रघुनंदन गोखले
बुद्धिबळ हा बुद्धिवंतांचा खेळ. चौसष्ट घरांच्या या ‘सोंगटीपटा’ला आत्मसात करणे सोपे, पण त्यात असामान्य कौशल्य प्राप्त करणे भल्याभल्यांना अप्राप्य. हा खेळ मुलांना लहानपणापासून गांभीर्याने शिकविण्याकडे पालकांचा कल जगभरात वाढत चालला आहे. वर्षभर माजी बुद्धिबळपटू आणि प्रसिद्ध प्रशिक्षक रघुनंदन गोखले या नव्या सदरातून या खेळामधील आपल्या अनुभवांसह अनेक किश्शांना सादर करणार आहेत.नुकतीच कझाकस्तानमधील अल्माटी शहरामध्ये जागतिक जलदगती (रॅपिड) आणि विद्युतगती (ब्लिट्झ) अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. अपेक्षेप्रमाणे जगज्जेता मॅग्नस कार्लसनने दोन्ही अजिंक्यपदे खिशात घातली. परंतु भारताच्या कोनेरू हम्पी (रौप्य) आणि सविताश्री (कांस्य) यांनी पदकं पटकावून महिला गटात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आहे.
मॅग्नस कार्लसनच्या कौशल्याची चमक वारंवार आपण बघतोच, पण विद्युतगती स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत एक सनसनाटी घटना घडली. मॅग्नस ट्रॅफिक जॅममध्ये अडकला आणि त्याला स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला. विद्युतगती स्पर्धेच्या नियमानुसार, प्रत्येक खेळाडूला संपूर्ण डाव खेळण्यासाठी फक्त ३ मिनिटं मिळतात. प्रत्येक चालीनंतर त्याच्या घडय़ाळात २ सेकंदांची भर पडते. त्याचा प्रतिस्पर्धी होता २०१८ ची एरोफ्लोट खुली स्पर्धा जिंकणारा ग्रँडमास्टर व्लाडिस्लाव कोवालेव.
पंचांनी नियमानुसार घडय़ाळं सुरू केली आणि कोवालेवनं पंचांना विचारलं, ‘मॅग्नस कुठे आहे?’ त्यांनी सांगितलं, ‘अजून आलेला नाही.’ घडय़ाळात फक्त ३० सेकंद उरलेले असताना मॅग्नस पळत पळत आला आणि त्यानं आपली पहिली चाल केली. खरोखरच विद्युतगतीनं आपल्या चाली रचून मॅग्नसंनं डाव जिंकला. त्या वेळी त्याच्याकडे ३० सेकंद उरलेले होते. याचा अर्थ त्यानं प्रत्येक चालीला सरासरी फक्त २ सेकंद घेतले होते.
बुद्धिबळ खेळाडूंना बॉबी फिशर त्याच्या बुद्धिबळाच्या अचाट चालींमुळे माहीत असतो, पण सामान्य क्रीडा शौकिनांना तो माहीत असतो ते त्याच्या विक्षिप्त वर्तणुकीमुळे! पण या महान खेळाडूनं विद्युतगती प्रकारातली पहिली स्पर्धा जिंकली होती हे किती जणांना माहिती आहे? ही गोष्ट आहे १९७० सालची. बलाढय़ सोव्हिएट संघराज्याच्या संघाविरुद्ध शेष विश्व संघाला आमंत्रित करण्यात आलं. चार विश्वविजेते असलेल्या सोव्हिएत संघानं चुरशीच्या लढतीत शेष विश्व संघाचा अडीच तासात ४० खेळी या गतीनं खेळल्या गेलेल्या सामन्यात पराभव केला. जगातले सर्वोत्तम खेळाडू युगोस्लाव्हिया (आताचे सर्बिया)मधील बेलग्रेड येथे एकत्र आले असताना एक प्रदर्शनीय स्पर्धा घेण्याचं ठरलं. प्रत्येक खेळाडूला ५ मिनिटं देण्यात आली आणि प्रत्येकानं आपल्या ११ प्रतिस्पध्र्याशी काळय़ा आणि पांढऱ्या- दोन्ही सोंगटय़ांकडून खेळायचं ठरलं.
माजी विश्वविजेता टीग्रान पेट्रोसियान हा या प्रकारातला माहीर मानला जात असे आणि त्यामुळे तोच पहिला येणार असा सगळय़ांचा कयास होता. नाहीतर मिखाईल ताल, बोरिस स्पास्की, व्हासिली स्मिस्लोव यांसारखे आणखी ३ जगज्जेते होतेच. परंतु त्यांनी बॉबी फिशर नावाच्या झंझावाताची गणती केलीच नव्हती. बॉबी फिशरनं एकावर एक डाव जिंकून तिथं जमलेल्या २००० प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. सामना संपला त्या वेळी फिशरचे गुण होते २२ पैकी १९!! आणि दुसऱ्या क्रमांकावर होता माजी जगज्जेता मिखाईल ताल- १४.५ गुणांवर!! गंमत म्हणजे बॉबी अनेक डाव केवळ अडीच मिनिटे घेऊन जिंकला होता आणि त्यानंतर त्याची प्रतिक्रिया विचारली असता तो म्हणाला, ‘‘मी फॉर्मात नव्हतो.’’आता आपण वळू या अल्माटीमधील जगज्जेतेपदाकडे.
महिलांमध्ये कोनेरू हम्पीच्या खेळातल्या सातत्याला दाद दिली पाहिजे. हम्पीच्या धमन्यांतून रक्त नव्हे तर बर्फ वाहतो, असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. बुद्धिबळ शौकिनांना आठवत असेल ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२० मधील भारत-पोलंड लढत. हजारो भारतीय श्वास रोखून ही लढत इंटरनेटवर बघत होते. कारण जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचणार होता. भारत पहिली लढत हरला होता परंतु दुसऱ्या परतीच्या सामन्यात त्यांनी पोलिश संघाला पराभूत केलं आणि आता वेळ आली टाय ब्रेकरची. हा सामना दोन्ही संघांपैकी फक्त एका खेळाडूच्या निकालावर अवलंबून होता. पोलंडतर्फे मोनिका सोको तर भारतातर्फे हम्पी खेळणार होती. सामना बरोबरीत सुटू नये म्हणून पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या मोनिकाला ६ मिनिटे तर काळय़ा सोंगटय़ांनी खेळणाऱ्या हम्पीला फक्त ५ मिनिटे देण्यात आली होती. मात्र सामना बरोबरीत सुटला तर हम्पी (पर्यायाने भारत) विजयी होणार होती. अवघ्या बुद्धिबळ जगताचे डोळे या सामन्याकडे लागले होते. हम्पीनं मोनिकाचा सहजी धुव्वा उडवून भारताला अंतिम फेरीत नेलं आणि नंतर भारताला रशियन संघासोबत सुवर्ण पदकाचा संयुक्त विजेता घोषित करण्यात आलं, हा इतिहास आहे.
या वर्षी विद्युतगती सामन्यात हम्पीचा सूर लागेना. पहिले दोन्ही डाव हरून माजी जलदगती जागतिक विजेती पार मागे फेकली गेली. ८ फेऱ्या संपल्या त्यावेळी हम्पी ४ गुणांवर होती. परंतु तिनं एकापेक्षा एक विजय मिळवून अखेरच्या ९ सामन्यांत ८. ५ गुणांची कमाई केली. विशेष म्हणजे अखेरच्या फेरीत द्रोनावली हरिकाने सुवर्णपदक विजेत्या बिबीसाराला मात दिली असती तर हम्पीला सुवर्णाची संधी होती.हम्पीच्या रौप्य पदकाचं जास्त आश्चर्य वाटलं नव्हतं, पण सविताश्रीच्या जलदगती स्पर्धेच्या कांस्य पदकानं सर्वाना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. कोण ही मुलगी, असं लोक एकमेकांना विचारू लागले. १५ वर्षांची सविताश्री युरोपमध्ये जाऊन आपला खेळ आणि त्याचबरोबर आपलं रेटिंग वाढवायचं काम करत होती. ती आता भारतात महिलांमध्ये ५ व्या क्रमांकावर आहे. इतक्या उच्च दर्जाची स्पर्धा खेळण्याची ही तिची पहिलीच वेळ, पण तरीही तिनं खंबीर खेळ करून जलदगती स्पर्धेत कांस्य पदक मिळवलं.
या स्पर्धेत भारतीयांनी चांगले पैसे कमावले. जरी मॅग्नस कार्लसनशी (अंदाजे १ कोटी) तुलना करणे शक्य नसले तरीही हम्पीने ३१ लाख आणि सविताश्रीने १७ लाख, अर्जुन इरिगेसी २१ लाख अशी घसघशीत कमाई भारतीयांनी केली. या पार्श्वभूमीवर मला भारताचे पहिले अर्जुन पुरस्कारित बुद्धिबळपटू मॅन्युएल एरन यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. १९५८ साली दिल्ली येथे राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा झाल्या. त्यावेळी राष्ट्रीय विजेत्यापेक्षा जास्त बक्षीस शेजारीच सुरू असलेल्या बैलगाडी शर्यतीच्या विजेत्याला होतं राष्ट्रीय विजेतेपदाची स्पर्धा तब्बल २० दिवस चालत असे.विद्युतगती सामन्यांत भारतीयांनी निराशा केली तरीही साडेबारा कोटींचं प्रायोजकत्व मिळवणाऱ्या अर्जुन इरिगेसीनं ५ वा क्रमांक मिळवून जलदगती सामन्यात आपला दर्जा दाखवून दिला. त्यानं ५ व्या फेरीत साक्षात मॅग्नस कार्लसनच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. अखेर मॅग्नसनं सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं.
हजारो वर्षांचा इतिहास असणाऱ्या बुद्धिबळाच्या जलदगती किंवा विद्युतगती स्पर्धा हल्ली म्हणजे २०१२ पासून सुरू झाल्या हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल; परंतु अनेक वर्षे या प्रकारच्या स्पर्धा फक्त प्रदर्शनीय सामने म्हणून बघितल्या जात असत. फार कशाला, पण सिडनी येथे २००० साली झालेल्या ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वनाथन आनंद आणि अलेक्सी शिरोव्ह यांचा जलदगती प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता.
पहिली जगज्जेतेपदासाठीची स्पर्धा २०१२ मध्ये भरविण्यात आली; परंतु पुरुषांची स्पर्धा झाली अस्थाना- कझाकस्तान येथे, तर महिलांची स्पर्धा बाटुमी, जॉर्जिया येथे झाली. मात्र नंतर पुरुष आणि महिला गटांच्या स्पर्धा एकत्रित भरवल्या जाऊ लागल्या. आतापर्यंत विश्वनाथन आनंद आणि कोनेरू हम्पी यांनी एकेकदा जलदगती बुद्धिबळाचं जगज्जेतेपद मिळवलं आहे. मात्र, विद्युतगती स्पर्धामध्ये सुवर्णाचा योग कोणाही भारतीयाला लाभलेला नाही.
जसे कसोटी क्रिकेट मागे पडून एका दिवसात (किंवा काही तासांत) संपणाऱ्या सामन्यांना सुगीचे दिवस आले आहेत; त्याप्रमाणे बुद्धिबळाचीही वाटचाल एक-दोन दिवसांत संपणाऱ्या सामन्यांकडे होत चालल्याची लक्षणे दिसत आहेत.
gokhale.chess@gmail.com