अभिजीत ताम्हणे
‘कोची बिएनाले’ आणि ‘मुंबई गॅलरी वीकएण्ड’साठी यंदा झालेली गर्दी, दिल्लीच्या ‘इंडिया आर्ट फेअर’चा भपका आणि कलेच्या त्या व्यापारमेळय़ात झालेली विक्री.. हे सारं दृश्यकलेचा गुलमोहोर फुलवणारं ठरेल का?
कलासमीक्षक असाल तर तुम्ही कलाबाजाराबद्दल तक्रारीचा सूर लावलाच पाहिजे, असा एक अलिखित नियम विसाव्या शतकात होता. तो एकविसाव्या शतकात, साधारण २००२ ते २००७ या वर्षांमध्ये हळूहळू विरत गेला. कारण त्या पाच वर्षांत भारतीय दृश्यकला- बाजार खऱ्या अर्थानं बहरला, त्याची फळं अनेकांपर्यंत पोहोचू लागली, फक्त महानगरांतच नव्हे खैरागडला किंवा खिरोद्याला शिकलेले गुणी दृश्यकलावंत एकदोन वर्षांत या बाजारानं आपलेसे करू पाहिले.. आणि दुसरीकडे त्याच काळात, अनेक कलासमीक्षक हेच प्रदर्शनांचे गुंफणकार झाले. केवळ बाजाराचे आकडे नव्हे- कलेचे पर्यायही वाढले. म्हणजे विविध प्रकारची चित्रं, शिल्पं, मांडणशिल्पं, व्हिडीओकला, कलाप्रसंग (परफॉर्मन्स आर्ट) दिसू लागली. मग ‘२००८’ ची युरो-अमेरिकी मंदी आली आणि जागतिकीकरणाची फळं अनेकांना चाखू देणारा भारतीय कलाबाजारही धसकत काहीसा आक्रसला. पण यानंतरच्या काळात दृश्यकलेच्या बाजाराला सुसंगत असं नवंच संस्थात्मक जाळं उभं राहू लागलं. ती उभारणी आशादायी वाटत असताना, नोटाबंदीसारखं देशी आणि कोविडसारखं जगड्व्याळ निमित्त मिळण्याआधी, २०१० ते १५ या वर्षांत कलाबाजारानं उभारीचा प्रयत्न केला होता, पण तो तेवढय़ापुरताच. यंदा मात्र ही सारी कारणं मागे पडली आहेत. बाजारासाठी जादुई ठरलेल्या ‘२००२’ला २० वर्ष उलटून, नवी पिढी आलेली आहे. त्या वेळचे तरुण आता ‘ज्येष्ठ’ होताहेत.. कलेशी दूरान्वयानंच संबंधित असलेली पर्यटनासारखी क्षेत्रं वाढताहेत.. अशा वेळी कलेच्या संधी आणि कलेचा बाजार कुढत राहणं अशक्यच!
हेच यंदाच्या- म्हणजे २०२२ च्या डिसेंबरपासून सुरू झालेल्या हंगामात दिसलं. हिवाळा हाच आपला सांस्कृतिक मोसम, त्यामुळे मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीतही डिसेंबरच्या मध्यापासून पुढल्या तारखा मिळाव्यात असंच चित्रकारांना वाटत असतं.. गेल्या काही वर्षांत जी संस्थात्मक उभारणी झाली त्यात मुंबईतही पर्यावरण/ शहर आणि कला यांचा संबंध जोडणाऱ्या संस्था आहेत, ‘काळा घोडा महोत्सवा’त बाकी सेल्फीखोरांचा आनंदच असला तरी विशेषत: शिल्पकारांच्या नवकल्पनांना स्थान दिलं जातं आहे, याचा एकत्रित परिणाम म्हणजे पुढल्या बहराची आशा लावणारा हा हिवाळा ठरतो आहे.
हे वर्ष ‘कोची-मुझिरिस बिएनाले’चं. एर्नाकुलमजवळच्या फोर्ट कोची बेटावरच दर दोन वर्षांनी भरणारं (म्हणून ‘बिएनाले – द्वैवार्षिक) महाप्रदर्शन २०२० मध्ये होऊ शकलं नव्हतं, पण त्या वर्षी याच द्वैवार्षिक प्रदर्शनाचा ‘स्टुडंट्स बिएनाले’ हा हिस्सा मात्र ऑनलाइन का होईना, सादर झाला होता. त्या अनुभवानं समृद्ध झालेली स्टुडंट्स बिएनाले यंदा दिसली, पण देशी आणि आंतरराष्ट्रीय अभ्यागत चित्रकारांचा समावेश असलेल्या मूळ प्रदर्शनाला २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली. यंदाच्या या महाप्रदर्शनातून अधिक पर्यावरणनिष्ठ कलाकृती दिसताहेत, या कलाकृतींशी केरळच्या सामान्यजनांचाही सहजसंवाद व्हावा यासाठी विशेष प्रयत्न (मल्याळम भाषेतून) घेतले जाताहेत हे या आंतरराष्ट्रीय उपक्रमाची पाळंमुळं घट्ट करणारं ठरलं. जागतिकीकरणाचा नव्हाळीचा बहर ओसरल्यानंतर आपल्याला वाढायचं आहे, याचं हे भान हल्ली अन्यत्रही दिसत असतं. गेल्या दहा वर्षांत दलित आणि ग्रामीण जाणिवेच्या दृश्यकलेनं आपलं अस्तित्व दाखवून देण्याची सुरुवात केलेलीच आहे आणि आता या प्रकारच्या कलेला अधिमान्यताही मिळते आहे (या लोकजाणिवांशी प्रामाणिक राहणारे प्रभाकर पाचपुते २०२२ मध्ये व्हेनिसच्या बिएनालेत, अमोल पाटील जर्मनीच्या ‘डॉक्युमेंटा’त होते, तर मयूरी चारी बर्लिन बिएनालेत होत्या, हे याच अधिमान्यतेचं- लेजिटिमसीचं- लक्षण).
यानंतर आला ‘मुंबई गॅलरी वीकएन्ड’! गुरुवार ते रविवार असा चार दिवसांचा हा खेळ खरं तर. जानेवारीच्या मध्यावर घडणारा. पण मुंबईची ३० हून अधिक खासगी कलादालनं, आपापल्या जागेत शक्यतो वर्षांतली सर्वोत्कृष्ट ठरणारी प्रदर्शनं याच वेळी सुरू करतात आणि मग तीनेक आठवडे ठेवतात. शिवाय कलादालनासाठी जागा नसलेले काही उत्साही कलासंग्राहक/ व्यापारी, फक्त चार दिवसांपुरती चांगलीशी जागा घेऊन तिथं प्रदर्शनं लावतात. या चारही दिवसांत ‘गॅलरी वॉकथ्रू’ ची- म्हणजे चित्रप्रदर्शनातून स्वत: चित्रकाराचं किंवा एखाद्या जाणकाराचं भाष्य ऐकत फेरी मारण्याची- रेलचेल असते. यंदाच्या ‘वीकएन्ड’चा प्रतिसाद संख्येनं तरी चांगला दिसत होता. ‘कला पाहण्यासाठी येणाऱ्यां’ची संख्या याहीपेक्षा अधिक पटीनं, २३ डिसेंबरपासून कुलाब्याच्या ससून डॉकमध्ये सुरू झालेल्या ‘मुंबई अर्बन आर्ट फेस्टिव्हल’मध्ये दिसू लागली होती. जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ात नेहरू सेंटरच्या दोन मजल्यांवरली व्यापार-प्रदर्शन दालनं भरून ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’ हा चित्रकारांनाही थेट स्टॉल भाडय़ानं घेऊ देणारा कलाविक्री मेळा पार पडला, तिथं जाऊन प्रभावित होणारेही अनेक होते. पण हंगामाचा परमोच्च िबदू दिल्लीच्या ‘इंडिया आर्ट फेअर’नं साधला जाणार, याची कल्पना तोवर दर्दीना होतीच. ‘आम्ही ‘इंडिया आर्ट फेअर’शी स्पर्धा करत नाही. त्यांचं बजेट मोठं, आर्थिक आव्हानंही मोठी..’ अशा शब्दांत ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’चे संस्थापक- संचालक राजेन्द्र यांनी, दिल्लीच्या त्या महा- व्यापारमेळय़ाला नुकसान सहन करावं लागल्याच्या चर्चेचा विषय टाळला होता. पण यंदा दिल्लीत काय होणार, याची उत्सुकता होतीच.
दिल्लीतला प्रतिसाद!
गेल्या चार वर्षांतली सर्वाधिक विक्री दिल्लीच्या कला-व्यापार मेळय़ात, ‘इंडिया आर्ट फेअर’मध्ये झाली. या व्यापारमेळय़ाचं स्वरूप कैक वर्ष सारखंच असलं- अगदी कुठल्या गॅलरीचा स्टॉल कुठं असणार हेही ठरल्यात जमा असलं तरी दर वर्षी काही ना काही वैशिष्टय़ ठेवण्याचा आर्ट फेअर आयोजकांचा प्रयत्न असतोच. यंदा गोंडी, मधुबनी आदी ‘लोककला प्रकारां’चे पाच-सहा खास स्टॉल आणि ‘ना-नफा’ कलासंस्थांसाठी अख्खं निराळं दालन हे वैशिष्टय़ ठरलं. शिवाय ‘एलजीबीटीक्यूं’चा वाढता वावर दिसला, त्यांच्या एका संस्थेचा स्टॉलही दिसत राहिला. खासगी कलादालनांकडून मोठय़ा कलाकृतींचे प्रस्ताव मागवून, अशा निवडक ‘प्रोजेक्ट’ना व्यापारमेळय़ाच्या तंबूंबाहेर जागा देण्याचा प्रघातही पाळला गेला. या ‘प्रोजेक्ट’पैकी, मुंबईच्या तर्क आर्ट गॅलरीनं प्रायोजित केलेलं एक मोठं मांडणशिल्प लक्षवेधी ठरलं. ठाण्याचा पराग तांडेल हा कोळी समाजाच्या जीवनानुभवाला दृश्यकलेत केंद्रस्थान देणारा, त्यानं किनाऱ्यांवर बोंबील सुकत ठेवतात तसंच दिसणारं हे मोठ्ठं मांडणशिल्प केलं होतं. बोंबील ‘खरे’ नसल्यानं वासाविना असलेल्या या कलाकृतीचा अंतर्भाग गुलाबी, रबराचा होता. त्यावर अनवाणी चालण्याची मुभा प्रेक्षकांना असल्यानं या रबरात कोरलेले समुद्रजीवांचे आकार स्पर्शानं अनुभवता येत होते. ‘केमोल्ड’, ‘मस्कारा’ या मुंबईकर गॅलऱ्यांच्या स्टॉलवर काल अमुक जागी असलेली कलाकृती आज तिथं नाही- ती विकली गेली आणि ‘पॅक’सुद्धा झाली- असं कलाबाजाराच्या दृष्टीनं सुखद चित्र होतं. इथल्या पाच गॅलऱ्यांच्या विक्रीचा आकडा साडेअकरा कोटी रुपयांहून अधिक आहे, अशी माहिती ‘फेअर’च्या संज्ञापनप्रमुख गौतमी रेड्डी यांच्याकडून नंतर मिळाली. दहा ते पंधरा महत्त्वाच्या असामींखेरीज, आंतरराष्ट्रीय कलाक्षेत्रात दरारा असलेल्यांचा राबता मात्र यंदा कमी दिसला.
एक निरीक्षण नागपूरचे चित्रकार मिलिंद लिंबेकर यांनी नोंदवलं- ‘यंदाच्या या व्यापारमेळय़ात स्त्रीवादी कला एकाही स्टॉलवर नसल्यात जमा आहे.. याचा संबंध बाजारशरणतेशी लावता येतो’! या निरीक्षणात तथ्यही आहे, कारण अखेर यंदा दिसलेला बाजाराचा प्रतिसाद हा ‘आहे तो पैसा आकर्षक कलाकृतीमध्ये गुंतवणे’ या प्रकारातला होता. शांत- संयत कलाकृती लहान आकाराच्या, तुलनेनं कमी किमतीच्या असतील तरच त्यांच्यासाठी चौकशा होत होत्या, हे तीन दिवस तिथं फिरताना दिसलेलं वास्तव.
पण अखेर बाजाराच्या चाली बदलतच राहणार, त्यांचे परिणामही ‘कला’ म्हणून काय दिसतं आहे, काय दाखवलं जातं आहे यावर होत राहणार. ‘आयकॉन गॅलरी’च्या स्टॉलवर वीर मुन्शी या मूळच्या काश्मिरी पण आता दिल्लीकर चित्रकारानं पेपरमॅश कलावस्तूसारखा घडवलेला गालीचा ही या बाजारचालींना गुंगवणारी कलाकृती.. त्या गालीच्यावरलं ‘डिझाइन’ हे अनेक छर्रे उडवून संहार वाढवणाऱ्या ‘शार्पनेल’चं आहे, हे चटकन कळत नव्हतं! किंवा ‘दृश्यकलावंत दिवंगत झाल्यावर त्याच्या कलाकृतींना मागणी वाढते’ हे बाजारसत्य प्रमाण मानलं गेल्यामुळेच तर यंदा, थोर वास्तुरचनाकार बाळकृष्ण दोशी यांच्या मोठय़ा कृष्णधवल कलाकृती इथं व्यापारमेळय़ात मांडल्या गेल्या होत्या! त्यातूनही दोशी यांचं अवकाश-भान दिसत होतंच. अर्थात, कोणत्याही- कितीही तरुण, अननुभवी दृश्यकलावंतानं डोळे उघडे ठेवून आपलं स्थान शोधल्यास निराश होण्याची शक्यता नाही, असा विश्वास देण्यासाठी या व्यापारमेळय़ातल्या ‘फिका’सारख्या संस्थांचे स्टॉल उपयुक्त ठरत होते. यापैकीच मुंबईच्या ‘आर्ट अॅण्ड सोल फाउंडेशन’च्या स्टॉलवरलं भूषण बोंबाळे यानं रबरातून घडवलेलं पण ‘मॉडर्निस्ट’ दिसणारं पर्यावरनिष्ठ शिल्प, हे नव्या पिढीच्या नव्या जाणिवांची खूण ठरत होतं!
ही सारी लक्षणं कलाक्षेत्रानं धरलेल्या उभारीचीच आहेत, पण ही उभारी फलदायी होण्यासाठी बाजारसुद्धा आणखी मोकळा होणं गरजेचं असतं. करोनानंतरच्या इंग्रजी ‘के’ आकाराच्या अर्थगतीमुळे त्या ‘के’च्या वर जाणाऱ्या रेघेवरल्या लोकांपुरताच (चित्रकार आणि संग्राहक- दोन्ही प्रकारचे लोक) कलाबाजार राहणार का, हा प्रश्न यंदा कायम राहील. दृश्यकलावंतांच्या अथक कामामुळे, आशावादामुळे कलाक्षेत्राचा गुलमोहोर फुलेलच यंदा, पण गुलमोहोराच्या फुलांमधली ‘राजाची पाकळी’ वसंतातच उघडते, तशी बाजाराची पाकळी छान उघडण्यासाठी वसंताची प्रतीक्षा आहे. तूर्तास पानगळ संपली एवढंच!
abhijit.tamhane@expressindia.com