे वा खासगी स्वरूपात काढणारा जो वर्ग विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून मुंबई-पुण्यात दिसत होता, त्या वर्गाचे अत्यंत संवेदनशील, विचारी भाष्यकार वामन मल्हार होते हे जेवढं खरं, तेवढंच हा वर्ग आणि त्याचा पािठबा नसता तर ‘वामन मल्हार जोशी’ या नावाला जे महत्त्व महाराष्ट्र देशी प्राप्त झालं ते झालंच नसतं यात शंका नाही.
हेही वाचा >>>कस्तुरीगंध : एका जोडप्याची सत्त्वकहाणी
स्वत: उच्चविद्याविभूषित असणाऱ्या वामन मल्हार जोशी यांनी ज्या संस्थांमधून ज्ञानदानाचं कार्य केलं त्या संस्थांची नुसती नावं पाहिली तरी त्यांचा वैचारिक पिंड एका विशिष्ट प्रकारचा कसा घडला याचं उत्तर आपल्याला लगेच मिळतं. डेक्कन कॉलेज, ‘राष्ट्रीय शिक्षण’प्रणेते विजापूरकर यांचं ‘समर्थ विद्यालय’, ‘केसरी-मराठा’ संस्था आणि अनेक वर्ष त्यांनी जिथे काढली ती महर्षी कर्वे यांची हिंगण्याची शिक्षणभूमी यांचा उल्लेख केला की, वामन मल्हार यांच्या लेखनाचा वाण आणि डीएनए आपल्याला सहज कळतो. कर्वे यांच्या संस्थांमध्ये ते पंचवीस वर्ष होते. त्यांच्या ‘रागिणी’, ‘आश्रमहरिणी’, ‘नलिनी’, ‘सुशिलेचा देव’ आणि ‘इंदु काळे -सरला भोळे’ या कादंबऱ्या आणि आज आपण ज्या नाटकाचा विचार करणार आहोत ते ‘विस्तवाशी खेळ’ यात डोकावलं तरी त्यातून त्यांच्या नायिकांचाच आवाज आपल्याला त्या त्या कलाकृतीच्या आसमंतातून प्रक्षेपित होताना ऐकू येईल. त्यांच्या कादंबऱ्यांची शीर्षकं हाच या गोष्टीचा सज्जड पुरावा नाही का? वामन मल्हार म्हणजे राष्ट्रवाद, गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवाद या सर्व वादांचे कोणते ना कोणते संस्कार त्यांच्या लेखकीय व्यक्तिमत्त्वावर झालेले आपल्याला जाणवत असले, तरी तुम्ही त्यांना यापैकी कोणत्याही एका वादाचे ‘कट्टर वाहक’ म्हणून त्यांची गणना करू शकणार नाही. सर्व प्रस्थापित विचारधारांचा, त्यातील स्वीकारणीय मूल्यांचा अंगीकार करून त्यांनी स्वत:ची एक विचारधारा निर्माण केली. त्याच विचारधारेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी माध्यम म्हणून आपल्या कादंबऱ्या आणि एकुलत्या एका नाटकाचा वापर केला. त्यांची साहित्यदृष्टी धर्मनिरपेक्ष, जातीनिरपेक्ष, वर्गनिरपेक्ष होती की नाही याबद्दल वाद होऊ शकेल, मात्र ही दृष्टी लिंगनिरपेक्ष होती यात वाद संभवू शकत नाही. या पार्श्वभूमीवर आपण त्यांच्या ‘विस्तवाशी खेळ’ या ‘स्वतंत्र सामाजिक’ नाटकाकडे पाहायला हवं. या नाटकाची १९३७ सालातली ख्याती ‘नवमतवादी नाटक’ म्हणूनच झाली होती हे आपण विसरता कामा नये.
हेही वाचा >>>कस्तुरीगंध : दुर्दैवाने रेलेव्हन्स राखलेलं ‘बंदिवान’
‘विस्तवाशी खेळ’मध्ये केम्ब्रिज विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन केलेली, उद्धवराव या निष्णात वकिलांची मुलगी असलेली विजया नवमतवादी आचार-विचारांची प्रतिनिधी म्हणून प्रेक्षकांना सामोरी येते. विजया म्हणजे एक फॅशनेबल आणि तडफदार तरुणी. तिचे लग्न, पुरुषसंबंध आणि स्त्रियांचं समाजातलं स्थान याविषयीचे विचार १९३७ सालच्या कोणत्याही उच्चशिक्षित मुलीचे विचार आहेत. तिला साथ आहे ती चंद्रिकाची. दोघी मैत्रिणी असल्या तरी त्यांचे विचार समान आहेत असं नाही. चंद्रिका ही तिच्याच भाषेत सांगायचं तर विजयाइतकी ‘फॉरवर्ड’ नाही. तिच्या संदर्भात नाटकाच्या पहिल्याच अंकात अमृत जे वक्तव्य करतो ते त्याचं खरं मत नसलं तरी तिच्या आचार आणि मानसिकतेवर प्रकाश टाकणारं आहे. तो म्हणतो, ‘‘जुन्या कल्पनांची जुनेरी नेसणारी तुझी बुरणुसलेली बुद्धी कुणीकडे आणि नव्या नव्या मतांची रंगीबेरंगी पातळं नेसणारी तिची (जयाची) तेजस्वी बुद्धी कुठे!’’ तो असं बोलून तिला भ्रमचित्त करत असला तरी त्याचं तिच्यावर निस्सीम प्रेम आहे, जसं तिचं त्याच्यावर आहे. नाटकात अमृत हा देशभक्त, ब्रिटिश सरकारविरोधात चाललेल्या चळवळीत हिरिरीने सहभागी झालेला, सरकारच्या रोषाला पात्र झाल्याने मुळातला जहागीरदार असूनही आता जहागिरी जप्त होऊन बेघर होऊ घातलेला तरुण आहे. त्याचा जीवश्च मित्र म्हणजे विभाकर. या विभाकराचं विजयावर प्रेम आहे, जसं अमृतरावाचं शाळामास्तरीण असलेल्या चंद्रिकेवर प्रेम आहे. नाटकात प्रेमिकांच्या किमान चार जोडय़ा आहेत. अमृत-चंद्रिका, विभाकर-विजया, अंगार (हा नावाप्रमाणेच कारस्थानं करून अमृतला संकटांच्या खाईत लोटणारा खलनायक आहे.) आणि नर्मदा (तिचं अंगारवर प्रेम नाही, मात्र ती त्याच्या वासनेचा बळी ठरून तिला त्याच्यापासून गर्भ राहिला आहे. अर्थातच तिच्या गर्भवती असण्याशी आपला संबंध अंगारने नाकारला आहे.) आणि विजयाच्या वडिलांचा आश्रित असणारा चक्रधर हा चंद्रिकेवर एकतर्फी प्रेम करणारा प्रेमवीर आहे. विजयाचे वडील- उद्धवराव हे सरकारच्या मर्जीतले, सरकारशरण वकील आहेत. ब्रिटिश अमलातील कातडीबचाऊ अधिकारी वर्गाचा हा एक नमुना म्हणता येईल. मात्र मुलीच्या हट्टापायी ते राजद्रोह आणि स्वत:जवळ बेकायदा पिस्तूल बाळगल्याच्या खटल्यात अडकलेल्या अमृतचं वकीलपत्र घेतात आणि नाटकाच्या अखेरीस त्याला त्या खटल्यातून सोडवतात. (भारतीय वकील प्रसंगी सरकारधार्जिणे असले तरी अंतिमत: ते ‘आपल्या देशबांधवांसाठी’ उभे राहतात आणि त्यामागे काही एक तत्त्वविचार वा मूल्यविचार असतो हेच नाटककाराला या ठिकाणी दाखवायचं आहे यात शंका नाही.) आपल्या देशभक्तीपायी आपल्याला कारावास झाला तर चंद्रिकेच्या आयुष्याची फरफट होऊ नये या एकमेव कारणासाठी अमृत चंद्रिकेला झिडकारून आपलं विजयावरच खरं प्रेम असल्याचा बहाणा करतो. यातून नाटकात असंख्य घटना-प्रसंग निर्माण होतात. त्यातलाच एक भाग म्हणजे अमृतरावाचं आपल्यावर प्रेम आहे असं समजून विजया त्याच्या प्रेमात पडते हा आहे. अखेरीस जेव्हा सारा उलगडा होतो तेव्हा कोणत्याही कारणाने का होईना, पण अमृतने आपला ‘वापर’ केला याची जाणीव जरी विजयाला होत असली तरी ती त्याला माफ करते हे विशेष.
नाटकातली विविध पात्रांच्या तोंडी असलेली काही वाक्यं आपण पाहिली, तरी आपल्याला नाटकाची पुरेशी कल्पना येऊ शकते. १. तरुणपणी प्रेम करणं म्हणजे कुठल्या तरी कॉलेजात नाव घालण्यासारखं आहे का? (चंद्रिका) २. समुद्राच्या तळातले मोती कुठे कसे आहेत हे सांगता येईल, पण स्त्रियांच्या हृदयातील गूढ कुणाला सहसा समजायचं नाही. (विभाकर) ३. समीधा होमात वाहायच्या असतात.. देशभक्तीच्या होमात स्वत:च्या सुखासाठी मी तिची आहुती देऊ? (अमृत ) ४. बायकांना इतकं स्वातंत्र्य देणं बरं नाही, फाजील स्वातंत्र्य म्हणजे विस्तवाशी खेळ! (उद्धव) ५. अविवाहित तरुण-तरुणींमध्ये इतकी सलगी नसावी, असल्या सलगीचे फार वाईट परिणाम होतात. (उद्धव) ६. स्वातंत्र्य तुम्ही कोण देणार मला? मी जन्मत: स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रच राहणार (विजया) ७. तुला अमृतरावांशी लग्न करायला मिळावं म्हणून मी विभाकरांशी लग्न करावं हा न्याय चांगला आहे! लँकेशायरमधील गिरण्यांना फायदा व्हावा म्हणून गिरण्या न काढता हिंदूस्थाननं फक्त कापूस पिकवावा अशातला तुझा हा न्याय आहे! (विजया) ८. ज्यांना सारासार विचार नाही त्यांच्यापुढे तू नवमतवादी भाषणं करतेस हे चांगलं नाही! (अमृत) ९. विवाहापूर्वीच्या प्रेमाला सलगीची मोकळीक देणं म्हणजे जळत्या निखाऱ्याला गवताच्या गंजीशी सलगी करू देण्यासारखं आहे. (उद्धव) १०. राजद्रोही भाषणं तुम्ही करायची, त्यात सरकारबरोबर आम्हां प्रागतिकांची नालस्ती करायची, आमची कुचेष्टा करून प्रतिष्ठा तुम्ही मिळवायची आणि सरकारने फिर्याद केली म्हणजे पदरमोड करून तुमचे खटले चालवायला तुम्ही आम्हाला विनवायचं! तुम्हां ज्वलज्जहालांचा हा असा धंदा! (उद्धव) नाटकातल्या पात्रांचे स्वभावविशेष आणि नाटकातले ताणेबाणे हे संवादखंड पुरेसे स्पष्ट करणारे आहेत. या नाटकाची भाषा अगदी मोकळीढाकळी, पुस्तकीपणा टाळणारी, भाषिक अलंकरणाचा सोस नाकारणारी नाही हे सत्य, मात्र त्या काळाचा एक सहज भाषाविष्कार त्यात दिसतो. ‘लाडकीचे हात आणि काय करी मात’, ‘दोघांच्या कानगोष्टी, तिसरा होई कष्टी’, ‘अडली गाय, फटके खाय’, ‘कारकुनाची स्वारी, उठाठेवी भारी’, ‘पती दास, बायको उदास’, ‘मनात डर नाही, त्याला वनातही डर नाही’ अशा वाक्यांमधून बोलीभाषेचा लहेजा आपल्याला भुरळ घालतो हे नक्की!
वामन मल्हार जोशी यांनी ‘विस्तवाशी खेळ’ या त्यांच्या एकुलत्या एका नाटकाच्या माध्यमातून रंगभूमी आणि नाटक या अत्यंत ज्वालाग्राही गोष्टीशी स्वत:चा संबंध प्रस्थापित केला आहे. ‘नाटक’ हाच मुळात उत्तम फुललेला आणि अत्यंत दाहक असा विस्तव आहे. या विस्तवाला हाती खेळवण्याचा मोह साहित्याच्या क्षेत्रात मनसोक्त मुशाफिरी करणाऱ्या अनेक रथी-महारथींना झाला आहे. मात्र त्यातल्या प्रत्येकाला हा विस्तव यशस्वीपणे हाती खेळवणं साध्य झालं आहे असं नाही. अशांच्या मांदियाळीतच मी वामन मल्हारांची गणना करेन. त्यांना नाटकाचा मोह पडला आणि त्यांनी नाटक लिहिलं यात गैर काही नाही. स्वत:ची विचारधारा आमरयतेसमोर आणायला नाटकासारखं लोकमाध्यमच हवं हेही कसोटीला उतरलेलं सत्यच. मात्र नाटकाचं म्हणून एक स्वतंत्र लॉजिक असतं, त्याची म्हणून एक प्रभावी मांडणी- एक रचनातंत्र असतं आणि त्याचं एक स्वायत्त सौंदर्यशास्त्रही असतं हे लक्षात न घेता किंवा लक्षात येऊनही त्याला बगल देऊन नाटक लिहिणारे काही कमी नाहीत. जरा कठोरपणे बोलायचं तर वामन मल्हार अशा नाटककारांपैकीच एक आहेत. मी असा दोषारोप त्यांच्यावर करतो कारण त्यांचं नाटक खूप बोलतं, प्रसंगी अगदी नको तितकं आणि नको त्या ठिकाणी बोलत राहतं. अशा अतिरिक्त बोलण्यातही पुनरुक्तीचा अडथळा वारंवार येत राहतो. ‘नाटकाने बोलावं बेतानं आणि दाखवावं आधिक्यानं’ या ‘कमिटमेंट’चाच नाटककाराला विसर पडला आहे. नाटक ही ‘परफॉरिमग आर्ट’ म्हणजेच प्रयोगशील कला आहे. नाटक म्हणजे कथा- कादंबरी- निबंध नव्हे- याचं जे टोकदार भान नाटककाराकडे असावं लागतं तेच वामन मल्हार जोशी यांच्यापाशी नव्हतं याचा खेद होतो. ते तसं असतं, तर ‘विस्तवाशी खेळ’ अधिक दाहक आणि अधिक परिणामकारक झालं असतं. पण ते तसं झालं नाही हे बोचणारं सत्य!
vijaytapas@gmail.com