अभिजीत ताम्हणे
फसवलं गेल्याची जाणीव, चीड, हताशा, काळजी.. अशा भावनांचा कल्लोळ १२ डिसेंबरपासून उडाला आणि हळूहळू विरतही गेला. केरळच्या कोची शहरातल्या फोर्ट कोची या छानशा भागात लांबलांबून आलेली माणसं. कुणी मुंबई, दिल्ली, लखनऊ, जम्मू, बेंगळूरू अशा शहरांतून तर कुणी जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्रिटन, दक्षिण कोरियासारख्या देशांतून इथं १२/१२ ही तारीख गाठण्यासाठी पोहोचलेले. कोची बिएनाले हे जगभरच्या भारतप्रेमींचं लक्ष वेधून घेणारं महाप्रदर्शन. फोर्ट कोची बेटावरली अनेक ठिकाणं या द्वैवार्षिक प्रदर्शनातल्या कलाकृतींनी व्यापली असली तरी ‘आस्पिनवॉल हाउस’ हे मुख्य ठिकाण : मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसराएवढं किंवा त्याहून आकारानं मोठंच. जगभर २०० ठिकाणी अशाच प्रकारची द्वैवार्षिक महाप्रदर्शनं भरतात, त्यांची रचना (अ) मुख्य सुनियोजित प्रदर्शन (ब) खासगी प्रयत्नांतून इतर ठिकाणी लागलेली इतर सहयोगी प्रदर्शनं (क) अन्य उपक्रम अशी असतेच.. पण कोची बिएनालेचं वैशिष्टय़ हे की, इथं स्टुडंट्स बिएनाले या उपक्रमातून देशभरच्या निवडक कलाविद्यार्थ्यांनाही संधी दिली जाते. अशा भरगच्च कार्यक्रमासाठी मुद्दाम तीन ते पाच दिवसांचा वेळ काढून १२ डिसेंबरला कोचीमध्ये पोहोचलेले लोक, सकाळीच कावलेले का दिसत होते?
ऐनवेळी- ११ डिसेंबरची मध्यरात्र होता होता कोची बिएनालेच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्यावरून घोषणा झाली की, १२ डिसेंबर ऐवजी २३ डिसेंबरपासूनच खुलं होऊ शकेल! म्हणजे आजपासून हे महाप्रदर्शन खऱ्या अर्थानं खुलं होईल. एव्हाना ती चीड, हताशा यांचे ‘धारक’ एकतर आपापल्या घरी परतले असतील, ‘मी पुन्हा येईन’ म्हणत असतील आणि पुन्हा येण्यासाठी पैशांसह जी काही जमवाजमव करावी लागते तीही करत असतील. पण मुख्य दालनं बंद असली तरी बाकीच्या सर्व ठिकाणी कलाकृती होत्या, त्यातच खासगी कलादालनांनी उद्घाटनाच्या आठवडय़ात ठेवलेले आपापले कार्यक्रम होते आणि या सगळय़ावर सावटासारखी ‘नेमकं कशामुळे लांबणीवर पडलं मुख्य प्रदर्शन?’ याची चर्चाही होती. या सर्वामुळे १२ ते १४ डिसेंबर हा फोर्ट कोची बेटावरला तीन दिवसांचा काळ भन्नाट वेगाचा होता. साधारण साडेतीन महिने चालणाऱ्या ‘कोची बिएनाले’ची पहिली खेप २०१२ मध्ये पार पडली, तेव्हाही अस्संच वातावरण होतं, म्हणजे ‘आस्पिनवॉल हाउस’मधल्या खोल्याखोल्यांतून नुस्ताच टर्पेटाइनचा वास येत होता, अनेकांच्या कलाकृती एकतर पूर्ण झाल्या नव्हत्या किंवा नीट मांडल्या गेल्या नव्हत्या. दृश्यकलेचा भाग म्हणून काहींनी व्हीडिओ-कलाकृती केल्या, पण इथं प्रोजेक्टर किंवा टीव्ही-पडदा टांगण्याची नीट व्यवस्थाच नव्हती.. वगैरे. तेव्हा बेशिस्त आणि गैरसोय ही काही कोची बिएनालेला नवीन नाही. पण त्यातूनही इथं येणारे कलाप्रेमी, जेवढं पाहायला मिळतंय तेवढं डोळय़ांत साठवत होते. यंदा मुख्य दालनांत मज्जावच झाल्यानं खुद्द या महाप्रदर्शनाची यंदाची गुंफणकार (क्युरेटर) सुभिगी राव हीदेखील ‘कोची बिएनाले फाउंडेशन’वर संतापलेली आहे, असं उघडपणे दिसत होतं. अशा अ-भूतपूर्व गोंधळातून मार्ग काढत कलाकृती पाहाव्या लागल्या!
नाही म्हणायला, ‘आस्पिनवॉल हाउस’मध्ये आयोजकांनी पहिल्या दिवशी काही परदेशी पाहुण्यांना आत सोडलं आणि ‘पुढं काही नाही’ असं म्हणत अध्र्या तासात बाहेर काढलं. पण त्या अध्र्या तासात, बडोद्याच्या ‘महाराजा सयाजीराव विद्यापीठा’तल्या कला विभागात अनेक विद्यार्थी घडवणारे वासुदेवन अक्कितम यांची ३६५ छोटी आणि तीन-चार मोठी चित्रं होती. करोनाकाळात ‘दिवसाला एक’ या साधारण गतीनं ही ३६५ चित्रं अक्कितम यांनी पूर्ण केली. चिकाटी, सातत्य हे जे गुण (यंदाच काय, यापूर्वीही) कोची बिएनालेच्या आयोजनात विशेष दिसले नाहीत, ते सारे गुण चित्रकाराकडे असू शकतात असं ही चित्रं सांगत होती. घरातल्या वस्तूंच्या किंवा खिडकीतून दिसणाऱ्या ढगांच्या आकारांतून चित्रकाराला सुचलेले कल्पनारम्य आकार, प्राणी आणि त्यांच्या गोष्टी, कलेतिहासातले दुर्लक्षित टप्पे ठरलेल्या काही चित्रांचं वासुदेवन यांनी केलेलं आत्मीकरण असे या ड्रॉइंगवजा चित्रांचे विषय होते. तिथून पुढं परदेशी पाहुणे गेले नाहीत, पण व्हीडिओ-दृश्यकलावंत अमर कन्वर यांची कलाकृती पुढे कुठेतरी असल्याचं शोधत गेलो, तर ट्रेबर माव्लाँग या मेघालयाच्या चित्रकार-मुद्राचित्रणकाराच्या कलाकृती पाहायला मिळाल्या. ट्रेबर हा दिवंगत चित्रकार चित्तप्रसाद यांची परंपरा पुढे नेणारा, काळय़ाच छटेचा वापर करून मानवी जीवनाचे रंग दाखवणारा. त्यापुढली अनेक दालनं २३ तारखेनंतर नीट तयार झालेली असतील, पण मध्येच एक बांबू जोडून बनवलेला त्रिकोण दिसेल ती दिल्लीचे आसिम वकीफ यांनी कल्पिलेली आणि केरळच्याच वायनाड भागातल्या बट्टकुरुमार जमातीचे ए. एन. सोमन् यांनी प्रत्यक्ष घडवलेली कलाकृती. त्या बांबूच्या घरात बसता येतं, बांबूचीच वाद्यं वाजवता येतात. इथून पुढे, यंदाच्या गुंफणकार सुभिगी राव यांच्या विचारांचे ठसे दिसणार असतात. सुभिगी या सिंगापूरच्या. त्या कवयित्री आणि दृश्यकलावंत आहेत आणि गेल्या कोची बिएनालेमध्ये (२०१८) पुरामुळे भिजलेली पुस्तकं हा त्यांच्या छायाचित्र-व्हीडिओ कलाकृतीचा विषय होता. पर्यावरण, निसर्गवैभव, भौतिकाची भंगुरता हे सुभिगी यांचे चिंतनविषय. ते या प्रदर्शनात ठिकठिकाणी दिसणार आहेत, याची खूणगाठ या बांबूंमुळे बांधली जाते. अगदी समोरच काही पावलं चालून गेल्यावर मोठ्ठय़ा हॉलवजा गोदामात, गोव्याचे साहिल नाईक यांनी उभारलेली अख्खी चिऱ्याची खाणच आहे. गोव्यातल्या बंद पडलेल्या खाणींची आठवण यातून होते. तिथल्या गूढ, खिन्न वातावरणाला साजेसं संगीतही या कलाकृतीचा भाग असेल, असं कुणीतरी म्हणालं. पण गेल्या आठवडय़ात तरी संगीत वगैरे वाजत नव्हतं. अमोल के. पाटील हा मुंबईच्या नवविचारी चित्रकारांपैकी एक. ‘डॉक्युमेंटा’ या जर्मनीत भरणाऱ्या पंचवार्षिक महाप्रदर्शनात यंदा (जून-सप्टेंबर २०२२) त्याची निवड झाल्यानं त्याच्याकडे जगाचंही लक्ष वेधलं गेलं आणि गिरणगावात वाढलेला हा तरुण आता अॅमस्टरडॅमच्या राइक्सअकॅडमीत शिकतो आहे. अमोलच्या कलाकृतींमधला विद्रोह केवळ दलित कवितांची भाषांतरं त्यानं इथं वाचता/ ऐकता येतील अशी ठेवली एवढय़ापुरता नाही.. त्याची नऊ शिल्पंदेखील इथं आहेत; आणि प्रत्येक शिल्पाचा खरखरीत पोत- काळय़ाकुट्ट गटारातून बाहेर काढल्यासारखं ब्राँझच्या त्या शिल्पवस्तूचं रूप- हादेखील विद्रोहाचा आविष्कारच आहे. भौतिकतेच्या हव्यासाला प्रश्न विचारण्याची ताकद या कलाकृतींमध्ये आहे. त्याच इमारतीत अर्चना हांडे या अमोलपेक्षा जवळपास दुप्पट वयाच्या चित्रकर्तीचं मांडणशिल्प आहे, तेही भौतिकतेचं दैनंदिन जंजाळ आणि त्याचा जुनाटपणा प्रेक्षकाला प्रथमदर्शनीच भिडवणारं.
पुढल्या ‘पेपर हाउस’ (पेपर म्हणजे कागद नव्हे, मिरी!) किंवा अन्य ठिकाणी अनेक कलाकृती प्रेक्षकांसाठी सज्ज होत्या. मुंबईत शिकलेल्या साजू कुन्हन यानं केरळमधलं त्याचं मूळ घर आणि पूर्वज हा विषय घेऊन लाकूड आणि माती यांवर चित्रं/ छायाचित्रं केली आहेत. ही माती त्या घराच्या परिसरातली. मातीच्या विटा बनवून त्यांवर पूर्वजांची छायाचित्रं त्यानं पृष्ठांतरित (ट्रान्स्फर) केली आहेत. पेपर हाउसमधली ही जितकी सहज लक्षवेधी ठरते, तितकी अल्पर आयदीन या तुर्कस्तानी कलावंतानं मांडलेली दगडांची छायाचित्रं कदाचित ठरणार नाहीत, पण या प्रत्येक दगडाचं वजन मोजून त्यावर तो आकडा लिहिणं ही त्यामागची मेहनत सहज दिसेल. हे दगड बरेच दगड बाहेरून आणून समुद्रात तात्पुरते ठेवले होते, हेही नंतर कळेल. दगडमातीच्या या प्रेमातून पुढे गेल्यावर अतिश्रीमंत, अतिउर्मट व्यक्तींच्या वैयक्तिक ज्या स्मृतीवस्तू किंवा त्यांच्या संग्रहातल्या ज्या कलावस्तू पुढे लिलावांत विकल्या गेल्या, त्यांच्या रेखाचित्रांचे समूह दिसतील. भौतिकतेच्या पराकोटीचं लोण भंगुरतेला पोहोचतं कसं, हे इथं काही क्षण थांबून विचार केल्यास जाणवू लागेल. फोर्ट कोची बेटावरली ‘बोट जेटी’ ओलांडून पुढे चालत गेल्यावर या बिएनालेचा पुढला हिस्सा- ‘स्टुडंट्स बिएनाले’ आणि इन्यागिन्या खासगी प्रदर्शनांना स्थान देणारं ‘इन्व्हिटेशन्स’ हे प्रदर्शन. त्याखेरीज, गेल्या खेपेपासून ‘कोची बिएनाले’च्या आयोजनातून गूढरीत्या- कोणतंही अधिकृत कारण न देता- दूर झालेले गुणी आणि धडाडीचा चित्रकार- मांडणशिल्पकार रियाझ कोमू यांच्या पुढाकारानं उभं राहिलेलं (पण बिएनालेचा भाग नसलेलं) ‘सी- अ बॉइिलग व्हेसल’ हे समुद्र आणि मानव यांच्या संबंधांवर आधारलेलं उत्तम प्रदर्शन.
पण यापैकी स्टुडंट्स बिएनालेचं आयोजन यंदा अधिक सुघटित होतं. २०२० मध्ये कोची बिएनालेचं मुख्य महाप्रदर्शन रद्द होऊनही, ‘ऑनलाइन’ स्वरूपात स्टुडंट्स बिएनालेचं काम सुरू होतं. तो अनुभव कदाचित यंदाच्या खेपेला कामी आला असेल. केरळपासून काश्मीर आणि गुवाहाटीपर्यंतच्या कलासंस्थांमध्ये शिकणारे विद्यार्थी, पाच मार्गदर्शकांच्या निगराणीखाली इथं काही दिवस तळ ठोकून होते. विद्यार्थीसंख्या अधिक असली तरी कलाकृती-प्रकल्प ५१ दिसतात, कारण काही विद्यार्थ्यांना गटागटानं काम करायला सांगण्यात आलं आणि गट म्हणून त्यांचा एक प्रकल्प मांडण्यात आला. हे गट-प्रकल्प प्रारूप दिसायला आकर्षक नाही, पण विद्यार्थी त्यातून बरंच काही शिकले असतील. दृश्यकलावंत म्हणून पुढे जाण्याची नियोजनबद्ध आस मुलींमध्ये अधिक दिसली, असंही एक ढोबळ निरीक्षण मांडता येईल. पण कुलसुम खान किंवा जशनदीप कौर या चंडीगढ इथं शिकणाऱ्या मुलींनी राजकीय विषयांवर कलाकृती करण्याची धमक दाखवली. यापैकी कुलसुमनं अगदी छोटेछोटे ‘बॅरियर’ तयार करून प्रेक्षकांच्या पायागती मांडून ठेवले आणि त्यातून वाट काढतच चालण्याची सक्ती प्रेक्षकांवर केली. तर जशनदीपनं सिंघू बॉर्डरवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांना पोस्टकरड लिहिली.. प्रत्येक पोस्टकार्डावर एकेका आंदोलकाचा फोटोही आहे. हा शेतकऱ्यांचा विषय आणखीही एका विद्यार्थीगटानं हाताळला आहे. शेतकरी आत्महत्या दाखवण्यासाठी त्यांनी टाकाऊ प्लास्टिकचा वापर करून मृतदेह बनवले, ते मात्र फारच थेट- प्रचारकी दिसतात. बंगालच्या शांतिनिकेतनात शिकलेल्या प्रीतम दासनं रस्त्यावरल्या राजकीय लढाया हा विषय हाताळला आणि अगदी सिंगूर आंदोलनादरम्यान बलात्कार करून जाळून टाकण्यात आलेल्या तापसी मलिक या मुलीबद्दलही कलाकृती केली, पण हे सारं त्यानं कौशल्याधारित चित्रभाषेला अंतर न देता केल्यामुळे ते प्रेक्षणीय ठरतं. अशाच प्रकारे, ‘कुटुंबातलं राजकारण’ हा मुंबईच्या रिया चांदवाणीचा चित्रविषय दु:खदर्शन घडवत असूनही वेधक ठरणारा आहे. खैरागडचं चित्रकला महाविद्यालय हे भारतीयतेशी जुळलेल्या अनेक चित्रकारांना घडवणारं, तिथल्या मुस्कान पारेखनं बस्तरच्या आदिवासी जीवनाचा अभ्यास करून, तट्टय़ाच्या चटयांवर चित्रं काढली आहेत. यासोबत तिनं तिथल्या आदिवासी कुटुंबांकडून जमवलेल्या भांडय़ाकुंडय़ांमध्ये एक इडलीपात्रही दिसतं.. बस्तरच्या आदिवासींकडे इडलीपात्र? या प्रश्नावर ती म्हणाली, ‘‘फार कमी, पण हल्ली हल्ली वापरतात लोक तिथले.’’
लोकजीवनाचं हे सांप्रत- समकालीन निरीक्षण आणखी पूर्वेकडल्या विद्यार्थी- चित्रकारांनी अधिक असोशीनं केलेलं दिसतं. आसाम, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, ओडिशा इथल्या विद्यार्थ्यांनी चित्रांऐवजी मांडणशिल्पं केली, त्यातही ग्रामीण राहाणीचा ठसा उमटवला. बोदे स्वूरो हा नागालँडच्या प्हेक या जिल्ह्यत वाढलेला आणि गुवाहाटीच्या खासगी विद्यापीठात शिकणारा, त्यानं इथं मातीकामाचं अनुष्ठानच मांडलं आहे. जमेल तितके दिवस तो इथंच राहून, आल्यागेल्याला मातीकाम शिकवणार.. मातीकामासाठी माती जमवण्यापासूनच त्याच्या नागा (चाकेसांग) जमातीचा निसर्गवादी आध्यात्मिक कल कसा दिसतो, याचं दस्तावेजीकरण त्यानं स्वत:चे मामा आणि आजोबा यांची छायाचित्रं आणि व्हीडिओ यांद्वारे केलं, तेही इथं आहे. त्याच्या शेजारीच, केरळच्या कोवुरी राजशेखर यानं छोटय़ा होडय़ांची शिडं, लाकडं, मासेमारीची जाळी आदी वापरून दस्तावेजीकरणावर आधारित ‘द अदर साइड ऑफ जिओटय़ूब’ ही कलाकृती मांडली आहे. समुद्राची धूप थांबवण्यासाठी जिओटय़ूब किंवा वाळू-बंधाऱ्यांची कामं केरळमध्ये अनेक ठिकाणी झाली, पण त्यापैकी अनेकांनी अधिकच इस्कोट केला.. त्याची कथा राजशेखर सांगतो. स्वत:च्या सभोवतालाबद्दलची ही अभिव्यक्ती त्यानं राजकीय टीकेसाठी केलेली नाही. पण तशी टीका होत असल्यास तो योगायोग.. हेच इतरही विद्यार्थी-कलावंतांबद्दल म्हणता येईल. मार्गदर्शक म्हणून काम करणारे प्रेमजीश अचारी, अम्शू चुक्की, आरुषी वत्स, सुवानी सुरी तसंच साविया लोपेझ-योगेश बरवे यांनी विद्यार्थ्यांची ही स्थिती नेमकी ओळखून त्यांना दिशा दिली आहे.
कोची बिएनालेचा एकत्रित परिणाम कदाचित २३ तारखेनंतर दिसूही शकेल. यंदाच्या बिएनालेचं वर्णनवाक्य ‘इन अवर व्हेन्स फ्लो इंक अॅण्ड फायर’ (शाई आणिक आग वाहते आमच्या नसानसांतून) असं आहे, त्याचे दृश्यसंदर्भ कदाचित मिळतीलही. पण गुंफणकार सुभिगी राव यांचं दीर्घ मनोगत अधिकृतपणे प्रसृतच होऊ दिलेलं नसूनही केवळ कलाकृतींमधून पुन्हापुन्हा डोळय़ांपुढे येत राहिलं ते केवळ भौतिक वस्तूंच्याच नव्हे तर काळाच्या, लोकजीवनाच्या, स्मृतींच्या आणि ऊर्मीच्याही भंगुरतेचं भान! कोची बिएनाले कुणामुळे लांबणीवर पडली, कुणासाठी लांबणीवर टाकली, याची शंकांची किल्मिषं कायम जोवर राहातील, तोवर भारताची ही पहिली, सर्वात मोठी आणि सर्वात लाडकीसुद्धा बिएनालेदेखील एखाद्या भग्नमूर्तीसारखीच भासत राहील.. अर्थात, म्हणून ती सुंदर नसेलच असं नाही
abhijeet.tamhane@expressindia.com