डॉ. राजेंद्र डोळके
खादीचा संपूर्ण अंगीकार म्हणजे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रतीक.. स्वातंत्र्य आंदोलनात खादीधारी स्वातंत्र्यसैनिक ‘चरखा चला के लेंगे स्वराज्य लेंगे’ हे गीत म्हणत, त्यावेळी त्यांच्याप्रती समाजात आदराची भावना निर्माण होत असे. गांधीजींनी खादीला सामान्य वस्त्राचे नव्हे, तर ‘विचारा’चे स्वरूप दिले.आजच्या गांधी जयंतीनिमित्ताने..
‘खादी हा एक विचार आहे. ते एक व्रत आहे. ती एक संस्कृती आहे..’ ही वाक्ये आठवली की खादीचे महत्त्व पटवून देणारे महात्मा गांधी आणि त्यांचे शिष्य आचार्य विनोबा भावे डोळ्यांसमोर येतात. गांधींच्या खादी चळवळीचा उगम ‘स्वदेशी’च्या सिद्धांतातून झाला. त्यांचे हे मानणे होते की भारताला आपल्या पायांवर उभे राहायचे असेल तर ‘स्वदेशी’शिवाय पर्याय नाही. स्वदेशी म्हणजे केवळ देशाभिमान नव्हे, तर आत्मनिर्भरता आणि श्रम ही तत्त्वे ‘स्वदेशी’च्या मुळाशी आहेत. वस्तुत: स्वदेशीचा जोरदार पुरस्कार गांधींच्या अगोदर पुण्याचे गणेश वासुदेव जोशी ऊर्फ ‘सार्वजनिक काका’ यांनी केला होता. गांधींनी स्वदेशीचे महत्त्व ओळखून ते स्वातंत्र्यलढय़ाशी जोडले, ही गांधींची अपूर्वता!
खादीची परंपरा आपल्या देशात अगदी उपनिषद काळापासून आहे. कापूस हाच जगातील कोणत्याही वस्त्राचे उगमस्थान असतो. भारताची भूमी कापसाच्या उत्पादनाला अनुकूल असल्यामुळे भारतात जेवढा कापूस निर्माण होतो तेवढा जगातील इतर कोणत्याही देशात निर्माण होत नाही. मरुकच्छ (सध्याचे भडोच, गुजरात) येथील उत्तम कापसाचा उल्लेख महाभारतामध्ये (सभापर्व ५१) आढळतो. तेव्हा कापसाच्या बाबतीत हिंदुस्थान पहिल्यापासून वैभवशाली आहे यात संशय नाही.
धूर्त आणि धंदेवाईक इंग्रजांनी ही बाब बरोबर हेरली. त्यांनी भारतावरील आपल्या आक्रमणात येथील उद्योगधंद्यांवर कब्जा केला असला तरी त्यांनी पहिला दणका दिला तो कापसापासून तयार होणाऱ्या वस्त्रोद्योगाला! भारतातल्या उच्च दर्जाच्या कापसापासून निर्माण होणाऱ्या वस्त्रांना परदेशात खूप मागणी होती. इंग्लंडमधील लोकांना तर येथील वस्त्रांचे प्रचंड आकर्षण होते. त्यामुळे येथील मालावर त्यांनी जबरदस्त जकात बसवली. येथील कापूस अतिशय स्वस्त दराने त्यांनी आपल्या देशात नेण्यास सुरुवात केली आणि त्यापासून तयार होणारी वस्त्रे येथे चौपट, पाचपट किमतीने विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकहितवादींनी आपल्या ‘शतपत्रा’त ‘येथील कापूस विकणाऱ्यांनी असा बेत करावा की इंग्रजांस इकडे तयार केलेले कपडे द्यावे, परंतु कापूस देऊ नये’ असे लिहिले आहे. (पत्र क्र. ५७) क्रांतिकारकांनीही परदेशी कपडय़ांची होळी करण्यास सुरुवात केली. हे लक्षात येऊन महात्माजींनी स्वदेशीच्या कार्यक्रमात ‘खादी’ला प्राधान्य देण्याचे ठरवले. याला तीन कारणे होती. पहिले मनुष्याच्या आवश्यकतांमध्ये अन्नाच्या खालोखाल दुसरे स्थान वस्त्राचे असते. दुसरे असे की, इंग्रजांचा आघात सर्वात जास्त वस्त्रोद्योगावर होता, आणि तिसरे कारण- हा उद्योग रिकाम्या वेळात घरच्या घरी करण्यासारखा असल्याने देशातील कोटय़वधी जनतेला रोजगार मिळेल. कारण वस्त्रोद्योगावर इतरही लहान उद्योग अवलंबून असतात.
या खादीच्या चळवळीला गांधींनी स्वराज्याच्या चळवळीशी जोडले. इंग्रजांनी आपल्या देशातून येथे आणलेल्या वस्त्रांवर आम्ही संपूर्णपणे बहिष्कार टाकून स्वत:च निर्माण केलेले वस्त्र नेसू.. म्हणजे इंग्रजांशी एक प्रकारे असहकार असे स्वरूप या चळवळीशी दिले. खादीचा संपूर्ण अंगीकार म्हणजे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रतीक असल्याचे त्यांनी जनतेला सांगितले. लोकांनाही याचे महत्त्व पटून त्यांनी खादीचा अंगीकार केला. स्वातंत्र्य आंदोलनातील खादीधारी स्वातंत्र्यसैनिक ‘चरखा चला के! लेंगे स्वराज्य लेंगे’ हे गीत मोठय़ाने म्हणत, तेव्हा त्यांच्याप्रती समाजात आदराची भावना निर्माण होत असे. अशा प्रकारे गांधीजींनी खादीला एका सामान्य वस्त्राचे नव्हे, तर ‘विचारा’चे स्वरूप दिले.
गांधीजी खादीवापराबद्दल फार आग्रही होते. त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, ‘मला जर खादीचे धोतर मिळाले नाही तर मी घोंगडी पांघरेन, पण दुसऱ्या कापडाचे वस्त्र स्वीकारणार नाही.’ १९२४ पर्यंत काँग्रेसच्या सभासदत्वासाठी चार आणे वर्गणी होती. १९२४ पासून गांधीजींनी सभासदत्वाकरिता हाताने कातलेल्या सूताची अट घातली. नंतर काही दिवसांनी काँग्रेसमधील कोणत्याही व्यक्तीला दर महिन्याला दोन हजार वार सूत काढणे बंधनकारक केले. १९२५ मध्ये ‘अखिल भारतीय चरखा संघ’ ही संस्था स्थापन झाली. या संस्थेच्या सभासदांना संपूर्ण खादी धारण करण्याची अट घालण्यात आली. तसेच त्यांनी दर महिन्याला स्वत: कातलेले चांगले पिळदार आणि एकसारखे १००० वार सूत दिले पाहिजे अशी अट घालण्यात आली होती. येरवडा तुरुंगातील आठवणी सांगताना ते म्हणतात, ‘‘(तुरुंगात) चोवीस तासांपैकी चार तास सूत काढण्यात जातात. हे चार तास इतर वीस तासांहून मला अधिक महत्त्वाचे वाटतात. चार तासांच्या अवधीत एकही अपवित्र विचार माझ्या मनाला स्पर्श करीत नाही.’’ अशा रीतीने बापूंनी जन्मभर रोज चरखा चालवला.
१९२० च्या असहकार चळवळीपासून खादीची जी व्याख्या करण्यात आली आहे, ती अशी- ‘खादी म्हणजे हाताने कातलेले आणि हाताने विणलेले कापड. मग ते कापसाचे असो, लोकरीचे असो वा रेशमाचे असो.’ जानवे अजूनही अशा सूतापासून तयार केले जाते. या धाग्यावर थोडी जरी प्रक्रिया केली तर त्याचे ‘खादी’पण धूसर होईल.. जे की आज खादीच्या नावावर बहुतांशी होत आहे.
हळूहळू काळाबरोबर खादीमागील विशिष्ट विचार मागे पडायला लागला. खादीमध्ये ‘राजकारण’ येऊ लागले. राजकारणी कडक इस्त्रीचे अत्यंत शुभ्र खादीचे कपडे घालायला लागले. अशा प्रकारे आज गांधीजींच्या त्यागाचा आणि निष्ठेचा फक्त देखावाच उरला आहे. त्यामुळे आजच्या पुढाऱ्यांकडे पाहण्याची समाजाची एक वेगळीच दृष्टी तयार झाली आहे. खादी ही महाग व वापरण्याकरता कटकटीची असते म्हणून लोकांनी त्याकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. तशात आजकाल भारतीय व विदेशी कंपन्यांचे सुंदर व आकर्षक कपडे बाजारात मिळत असल्याने जाडय़ाभरडय़ा खादीकडे कोण वळणार?
त्यामुळे खादी उद्योगाची सध्याची स्थिती शोचनीय झाली आहे. सरकारी अनुदानाच्या भरवशावर हा उद्योग कसाबसा तग धरून आहे, एवढेच. दरवर्षी २ ऑक्टोबरपासून खादी भंडारात खादीच्या कपडय़ांवर सवलत जाहीर होत असल्याने कपडय़ांचे शौकीन खादी भंडाराकडे वळतात. एकंदरीत खादीचा मार्ग खडतर आहे. कारण गांधींचे खादीचे तत्त्वज्ञान हे सैद्धांतिक पातळीवर आदर्शवत वाटत असले तरी व्यावहारिक आणि आचरणाच्या पातळीवर ते कठीण आहे. त्यामुळे खादीच्या तत्त्वज्ञानाला अगदी सुरुवातीपासूनच काहींचा विरोध होता. एक मोठा गट गांधींवर श्रद्धा ठेवून खादी अंगीकारणारा होता, तर दुसरा गट शिकल्यासवरल्या उच्चभ्रूंचा होता. या गटाला वाटे की, आम्ही एवढे शिकलेसवरलेले.. आपले कामधाम सोडून सूत कातत बसायचे का? देशबंधू दास व मोतीलाल नेहरू यांनी गांधींच्या या धोरणाला सुरुवातीला विरोध केला होता. पुढे मोतीलाल नेहरू स्वत: अलाहाबादमध्ये खादीविक्रीकरिता रस्त्यांवरून फिरत, हा भाग वेगळा. स्वत: गांधीजींनाही याची जाणीव होती. खादीचे हे तत्त्वज्ञान आचरण्याकरिता कठीण व व्यावहारिकदृष्टय़ा फायदेशीर नाही हे पटूनदेखील लोकांनी खादी अंगीकारली पाहिजे याकरिता ते आग्रही होते. ते म्हणत, ‘‘खादीशिवाय आपल्या भुकेलेल्या, अर्धनग्न व अशिक्षित बंधुभगिनींना स्वराज्य मिळणे अशक्य आहे. खादी वापरणे हे देशातल्या गरिबातील गरीब जनतेशी एकरूप होण्याचे प्रतीक असून, गिरणीच्या कापडाहून अधिक महाग व ओबडधोबड खादी वापरण्यास तयार होणे म्हणजे आपल्या मनात देशाभिमान व त्या वृत्ती नांदत असल्याचा पुरावा देणे आहे. दुसरे कापड खादीपेक्षा कितीही स्वस्त मिळत असले तरी आपण खादीच वापरली पाहिजे. आपण राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने विचार करू लागल्यास खादी महाग वाटेनाशी होईल.’’
गांधीजींचा ‘खादी’विचार हा असा आहे. स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज हा प्रमाणित खादीच्या वस्त्रानेच तयार झाला पाहिजे असे संविधान सभेने ठरवले होते. कारण यातून राष्ट्रीय एकात्मतेचा भावात्मक आविष्कार आपोआपच निर्माण होतो. खादीच्या उत्पादनापासून फायदा झाला नाही तरी गांधींना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रप्रेमाचे प्रतीक म्हणून त्याच्या उत्पादनास प्रोत्साहन देणे हे सर्व जनतेचे व विशेषत: राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. अन्यथा केवळ मुखाने गांधींच्या विचारांचा गौरव करावयाचा, पण आचरण मात्र अगदी त्याच्या उलट करायचे असेच दृश्य सर्वत्र दिसेल.
rajendradolke@gmail.com