१९८५ साली डॉ. डेमिंगने जपानला भेट दिली होती. पाश्चात्त्यांच्या प्रभावाचा संसर्ग जपानला ग्रासणार आहे याची कल्पना त्याला आली होती. आपल्या एका भाषणात डॉ. डेमिंगने जपानी उद्योजकांना याची स्पष्ट कल्पनाही दिली होती. ‘पाश्चात्त्यांना ज्या अर्थाने स्पर्धेवर अधिष्ठित जग अपेक्षित आहे, त्या जगाची जीवनशैली फारशी सुखावह नाही. खुद्द अमेरिकन उद्योग जगताला या स्पर्धेमुळे मोठे नुकसान सोसावे लागते आहे. तुमचे (म्हणजे जपानचे) उद्योगविश्व सशक्त आहे; पण सशक्त शरीरालादेखील रोगाचा संसर्ग होऊ शकतो हे ध्यानात ठेवा.’..
मागील लेखात आपण टोयोटा या जगप्रसिद्ध कंपनीचे एक उदाहरण विचारात घेतले होते. टोयोटा या सर्वाधिक मोटार उत्पादन करणाऱ्या कंपनीने विकलेल्या दीड कोटी मोटारी ग्राहकांकडून परत मागवल्या, याचा उल्लेख मागील लेखात आलाच आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात विकलेल्या गाडय़ा परत मागवण्याइतकी कोणती गंभीर समस्या उद्भवली होती? झाले होते ते असे – एकाच कारखान्यात टोयोटा अनेक प्रकारची मॉडेल्स बनवते. मोटार उत्पादन करताना नजरचुकीने ड्रायव्हरच्या पायाखाली जे रबर मॅट घातले जाते, ते त्या त्या मॉडेलच्या आकारानुसार असते. अवघ्या दोन गाडय़ांमध्ये चुकून दुसऱ्या मॉडेलचे रबर मॅट घातले गेले होते. घातलेले चुकीचे मॅट्स आकाराने मोठे होते. ड्रायव्हरने ब्रेक दाबला तर कदाचित त्या मोठय़ा आकाराच्या मॅटमुळे ब्रेक पूर्ण दाबला जाणार नाही, असा धोका होता. ही चूक लक्षात आली खरी, पण एव्हाना फार उशीर झाला होता. नेमक्या कोणत्या दोन मोटारींमध्ये चुकीची मॅट घातली आहेत हे कळणार कसे? कंपनीने तात्काळ सर्व गाडय़ा परत मागवल्या.
भारतात आपण अशा प्रकारच्या सेवेची कल्पना तरी करू शकतो का? ‘विक्रीपश्चात सेवा’ या नावाखाली बहुसंख्य ग्राहकांच्या पश्चात्तापच नशिबी येतो. ‘तीन वर्षांच्या गॅरंटीसह’, ‘पाच वर्षांच्या वॉरंटीसह’ अशा आकर्षक नावांखाली केवळ किमतीत वाढ केली जाते. पण प्रत्यक्ष अशा प्रकारची सेवा घेण्याची वेळ आली, की ‘भीक नको पण कुत्रे आवर’ असे म्हणण्याची पाळी ग्राहकावर येते.
जपानमध्ये ग्राहकांना कशी वागणूक मिळते ते आपण टोयोटाच्या उदाहरणावरून समजू शकतो. या सगळ्या प्रगल्भ कार्यसंस्कृतीची प्रेरणा डॉ. एडवर्ड डेमिंगच्या विचारसरणीत आहे. त्याचबरोबर याचे श्रेय मोठय़ा प्रमाणात जपानी जीवनशैलीलादेखील आहे. जपानी समाजजीवनाची मूलतत्त्वे आणि डॉ. डेमिंगची विचारसरणी हे एक अतिशय अनोखे, विलोभनीय अद्वैत आहे. जपानी समाजजीवनाची अनेक मूलतत्त्वे विचारात घेऊन त्याच्याशी सुसंगत अशी विचारप्रणाली डॉ. डेमिंगने विकसित केली. दुसरीकडे डॉ. डेमिंगच्या अनेक कल्पना जपानी उद्योजकांनी (आणि जनतेनेदेखील) अंधपणे न स्वीकारता आपल्या संस्कृतीशी त्या सुसंगत करून घेतल्या. ‘क्वालिटी सर्कल’, ‘कायझेन’ ही अशीच काही लोकप्रिय उदाहरणे.
पाश्चात्त्य जग आणि विशेषत: अमेरिका, जपानची प्रगती पाहून अक्षरश: दिङ्मूढ होऊन गेले होते. या प्रगतीचे मर्म समजावून घेण्याचा त्यांनी आपल्यापरीने खूप प्रयत्न केला. अमेरिकन उद्योग- विशेषत: वाहन उद्योग- तर जपानच्या रेटय़ाने पार मोडकळीस आला होता. पण जपानी जीवनशैली आणि डॉ. डेमिंगची विचारसरणी यांचे अद्वैत जोवर समजत नाही, तोवर हे जपानच्या प्रगतीचे इंगित समजणार नाही. जपानी कंपन्यांशी तांत्रिक करार करणे, त्याचाच एक भाग म्हणून आपले कर्मचारी जपानी उद्योगधंद्यांत प्रशिक्षणाकरिता पाठवणे असे वरवरचे अनेक उपाय अमेरिकन लोकांनी करून पाहिले. त्याला यश येणे शक्यच नव्हते. बराच काळ ‘जपान’ हे एक मोठे कोडे होते जगासाठी. विशेषत: अमेरिकनांसाठी.
आपण ही आज नेमकी अशाच प्रकारची चूक करतो आहोत का? अमेरिका आणि पाश्चात्त्य जगातील अनेक गोष्टींचे अंधानुकरण करून आपण आपली प्रगती साधू पाहात आहोत का? हा प्रश्न केवळ उद्योग जगतापुरताच मर्यादित नाहीये. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपण प्रगतीकरता पाश्चात्त्यांकडे पाहतो आहोत का? आणि असे करताना आपण केवळ अंधानुकरण करतो आहोत. गाभा समजावून घेणं आणि मग ती मूलतत्त्वे भारतीय संस्कृतीशी- समाजमानसाशी- जीवनशैलीशी सुसंगत करून घेऊन विकास साधणं हा खरा कळीचा मुद्दा आहे.
नुकतेच ‘झिम्मा’ हे विजया मेहता यांचे नितांत सुंदर आत्मचरित्र वाचनात आले. मेहता यांनी नाटय़कलेचे जे प्रशिक्षण परदेशात घेतले- परदेशी तज्ज्ञ रंगकर्मीशी त्यांचा जो संपर्क आला, त्याचा उपयोग करून त्यांनी भारतीय नाटय़परंपरेचा प्रवाह अधिक विस्तारित- अधिक जोमदार केला. पण असे उदाहरण अपवादात्मकच. बाकी आमच्याकडची बरीचशी मंडळी पाश्चात्त्य नाटक-सिनेमांच्या निकृष्ट कॉप्या मारण्यातच मश्गुल आहेत.
कळीचा मुद्दा
१९८५ साली डॉ. डेमिंगने जपानला भेट दिली होती. पाश्चात्त्यांच्या प्रभावाचा संसर्ग जपानला ग्रासणार आहे याची कल्पना त्याला आली होती. आपल्या एका भाषणात डॉ. डेमिंगने जपानी उद्योजकांना याची स्पष्ट कल्पनाही दिली होती. ‘पाश्चात्त्यांना ज्या अर्थाने स्पर्धेवर अधिष्ठित जग अपेक्षित आहे, त्या जगाची जीवनशैली फारशी सुखावह नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-11-2012 at 01:40 IST
मराठीतील सर्व जगणे व्हावे गाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Key point