जशी ज्यांची कर्मे। तशी फळे देती
वळण लाविती। संतानास।।
दुष्ट कर्मे तुम्ही। अजीबाद टाळा।
पुढे नाही धोका। मुलांबाळा।।
महात्मा जोतिबा फुले यांचा हा उपदेश केवळ व्यावहारिक नव्हता आणि केवळ शूद्रातिशूद्रांसाठी नव्हता. आपल्या वाईट कर्माचे परिणाम पुढे नैतिक अध:पतनात, सार्वजनिक अवनतीमध्ये आणि आर्थिक विपन्नतेमध्ये झालेले दिसून येतील ही गर्भित सूचना या अखंडामध्ये आहे.
आज या ओळींची आठवण होण्याचे कारण म्हणजे किशोर शांताबाई काळे या दिवंगत लेखकाच्या ‘कोल्हाटय़ाचं पोर’ या आत्मचरित्रपर पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत आहे. मागणीचे मुख्य कारण, लेखकाने आपल्याच समाजाची बदनामी केली हे सांगण्यात येते. म्हणून समाजाने (की जातपंचायतीने?) ही मागणी केली आहे वा तसे सांगण्यात येते.
एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘कोल्हाटय़ाचं पोर’ हे पुस्तक नोव्हेंबर १९९४मध्ये ‘ग्रंथाली’ या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले. त्या काळात दलित, उपेक्षित, शोषित आणि वंचितांच्या आत्मचरित्रपर ग्रंथांचे सातत्याने प्रकाशन होऊ लागले. ‘आत्मचरित्र’ नावाच्या मराठी वाङ्मय प्रकारामध्ये भर एवढेच केवळ या पुस्तकांचे स्वरूप नव्हते. सवर्ण समाजाच्या जवळ, बाजूला, नजरेसमोर असणाऱ्या, पण त्यांची दखल न घेतलेल्या जात, पोटजात, समूह, समाजगट यांच्या अप्रकाशित जगण्याचा तो एक जळजळीत असा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इतिहास होता. वैयक्तिक सुखदु:खे आळविणाऱ्या मराठीतील आत्मचरित्र नावाच्या साहित्य प्रकारालाच या शोषितांच्या आत्मचरित्रांनी सामाजिक असे वजनदार परिणाम दिले. शोषण केवळ आर्थिक नसते तर धार्मिक, सांस्कृतिक, मानसिक, लैंगिक, शैक्षणिक पातळीवरील शोषणाच्या अनेक तऱ्हा या आत्मचरित्रांनी अधोरेखित केल्या, उघडकीस आणल्या. मराठी वाचकांसाठी हे नवे ‘दर्शन’ होते. ही पुस्तके केवळ वाचक-समीक्षकांसाठी नव्हती तर सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करणाऱ्यांसाठीही लक्षणीय आणि महत्त्वाची होती. त्यातले एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे ‘कोल्हाटय़ाचं पोर!’
आज सुरू आहे साल २०१३. म्हणजे पुस्तक प्रसिद्ध झाले त्याला १९ वर्षे झाली. किशोरचे अपघाती निधन झाले २१ फेब्रुवारी २००७ या दिवशी. म्हणजे लेखक जाऊनही सहा वर्षे झालीत. आत्ता, आज या ‘बंदी’ची मागणी कशाला? – या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सध्याच्या सामाजिक – राजकीय पर्यावरणात आणि या पर्यावरणात वावरणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्या लोकांच्या मानसिकतेत सापडेल.
समाज पुढे जाण्यामुळे ज्यांच्या हितसंबंधांना बाधा पोचते ते लोक समाजाला एकत्र बांधून ठेवण्याच्या नावाखाली; मुख्य प्रवाहापासून वेगळे ठेवतात. आधीच आपल्याला आपापली बेटे जोपासण्याची हौस. त्याशिवाय आपला वेगळा झेंडा मिरवता येत नाही. आत्तापर्यंत उपेक्षित असलेल्या समूहांना जाग येत आहे. आणि ते आपला हक्क मागत आहेत, असे सांगितले जाते. पण खऱ्या उपेक्षितांमध्ये बेमालूमपणे मिसळून सुस्थापितही गळा काढताहेत आणि दुसऱ्याच्या हक्कावर डल्ला मारताहेत असेही दिसून येत आहे. कविवर्य सुरेश भट म्हणाले होते,
हा न टाहो दु:खितांचा, हा सुखाचा ओरडा होत आहे शूर बंडाचा पुकारा वेगळा
परंतु कवीच्या आणि लोकांच्याही दुर्दैवाने पहिली ओळ खरी ठरते आहे. दुसऱ्या ओळीतील पुकारे दिशा हरवत आहेत. किशोरने हिमतीने, नेटाने जे वास्तव पुस्तकात मांडले, त्या वास्तवाने आपले डोळे धुऊन दृष्टी स्वच्छ करून घेण्याऐवजी किशोरलाच धारेवर धरले जात आहे.
सध्या एक वहिवाट पडली आहे. एखाद्या समूहाचे, गटाचे नेतृत्व करायचे असेल तर त्याच्याशी संबंधित एखादा मुद्दा उचलून धरा. आणि जर मुद्दा नसेल तर मुद्दा निर्माण करा. तयार करा. अस्मितेचा मुद्दा तर नेहमीच हिरवागार असतो.
खरे तर ‘कोल्हाटय़ांचं पोर’मधील किशोरची त्याच्या जन्मापासून एमबीबीएस म्हणजे डॉक्टर होईपर्यंतची जी वाटचाल आहे, ती वाचकालाच कासावीस करणारी आहे. शिक्षणाचा ध्यास घेतला म्हणून किशोर डॉक्टर झाला. परिस्थितीशी निकराने झुंज दिली. आत्महत्येचाही प्रयत्न केला. पण डॉक्टर झालो नसतो तर.. पुस्तकाच्या सुरुवातीलाच किशोरने लिहिले आहे- ‘मी बार्शीच्या कुंटणखान्यातून बाब्याबरोबर पुण्या-मुंबईला गेलो असतो, तर मी डॉक्टर होण्याऐवजी भडवेगिरी करीत अनेक जातीतील स्त्रियांचं शरीर मी विकलं असतं?
जोतिरावांच्या अखंडांमध्ये अशा अनेक ओळी आहेत. ज्यामधून त्यांचे सूक्ष्म समाजनिरीक्षण तर दिसतेच, पण समाजाच्या अवनतीला कारणीभूत ठरणाऱ्या अवगुणांचा निर्देश ते अतिशय साध्या पण स्पष्ट शब्दांत करतात-
धनाढय़ आळशी। जुव्वेबाज होती
चोरून खेळती। एकीकडे।।
डाव जिंकिताच। बक्षीसे वेश्यांस
खाऊ चोंबडय़ांस। सर्वकाळ।।
द्रव्य हरताच। शेतावर पाळी
सर्व देई बळी। घरासह।।
आळशाचा धंदा। नि:संगबा होती
भिकेस लागती। जोती म्हणे।।
– या ओळींमधील आशय किशोरला पदोपदी आणि क्षणोक्षणी त्याच्या आयुष्यात अनुभवावा लागत होता.
‘कोल्हाटय़ाचं पोर’वर बंदी घाला ही मागणी मान्य होईल का? सांगता येत नाही. मागणीची गुणवत्ता कशावर अवलंबून असते? मागणी करणारे कोण आहेत, किती आहेत, कोणाचे मतदार आहेत? अन्न, वस्त्र, निवारा, बेकारी, भ्रष्टाचार याबाबत आपण काही करू शकत नाही याची सरकारला मनोमन जाणीव असते आणि जनतेनेही ते मनोमन जाणलेले असते, पण अस्मितांच्या प्रश्नावर सरकार खूपच संवेदनशील असते. यासंबंधी काही निर्णय घेतला, बंदी घातली की आपण संपूर्ण मानवजातीला विनाशापासून वाचवल्याचे समाधान सरकारला वाटते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा, ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या सूत्राचा परिणाम किशोरच्या जीवनरीतीवर आणि विचारपद्धतीवर होत होता. ज्यामुळे तो पुन्हा पुन्हा खचता खचता उभा राहत होता.
या आत्मकथनाला शैली म्हणावी अशी नाही. शब्दांची उधळपट्टी नाही. प्रसंग खुलवणे नाही, घटना सजवणे नाही. अनुभवच इतके विलक्षण आणि मन हादरवून टाकणारे आहेत; त्यांना इतका वेग आहे, लेखकाचे दैनंदिन जीवनही यातना, वेदना, अपमान यांनी गांजलेले आहे की, वाचक गुदमरूनच जातात आणि यातील स्त्रिया? त्या तर रोजच मरण जगत होत्या. त्यात स्त्रियांचा एक गोतावळाच आहे, जणू वेदना आणि करुणा यांचा महापूर! त्यांच्या शोषणाला आणि दु:खाला पारावार नाही. किशोरचे पुस्तक वाचून वाचून या स्त्रियांनादेखील मुक्तीचा मार्ग गवसेल ही भीती ज्यांना वाटते, त्यांनाच या पुस्तकावर बंदी आणावी, असे वाटत असावे.
अज्ञानी स्त्रियांचे। नाच की नाचाल
सर्वस्वी नाडाल। संततीला
– हा जोतिरावांच्या शब्दांचा आसूड तिथपर्यंत पोचणे गरजेचे आहे.
एकविसावे शतक आहे. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे उलटून गेली आहेत. लोकशाही व्यवस्था आहे. कल्याणकारी राज्य आहे आणि अधिकृत कायद्यांसोबत अनधिकृत, स्वयंघोषित अशा नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थाही आहेत. कुठे खाप- पंचायत असेल, कुठे जात – पंचायत असेल. कायद्याचा बडगा उगारल्याशिवाय ऐकायचेच नाही, अशीही आपल्याला सवय लागली आहे. पण जोतीराव
आणि भीमरावांचा वारसा सांगणारे जागरूक
नागरिक एका दिवंगत लेखकाच्या पुस्तकाचा बचाव करण्यासाठी निश्चितपणे उभे ठाकतील अशी खात्री आहे. कारण प्रश्न केवळ एका व्यक्तीचा वा लेखकाचा नाही, ‘स्वातंत्र्य’ नावाच्या मूल्याचा आहे. ‘विद्रोह आणि नकार’ या अधिकाराचा आहे. एखादी बंदिस्त व्यवस्था खिळखिळी करायची असेल तर विद्रोह आतून व्हावा लागतो. नकार देण्यासाठी बळ एकवटावे लागते. स्वत:लाच, मग बाहेरून पाठबळ मिळते. किशोरने नेमके हेच ऐतिहासिक काम त्याच्या समाजासाठी केले.
‘मी १९९४ मध्ये एम.बी.बी.एस. झालो’ या वाक्याने हे आत्मकथन संपवले आहे. जणू सार्थक झाले जन्माचे। पण तसे झाले नसावे. तपशिलात जाण्याचे कारण नाही. पण भटकत, भरकटत तो अकोल्यातही बराच काळ होता. त्याची मेडिकल व्हॅन म्हणावी अशी गाडी बरेच महिने एका ठिकाणी पडून होती. त्याच्याशी बोलताना जाणवायचे की तो स्वस्थ, अस्थिर, अशांत आहे. काही दिवस त्याने टेकडय़ांवर योगासनांचे वर्गही चालवले. मग काही अफवा, काही प्रवाद, अशातच तो गेला. वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी. ‘बंदी’संबंधीची बातमी आली तेव्हा त्याची आई म्हणाली, ‘आता किशोर नाही. कोणी नाही. त्याचं पुस्तक फक्त आहे.’
एका ‘आई’साठी जागरूक राहू या.
‘कोल्हाटय़ाचं पोर’मध्ये मार खाण्याचे हृदयद्रावक प्रसंग पानोपानी आहेत. लहानपणापासून कॉलेजमध्ये जाईपर्यंतचे आजोबा, मावशी, ताई, भाऊ, पुरुष धगड, सगळे त्याला येताजाता मारायचे, कारण शोधूनशोधून! पाठीचे सालटे निघेपर्यंत, डोके फुटेपर्यंत, हाडमोडेपर्यंत.. आता तो उरलाय पुस्तक रूपाने. या त्याच्या मरणोत्तर अस्तित्वाला कृपया बंदी घालून मारू नका..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा