पुस्तक परीक्षण
रवींद्र पाथरे
अलीकडेच भारत-चीन सीमावादाची ठिणगी पुन्हा नव्याने पडली आहे. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याने भारतीय लष्कराची कुरापत काढून अघोषित युद्ध छेडले आहे. भारताच्या सीमावर्ती देशांना आर्थिक तसेच अन्य रसद पुरवून त्यांना आपले मांडलिक बनवण्याची रणनीतीही चीनने अवलंबिली आहे. परिणामी पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश हे भारताचे शेजारी भारताविरोधात जातील अशी व्यूहरचना चीनने केली आहे. सर्व बाजूंनी भारताला घेरून, त्याच्यावर राजनयिक, सामरिक आणि आर्थिक दबाव आणून पुरते कोंडीत पकडण्याचे चीनचे कारस्थान आहे. याचा मुकाबला करताना भारताला चीनचा इतिहास, त्याची प्रचंड आर्थिक व लष्करी ताकद, चीनचे जागतिक व्यापारातील महत्त्वपूर्ण व गुंतागुंतीचे स्थान अशा अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागणार आहेत. जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या या काळात जगातील कुठल्याही देशाला आपल्याविरुद्ध असलेल्या देशाशी युद्ध छेडताना दहादा तरी विचार करावा लागेल अशी सद्य:स्थिती आहे, इतके त्या देशांचे बहुआयामी हितसंबंध परस्परांत गुंतलेले असतात. या पार्श्वभूमीवर चीनशी शत्रुत्व ओढवून घेताना भारतालाही बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागत आहे. विरोधी पक्षात असताना राणा भीमदेवी गर्जना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत: सत्तेत आल्यावर चीनशी पंगा घेणे किती दुष्कर आहे हे समजून चुकले आहे. त्यामुळेच त्यांची भाषा बदलली आहे. पाकिस्तान व चीनला एकाच तराजूत तोलणे शक्य नाही, हे कटु वास्तव पचवताना त्यांना शब्दच्छल करणे भाग आहे. गेली काही वर्षे चीन आणि भारत या भविष्यातील आर्थिक महासत्ता होणार असल्याचा डंका आपल्यासाठी कितीही सुखावणारा असला तरी ते वास्तव नाही हे आपण नीटच समजून घेतले पाहिजे. यासाठी योगिनी वेंगुर्लेकर लिखित ‘कथा एका शर्यतीची’ हे चीन आणि भारत यांच्या सर्वागीण सामर्थ्यांचा अभ्यासपूर्ण परामर्श घेणारे पुस्तक दिशादर्शक ठरू शकेल.
भारत हा लोकशाही देश आहे, तर चीन साम्यवादी. साहजिकपणेच दोघांची विकासाची प्रतिमाने वेगवेगळी राहिली आहेत. दोन्ही देशांना प्रदीर्घ इतिहास, सांस्कृतिक व व्यापारी परंपरा आहेत. इसवी सनपूर्व काळापासून परस्परांचे या ना त्या प्रकारे दृढ संबंध राहिलेले आहेत.. जरी या प्रदीर्घ काळात दोन्ही देशांमध्ये राजकीय-सामाजिक अस्थैर्य होते, तरीही! लेखिकेने या इतिहासाच्या मागोव्याने दोन देशांतील परस्परसंबंधांचा, तिथल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक स्थितीचा तपशिलात धांडोळा घेतला आहे; जेणेकरून उभय देशांच्या आजवरच्या वाटचालीत, त्यांच्या प्रगतीत कोणकोणत्या गोष्टी कारक ठरल्या याचे आकलन व्हावे.
ब्रिटिश राजवटीतील भारत आणि सरंजामशाहीने पिचलेला चीन यांच्या वाटचालीत स्वाभाविकपणेच महदंतर होते. ब्रिटिश राजवटीमुळे भारताला लाभलेले आधुनिकतेचे कोंदण व सामाजिक-सांस्कृतिक विचारविश्व चीनला लाभले नाही. याची परिणीती म्हणजे आपल्या उन्नतीसाठी दोघांनी स्वीकारलेले भिन्न मार्ग! चीनने सम्राटशाहीला तिलांजली देऊन माओच्या नेतृत्वाखाली साम्यवादाला जवळ केले, तर पं. नेहरूंच्या उदारमतवादी धोरणांमुळे आपण लोकशाहीवादी संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. याचे बरे-वाईट परिणाम दोघांनाही अनुभवायला मिळाले. परिणामी अत्यंत टोकाचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यक्तिगत जीवन दोन्ही देशांमधील जनतेच्या वाटय़ास आले. त्यात भारतासारख्या खंडप्राय देशात असंख्य जाती-जमाती, धर्म, रीतिरीवाज, प्रथा-परंपरा. त्या सर्वाना एका धाग्यात गुंफून लोकशाही मार्गाने देशाचा राजशकट चालवणे पं. नेहरूंसाठी आव्हानात्मकच होते. याउलट, ‘जनतेचे राज्य’ नामक भूलभुलय्यात गुंगवून माओने जनतेला आपल्या पोलादी मुठीत ठेवले. विरोधकांना चिरडून, संपवून देशाची प्रगती साधण्याचा साम्यवादी चीनचा अट्टहास मानवाधिकारांची पायमल्ली करणारा होता, आणि आहे. जगाच्या नकाशावर सर्वोच्च स्थान प्राप्त करण्यासाठी वैध-अवैध मार्गाचा अवलंब करण्यास चिनी शासकांनी मागेपुढे पाहिले नाही. चीनच्या आजच्या प्रगतीच्या झगमगाटात तिथल्या सामान्यांची झालेली फरपट, त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टा, त्यांच्या जगण्याला आलेले यांत्रिकपण, सतत भीती व दहशतीच्या सावटाखाली जगणे आदी अनेक पैलू आहेत. चीनमध्ये शहरी लोकांचा चंगळवाद आणि ग्रामीण जनतेचे दारिद्य््रारेषेखालचे हलाखीचे जीवन हे विषम चित्र आजही आहे. तिथेही राजकीय आश्रयाखाली भ्रष्टाचार होतच असतो. त्याविरुद्ध ब्र काढण्याची मात्र कुणाची प्राज्ञा नाही. जे तसा प्रयत्न करतात, त्यांचे अस्तित्वच संपवले जाते. चीनची पाशवी राजकीय शक्ती देशाच्या प्रगतीसाठी एकीकडे आकाशपाताळ एक करत असताना त्याचे दुष्परिणामही समोर येत आहेत. चीनने राबवलेल्या ‘एकच मूल’ या धोरणामुळे त्यांच्याकडे वृद्धांची संख्या प्रचंड वाढली आहे. ज्याची किंमत त्यांना आज तरुण मनुष्यबळाची कमतरता आणि ज्येष्ठांच्या अर्थव्यवस्थेवरच्या अतिरेकी भारातून चुकवावी लागते आहे. लेखिकेने चीनमधील महत्त्वपूर्ण घटना-घडामोडींचा इतिहास तटस्थपणे मांडून, त्यांचा सर्वागीण धांडोळा घेत चीनच्या संभाव्य महासत्तापदापर्यंतच्या प्रवासाचा चिकित्सक आलेख पुस्तकात चितारला आहे. या प्रवासात चिनी राज्यकर्त्यांकडून झालेल्या चुका, त्यांचे दुष्परिणाम, सत्ताधाऱ्यांना या चुकांची जाणीव होताच त्यांनी बदललेले मार्ग, त्यातून घडलेले मन्वंतर असा मोठा पट यात उभा केला आहे. माओ, डेंग ते क्षी जिनपिंग असा राजकीय नेतृत्वाचा इतिहास धुंडाळताना या प्रत्येकाची कार्यशैली, त्यांचे गुणदोष, त्यातून देशाचे झालेले फायदे-तोटे, आपल्या सोयीने स्वीकारलेले आर्थिक उदारीकरण व भांडवलशाही, त्यातून झपाटय़ाने झालेला चीनचा विकास या सगळ्याचा ऊहापोह पुस्तकात आहे. चिनी जनतेच्या स्वातंत्र्याकांक्षी आंदोलनांचा वेधही लेखिकेने घेतला आहे. परंतु चीनमधील पोलादी राजकीय चौकट भेदण्याचे जनतेचे सगळे प्रयत्न कसे विफल ठरत आले आहेत याचा साद्यंत वृत्तान्त त्यातून आकळतो. संपूर्ण जगाला राजकीय, व्यापारी व आर्थिकदृष्टय़ा अंकित करण्याची चीनची चाललेली धडपड, त्यासाठी धूर्तपणे टाकलेली पावले, चीनमधील स्वस्त मनुष्यबळ व उत्तम पायाभूत सोयीसुविधा यांच्या सापळ्यात अलगद सापडलेले जग व त्याचा लाभ उठवून चीनची महासत्ता होण्याकडे सुरू असलेली वाटचाल.. हा सारा पट थक्क करणारा आहे.
दुसरीकडे भारताचा प्रदीर्घ इतिहास, स्वातंत्र्य चळवळीचा काळ, स्वातंत्र्योत्तर काळात संमिश्र अर्थव्यवस्थेचा केलेला स्वीकार, त्यातून वेगवान विकासात आलेले अडथळे, लोकशाही शासनव्यवस्थेमुळे जनतेला मिळालेले अधिकार आणि त्यामुळे येथल्या राजकीय नेतृत्वाला कोणतेही निर्णय घेताना या खंडप्राय देशातील वैविध्यपूर्ण जाती-जमाती, धर्म आदींचे हित-अहित लक्षात घेण्याच्या आलेल्या मर्यादा, १९९१ साली तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग या जोडगोळीने जागतिकीकरण व उदारीकरणाचे खुले केलेले अवकाश, परिणामी विकासाला मिळालेली गती, पुढे काही काळ अस्थिर सरकारांमुळे त्यात निर्माण झालेले अडथळे, जागतिकीकरणातून झालेल्या विकासाची फळे चाखत असतानाच निर्माण झालेले नवे वर्गभेद, परिणामत: देशाच्या एकात्मिक विकासाचे अधुरे राहिलेले स्वप्न इत्यादीची चर्चा पुस्तकात तपशिलांत केली गेली आहे. अर्थात कुशल तरुण मनुष्यबळ आणि मोठी बाजारपेठ यांच्या जोरावर भारतही प्रगती करतो आहे. तथापि चीन आज आपल्यापेक्षा कितीतरी पुढे निघून गेलेला आहे. त्याला गाठणे आणि मागे टाकणे अनेक अडथळ्यांमुळे सध्या तरी भारतासाठी दिवास्वप्नच आहे, हे कटु वास्तव आहे. चीन व भारत यांच्या आयात-निर्यातीमधील प्रचंड तफावतच यादृष्टीने पुरेशी बोलकी आहे. चीन व भारताने अर्थव्यवस्थेच्या स्वीकारलेल्या भिन्न प्रारूपांमुळे उभयतांच्या विकासात पडलेले महदंतर लेखिकेने सोदाहरण स्पष्ट केले आहे. याकरता दिलेली प्रत्यक्ष आकडेवारी व अन्य संदर्भाची रेलचेल पुस्तकात आढळते. त्यामुळे या पुस्तकास संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. चीन व भारताच्या तौलनिक प्रगतीच्या अभ्यास करू इच्छिणाऱ्यांना तर हे पुस्तक पथदर्शी ठरेलच; त्याचबरोबर भारताच्या विकासाबद्दल भ्रामक समजुती बाळगणाऱ्यांच्या डोळ्यांतही ते अंजन घालेल.
पुस्तकाचे शेवटचे प्रकरण भारतीय व चिनी लोकांच्या चीनबद्दलच्या प्रतिक्रियांचा समावेश असलेले आहे. त्यात ज्या भारतीय माणसांचा चीनशी या ना त्या कारणाने प्रत्यक्ष संबंध आलेला आहे अशांची मते दिली आहेत. ही मते प्रत्यक्षानुभवांवर आधारित असल्याने त्यांना निश्चितच महत्त्व आहे. चीनमध्ये लोकशाही नाही याबद्दल आपण त्यांची कींव करत असलो तरी काही चिनी माणसांचे मत आपल्यापेक्षा वेगळे आहे. त्यांचे म्हणणे, ‘‘आम्ही आज महासत्तेप्रत जाणारी जी प्रगती करू शकलो आहोत, तशी प्रगती लोकशाही स्वीकारलेल्या तुम्हाला का साध्य होऊ शकली नाही याचा तुम्हीसुद्धा अंतर्मुख होऊन विचार करावा.’’
चीनमध्ये भ्रष्टाचार, वशिलेबाजी, नातीगोतीशाही नाही असे बिलकूल नाही. किंबहुना, या सगळ्यास तिथे ‘संस्था’त्मक रूप दिले गेले आहे. मात्र त्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज त्वरित संपवला जातो. इतकी प्रचंड आर्थिक प्रगती होऊनही ग्रामीण चिनी जनतेची परवड सुरूच आहे. ‘आमच्याकडे सगळे समान’ असल्याचे वरकरणी दाखवले जात असले तरी तिथे वर्गभेद आहेतच. पण काहीही झाले तरी ‘देशाची प्रगती’ हे लक्ष्य मात्र कधीही दुर्लक्षिले जात नाही, ही त्यांच्या देदीप्यमान प्रगतीतली मेख आहे. आणि नेमका त्याचाच आपल्याकडे अभाव आहे. आपले बहुतांशी राजकीय नेते हे (अपवाद वगळता) आपण व आपले आप्त यांचं भलं करण्यातच मग्न असतात. देशाचं भवितव्य, प्रगती वगैरे गोष्टी त्यानंतर येतात. भारत महासत्ता बनण्यातील हा मोठ्ठाच अडथळा आहे. त्यामुळे चीनशी आपली बरोबरी कधीच होऊ शकत नाही. त्याच्या पुढे जाण्याची तर बातच सोडा.
आज करोनाप्रसाराचे खापर चीनवर फुटले असले आणि सबंध जग चीनच्या विरोधात गेले असले तरीही चीनची प्रगती रोखण्याची, त्याला अटकाव करण्याची कुणीच हिंमत करू शकत नाही, हे वास्तव आहे. महासत्तेचेच हे लक्षण नव्हे काय?
‘कथा एका शर्यतीची’- योगिनी वेंगुर्लेकर, राजहंस प्रकाशन, पृष्ठे- ३२०, किं.- ४०० रुपये.
ravindra.pathare@expressindia.com