शरीरमन असे अद्वैत असताना त्याचे शरीर आणि मन असे द्वैत केल्याने माणसांच्या आयुष्यात फार दु:ख उत्पन्न झाले आहे. शरीर हे क्षणभंगूर आहे, असे ओरडणारे महात्मे त्यात भर घालीत असल्याने सामान्य माणसांचा बुद्धिभेद झाला आहे. या जगात माझे म्हणून जे काही आहे, ते फक्त माझे शरीरमन आहे, बाकी काहीही नाही, हा साक्षात्कार झाला की, मग या शरीरमनाद्वारे आनंदप्राप्तीच काय सच्चिदानंदप्राप्ती शक्य आहे. एवढेच नाही तर तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे, याची जाणीव होते. ही जाणीवच आपल्याला आनंदी आयुष्य मिळवून देते आणि देत राहते.
शरीराइतकी विस्मयजनक गोष्ट या दुनियेत नाही. ते दोन भिन्न शरीरांमार्फत जन्माला कसे येते, हे आश्चर्यकारक असते. ते वाढते. योग्य तेवढेच वाढते आणि थांबते. सर्व अवयव सामान्यपणे एकमेकांशी प्रमाणबद्ध असतात. हे शरीर बाहेरील सर्व शत्रूंशी सामना करते. आतील जंतूंशी सामना २४ तास करत असते. काही जंतूंशी सामोपचाराने राहते. जे खाल ते पचवते. शरीरात पाच प्रकारे कार्य होते- ढल्ली४ें३्रू, ऌ८१िं४’्रू, टीूँंल्ल्रूं’, ए’ीू३१्रूं’ ंल्ल िटी२२ील्लॠी१ े’ीू४’ी२ ॠी३३्रल्लॠ ६१‘ ल्लिी ूँी्रेूं’’८. शरीरात पंचमहाभूते येतात आणि जातात. ते कधीही स्थिर नसते. सतत हलत असते. पुन्हा आपल्यासारखे नवीन शरीर उत्पन्न करते आणि विनाकारण मरून जाते.
मनाचे तर काय वर्णावे? शरीराबरोबर आलेले हे ‘सॉफ्टवेअर’ दिसत तर नाही, पण त्याचे प्रताप जग हादरवून टाकतात. त्याची ताकद काय आहे, याचा जगात कुणाला अजून अंदाजसुद्धा आलेला नाही. ते शरीराचा नाश करू शकते, तसेच शरीराचे उत्तम संवर्धनही करू शकते. ते कुठे असते, जाते, राहते हे कुणाला कळत नाही म्हणजे त्या माणसालादेखील कळत नाही. तरीदेखील त्याचे दोन भाग असतात- एक म्हणजे शरीराबरोबर जे ‘सॉफ्टवेअर’ येते, ते आणि दुसरे म्हणजे ज्या समाजात हे शरीरमन जन्माला येते, त्या समाजाने दिलेले ‘अ‍ॅप्स’ आणि ‘अ‍ॅड ऑन्स’! हे दोन्ही भाग पुढे जणू एक दिसतात. पण कधीच एक होत नाहीत. एक भाग जे म्हणेल त्याविरुद्ध दुसरा भाग म्हणत असतो. मन नेहमी दोन विचारांत असते, ते यामुळे. शरीरातून सतत सुखकर संवेदना येत राहणे, मनात सतत उत्साही विचार येणे आणि सद्भावना सतत असणे म्हणजे २४ बाय ७ आनंदी असणे.
हे होण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो. हे समजून घेणे अत्यावश्यक असते. तुम्ही कोण आहात, तुम्हाला समाजात काय मानसन्मान आहे, हे शरीरमन जाणत नाही. तुमचे शरीरमन हे इतर कोणत्याही माणसाच्या शरीरमनाइतकेच सामान्य अगर असामान्य असते. त्याची देखभाल करणे हे फक्त तुमच्याच हातात असते आणि तुमच्याच हिताचे असते. याहून महत्त्वाची गोष्ट जगात दुसरी कुठलीही नाही.
सुख, आनंद आणि सच्चिदानंद हे समजून घेण्यासाठी आधी दु:ख या कल्पनेचा जो मोठमोठय़ा महात्म्यांनी विचित्र अर्थ लावला आहे, तो पाहणे फार महत्त्वाचे आहे. दु:ख याचा अर्थ आपले काहीतरी चुकते आहे, असा सोपा आणि सरळ असताना हे जगच दुखभरे आहे, असा अनर्थ करून अंतराळात डोळे लावलेल्या महापुरुषांनी माणसाची जगण्याची उमेदच घालवून टाकली आहे. याचे साधे कारण असे की, या साऱ्या महात्म्यांकडे कुणी शारीरिक पीडा घेऊन गेला की, त्या पीडेचे निवारण कसे करायचे, हे त्यांना मुळीच माहिती नसायचे. मग आपल्याला हे माहिती नाही, असे सांगण्यापेक्षा हे शरीरच दु:खाचे मूळ आहे, असा त्या माणसाचा समज करून द्यायचा आणि काही तरी आत्मा-परमात्मा असे बोलून त्याला वाटेला लावायचे. या दोन्ही गोष्टी दाखवायला लागत नाहीत, हा मोठाच फायदा. पण दु:ख हे आपल्याला सांगते की, तू जसे वागतो आहेस ते तपासून बघ. काही तरी चुकते आहे. क्वचित काही मुले जन्माला येतात. त्यांना जन्मत:च दु:खाची संवेदना करून देणाऱ्या नसा नसतात. ही मुले स्वत:ला भयंकर इजा करतात, पण खिदळत असतात. ही मुले जगत नाहीत, लहान वयातच मरून जातात.
शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, लैंगिक, आर्थिक असे कोणतेही दु:ख झाले की, त्यामागे आपली काय चूक आहे हे शोधणे आनंदात राहण्यासाठी महत्त्वाचे असते. चूक सापडण्याचा आनंद तर होतोच, पण पुढे ती चूक न केल्याने दु:ख होत नाही. आनंदात राहण्याची जबाबदारी ज्याची त्याची असल्याने दुसरा कुणी आपल्याला सुख देऊ शकत नाही, हे समजणे किंवा तसा साक्षात्कार होणे आवश्यक असते. याबाबतीत नशीब हा एक भाग झाला, पण आपल्या हातात असलेली गोष्ट म्हणजे प्रयत्न आवश्यक असतात. त्यातील पहिला भाग म्हणजे शरीरमन आपल्याशी काय आणि कसे बोलत असते ते ओळखणे. अगदी प्राथमिक अशी गोष्ट म्हणजे सुखकारक संवेदना उत्पन्न होत असतील तर सारे काही ठीक चालले आहे. दु:खकारक काही होत असेल तर चुकीचे चालले आहे. इतके सोपे असताना काही दुखते म्हटल्यावर पटकन गोळी तोंडात टाकणे हे शरीराची हेळसांड केल्यासारखे असते. म्हणजे खूप शोध घेतल्यावरदेखील कारण नाही सापडले तर दु:ख सहन करण्याची काहीच आवश्यकता नाही. अशा वेळेस गोळी खाल्ली तर समजू शकते. हे एकदा लक्षात आले की शरीराची पुढची ‘पदव्युत्तर’ भाषा कळणे सोपे जाऊ लागते.
शरीरमन आपल्याला तहान, भूक, मलोत्सर्जन, झोप, लैंगिक इच्छा या संवेदनांद्वारे काही कळवीत असते. या साऱ्या गोष्टी होत असतात, करता येत नाहीत हा साक्षात्कार आवश्यक असतो. आपल्या भाषेत ‘होणे’ आणि ‘करणे’ या क्रियापदांची फार गल्लत झाली आहे. मलोत्सर्जन ‘करणे’ आणि ‘होणे’ यातला फरक तमाम मानवजातीला चांगलाच कळतो.
स्त्रिया आणि पुरुष या दोघांनी आपले शरीरमन सांभाळण्याची सुरुवात करताना थोडे जागरूक असायला हवे. म्हणजे स्त्रियांनी आधी मनापासून सुरुवात करावी तर पुरुषांनी शरीरापासून करावी. याचे कारण असे की, व्यायाम करण्याआधी स्त्रियांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो, जो पुरुषांना करावा लागत नाही. म्हणजे स्त्रीने आपले शरीर नीट ठेवण्यासाठी काही वेळ देणे हेच कित्येकांना मान्य नसते. ‘आमच्या काळात नव्हती असली थेरं. कशा खुटखुटीत राहिलो आम्ही. आता नुसती फ्याडं बघा या पोरींची,’ असे म्हणणाऱ्या आज्या काही कमी नाहीत. एवढेच कशाला माझ्याकडे एक सासूबाई आल्या. त्यांच्या सूनेला लग्न होण्याआधी तब्येत चांगली ठेवण्यासाठी मी काही व्यायाम सांगितले होते. ते व्यायाम ती करत असताना त्यांनी तिला विचारले की, ‘हे काय आणि कशासाठी करतेस?’ तर सूनेने सांगितले की, ‘माझी पूर्वी पाठ दुखायची. आता व्यायाम करते आहे तेव्हापासून पाठ दुखायची पूर्ण थांबली आहे.’ यावर त्या सासूने सुनेच्या घरी जाऊन ‘आम्हाला मोडकी मुलगी दिली,’ असा धिंगाणा घातला! तिला समजावता समजावता नाकी नऊ आले.
याशिवाय ज्याला ‘सेल्फ पिटी’ असे इंग्लिशमध्ये म्हणतात, त्याचा सामना प्रत्येक स्त्रीला करावा लागतो. म्हणजे, ‘माझे असेच असते.’ काहीही करू म्हटले की अडचणी येतातच. ‘माझे नशीबच असे आहे’, ‘मला वेळच होत नाही’, ‘इतक्या साऱ्या जणांचे करून मी जी दमते. व्यायाम कसला करते आहे?’ या आणि अशा विचारांचे स्त्री मनावर फार प्राबल्य असते. त्यात पाळी येणे-जाणे हा शारीरिक तर व्यायामाचे कपडे घालून जाणे हा सामाजिक प्रश्न सतत पडलेला असतो. या वयात मी पँट-शर्ट कशी वा कसा घालणार, या प्रश्नातच फारसा अर्थ नाही, हे कळायला वेळ जातो.
पुरुषांना त्या मानाने अडथळे कमी असतात. कमी असले तरी जबरदस्त असतात. प्रमुख म्हणजे आळशीपणा. याला उपाय नाही. व्यायामामुळे २४ बाय ७ असा सतत आनंद कसा येत राहतो, हे कळायला फक्त तीन आठवडे जातात, तेवढादेखील धीर ज्यांना नाही त्यांचे काय सांगावे? मग इतर काही तरी मार्ग शोधले जातात, ज्यात स्वत:चे हात-पाय हलवायला लागत नाहीत. हे मार्ग कोणते, ते सांगणे न लगे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा