रेश्मा राईकवार
बाईपण म्हणजे काय? घरसंसारासाठी तिची होणारी ओढाताण, आर्थिक जबाबदाऱ्यांचं ओझं, रोजच्या स्वयंपाकापासून नोकरी-व्यवसायात उत्तम जम बसवण्यापर्यंत स्वत:ची कोडी स्वत:च सोडवत आपण आपल्याच चक्रात गुरफटत जातो हे आजच्याच काय कुठल्याही स्त्रीला माहिती नाही, असं म्हणणं धाष्र्टय़ाचं ठरेल. कधी ठरवून, तर कधी नकळतपणे आपणच निर्माण केलेला हा पसारा आवरताना दु:खाचे कढही येणारच याची जाण असतेच; पण त्याला थोडा नात्यांचा ओलावा, छंद-आवडत्या गोष्टींतून मिळणारा आनंद याची जोड मिळाली तर उन्हातही चांदणं पाहिल्याची शीतलता मनभर पसरते. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातून भर उन्हातही आपलं चांदणं शोधण्याची ऊर्मी मनात पुन्हा जागल्याशिवाय राहात नाही.
आई, बहीण, पत्नी, मुलगी, सून अशा विविध नात्यांतून आपल्याबरोबर वावरणाऱ्या बाईचं मन पुरुषांनी समजून घेतलं पाहिजे हे जितकं खरं.. तितकंच किंवा त्याहीपेक्षा बाईने स्वत:ला समजून घेणंही अधिक गरजेचं आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात सहा बहिणींच्या गोष्टींतून लेखिका वैशाली नाईक यांनी बाईला तिच्या आत डोकवायला, तिच्या दैनंदिन कोषातून बाहेर पडून थोडा मोकळा श्वास घ्यायला, आपला आतला आवाज ऐकायला भाग पाडलं आहे. इथे ही फक्त बाईपणाची गोष्ट उरत नाही.. माणूस म्हणून तिचा पहिला विचार होतो आणि व्यक्ती तितक्या प्रकृती.. या अनुषंगाने इथेही सहा बायका आहेत. त्यांचे स्वभाव आहेत. त्यांच्या प्रत्येकीच्या आयुष्याची गुंतागुंत आहे. सहा सख्ख्या बहिणी असूनही एकमेकांपासून मनाने दुरावलेल्या आणि म्हटलं तरी इतक्या वर्षांचा आपुलकीचा धागा अजूनही मनात कुठे तरी टिकवून असलेल्या या सहा जणींची मंगळागौरीच्या स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येण्याची, एकमेकींशी पुन्हा जोडलं जाण्याची ही गोष्ट आहे. माणूस एकमेकांशी जेव्हा पुन्हा मनाने जोडला जातो तेव्हा आपोआपच मधलं अंतर, समज-गैरसमजुतींचे धागे गळून पडायला लागतात. वाद संपून एक नवा संवाद सुरू होतो.. हा संवाद फक्त बाईसाठीच नव्हे तर आज प्रत्येकासाठी गरजेचा आहे. आपला इतरांबरोबरचा आणि स्वत:बरोबरचा हा संवाद फार महत्त्वाचा आहे, हे लेखिका वैशाली नाईक यांनी कथेतून अधोरेखित केलं आहे आणि ते तितक्याच हसत-खेळत मांडणी करत जाता जाता तुम्हाला म्हणून सांगतो इतक्या सहज शैलीत प्रभावीपणे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी चित्रपटातून आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे.
पाठीला पाठ लावून आलेल्या सहा बहिणी.. त्यातही जया आणि शशी, केतकी आणि पल्लवी या जुळय़ा बहिणी, तर साधना-चारू या दोघी जणी. कधीकाळी मनाने घट्ट असलेल्या या बहिणी आज आपापल्या संसारात गढल्या आहेत. प्रत्येकीची स्वतंत्र गोष्ट आहे. कुठल्या ना कुठल्या समारंभाच्या निमित्ताने एकत्र आलं की एकमेकांची तोंडदेखली खुशाली आणि तिचं काय चाललं आहे हे कुजबुजत्या स्वरूपात ऐकून घेण्यापलीकडे त्यांचं जग नाही. स्वतंत्र बेटांप्रमाणे असलेल्या या सहा जणींच्या उपकथा, एकमेकींचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष, त्यांच्या अडचणी हे सगळं एकमेकीचं एकमेकींना उलगडत जातं. आपोआपच आतली माया एकमेकींना जोडून घेते, एकत्र येण्यातून आपली बिघडलेली नाती सावरताना स्वत:चाही तोल सावरला जातो या मूळ गोष्टीबरोबरच रोजच्या जगण्यात स्त्रीला वेगवेगळय़ा नात्यांत गृहीत धरलं जाणं, कुटुंब नावाच्या व्यवस्थेचा तिच्यावर दबाव टाकत तिचं स्वतंत्र अस्तित्वच मिटवून टाकणं यावर जसं भाष्य करण्यात आलं आहे. तसंच स्वभावांच्या ताण्याबाण्यातून निर्माण झालेली गुंतागुंत आणि त्यातून तिचं बाहेर पडणं हेही सहजतेने त्यांच्या गोष्टीतून आपल्यापर्यंत पोहोचतं. सतत यशस्वी स्त्री म्हणून वावरण्याची सवय लागल्यानंतर कळत-नकळत आपल्या मुलीच्या जगण्यातही कुठे चूक राहू नये म्हणून हरएक प्रयत्न करणारी आई, एरव्ही आधुनिक राहणीमान, स्वतंत्रपणे उद्योग उभारणारी स्वावलंबी स्त्री पन्नासाव्या वर्षी नवरा दुसऱ्या स्त्रीसाठी आपल्याला सोडून देतो आहे या विचारानेच खचते. बहिणीने आपलं दु:ख जाणलं नाही, हा सल बाळगून कित्येक वर्ष कुठल्याच गोष्टीत आनंदी न होता जगणारी माई.. अशी एकेक व्यक्तिरेखा उलगडत नेत या बाईपणाची गोष्ट आपल्यापर्यंत दिग्दर्शकाने पोहोचवली आहे.
कुठलाही उपदेश करण्याच्या शैलीत या चित्रपटाची मांडणी दिग्दर्शकाने केलेली नाही आणि तरीही चित्रपट पाहताना तो आपल्याला हसवतो, कधी प्रगल्भ क्षण अनुभवू देतो, तर कधी चटकन डोळय़ात पाणी आणतो. गोष्टींच्या पलीकडे असलेली ही भावभावनांची गोष्ट या चित्रपटाच्या सहा नायिकांमुळे अधिक प्रभावी झाली आहे. वंदना गुप्ते यांनी रंगवलेली शशी भाव खाऊन जाते. काहीही न बोलता नजरेतून आपलं म्हणणं पोहोचवणारी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची जया एकीकडे आणि शशी-जया यांच्यातली जुगलबंदी दुसरीकडे. शिल्पा नवलकर यांची ठसकेबाज केतकी, कधी नरम कधी गरम अशी सुचित्रा बांदेकर यांची पल्लवी, दीपाची सहनशील चारू आणि या सगळय़ात साधी साधी म्हणत मन जिंकणारी सुकन्या कुलकर्णीची साधना.. हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी उत्तम अभिनयाची पर्वणी आहे यात शंका नाही. सध्याच्या एकंदरीत सुरू असलेल्या धावपळीत हळुवार समजून – उमजून देत बाईची गोष्ट रंजक शैलीत मनात उतरवण्याचा भारी प्रयत्न आहे.
बाईपण भारी देवा
दिग्दर्शक – केदार शिंदे कलाकार – रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब-चौधरी.