सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर हिंदीचाच वापर करावा असा अध्यादेश नुकताच मोदी सरकारने काढला होता. परंतु त्याला दक्षिणेतून तीव्र विरोध होत आहे हे पाहून शेवटी त्यांनी माघार घेतली. यानिमित्ताने बहुभाषिक भारतातील भाषिक संघर्ष, त्यासंदर्भातील राजकारण आणि त्यातून निर्माण होणारा वैरभाव पुनश्च एकदा ऐरणीवर आला आहे. अलीकडे भाषिक वैमनस्याच्या दुर्दैवी घटना वारंवार घडताना दिसतात. भाषिक उच्च-नीचतेचा गंड आणि त्यातून उठवलं जाणारं भाषिक अस्मितेचं आग्यामोहोळ.. या गहन समस्येचा मार्मिक ऊहापोह करणारा लेख.
स्वत: उत्तम, कसदार द्वैभाषिक साहित्यनिर्मिती करणाऱ्या लेखकाचं विचारगर्भ, सडेतोड चिंतन..
काहीशा प्राचीन इतिहासाचे उत्खनन करून मी सुरुवात करतो. ते वर्ष आहे १९९७- जेव्हा ‘दि विंटेज बुक ऑफ इंडियन रायटिंग : १९४७-१९९७’ प्रसिद्ध झाले. या पुस्तकाला सलमान रश्दींनी प्रस्तावना लिहिली आहे. प्रस्तावनेतील एक अवतरण असे आहे- ‘या कालखंडातील (म्हणजेच स्वातंत्र्यानंतरच्या ५० वर्षांमध्ये!) भारतीय लेखकांनी इंग्रजीतून लिहिलेले साहित्य हे भारतातील मान्यताप्राप्त १८ भाषांतील किंवा तथाकथित ‘व्हर्न्याक्युलर’ भाषांतील साहित्यापेक्षा सशक्त आणि जास्त महत्त्वाचे ठरत आहे. आणि खरोखरच हे नवीन, झपाटय़ाने वाढणारे ‘इंडो-अँग्लियन’ साहित्य हे भारतीयांनी जागतिक पुस्तकासाठी केलेले व्यापक स्वरूपाचे योगदान ठरत आहे.’ अशा चढेल मतप्रदर्शनानंतरही समाधान न पावल्याने की काय, रश्दी आपल्या मताला एका आळशी विधानाची पुष्टी जोडतात. ती अशी- ‘उत्तरवसाहतीच्या या अर्धशतकात खरंखुरं भारतीय साहित्य ब्रिटिशांनी मागे सोडलेल्या भाषेतूनच लिहिलं गेलं आहे.’ हे त्यांनी एखाद्या धर्मोपदेशकाच्या थाटात सांगितल्यासारखे वाटते! सश्रद्ध माणसाची निष्ठावान श्रद्धा तुम्हालाही श्रद्धाळू बनविण्यास भाग पाडते.
उर्दूचा अपवाद वगळता रश्दींना भारतातील इतर कोणती भाषा माहीत असेल, याबद्दल शंका वाटते. त्यांनी स्वत:च हे मान्य केले आहे की, त्यांचे ‘अनपेक्षित आणि औपरोधिक निष्कर्ष’ हे त्यांनी वाचलेल्या प्रादेशिक भाषेतील साहित्याच्या भाषांतरांवर आधारीत आहेत. ते हेही नमूद करतात, की गुणवत्तेचा विचार करता भाषांतरे ही बऱ्याच वेळा परिपूर्ण नसतात. इथे मला खेदाने नमूद करावेसे वाटते, की एका ‘व्हन्र्याक्युलर’ भाषेतून दुसऱ्या भाषेत किंवा इंग्रजीत भाषांतरे करण्याबाबत नाव घ्यावी अशी परंपरा आपल्याकडे नाही. रश्दींच्या प्रस्तावनेस इतकी वष्रे उलटून गेल्यानंतर आजही भारतीय उपखंडामध्ये भाषांतरे ही क्वचित आढळून येणारी प्रकिया आहे. किंबहुना, प्रादेशिक भाषेत लिहिली गेलेली असाधारण व संस्मरणीय कलाकृती ही भाषांतरित होताना दिसत नाही.
बऱ्याच भारतीय समीक्षकांची अशी भावना आहे की, रश्दींचे ‘अनपेक्षित आणि औपरोधिक निष्कर्ष’ हे त्यांच्या अगाध अज्ञानातून आलेले आहेत. पण रश्दींच्या या हास्यास्पद दाव्याला केवळ एक प्रतिक्रिया पुरे होती. ती म्हणजे- त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे. रश्दींसारखा अतिशय बुद्धिमान लेखक अशा प्रकारचा वाह्य़ात आचरटपणा करतो तेव्हा त्यांचा एकमेव उद्देश वाचकांना चिथावणे व स्वत:कडे लक्ष वेधून घेणे, हा असावा! दुर्दैवाने त्यांच्या या चालीला बहुतांश प्रादेशिक लेखक बळी पडले आहेत.
थोडी गमतीची बाब अशी की, रश्दींचे शब्द ‘खरंखुरं प्रादेशिक साहित्य’ हे प्रादेशिक भाषेतून लिहिणारे लेखक आणि त्यांची अस्सल भारतीय लिखाणाच्या भूमिकेची आठवण करून देतात. काही वर्षांपूर्वी ‘आऊटलूक’ साप्ताहिकाने ‘भारतीयांचे इंग्रजी लिखाण कितपत भारतीय?’ या विषयावर एक विशेषांक काढला होता. त्यात प्रादेशिक लेखकांनीसुद्धा दुजाभाव करत ‘इंडो-अँग्लियन’ लेखकांच्या विरोधात वेडेवाकडे दोषारोप केले होते.
हिंदी लेखक राजेंद्र यादव यांना असे वाटले की, भारतीयांचे इंग्रजी लिखाण हे अगदी दुय्यम दर्जाचे आहे, कारण ते केवळ ‘सनसनाटी किंवा शृंगारिक’ गोष्टी आवडणाऱ्या पाश्चात्त्य वाचकांना खूश करू पाहतात. भारतीय इंग्रजी साहित्य भारताकडे पर्यटकाच्या नजरेतून बघते. उदा. पंकज मिश्राचे ‘दि रोमँटिक्स’ किंवा विक्रम सेठचे ‘अ सुटेबल बॉय.’ अशी पुस्तके म्हणजे केवळ सर्जनशीलपणे लिहिलेली पर्यटकांसाठीची माहितीपुस्तके होत. त्यांचा सगळा डोळा पाश्चात्त्यांवर असून, ही एक प्रकारची तिय्यम दर्जाची साप-दोरीची हातचलाखी आहे. गुरदयाळ सिंग यांच्या मते, भारतीयांचे इंग्रजी लिखाण आणि त्याचे वाचक म्हणजे बुद्धिमंत बुटके होत. कै. निर्मल वर्मा यांचा असा दावा होता की, भारतीय इंग्रजी साहित्यिक एका विचित्र अवकाशात राहतात; जिथे त्यातील सच्च्या भारतीय अनुभवाप्रमाणेच भावनिक आत्माही हरवलेला आहे. बंगाली कादंबरीकार आणि कवी सुनील गंगोपाध्याय यांचे म्हणणे असे होते की, मातृभाषेतून लिखाण करणे असुरक्षितपणाचे वाटत असल्यानेच हे लेखक इंग्रजीतून लिखाण करतात. मराठी कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांचे विचार तर फारच विखारी आहेत. त्यांचा दावा असा आहे की, इंग्रजीतून लिखाण करणारे भारतीय लेखक ‘जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकासारखे आहेत, जे नव्हत्याचे होते करू शकतात.’
अर्थात, ही विपुल मतांतरे अतिशय सरधोपट आणि सूक्ष्म निरीक्षणांच्या अभावातून आलेली आहेत. प्रादेशिक लेखकांनी जर अशी पूर्वग्रहदूषित आणि पक्षपाती भूमिका घेतली नसती तर त्यांना हे मान्य करावेच लागले असते की, अमिताव घोषची ‘द श्ॉडो लाइन्स’, अरुण कोलटकरांची ‘जेजुरी’ आणि भारतीय लेखकांनी इंग्रजीतून लिहिलेली इतरही काही पुस्तके- या खरोखरच लक्षणीय साहित्यकृती आहेत.
भारतातील प्रादेशिक लेखकांनी केलेला एक अजब दावा असा की, ते पशाला काडीचीही किंमत देत नाहीत. त्यांच्यासाठी केवळ लिखाण आणि लिखाणच महत्त्वाचे आहे. हे नक्कीच प्रशंसनीय आहे; पण पूर्णत: प्रामाणिकपणाचे नाही. भारतीय इंग्रजी लिखाणाच्या इथल्या बाजारपेठेचा विचार करता थोडय़ाफार नशीबवान लेखकांबाबत गेल्या १०-१५ वर्षांत अशा प्रकारचे लिखाण खरोखरच सोन्याची खाण ठरले आहे. याची तुलना काही अर्थाने अलीकडच्या काळातील भारतीय कलाक्षेत्रासंबंधातील वाढलेल्या वेडेपणाशी करता येईल. तथापि, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे, की सचोटी आणि पसा जरी नेहमी एकत्र जात नसले, तरी या गोष्टी हटकून परस्परांना वगळून जातात असेही नाही. गार्सिया माक्र्वेझ, सलमान रश्दी, िपचन, जोझेफ हेलर यांना अर्थातच यश मिळाल्यानंतर पैशासाठी खूप झगडावे लागले नाही.
आता पैशाचाच मुद्दा निघाला आहे तर माझ्या पहिल्या कादंबरीचे- म्हणजे ‘सात सक्कं त्रेचाळीस’चेच पाहा. कमाईच्या बाबतीत या कादंबरीने जणू काही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधील प्रत्येक विक्रम मोडला आहे. या कादंबरीबद्दल मला आजही सांगण्यात येते, की ती मराठीतील एक मैलाचा दगड आहे. पण तिच्या हजारभर प्रती अगदी रडतखडत विकल्या गेल्या. त्याही तब्बल २७ वर्षांत. मला पहिल्या वर्षी पुस्तकातून १७४ रुपये मिळाले आणि शेवटच्या वर्षी तर चक्क ११ रुपये. त्यामुळे तुम्ही माझ्या आर्थिक हव्यासाला माफ करायला तयार असाल तर स्पष्ट बोलायला काय हरकत आहे! जर तुम्ही दर्जेदार लिखाणासाठी अमाप कष्ट घेणार असाल, तर चांगले पसे मिळणे योग्यच नव्हे का?
भारतीय भाषांतील लेखकांच्या दृष्टिकोनातून जो दुसरा कळीचा मुद्दा जाणवतो, तो म्हणजे स्वत्त्व! आमच्या लिखाणातील आमचे भारतीयत्व! प्रश्न असा आहे की, अस्सल भारतीयत्व म्हणजे नेमके काय, हे ठरवायचे कुणी? साडी भारतीय आहे यावरून ठरवायचे, की मनाची ठेवण आणि दृष्टिकोन कसा आहे, यावरून? चित्रा दिवाकरूनीच्या ‘मिस्ट्रेस ऑफ स्पायसेस’वरून ठरवायचं, की लाखो लोकांचे मनोरंजन करणाऱ्या कै. गुलशन नंदांच्या गल्लाभरू कादंबऱ्यांवरून? हे ठरवून केलेल्या लग्नावरून ठरवायचे, की बायकोच्या अदलाबदलीवरून? हे हिंदू मूलतत्त्ववादी- जो मुस्लिमांची घरे पेटवतो त्याच्यावरून ठरवायचे, की काश्मीरमधील मुस्लीम आतंकवादी- ज्याचा असा विश्वास आहे, की तो त्याच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतोय, यावरून? खरी गोष्ट ही आहे की, साहित्यात, कलेमध्ये भारतीय-अभारतीय, चुकीचे-बरोबर असे काहीही नसते. जोपर्यंत लेखक एखाद्या विषयातील जाणिवेची गहनता, समृद्धता आणि जटिलता रेखाटू शकतो, तोपर्यंत त्याची पात्रे द्विमितीय न राहता ती तुम्हाला खऱ्याखुऱ्या मित्राप्रमाणे किंवा कुटुंबीयांप्रमाणे भिडू शकतात. थोडक्यात, तो हे शिवधनुष्य पेलू शकतो असा कोणताही विषय हा साहित्यासाठी ग्राह्य़च धरला पाहिजे.
खरे तर जेव्हा एखादा भारतीय लेखक तथाकथित पाश्चिमात्य लोकांसमोर स्वत:ला सादर करीत असतो तेव्हा धूर्तपणे आखलेली त्याची चाल ही तितकीच भारतीय असते, जितकी प्रेमचंदांची कादंबरी किंवा दांभिकतेचे बुरखे फाडणाऱ्या चौदाव्या शतकातील संत कबीराचे दोहे, अथवा भयावह शोकांतिकेचा प्रत्यय देणारी ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’! असे असूनही कित्येक भाषालेखक स्वत:च्या निर्मितीसाठी भारतीयत्वाचा विशेषाधिकार मान्य करतात आणि जे इंग्रजीतून लिहितात त्यांच्यापासून मात्र अशा प्रकारचे स्वातंत्र्य हिरावून घेतात.
मला आठवते, की जेव्हा कुणीतरी इंग्रजी भाषा भारतासाठी परकी असल्याचे सुचवले तेव्हा आय. अॅलन सिली या अँग्लो-इंडियन लेखकाने प्रखर प्रतिकार केला होता. त्यावेळी त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांची- खासकरून प्रादेशिक भाषेतून लिखाण करणाऱ्या लेखकांनी गंभीर दखल घेणे अनिवार्य आहे. त्याने विचारले, ‘असेच असेल तर माझ्या अस्तित्वाचा अर्थ तो काय? मी नेमका कुठला? तुम्हाला केवळ वसाहतवादी उद्योगाच्या आठवणीच नव्हे, तर उपखंडातून एक संपूर्ण समुदायच पुसून टाकायचा आहे की काय?’
अरुण कोलटकर, जयंत महापात्रा आणि माझ्यासारख्या द्विभाषिक लेखकांची अवस्था तर अॅलन सिलीपेक्षाही बिकट आहे. आम्ही असे समजावून घ्यावे का, की ज्यावेळी आम्ही मराठी किंवा उडियामधून लिहितो, त्यावेळीच आम्ही खरेखुरे लिखाण करतो? किंवा अरुणचा मराठी आवाज हाच अस्सल आहे? आणि ज्यावेळी तो इंग्रजीकडे वळला, त्यावेळी मात्र तो खोटा, फसवा झाला आणि मुळापासून तुटला?
इंग्रजी लेखक आणि भाषालेखक यांच्यातील वैरभाव हा काही रश्दींपासून सुरू झालेला नाही, तर तो दीर्घकाळापासून सडत पडला आहे. परिघावरून येऊन इंग्रजी भाषेने- विशेषकरून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आश्चर्यकारक प्रगती केली आहे. याचे एक कारण ५०-६० च्या दशकात केली गेलेली भाषावार प्रांतरचना! यासाठीचे अजून एक कारण म्हणजे निरस व संस्कृतोद्भव हिंदी भाषेला उतावळेपणाने ‘राष्ट्रभाषा’ म्हणून पृरस्कृत करणे. दाक्षिणात्य राज्यांनी अशा हिंदीला तात्काळ झुगारून दिले आणि इंग्रजीला आपसूकच संपूर्ण देशाची एक सामायिक भाषा म्हणून दर्जा प्राप्त झाला.
ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नर जनरल कौन्सिलचा कायदा सदस्य मेकॉले याला इंग्रजीच्या तीव्र अतिक्रमणास दूषणे देण्याचा आपल्याकडे एक सर्वसामान्य प्रघात आहे. उच्च शिक्षण हे स्थानिक भाषेतून देण्याऐवजी इंग्रजी भाषेतून देण्यासाठी सरकारचा पसा खर्ची पडावा, या मताचा त्याने आग्रह धरला. १८३५ च्या शिक्षणासंबंधातील आपल्या टिपणात मेकॉले वसाहतवाद्यांच्या निलाजऱ्या उद्धटपणाने असे जाहीर करतो की, ‘उत्तम युरोपियन साहित्याचा ग्रंथालयातील एक कप्पादेखील संपूर्ण भारतीय आणि अरबी देशी साहित्यापेक्षा मोलाचा आहे.’ अर्थात हे अगदी नि:संशय आहे, की मेकॉले-महाशयांना भारतीयांना ह्य़ूम आणि मिल्टनच्या साहित्यातील आनंद देण्यापेक्षा इंग्रजी बोलणारी नोकरशाही, वकील व शिक्षक यांची फळी बनविण्यात जास्त रस होता. पण आपल्याला हे मानावेच लागेल, की भारतामध्ये इंग्रजी सर्वत्र वापरले जाण्याचे कारण फक्त मेकॉलेचे शिक्षणावरील टिपण कारण नाही.
एडवर्ड सैदच्या ‘ओरिएंटॅलिझम’वरील मूलगामी संशोधनाने आपणास हे दाखवून दिले आहे की, गोऱ्या लोकांचा एतद्देशीयांबद्दलचा दृष्टिकोन आणि इंग्रजी भाषेचे श्रेष्ठत्व या गोष्टींवर आपण कशी श्रद्धा ठेवून आहोत, आणि आजही या अनुभवामुळे आपला आपल्याबद्दलचाच दृष्टिकोन कसा कलुषित झालेला आहे! या महत्त्चपूर्ण योगदानासाठी जग सैदचे सदैव ऋणी राहील. या इथे एका गोष्टीची नोंद करणे आवश्यक आहे. पाश्चिमात्य वसाहतवादाने निर्दयपणे जेत्या भूमीचे शोषण केले, स्थानिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, आणि त्याहून अधिक म्हणजे स्थानिकांच्या आत्मविश्वासाच्या जाणिवेला जबर धक्का दिला. हे जरी खरे असले, तरी हेही विसरून चालणार नाही की, आता आपला देश ६७ वर्षांचा झाला आहे. आणखीन किती वर्षे आपण आपल्या दौर्बल्याचे, भ्रष्टाचारी, दांभिक वृत्तीचे खापर इंग्रजांच्या डोक्यावर फोडणार आहोत? स्वत:ची कृत्ये आणि स्वत:चे नशीब यांची जबाबदारी आता संपूर्णपणे आपलीच आहे.
इथे एक गोष्ट मात्र नमूद केली पाहिजे की, ओझरत्या स्वरूपात का होईना, एक दृष्टिकोन मांडण्यात सैद कमी पडला आहे. जशी गोऱ्या लोकांनी त्यांची भाषा आणि संस्कृती आपल्यावर लादली, तशीच ज्या मुसलमान आक्रमकांनी भारतावर व इतर देशांवर राज्य केले, त्यांनीही हेच पालुपद डोळ्यासमोर ठेवले. भारतीय व्यापारी इंडोनेशिया, थायलंड, बाली आणि इतर ठिकाणी कित्येक शतकांआधी गेले होते. तेसुद्धा आपली भाषा, देव आणि संस्कृती पाठीमागे ठेवून आले आहेत, हे जाहीर आहे. साध्या शब्दांत सांगायचे तर, वसाहतवाद नामक श्वापदाचे हे एक वैशिष्टय़च आहे.
जर प्रादेशिक भाषांचे स्थलांतर करून इंग्रजीने विशेष भाषेचा दर्जा मिळवला असेल, तर जेव्हा दिल्लीमध्ये मुस्लीम राज्य प्रस्थापित झाले तेव्हा पíशयन भाषेनेही नेमके हेच केले. भारतामध्ये १६ व्या शतकात मुघल सत्तेचा पाया रचणारा बाबर याने आपल्या आठवणी जरी छगताई तुर्की भाषेत लिहिलेल्या असल्या तरी मुघल सत्तेचा अस्त होईपर्यंत दक्षिण द्वीपकल्पाचा अपवाद वगळता पíशयन संस्कृतीने दिल्ली व बहुतांश भारतामध्ये अधिराज्य गाजवले. त्यानंतरच्या फेरीत उर्दूची जागा इंग्रजीने घेतली.
तथापि, या भूतलावर अलीकडच्या काळात इंग्रजीचे प्राधान्य वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. पूर्वीच्या कालखंडात वसाहतवाद्यांची भाषा ही केवळ वसाहतवाद्यांची मातृभूमी आणि त्यांनी जिंकलेला भूप्रदेश यांच्यापुरतीच मर्यादित होती. इंग्रजीच्या बाबतीतही हे खरे आहे. यात फरक तो इतकाच, की इंग्रजांचे साम्राज्य पार अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियापासून आफ्रिका व आशियातील कित्येक भागांमध्ये पसरले होते. आज यापकी बहुतांश देशांमध्ये ब्रिटिश साम्राज्य केवळ आठवणींपुरतेच उरले असले तरीही प्रचंड मोठय़ा भूप्रदेशावर इंग्रजी आजही अधिराज्य गाजवीत आहे. आज ती इतकी सर्वसमावेशक होण्यास प्रामुख्याने अमेरिका कारणीभूत आहे. विसाव्या शतकाच्या अर्धशतकानंतर अमेरिकन अर्थव्यवस्था, अमेरिकेचे राजकीय सार्वभौमत्व आणि त्यांची सर्जनशीलता यांनी त्यांचे विभिन्न वेशभूषेतील राजदूत केवळ भूतपूर्व इंग्रजी वसाहतींमध्येच नव्हे, तर इंग्रजी न बोलणाऱ्या जगातदेखील पाठवण्यास सुरुवात केली. मार्शल प्लॅन, हॉलीवूड, भांडवलशाही, डॉमिनो सिद्धान्त, बहुराष्ट्रीयत्व, संगीत, वाहनउद्योग, स्टारबक्स, माहिती तंत्रज्ञानाची क्रांती, बोइंग, कोका-कोला, मॅकडोनल्ड्स, व्हॉइस ऑफ अमेरिका, शस्त्रास्त्र उद्योग, बेस्टसेलर्स, आऊटसोìसग आणि तितकेच महत्त्वाचे विज्ञान व तंत्रज्ञान. या सर्व गोष्टी इंग्रजी भाषा नामक सार्वत्रिक विषाणूच्या वाहक आहेत. आजचे बहुतांश वैज्ञानिक लिखाण जर जगापर्यंत पोहोचवायचे असेल तर ते हटकून इंग्रजीतूनच करावे लागते. कित्येक राष्ट्रांनी पहिल्या यत्तेपासून मातृभाषेबरोबरच इंग्रजीच्या सक्तीचे कायदे त्यांच्या कायदेमंडळात पारित केले आहेत. केवळ फ्रान्समध्ये इंग्रजीविरुद्धचा प्रतिकार टिकून आहे. पण स्पेनमध्ये तो गळून पडला आहे, तर जर्मनीत तो नावापुरता आहे.
सध्या जगभरात भाषांचा मृत्यूदर भयानक आहे. दर १५ दिवसांनी एक भाषा नाहीशी होते. २००५ च्या सुरुवातीस जगात जवळपास ६००० भाषा अस्तित्वात होत्या. याचा अर्थ आजमितीस या भूतलावर साधारणपणे किती भाषा टिकून आहेत, याबद्दल विचार न करणे हेच शहाणपणाचे. आदिम जंगले आणि जमाती यांच्यात होणारा संस्कृतीचा तथाकथित प्रसार ही एक प्रकारे कित्येक भाषांसाठी मृत्युघंटाच आहे. पण गेल्या सहा-सात दशकांमध्ये इंग्रजीनेसुद्धा जगातील केवळ बोलीभाषाच नव्हे, तर प्रमुख भाषांसाठीदेखील एक प्रकारची दहशत निर्माण केली आहे. भारतातील भाषालेखकांची इंग्रजीप्रती असणारी द्वेषमूलक भावना ही एक प्रकारे देशातील स्थानिक भाषांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे द्योतक आहे. तथापि, खरी भीती ही इंग्रजीसारख्या बाह्य़घटकापासून नसून अंतर्गत शत्रूपासूनच आहे, हे कटू सत्य नाकारण्यात काहीच मतलब नाही.
विविध भाषांमधून लिखाण करणारे आपले लेखक- नेमकेपणाने सांगावयाचे तर सरकारने नव्याने दुरूस्त केलेल्या आकडेवारीनुसार, बावीस भाषांतील लेखक भ्रांतचित्त किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर स्वत:ची फसगत करण्यात मश्गूल आहेत. सर्व भाषालेखक इंग्रजीच्या विरोधात एकत्र उभे राहिल्याचे चित्र दिसत असल्याने स्वाभाविकच असे गृहीत धरता येईल, की विविध प्रादेशिक भाषांतून लिखाण करणाऱ्या या लेखक मंडळीमध्ये एकजूटीची व सौहार्दाची भावना असावी, त्यांच्यात आपापसात एक सुदृढ देवाणघेवाण होत असावी, त्यांना एकमेकांच्या साहित्याबद्दल अभिरुची वाटत असावी; ज्यायोगे भाषांतराचा एक प्रवाह एका भाषेतून दुसऱ्या भाषेत सातत्याने वाहत असावा. दुर्दैवाने यातील काहीही खरे नाही. शेजाऱ्यांबद्दलची एखादी उत्सुकतेची प्रासंगिक झलक वगळता आम्ही आमच्याच विश्वात गुंग होऊन पडलो आहोत.
१९३०-४० च्या दरम्यान एक जमाना होता- ज्यावेळी शरच्चंद्रबाबूंचे संपूर्ण साहित्य बंगालीतून मराठीत भाषांतरित झाले होते. पण तो काळ आता गेला. आजकाल फार फार तर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीनची ‘लज्जा’सारखी कादंबरी क्वचित मराठीत आलेली दिसते. पण सर्वसाधारणपणे बोलावयाचे झाल्यास महाराष्ट्रीय लेखकांना दक्षिणेकडील भाषांमध्ये काय चालले आहे याच्याशी काही देणेघेणे असेल याबाबत साशंकताच आहे. उत्तर भारतीयांच्या मानसिकतेमध्ये संपूर्ण दक्षिण भारत हा एकसंध प्रदेश आहे. इथल्या सर्व प्रादेशिक भाषांचा उल्लेख ते तुच्छतेने ‘आंडू-गुंडू भाषा’ असा करतात. दक्षिणेकडची राज्ये आणि लोक मराठी, बिहारी किंवा अन्य कोणत्याही उत्तर भारतीय भाषांकडे कसे पाहतात? त्यांच्याही लेखी भाषा हा चेष्टेचा विषय आहे का, याबाबत मात्र मला काहीच अंदाज नाही.
भाषांतर ही जगातील बहुतांश ठिकाणी मर्यादित स्वरूपात चालणारी क्रिया आहे. भारतात तर ती कमालीची नगण्य आहे. त्यातूनही मर्यादित स्वरूपातील भाषांतरे ही प्रादेशिक भाषांतून इंग्रजीमध्ये होताना दिसतात, परंतु एका प्रादेशिक भाषेतून दुसऱ्या प्रादेशिक भाषेत फारच क्वचित! इतर भाषांच्या तुलनेत पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये मात्र याबाबतीत बऱ्यापकी काम चालू आहे. खासकरून इंग्रजी कादंबऱ्या, नाटके आणि कवितांच्या भाषांतराबाबत. अलीकडेच केरळमधील एका जाणकार माणसाने मला सांगितले की, कुणीतरी जेम्स जॉइसची ‘युलिसिस’ मल्याळममध्ये भाषांतरित केली आहे. किती भाग्यवान आहेत केरळी लोक! मराठीमध्ये आणि इतर भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये का बरे कोणी जॉइस, ग्रीन, सव्र्हातेस, नेरुदा, मुराकामी, पेशोआ भाषांतरित करीत नाहीत? प्रारब्धातील ज्या अनेक अपघातांनी सरतेशेवटी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत धाडले, त्यांच्याप्रति मी कशी बरे कृतज्ञता व्यक्त करावी? जर कुणा भाषांतरकाराने टॉलस्टॉय, काफ्का, काम्यू, डॉस्टॉव्हस्की, हॉलडर लॅक्सनेस, सेलिन, सारामागो, हुआन रूल्फो (ज्याने अगदी सुरुवातीची जादूई वास्तववादी कादबंरी ‘पेद्रो परामो’ लिहिली.) किंवा कुíझओ मॅलापात्रे यांना इंग्रजीतून भाषांतर करून आणले नसते, तर खरेच आपले आयुष्य किती दरिद्री आणि नीरस झाले असते, नाही?
उत्तम भाषांतर हे मूळ कलाकृतीशी कमालीचे सार्धम्य सांगते. पण कोणत्याही परिस्थितीत ते केवळ सार्धम्यच असते, हा जुनाच सिद्धान्त मी परत सांगतोय. भाषांतराने मूळ संहितेच्या भाषेशी प्रामाणिक राहावे की कलाकृतीच्या अंतरंगाशी, हा वाद कधीच न सुटणारा आहे. भाषांतरे टाळण्याचा आपल्यासमोर केवळ एकच मार्ग आहे. त्यासाठी आपल्याला फक्तअस्तित्वात असणाऱ्या ५८०० भाषा अवगत असण्याची गरज आहे. आणि त्याही केवळ सफाईदारपणे नव्हे, तर त्यात उतरलेल्या युगानुयुगांच्या वैविध्यपूर्ण नादमयतेसहित. सरमिसळ किंवा क्लिष्ट अशा वाईट भाषांतरांना बिलकूल तोटा नाही. असे असले तरी भालचंद्र नेमाडेंचा अपवाद वगळता आपल्यापकी कितीजणांना आयुष्यातून भाषांतरे वगळून टाकण्याचा विचार पचनी पडेल?
पण आता पुन्हा एकदा प्रादेशिक भाषांच्या विषयाकडे वळूयात. आपले प्रादेशिक लेखक आणि राजकारणी मातृभाषेबद्दलच्या त्यांच्या प्रेमाचा टेंभा पुन: पुन्हा मिरवतीलही; इंग्रजी वा इतर कोणत्याही भाषेच्या आक्रमणाविरोधात उभे राहून मातृभाषेच्या सन्मानाचे रक्षण करण्याच्या शपथाही घेतील; पण आपली सार्वजनिक भूमिका आणि वैयक्तिक आयुष्य यांत दिवसेंदिवस अधिकाधिक तफावत होत चालली आहे. कितीही जीर्ण आणि शिळा झालेला हा विचार असला तरी वस्तुस्थिती ही आहे, की बहुतांश लोक ज्यांना परवडते- आणि कित्येक लोक ज्यांना परवडत नाही तेही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत धाडतात. यावर तुम्ही विचाराल, ‘का पाठवू नये? शेवटी आमच्या मुलांना जे सर्वोत्कृष्ट आहे ते मिळालेच पाहिजे.’ हे शंभर टक्के बरोबर आहे. फक्त यामध्ये आपण असा समज करून बसलोय- की या सर्वोत्कृष्टतेच्या कसोटीमध्ये मातृभाषा अंतर्भूत होत नाही. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आजकालची बहुतांश मुले- जी इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकतात, ती आपल्या मातृभाषेतून कसेबसेच लिहू आणि बोलू शकतात. जणू काही मातृभाषेतून बोलणे नामुष्कीचे आहे!
पालकांनी आपल्या मुलांबरोबर मातृभाषेतून बोलावे, यापेक्षा अधिक सुलभ आणि स्वाभाविक असे दुसरे काही असू शकेल का? आपल्या राष्ट्रभाषेचा विचार करायचा झाल्यास मुले दोन-तीन वर्षांची झाल्यापासून हिंदी शिकतात. कारण त्यांचे पालक- मग ते कितीही उच्चभ्रू असू देत, मुलांना िहदी सिनेमे, सीरियल्स पाहू देतात, िहदी गाणी गाऊ देतात, आणि भारतात सर्वत्र आढळणारा अंताक्षरीचा खेळही खेळू देतात. त्यामुळे आपल्यापकी जे मुंबईसारख्या शहरात राहतात, त्यांना मातृभाषेशी काहीही देणेघेणे नसते. आणि याचे साधे-सरळ कारण म्हणजे आम्ही इंग्रजीच्या श्रेष्ठत्वाचे मिथक विकत घेतले आहे.
चिनी आणि जपानी लोक जेव्हा अमेरिकेला स्थलांतरित होतात तेव्हा त्यापकी बहुतांशजण आपली मुले नव्या देशातील भाषेबरोबरच आपलीही मातृभाषा बोलतील याची खबरदारी घेतात. ते आपल्या मुलांबरोबर चिनी किंवा जपानी भाषेत बोलतात. याउलट, भारतामध्ये शहरी भागातील पालकांना केवळ परदेशातच नव्हे, तर त्यांच्या स्वत:च्या देशात, स्वत:च्या घरीही आपल्या मुलांसोबत मातृभाषेतून बोलणे गरजेचे वाटत नाही. जर अशा पद्धतीचे दुटप्पी बोलणे आणि दुटप्पी दर्जा यांचे गारूड आपल्यावर चालून येणार असेल, तर आपल्या प्रादेशिक भाषांना भवितव्य ते काय असणार? कन्नड, मराठी, आसामी आणि इतर भाषांतील पुस्तके वाचणार तरी कोण?
थोडय़ा वेळासाठी आपण उच्चभ्रू भारत जरा विसरून जाऊयात आणि अगदी ‘अमर- अकबर- अँथनी’छाप सामान्य माणूस- त्याला इंग्रजी भाषेबद्दल काय वाटते, ते पाहू. जोपर्यंत शिक्षणाचे माध्यम निवडण्याची गोष्ट चालेल, जिथे कुठून का होईना इंग्रजीला स्पर्शून जाण्याची शक्यता असेल, तिथे एखादा बॉम्बे हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय, अॅडव्हर्टायिझग एजन्सीमधील एखादा एसएससी नापास डिस्पॅच कारकून, रिक्षाड्रायव्हर, शासकीय कार्यालयातील कारकून किंवा अगदी मुंबईतील एखादा मराठी व गणिताचा शिक्षकही आपल्या मुलाला अगदी तिय्यम दर्जाच्या शाळेत घालण्यासाठी भीक मागेल, उसने पसे आणेल, किंवा प्रसंगी सासऱ्याला धमकीही देईल.
चला, आता एकदम २००६ कडे वळूयात. हेच ते वर्ष- ज्यावेळी फ्रँकफर्ट बुक फेअरने भारताला सन्माननीय अतिथी म्हणून निवडले. कोणत्याही कसोटीवर तपासून पाहता हा भारतासाठी खरेच एक मोठा सन्मान होता. कारण फ्रँकफर्ट बुक फेअर हा जगातील सर्वात मोठा पुस्तकमेळा आहे. हा मेळा संपूर्ण जगातील प्रकाशक आणि एजंट्स यांना त्या देशाची कवाडे उघडी करून देतो, तसेच जगासमोर तुमचे जे सर्वोत्तम साहित्य आहे, ते मांडण्याची संधी उपलब्ध करून देतो. पण भारताच्या दृष्टीने २००६ साल आणखीनच वैशिष्टय़पूर्ण होते. कारण केवळ २० वर्षांत दुसऱ्यांदा निमंत्रण मिळवणारा भारत हा एकमेव देश होता.
त्या वर्षी फ्रँकफर्ट बुक फेअरला जे मुंबईतले चार लेखक उपस्थित राहिले होते (ज्यात मीही एक होतो!) त्यांना मायदेशी परत आल्यानंतर तिथल्या अनुभवांचे कथन करण्यासाठी गटे इन्स्टिटय़ूटने निमंत्रित केले होते. प्रारब्धदेवता माझ्यावर प्रसन्न झाली असल्याने माझा नेमका आवाज बसला होता. तरीदेखील मला व्यासपीठावर इतरांच्या बरोबरीने बळेबळे बसविण्यात आले. मी एका मुक्या निरीक्षकाची भूमिका बजावू लागलो. तीन वक्त्यांपकी पहिला वक्ता हा पहिलीच कादंबरी लिहिलेला एक नवखा लेखक होता. दुसरा वक्ता ही एक कमालीची यशस्वी कादंबरीकार होती. जिच्या कलाकृतींबद्दल साहित्यिक वर्तुळात खरे तर नाके मुरडली जातात; पण इंग्लंडमध्ये ओरिएंटल आणि आफ्रिकन स्टडीजच्या विभागात तिच्या कादंबऱ्या शिकवल्या जातात. तिसरा वक्ता होता भारतातील एक सन्माननीय कवी आणि कलासमीक्षक.
मी काहीसा धास्तावलो होतो. पण एकंदरीत माहोल प्रसन्न आणि हलकाफुलका होता. कादंबरीकार बाईंनी तिकडच्या कटू अनुभवांचे कथन करून मनोरंजन केले. पहिलीच कादंबरी लिहिणारा लेखक सफाईदारपणे अडखळत होता, तर कवी-समीक्षक ८०-९० च्या दशकांत बुद्धिवंतांच्या वर्तुळात परिचित असणाऱ्या विरचनावादी शब्दबंबाळ वाक्यरचनांपासून मुक्त होता. सत्राच्या शेवटच्या पाच मिनिटांत विषय भाषालेखकांच्या जर्मन दौऱ्यावर घसरला. त्यांचे जर्मनीतील पंचतारांकित हॉटेलमधील वास्तव्य दिल्लीतल्या शासकीय प्रशासन व्यवस्थेमार्फत पुरस्कृत झाले होते. आम्ही चौघे मात्र भारत सरकारचे पाहुणे नव्हतो.
विषय निघाल्या निघाल्या कवी-समीक्षकाच्या भाषेने अचानक आत्मप्रौढीचे वळण घेतले आणि ते प्रादेशिक लेखकांबद्दल काहीशा असभ्य भाषेत ते तिरस्काराने बोलू लागले. त्यांच्या टीकेचा एक सर्वसाधारण सूर असा होता की, इंडो-अँग्लियन लेखकांनी बुक फेअरमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रवेश त्यांच्या साहित्यिक मूल्यांवर मिळवला आहे, तर भाषालेखकांनी हा प्रवेश सत्तेत असलेल्यांची खुशमस्करी करून, राजकारण करून आणि सरकारी भिक्षेवर मिळवला आहे. यात मग कादंबरीकार बाईंनीदेखील आपला सूर मिसळला आणि भाषालेखकांची यथेच्छ निंदानालस्ती सुरू झाली. अर्थात माझा ‘व्हॉइस-बॉक्स’ तात्पुरता ‘आऊट ऑफ ऑर्डर’ असल्याने मी त्यांना विचारू शकलो नाही, की मग भूतदयेवर मिळवलेला प्रवेश तरी योग्य आहे का? कारण आम्हीसुद्धा फ्रँकफर्ट बुक फेअरमध्ये जर्मन प्रकाशकांनी दाखवलेल्या सौजन्यामुळेच गेलो नव्हतो का?
तर अशा तऱ्हेने आम्ही पुन्हा एकदा ढोबळ विधानांपर्यंत येऊन पोहोचलो होतो. मोजकेच प्रादेशिक लेखक- जे चलाखी करण्यात, स्वत:ला पुढे रेटण्यात वाकबगार होते (आणि जणू काही इंडो-अँग्लियन लेखक याबाबत धुतल्या तांदळासारखे आहेत!), अशांमुळे संपूर्ण प्रादेशिक लेखकांची जमात कलंकित करण्याचे प्रयत्न सुरू होते. पुन्हा एकदा सीमारेषा आखल्या गेल्या. संपूर्ण चच्रेचा सूर ‘आम्ही आणि ते’ या चौकटीत बंदिस्त झाला. जग गुणी आणि वाईट लोकांत विभागले गेले. आणि ‘वाईट’ कोण, याचा आडाखा बांधण्यासाठी कोणत्याही पारितोषिकाची गरज नव्हती. मला असे वाटले की, १००-१५० च्या जाणकार श्रोतृवर्गापकी किमान तीन-चार तरी त्या कवी-समीक्षकाला अडवतील. त्याचा चढेल स्वर कुठून येतोय, हे विचारतील आणि प्रादेशिक लेखकांमध्ये जसे टुकार लेखक आहेत, तसेच इंग्रजी लेखक मंडळींत कुणीच नाहीत का, याचा जाब विचारतील. मला असेही वाटले की, कादंबरीकार बाई जेव्हा भाषालेखकांवर तोंडसुख घेत होत्या तेव्हा ते दणदणीत हल्ला करतील आणि त्यांच्या भाषालेखकांबाबतच्या भूमिकेविषयी गंभीर टीकाही!
माझी समज कमी पडते- आणखी काय! प्रादेशिक लेखकांच्या बाजूने एकानेही चकार शब्द काढला नाही. उलट, श्रोतृवर्गाने व्यक्त केलेल्या भावनांना हसून हसून दाद दिली. सुदैवाने असे वाटते की, भाषालेखक आणि इंडो-अँग्लियन लेखक या दोघांनाही हे उमगून चुकले आहे, की ते ‘चोझन’ या संकल्पनेत बसतात. ही विशिष्टवर्गीय संकल्पना त्याचवेळी कार्यरत असते, ज्यावेळी वजाबाकीचे (‘एक्स्क्लुझन’चे) राजकारण सुरू होते. जितके जास्त तुम्ही स्वत:ला विशिष्टवर्गीय मानाल, तितकी तुम्हाला उणेपणाची गरज अधिक जाणवेल. भाषालेखकांना आपण ‘एक्स्क्लुझिव्ह’ वर्तुळाच्या बाहेर आहोत हे जितक्या जास्त तीव्रतेने जाणवेल, तितके जास्त ते स्वत:ला कमकुवत समजू लागतील आणि स्वत:बद्दल आपण अधिकच विशिष्टवर्गीय असल्याचा ग्रह करून घेऊ लागतील. आणि बरोब्बर त्याच्या उलट परिस्थितीत रश्दी स्वत:च्या ‘चोझन क्लब’मध्ये येण्यास त्यांना नकार देऊ शकतात. इंडो-अँग्लियन लेखकांची दर्पोक्ती ही भाषालेखकांचा आडमुठेपणा व असहिष्णुतेइतकीच अपमानास्पद आहे. कदाचित दोन्ही पक्षांचा असा विश्वास असावा, की दुसऱ्याला सतान बनवल्याने आपण स्वत: सद्गुणी, निष्कलंक आणि प्रामाणिक आहोत हे स्पष्ट होईल. सबब दोघांपकी एकाची निवड करावी असे दोघांकडे काहीही नाही.
जी भाषा संवादाचे माध्यम म्हणून वापरली जाते, तिचा उपयोग बहिष्कृत करण्याचे हत्यार म्हणून होतो, हे जर आत्मविरोधी वाटत असेल, तर तीच भाषा छळवणुकीचे माध्यम म्हणून वापरली जाते, ही विपर्यासाची पराकाष्टा ठरते. परदेशात हे होताना अनेक वेळा दिसते. उदाहरणार्थ, स्पेनमधील कॅटालोनियन बोलणारा समूह. त्यांच्यामधलेच काही लेखक स्पॅनिशमध्ये जेव्हा लिहितात तेव्हा त्यांना वाळीत टाकले जाते. पण इथे महासागर ओलांडायची काही गरज नाही. आपल्या घरात तेच चालले आहे. केरळातले, तामिळनाडूतले लोक आपल्याला एकेकाळी नकोसे झाले होते. आणि नंतर बिहारी लोकांचा आपल्याला इतका तिटकारा वाटला, की त्यांना महाराष्ट्र सोडावा लागला. आपला महाराष्ट्र इतका कसा कोत्या मनाचा बनला, हे एक शरिमदा करणारे कोडे आहे.
हे सर्व विवेचन मला साहित्याबद्दलच्या माझ्या दोन दृढ मतांपर्यंत आणून पोहोचवते. काय फरक पडतो, की लेखक टिंबक्टूचा आहे, भारताचा आहे, फ्रान्सचा आहे की अमेरिकेचा? काय फरक पडतो, की अमूक एक लेखिका जपानी भाषेत लिहिते, स्वाहिलीत लिहिते, इन्यूइटमध्ये लिहिते, इंग्रजीत लिहिते की मल्याळममध्ये? महत्त्वाची असते ती एकच गोष्ट- ती म्हणजे तो लेखक चांगला आहे की टुकार? ती लेखिका तुमच्या कल्पनाशक्तीला गवसणी घालू शकते का? अशी काही त्या लेखकाची भाषाशैली आहे का- जी एखाद्या वावटळीनंतर खिडकीतून येणाऱ्या प्रकाशझोताप्रमाणे तुमचा आसमंत, तुमचे अवकाश आणि तुमचे मन निरभ्र बनवेल? किंवा त्या लेखिकेची कलाकृती अशी काही दृष्टी तुम्हाला देऊ करते का, की जी तुम्हाला आयुष्यभर साथसंगत करेल?
टीव्हीवरील चलत्चित्रे, मोठा पडदा, सेलिब्रिटी जर्नालिझम, इंटरनेट, फेसबुक, सेलफोन मेसेजिंग आणि व्हिडीओ गेम्स या सगळ्यांमुळे साहित्य हे या भूतलावरील एक संकटात सापडलेली प्रजाती बनून राहिले आहे. भारतातील लेखकांना जर या गोष्टीचे आकलन होणार नसेल तर अनिच्छेने का होईना, त्यांना आत्मविनाश हा ओढवून घ्यावाच लागेल. जर आपल्याला साहित्याची खरोखरच कदर असेल (आणि अर्थात हा आपला नेहमीचाच दावा असतो.) तर हे हास्यास्पद, कमालीचे निरुत्पादक, परस्परविघातक भांडण तात्काळ थांबले पाहिजे आणि आपली ऊर्जा वेधक कादंबरी, नाटक, कविता, गद्य लिहिण्यासाठी खर्ची घातली पाहिजे. जेणेकरून पळून चाललेल्या वाचकांच्या रूपकात्मक िझज्या पकडून त्यांना आपण पुन्हा एकदा शब्दांकडे आणि पुस्तकांकडे खेचून आणू शकू.
२००८ साली जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या माजी प्राध्यापक, साहित्यकार आणि विद्वान टीकाकार मीनाक्षी मुखर्जी मला म्हणाल्या की, ‘अरेकिरण, भारतातला भाषावाद या विषयाचं केव्हाच दफन झालंय.’ दुर्दैवाची गोष्ट अशी की, वर्षभरातच या लेखिकेचे निधन झाले. पण एका अर्थी त्या नशीबवान ठरल्या. भाषेचा वांझ, पण अतिशय हानीकारक वाद जोरात चालू आहे हे त्यांना बघावे लागले नाही.
बाहरचे लोक आपल्या नोकऱ्या पटकावताहेत, या विधानाच्या पाठीमागचा न्यूनगंड महाराष्ट्रीय लोकांमध्ये कुठून आला? कुवतीची आणि कर्तबगारीची आपल्याकडे कधीच कमी नव्हती. आळशीपणा किंवा काही कामे आपल्या अब्रूला धक्का पोहोचवतात, ही कारणे तर यामागे नाहीत ना? दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशातील लोक ‘बाहेरचे’ कसे ठरतात? चक्क आपली राज्यघटना स्पष्टपणे सांगते की, भारतातला कुठलाही माणूस देशात कुठेही नोकरी शोधू शकतो व राहू शकतो.
जणू काही जातपात, वर्ग, गोत्र, अस्पृश्यता कमी पडत होती म्हणून की काय आपण आता भाषेच्या निमित्ताने या ना त्या भाषा बोलणाऱ्या समूहाच्या पाठी हात धुऊन लागतो आहोत. एक काळ असा होता की, आपल्याला तामीळ, मल्याळम वा तेलुगू बोलणारे सहन व्हायचे नाहीत. मग त्यांची जागा बिहारी लोकांनी घेतली. त्यांचा छळवाद इतका वाढला, की त्यांना रातोरात आपली नोकरी, घर आणि इथलं जीवन उखडून पळ काढावा लागला.
मुंबई हे शहर अमेरिकेसारखे आहे. इथली ९५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही प्रामुख्याने विविध प्रांतांतून आलेली आहे. मराठी माणसामध्ये अनेक गुण आहेत; परंतु मुंबईत आणि महाराष्ट्रात उद्योग आणि मोठे धंदे सुरू केले ते बहुतांशी पारशी, गुजराती, सिंधी आणि मारवाडी लोकांनी. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात अनेक जमातींनी हातभार लावलेला आहे. आणि म्हणूनच मुंबई कॉस्मोपॉलिटन म्हणून नावाजली जाते. आपल्याकडे जे खास गुण, सामथ्र्य आणि ताकद आहे, तीच दुर्बल आणि कमजोर केली, तर भविष्यासाठी ते अत्यंत घातक ठरेल.
२०१४ साली भाजपाने निवडणुका जिंकून नरेंद्र मोदी यांनी २६ मे रोजी मध्यवर्ती सरकारचा कब्जा घेतला. जेमतेम तीन आठवडे पुरे होत नाहीत तोच सरकारने फर्मान काढले की, सरकारी नोकरांनी ट्विटर आणि सोशल मीडियावर फक्त हिंदीच वापरायला हवे. यावर दक्षिणेतल्या प्रादेशिक राज्यांकडून ताबडतोब विरोध करण्यात आला. कधी कधी असा प्रश्न पडतो की, प्रत्येक नवीन सरकारला विस्मृतीने पछाडले आहे की काय?
हिंदीविरुद्ध आंदोलनाची सुरुवात १९३७ सालापासून झाली- जेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेसने मद्रास प्रेसिडेन्सीमधल्या शाळांमध्ये हिंदी शिकविण्याचा निर्णय घेतला. निषेध सभा, उपवास, दंगे आटोक्यात येईनात तेव्हा प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नरांनी हिंदी शिक्षणाचा अहवाल बाजूला सारला. फक्त हिंदी भाषेला राष्ट्रभाषा बनवण्याचा हट्ट १९६५ साली शिगेला पोहोचला. मद्रास- म्हणजे आजच्या तामिळनाडूमध्ये भयानक दंगल आणि आंदोलने झाली. जाळपोळ, हिंसा, गोळीबार, लुटालूट हे प्रकार तब्बल दोन महिने चालू राहिले. सुमारे सत्तर लोक मारले गेले. त्यात दोन हवालदार होते. एवढेच नव्हे, तर तामिळनाडू देशापासून अलग होण्याची भाषा बोलू लागला. शेवटी इंदिरा गांधी सरकारने १९६७ साली हिंदी आणि इंग्लिश या दोघांना राष्ट्रभाषेचा मान दिला.
या भाषिक चळवळीने काँग्रेसला एक महत्त्वाचा धडा शिकवला : तामिळनाडूमध्ये तदनंतर पुन्हा कधीच काँग्रेस सत्तेवर आली नाही.
एका मिनिटाकरता आपण भारताची राजधानी दक्षिणेकडे हलवूया आणि चेन्नई वा हैदराबाद वा तिरुवनंतपूरममध्ये बसवूया. मग समजा, नवीन राजधानीच्या लोकांनी असे ठरवले की, तामीळ, तेलुगू किंवा मल्याळम राष्ट्रभाषा बनवायच्या. अशा फर्मानाला भाजप, काँग्रेस वा समाजवादी पार्टी सोडाच; महाराष्ट्रीय, बंगाली, हिंदी वा शीख लोकांचा दुजारा मिळण्याचा संभव तरी आहे का?
भारतातल्या अगदी विनाकारण चालू असलेल्या भाषिक संघर्षांच्या विचाराने माझ्या मनातील रोम न् रोम बंड करून उठतो. माझ्या लोकांना जर खरेच जबाबदारीचे भान असते, तर या तद्दन तकलादू मुद्दय़ांना ऊत आणण्यापेक्षा आपणासमोर असणाऱ्या भीषण वास्तवाकडे, तात्काळ भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष दिले गेले असते.
आपल्याला बहुतेक या गोष्टीचा विसरच पडत चालला आहे, की ज्या भारतात आपण राहतो, तो बहुविध भाषा जेथे वास करतात असा देश आहे. आजमितीस देशात २२ प्रमुख भाषा आहेत आणि प्रत्येकीला शेकडो वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. पकी तामीळ ही सर्वात प्राचीन भाषा असून, ती ३००० वर्षांहून अधिक जुनी आहे. यातील एखादी जरी भाषा आपल्यातून कमी झाली, तर आपण कमजोर बनू. बहुतांश देशांना एकच भाषा आहे. आपण किती सुदैवी आहोत- जिथे तब्बल २२ मुख्य भाषा आणि शेकडो बोलीभाषांचा प्रचंड मोठा खजिना आहे. इतर कोणाहीपेक्षा लेखकांचे भाषेशी अधिक जिव्हाळ्याचे नाते असते. तेच तिचे पूजक असतात. लेखकच शब्दांना नवी वळणे, नवे आकार देऊ शकतात. तेच भाषेला असाधारण संदर्भात निराळ्या पद्धतीने वापरू शकतात. आपल्या भाषेला बंधने घालणाऱ्यांच्या विरोधात लेखक मंडळींनीच सन्याची पहिली फळी उभी केली पाहिजे आणि पुढच्या पिढय़ांसाठी भाषेचे जतन केले पाहिजे.
अनुवाद : नितीन जरंडीकर