मृदुला दाढे- जोशी – mrudulasjoshi@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मेरा कुछ  सामान..’ हे गाणं नव्हेच.. ती एक मुक्तछंदातली कविताच आहे! कारण माया हा स्वत:च एक मुक्तछंद आहे. मग तिचे विचार कसे सामान्य, सरळ, धोपटमार्गी असतील? गाण्याची रचना सलग. पंचमनं जसे शब्द समोर येतील तशी चाल लावलीय. कारण हे नेहमीसारखं गाणं नाहीए. म्हणून मग तिन्ही कडव्यांच्या चाली वेगवेगळ्या झाल्या. अगदी गाण्याचा शेवटसुद्धा! गाण्याच्या धृवपदात ते थबकणं.. ‘पतझड है कुछ, है ना?’ असं विचारणं. तिथे संतूरमधून एक स्वरांची लड ओघळायला सुरुवात होते. त्या ‘पतझड’चा भास देते ती. सुकलेल्या पानांसारखे ते स्वर वाटतात. पं. उल्हास बापटांनी वाजवलेल्या या पीसमुळे वाऱ्यावर उडालेली ती पानं डोळ्यापुढे दिसायला लागतात. त्यांची चाहूल कानात ‘पहननारी’ माया मग आपल्याला आतून समजते. अशा बेधुंद प्रेमाला पूर्वेतिहास नसतो. नसतं सामाजिक भान. नसते महत्त्वाची त्या व्यक्तीची लौकिक किंमत! अशा प्रेमाला फक्त वर्तमानकाळ असतो. खरं तर आत्ताचा क्षण आसुसून जगण्यातच त्या प्रेमाचं सार्थक असतं. माया ज्या passion नं महेंद्रवर प्रेम करते त्याचा हेवा वाटू शकतो. असं प्रेम ‘सच’ असतं, ‘सही’ नसतंच अनेकदा. जे सत्य आहे ते योग्य असावं, किंवा योग्य वाटतं ते प्रत्यक्षात उतरावं असा काही नियम आहे का?

या गाण्यात लयीचा विलक्षण अंदाज दाखवणारी एक ओळ आहे. ‘आधे सूखे, आधे गीले’ हे शब्द तालाला सोडून आहेत. त्यात एक वेगळाच फील आहे. ‘वो रात बुझा दो’ म्हणताना ‘दो’वरचा आवाजाचा जोर, ‘मेरा’वरचा जोर, लाडिकपणा.. यांत फक्त आणि फक्त माया दिसते. ‘गीला मन शायद’ म्हणताना हा आवाज रहस्यमय होतो. गुलजारजींच्या काव्यात ‘निशादीप’ विझत नाही, तर ‘रात्र’च ‘विझते.’ (‘तेरे बगैर दिन न जला.. तेरे बगैर शब न बुझे.. सिली हवा..’ हे आठवतं अशा वेळी.) कारण ती रात्र हेच त्या उत्कट प्रेमाचं प्रतीक! ‘वो’ रात बुझा दो! ती अनुरागी रात्र.. ते एकमेकांत बुडून जाणं. या सगळ्यावरच एक फुंकर मारून विझव ते!

महेंद्र म्हणतो तसं- This is Maya! काय करायचं असतं अशा माणसांचं? महेंद्रचं ‘इतना छोटा मत करो मुझे..’ हे वाक्य खूप सुंदर आहे. कारण सुधापासून त्यानं काहीही लपवलेलं नाही. सुधाही मायाचं पत्र वाचून गलबललीय.. हा टिपिकल ‘त्रिकोण’ नाही. माया हे एक वेडं मूल आहे.. एक भरकटलेलं सुंदर पाखरू- ज्याला सोडूनही देता येत नाही आणि समाजाच्या चौकोनी पिंजऱ्यातही ते राहू शकत नाही. महेंद्रचा मायापासून दूर जाण्याचा, सुधाबरोबर नव्यानं आयुष्य सुरू करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आहे.. ‘सत्य’ स्वीकारून ‘योग्य’ वागण्याचा हा मार्ग आहे. दोघं हनिमूनला जातात. एकमेकांचा अखंड सहवास.. निसर्गसौंदर्य.. यातून खरी सुधा फुलत जाते. पण हे गाणं अशा क्षणी सुरू होतं! त्या वेटिंग रूममध्ये सुधाच्या पायाच्या जखमेवर औषध लावण्याचा तो क्षण.. सहजपणे, अधिकारानं महेंद्र तो स्पर्श करतो. नजरानजर होते. जे विझलं, गाडलं असं वाटलं होतं ते तर आहेच की अजून! पण आता त्याला कसलंही नाव देता येत नाहीये.. मग आठवतात ‘ते’ क्षण.. आसुसून जगलेले. त्या क्षणांची प्रतिबिंबं एकमेकांच्या डोळ्यांत दिसायला लागतात. आत काहीतरी हलतं खोलवर..

‘कतरा कतरा मिलती है

कतरा कतरा जीने दो

ज़िंदगी है, बहने दो

प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो’

(आशा भोसले)

खऱ्या अर्थानं आपण ‘जगतो’ तो काळ किती? कारण तेवढेच क्षण आपण ‘जगलेले’ असतो. बाकीचा काळ केवळ मेलो नाही म्हणून आपण जिवंत असतो! असे क्षण एक ‘कतरा’ असतात.. लहानशा तुकडय़ाइतके छोटे! तुझ्याबरोबर मिळालेले हे उन्मुक्त क्षण.. कितीही कमी असले तरी त्यातच पूर्ण आयुष्य जगून घ्यायचंय.. वाहू दे मला तुझ्यात असंच. आणि अशीच तहानलेली राहायचंय मला. नकोच ती पूर्ण तृप्ती.. तुझ्यापर्यंत पोचण्याचा हा प्रवासच.. सुखावणारा!

कधीतरी त्या स्वप्नांवर पाय पडावा चुकून.. आणि तुझ्या मिठीत कोसळावं.. तसं आहे हे. याच धुंदीत राहायचंय..

‘तुमने तो आकाश बिछाया

मेरे नंगे पैरों में ज़्‍ामीं है

पाके भी तुम्हारी आरज़ू हो

शायद ऐसी ज़िंदगी हसीं है..’

मी अशीच बरी आहे साधीसुधी! जमिनीवर घट्ट पाय रोवून असणारी. आयुष्याकडून भव्यदिव्य अपेक्षा नसणारी. तू आकाश अंथरलंस, पण माझी ती मागणीच नाही! तू मिळालास मला- तरीही ती ओढ, असोशी संपू नये कधीच. हेच सौंदर्य आहे जगण्यातलं! त्या आरजूतच वाहून जावं.. तुझ्याकडे एका उत्कंठेनं बघत राहावं!

‘हलके हलके कोहरे के धुंए में

शायद आसमां तक आ गयी हूँ

तेरी दो निगाहों के सहारे

देखो तो कहाँ तक आ गयी हूँ..’

तुला हासील करणं सोपं नव्हतं. धुक्यात वेढलेला तू- त्या आकाशासारखा! पण ते आकाश आता कवेत आल्यासारखं वाटतंय. माझा आहेस तू.. कुठे आले बघ तुझ्याच नजरेच्या रोखानं, आधारानं.. पण ते धुकंही  हवंय तुझ्या भोवतालचं! तुला जास्त सुंदर आणि अप्राप्य बनवणारं!

सुधाच्या जगात एकच व्यक्ती आहे. तिला गमवायचं नाहीये.. आशाबाईंचा आवाज एक जबरदस्त ओढ घेऊन येतो.. आता हा आवाज सुधाचा.. एका पत्नीचा.. निसर्गात, एकांतात प्रेयसी बनून येणारा! ‘प्यासी हूँ मैं, प्यासी रहने दो..’ हे स्वर टिपेला जातात तेव्हा आशाबाईंचा आवाज काय विलक्षण उत्कट होतो! रेखाच्या चेहऱ्यावरचे भाव आणि हा आवाज यांचं अद्वैत आहे. हातावर हनुवटी टेकवून बसलेली रेखा.. तिच्या नजरेतला तो कृतार्थ भाव.. महेंद्रच्या केसांतून हात फिरवताना स्वत:च हरवून जाणं! तिच्या प्रेमात एक शांतपणा आहे. स्थैर्य आहे. माया म्हणजे एक उन्मुक्त प्रपात, तर सुधा म्हणजे एक जलाशय. गंभीर खोली असलेला! घनगर्द प्रेमाचा तो विशाल आणि तृप्त करणारा स्रोत आहे.

पंचमनं गाण्यात त्या पाण्याच्या झऱ्यांना मुक्तपणे बागडू दिलंय. आशाबाईंचा आवाज ओव्हरलॅप करून मनाच्या न थांबवता येणाऱ्या विचारांना मुक्त बागडू दिलंय. जणू विचारांची न थांबणारी आवर्तनंच.. आतून एकापाठोपाठ एक उलगडत जाणारी. ‘कतरा कतरा’ म्हणताना ‘रा’ अक्षरावर बीट असल्याने गाणंच ऑफ बीट  जातंय का, असा क्षणभर भ्रम निर्माण होतो. पण  ‘जिंदगी’मध्ये ‘जिं’वर बीट आल्यामुळे तसं काही नाही हे लक्षात येतं. पुन्हा ‘प्यासी’ ऑफबीट.. ‘रहने’ बीटवर! पंचमचा विचारच ऑफबीट.. तो विचार पेलू शकणारं आशाबाईंच्या गायकीतलं टायमिंग! मुळात आयुष्यं एका रेषेत कुठे चाललीयत? एक विलक्षण मोठी चुकामूक घडलीय. पण त्यातून कुठे एका रस्त्यावरून चालू शकतोय का, हे आजमावलं जातंय इथं. म्हणून गाण्याचंही असं मध्येच अधांतरी असणं.. मध्येच जमिनीवरून चालणं थरारून टाकतं. पंचमदांसारख्यांना हे ठरवून करावं लागत नाही.. ते होतं त्यांच्याकडून.

आणि सिनेमॅटोग्राफी? प्रत्येक फ्रेम बोलते. झाडांची पाण्यातली प्रतिबिंबं काहीतरी सांगतात! हे गाणं ४िी३ सुद्धा करता आलं असतं. पण आत्तापर्यंत सुधामधली प्रेयसी फुटून कुठे आली होती? हे गाणं नसतं तर ‘टिपिकल बायको’ या कप्प्यात तिला टाकून मोकळे झालो असतो आपण. सुधामधला रोमान्स.. तिच्या प्रेमाचा रेशमी पोत इथं झळाळून येतो. महेंद्रला चिंब भिजवून आपल्या प्रेमाच्या शालीची ऊब देणारी सुधा या गाण्यात भेटते. रेखाच्या डोळ्यांत फक्त समर्पणच नाही, तर एक घरंदाज अनुराग आहे.. तिच्या हालचालींमधला तो अस्सल घरगुती ढंग.. मग ते वेणीचा शेपटा मागे टाकणं असो किंवा पाण्यात पाय बुडवून बसणं.. किती बोलतात या साध्या हालचाली!

मायाचा आत्महत्येचा प्रयत्न.. महेंद्रचं तिला भेटायला जाणं.. त्यातून सुधाचे गैरसमज.. सुधाला पोकळी जाणवणं साहजिकच असतं.

‘खाली हाथ शाम आयी है

खाली हाथ जायेगी

आज भी न आया कोई

खाली लौट जायेगी..’ (आशा भोसले )

दिवस कसाही जातो.. कारण त्याला संध्याकाळचं एक नकळत आश्वासन असतं. पण जेव्हा ती संध्याकाळही रित्या हातांनी येते तेव्हा आशेचा शेवटचा किरणसुद्धा विझतो. आणि शेवटी ‘आजही’ तो आला नाही, हीच नोंद उरते त्या दिवसाची..

‘आज भी न आये आँसू

आज भी न भीगे नैना

आज भी ये कोरी रैना

कोरी लौट जायेगी..’

ऊर फुटून रडावंसं एकेकाळी  वाटे. आता अश्रूही महाग झालेत. डोळे कोरडे होत चाललेत! चहुबाजूंनी घेरून आलेलं एकाकीपण.. आणि ही अशी कोरी रात्र, कोरं आयुष्य! कारण त्याच्यावर जे उमटायला हवंय ते उमटत नाहीये.

‘रात की सियाही कोई

आए तो मिटाए ना

आज ना मिटाईतो ये

कल भी लौट आयेगी..’

ही सियाही.. हे एकटेपण.. या रात्रीला पोरकं करून जाणारं! नको यायला ती रात्र.. या एकटेपणाची भीती वाटते! कदाचित उद्याही मी अशीच एकटी असेन.. ही अशी निराधार संध्याकाळ.. जिला दिवस सोडून जातो आणि रात्र आपलंसं करत नाही! पिलू रागाचे स्वर हे दु:ख गहिरं करतात. तिच्या साथीला फक्त बासरी आहे.. जी तिला समजून घेतीय..

‘खाली लौट जायेगीऽऽऽ’ म्हणताना आवाजाची जी आस आशाबाई ठेवतात ती केवळ अप्रतिम आहे. स्वरांचे ठहराव, त्यांचे दर्जे.. गमक.. अशा अनेक सुंदर लेण्यांनी नटलंय हे गाणं. ‘आज भी’ म्हणताना ‘भी’ अक्षर अधिक गडद, गहिरं करतात आशाबाई. त्या उच्चारात आधी बाळगलेला कमालीचा संयम सुटत चाललाय हे जाणवतं. मायाची काळजी घेणारा, तिला आनंदी ठेवण्यासाठी धडपडणारा आणि सुधालाही थोपटून झोपवणारा महेंद्र दिसतो. नात्यांतली वीण किती गुंतागुंतीची असू शकते!

सुधाला मायाच्या अस्तित्वाच्या, महेंद्र व तिच्या सहवासाच्या खुणा सापडल्यावर तिचा संयम संपतो. आपणच या दोन एकमेकांवर जीव तोडून प्रेम करणाऱ्या माणसांमध्ये येतोय, यातून कुणीच सुखी होणार नाही असं वाटून, तशी चिठ्ठी लिहून ती घर सोडून जाते. इकडे मायाही गायब होते. हा धक्का सहन न होऊन महेंद्रला हृदयविकाराचा झटका येतो. पुन्हा माया त्याची शुश्रूषा करायला येऊन राहते. सुधा स्वत:ला सगळ्यातून बाहेर काढून, दादूना समजावून लांबच्या गावी निघून जाते. नंतर सावरलेला महेंद्र सुधाला समजावून घरी आणण्याच्या तयारीत असतो. त्याचा सुधाच्या परिपक्वस्वभावावर इतका विश्वास असतो.. इतका, की मायाचं काय करायचं, खरं तर आपण दोघांनी काय करायचं, हेही सुधाच आपल्याला सांगेल, असंही तो बोलून जातो. पण त्याच क्षणी सुधाचं त्याला बंधनातून मोकळं करणारं पत्र येतं आणि त्याला प्रचंड धक्का देऊन जातं. त्याचं दु:ख बघून माया सैरभैर अवस्थेत मोटारसायकलवर सुसाट निघते. तिचा भीषण अपघाती मृत्यू होतो. महेंद्रचा पोरका हंबरडा ऐकायला फक्त क्रूर पहाट तेवढी जागी असते.

श्वास रोखून हे ऐकणाऱ्या सुधाला प्रचंड धक्का बसलाय. हुंदका फुटलाय. मात्र, तिच्या त्या हुंदक्यात फक्त मायाच्या मृत्यूचं दु:ख नाहीए, तर काय होऊन बसलं हे? महेंद्र म्हणतो तसं ‘त्याग’ नावाच्या संकल्पनेचंही काही जणांना नको इतकं आकर्षण असतं! सुधा निघून गेली नसती तर हे सगळं सावरलं असतं? तिच्यात ती ताकद आणि अधिकार नक्की होता ना? पण मग तिच्या ‘वजूद’ला काय अर्थ? तिनं का ‘मोठं’ व्हायचं सतत? अनंत प्रश्न! आणि उशीर तरी किती व्हावा हे समजायला, की कानातलं अडकू शकतं कपडय़ात.. शालीत! ‘तसं’ काही झालं नसतानाही..?

‘अकेली हो?’ असं विचारताक्षणी धाडकन् दार ढकलून सुधाच्या पतीचं तिच्यासाठी धावत येणं.. महेंद्र आतून कोसळत चाललाय.. आपण सर्वस्व गमावलंय. सगळं सगळं संपलंय आता. त्याचं येणं, बोलणं- यातून महेंद्रच्या काळजाचे झालेले तुकडे.. त्याचं रितं होत जाणं.. विझत जाणं.. हा भयंकर धक्का नसिरुद्दीनच्या चेहऱ्यावर, डोळ्यांतून, खचत जाणाऱ्या त्या शरीरातून.. आपलं काळीज पिळवटून टाकतो. ‘तेव्हा मागितली नाही, पण आता तुझी इजाजत मागते..’ हे सांगणारी सुधा.. आणि ‘मी जे देऊ शकलो नाही, त्यापेक्षा कितीतरी पटीनं तुला सुख देणारा पती मिळालाय..’ हे नसीरचं सांगणं. ‘नव्हतीसच तू माझ्यासाठी.. जमलं तर माफ करून टाक..’ हे त्याचं सांगणं! शशी कपूरच्या चेहऱ्यावरचा विलक्षण समंजसपणा! काही न सांगताच सगळं समजलंय त्याला!

खरं तर या क्षणी आतून वाटतं, ढसाढसा रडावं. त्या वेडय़ा मायासाठी.. कुठेच न चुकणाऱ्या, पण योग्य वेळी स्वाभिमान दाखवणाऱ्या, आता मागे वळून बघताना रडणाऱ्या सुधासाठी.. आणि सर्वार्थानं ‘पोरक्या’ झालेल्या महेंद्रसाठी! त्याच्या चेहऱ्यावरचे भाव.. आयुष्याचीच चुकलेली गाडी.. ती चेन सुटलेली सायकल.. निघून गेलेले क्षण.. आणि पुन्हा एकदा तो स्वप्नातला रेशमी पदर हाताला लागता लागता सुटून जाणं.. आपला हंबरडा आतल्या आत जिरतो. ऊर फुटून आपण रडत असतो या सगळ्यांसाठी. का होतं असं? का नाही या घटना पुसून टाकू शकत? या ‘का’ला उत्तर असतं तर..? मग प्रेमात पडायचंच नाही का? जीव उधळायचाच नाही का? वैभव जोशी म्हणतात तसं-

‘जीवच जडला नसता जर का मातीवरती

आभाळाचे पाय कधीही मळले नसते!’

पाय मळण्याच्या धास्तीनं त्या मातीशी नाजूक नातं जोडायला घाबरायचं? आणि आभाळाच्या  अथांग उंचीपर्यंत पोचण्याचा विचार मातीनंही करायचाच नाही का? सोपी गणितं सोडवण्यातच धन्यता मानायची, की आयुष्याची अवघड प्रमेयंही सोडवण्याची आव्हानं स्वीकारायची? जिथे दोन गुणिले एक- कितीही असू शकतात, त्या अनंत कंगोरे असलेल्या भावनेच्या गुंत्यांत पाय अडकवून घेताना स्वत:चीच अनेक रूपं बघण्याचं धैर्य लागतं. फार मोठी किंमत चुकवावी लागते त्या असोशीची. मनात कल्लोळ उमटलेला असतो.. मन रिक्त रिक्त होऊन रडत असतं. नियतीला जाब विचारत असतं.. उत्तर मिळणार नाही, हे माहीत असूनही! जीव तुटतो त्या उद्ध्वस्त महेंद्रसाठी.. मागे खूप काही सोडून अपरिहार्य ‘शहाण्या’ भविष्याकडे जाणाऱ्या सुधासाठी.. आणि पृथ्वीतलावरच्या सर्वात विलक्षण अशा ‘प्रेम’ नावाच्या त्या अद्भुत भावनेसाठीही!

(उत्तरार्ध)

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katra katra milti hai asha bhosle ijaazat r d burman rekha afasana likh rahi hun dd70
Show comments