कलापिनी कोमकली

‘‘तुम्हारे पिताजी गाते हैं वो ठीक हैं, पर वो करते क्या हैं?’’ हा प्रश्न विचारला जाणाऱ्या वातावरणात आपले वडील ‘कुमार गंधर्व’ आहेत म्हणजे काय, हे कळायला मला उशीर लागला, तर त्यात नवल नाही! झुल्यावर शांतपणे कामात गुंतलेले बाबा एकदम समोरच्या झाडाकडे बघायचे, तेव्हा त्यांच्या मनात ‘ना जानूं किधर गिरेगा, लग्या पवन का रेला..’चे सूर उमटलेले असायचे. हे आणि असं बरंचसं ‘अॅबस्ट्रॅक्ट’ काही आपल्या पदरात वेचायचा आम्ही प्रयत्न करायचो. तो अवकाश अजूनही मला पुरून उरला आहे..’ प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांनी ‘लोकसत्ता गप्पा’ या मंचावर अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्याशी गप्पांची स्वरमाळ गुंफताना केलेलं मुक्तचिंतन..

अगदी लहानपणची आठवण. झोपलेले मी रात्री साडेदहाच्या सुमाराला खडबडून जागी झाले. ती आईची (वसुंधरा कोमकली) रियाजाची वेळ असायची. कामाची सगळी आवरासावर झाल्यानंतर ती बाबांसमोर तंबोरा घेऊन गायला बसायची. तशी ती गात होती. मी धावत त्यांच्या खोलीत शिरले आणि तिच्या मागे जाऊन अक्षरश: हातानं तिचं तोंड दाबून म्हटलं, ‘‘अगं, नको गाऊ तू आता. बंद कर ते गाणं!’’ ते दृश्य कायमचं माझ्या डोळय़ांसमोर राहिलेलं आहे!
मी डोळे उघडले तेच स्वरांच्या अंगणात, वगैरे खरं असलं, तरी माझी सुरुवात ‘नको ते गाणं’पासून झाली आहे! आजूबाजूला सतत स्वर गुंजारत असताना मला सुरुवातीला त्यांचा लोभ का नव्हता, याचा आता विचार करते तेव्हा वाटतं की, ‘आपली आई, आपले वडील आपल्याजवळ नाहीत.. कुणीच माझ्याकडे लक्ष देत नाहीये.. तेव्हा तुम्ही हे गाणं आधी बंद करा!’ अशी काही भावना माझी झाली होती. बाबांकडे अनेक लोक येत. संगीत शिकायलाही येत असत. मात्र इतर गुरुजनांकडे ज्याप्रमाणे खूप मोठय़ा संख्येनं शिष्य शिकायला जातात, आठ-दहा तास संगीताचं शिक्षण सुरू असतं, तसं आमच्याकडे कधीच नव्हतं. बाबांकडे अगदी मोजके, ‘छलनी से छलके’च लोक शिकायला येत. याचं मुख्य कारण असं की, कुमारजींचं संगीत सोपं नाहीये. समजून घ्यायलाही आणि गळय़ातून उतरवायला तर अधिकच अवघड. त्यामुळे अनेक जण त्याचा आधीच धसका घेत असावेत! परंतु जेव्हा जेव्हा कुमारजी देवासला असत, तेव्हा गाणं आमच्या घरी नेहमी चालायचं. वसुंधराताई गातच होत्या. मुकुल दादा (मुकुल शिवपुत्र), सत्यशील (देशपांडे), इतरही काही शिष्य त्या वेळी गुरुकुल पद्धतीनं आमच्या घरी राहून शिकत होते. मग चोवीस तास संगीताच्या चर्चा रंगत. सकाळ-संध्याकाळ मंडळी तंबोरे लावून बसत. अगदी कुमारजींना भेटायला जरी कुणी आलं तरी गप्पा वगैरे मारण्याची पद्धत नव्हती. आलेला मनुष्य सरळ खोलीत घातलेल्या बैठकीवर जाऊन बसायचा. पुढे गायन सुरू असे. दोन-तीस तासांनी गाणं संपल्यावर नमस्कार-चमत्कार होत. माझं बालपण गेलं ते या वातावरणात.


सहावीत असताना शाळेत ‘मेरे प्रिय व्यक्ती’ असा निबंध लिहायला सांगितला होता. तोपर्यंत ‘कुमार गंधर्व’ जगासाठी कोण आहेत, हे मला खरोखरच उमजलं नव्हतं. फक्त माझे बाबा म्हणूनच मी त्यांच्याकडे पाहत होते. याचं कारण असं, गायन- ज्यावर आयुष्य खर्च करावं अशी गोष्ट आहे, असं मानणारा समाज आमच्या आजूबाजूला नव्हता. ‘‘तुम्हारे पिताजी क्या करते हैं’’ या प्रश्नावर ‘ते गातात’ हे उत्तर पुरेसं नसे! मी आईला विचारलं, ‘‘मी कुणावर लिहू?’’ ती म्हणाली, ‘‘असं काय करतेस! बाबांबद्दल लिही ना!’’ आईनं मला हिंदूी-मराठीत बाबांबद्दल लिहून आलेलं वाचायला लावलं. त्यात राहुल बारपुतेंचा (पत्रकार) एक लेख होता, ‘कुमार कुछ निकट से’. ते वाचून मला वाटलं की, बाबा फारच वेगळे आहेत. मग मी माझी टिपणं काढली आणि कुमारजींवर एक लेख लिहिला. तो बाबांना वाचण्यासाठी ठेवून मी शाळेत गेले. परतल्यावर बाबांनी मला राहुल यांना ट्रंक कॉल लावायला सांगितलं. ‘‘अरे राहुल, हिनं फार छान लिहिलंय रे माझ्याबद्दल!’’ ही पावती! त्या प्रसंगी मला प्रथम जाणवलं, आपण बाबांकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे! बाबांसमोर बसून गाणं शिकणं सोपी गोष्ट नसे. त्यांचा मुलगा किंवा मुलगी म्हणून कोणतीही सूट नव्हती. तंबोऱ्याच्या तारेवर कोणत्या लयीनं बोटं पडायला हवीत याचं त्यांचं एक शास्त्र होतं आणि ते नाही जमलं तर बोलणी खावी लागायची; पण कुमारजींच्या आधी मी वसुंधराताईंकडून गाणं शिकले. एखादी व्यक्ती घडते त्याच घरात आईचं स्थान किती महत्त्वाचं असतं, हे मी त्यांच्या रूपानं अनुभवलं. आईनं मला माझ्या वडिलांकडे पाहण्याची दृष्टी दिली.

कुमारजी आपल्यातून गेल्याला तीन दशकं उलटून गेलीत, पण जसजसा काळ पुढे जातोय, तशी मी त्यांच्या आणखी जवळ जाते आहे. कुमारजी आणि वसुंधराताईंचं सहगायन हीसुद्धा खूप वेगळी गोष्ट होती. शास्त्रीय गायनात मुख्य कलाकार पुरुष असेल, तर त्यांच्याबरोबर गाणाऱ्या शिष्या कधी त्यांच्या स्वरात गात नाहीत. त्यामुळे मागे बसून गाणाऱ्या विद्यार्थिनींच्या गाण्याला मर्यादा असतात. कुमारजी आणि वसुंधराताई यांच्या बाबतीत असं कधीही झालं नाही. कुमारजी थोडय़ा चढय़ा स्वरात गात असत आणि वसुंधराताई त्यांच्या षड्जाला षड्ज धरून गायच्या. ते आजवर कुठेही न झालेलं अद्वितीय संयोजन होतं. मजा अशी की, मैफलीत काय आणि कसं गायचं यातलं ते आधी काहीही ठरवत नसत. कुमारजींना आयत्या वेळी जे सुचत असे, त्याला योग्य साथ वसुंधराताई करत असत. मला वाटतं की बाबा पुढच्या क्षणाला काय गाणार आहेत याची चाहूल तिला लागायची आणि ते ओळखून ती गायची! बाबा फार तापट होते. कदाचित ती आई-वडिलांची पिढीच तशी होती की काय- त्यांचा भरपूर ओरडा आणि भरपूर मारही आम्ही खाल्ला आहे. आमच्या घरी एक चमेलीचा वेल होता. तो सुकल्यावर बाबांनी त्याची एक छडी केली होती. तिचं नाव त्यांनी ठेवलं ‘शांती’! त्यांचा राग सगळय़ांचा थरकाप उडवायचा. दौऱ्यांना जाताना दोन तंबोरे, एक कपडय़ांची पेटी आणि एक छोटी ब्रीफकेस ते बरोबर घेत. ब्रीफकेसमध्ये त्यांच्या अत्यंत आवश्यक वस्तू ठेवलेल्या असत. ते फक्त ‘फस्र्ट क्लास’नं प्रवास करत. रेल्वेत बर्थ आणि चहाचं टेबल यांच्या मध्ये असलेल्या फटीतच तंबोरे उभे करून ठेवावे लागत. इतकंच नव्हे, तर ते जागचे हलू नयेत म्हणून तंबोरे दोन्हीकडे बांधून ठेवायला त्यांनी दोरीही बरोबर आणलेली असे. तंबोरे उभे करायचं काम आमचं. ते करण्यासाठी ब्रीफकेस उघडताना तिचा वरचा भाग कोणता आणि खालचा भाग कोणता हे मला कळायचं नाही.. मग ‘शांती’ कामी येत असे! आमच्या घरात डायिनग टेबल हा घराचा केंद्रिबदू होता. तिथे बाबांचा पानाचा डबाही ठेवलेला असे. बहुतेक गोष्टी तिथेच घडत. एखादी बंदिश त्यांना स्फुरली की ते आत स्वयंपाकघरात काम करणाऱ्या आईला आवाज द्यायचे. पानाचा डबा डग्गा व्हायचा आणि बाबा गुणगुणायला सुरुवात करायचे. नव्या बंदिशीचा सगळय़ात पहिला प्रसाद आईला मिळायचा. त्यानंतर मुकुल दादा आणि सतीश (सत्यशील) दादा. या काळात मी फारच लहान होते; पण पुढे १९८० च्या सुमारास मी त्यांच्याबरोबर अधिक वेळ घालवू लागले. बाबा बराच वेळ बाहेर झुल्यावर बसलेले असायचे. त्या वेळी ते तांदूळ निवडायचे, मोगऱ्याच्या ढीगभर फुलांचा हिरवा देठ निवडून काढत बसायचे, तासन्तास सुपारी कातरायचे. त्या वेळी कुणीही त्यांच्याशी बोलायचं नाही असा अलिखित दंडक होता. ती त्यांची साधना होती. अशा वेळी मी त्यांच्या शेजारी खुर्चीवर बसून माझं वाचन वगैरे करत बसायचे. त्यांना वाटायचं तेव्हा ते एकदम बोलायचे.

‘उड जाएगा हंस अकेला’ची जन्मकथा अशीच आहे. ते असे बसले होते, समोर बदामाचं झाड होतं. ते एकदम मला दाखवून म्हणाले, ‘बघ.. ना जानूं किधर गिरेगा, लग्या पवन का रेला.. जैसे पात गिरे तरुवर से, मिलना बहुत दुहेला’! संगीतात स्वत:चे नवीन प्रयोग करणं सोपं नाही. कुमारजींनी अकरा ‘धून-उगम राग’ केले. ‘नगरगंधा’, ‘अहिमोहिनी’, ‘मघवा’, ‘बिंदियारी’, ‘संजारी’, ‘बिहड भैरव’, तसाच एक ‘मधुसूरजा’. मात्र या सगळय़ांत मधुसूरजाची फार वेगळी जागा आहे. देवासला आमच्या घराच्या मागे टेकडीवर तुळजा भवानी आणि चामुंडेचं मंदिर आहे. १९६२ च्या सुमारासची गोष्ट. बळी देण्यासाठी देवीच्या देवळाकडे नेल्या जाणाऱ्या कोकराचं रुदन पाहून त्यांच्या अंगावर काटा आला. ते रुदन मनाला भिडलं आणि त्यातून ‘मधुसूरजा’ची आर्तता जन्मली. वेगवेगळय़ा प्रसंगांबद्दल कुमारजींच्या बंदिशी आहेत. ‘सास-बहू-ननंद’च्या फेऱ्यातून त्यांनी फार मोठय़ा प्रमाणावर बंदिशींना बाहेर काढलं. त्यांच्या माध्यमातून खूप वेगवेगळय़ा विषयांचं भारतीय शास्त्रीय संगीतात आगमन झालं. आमच्या माळव्यात आंबा उशिरा येतो. फेब्रुवारीनंतर आंब्याला मंजिऱ्या यायला सुरुवात होते. त्या भागात महाशिवरात्रीला प्रथम हा मोहोर तोडून शंकराच्या पिंडीवर वाहण्याची प्रथा आहे. त्यावर कुमारजींनी ‘मघवा’ या धून उगम रागात बंदिश बांधली आहे. डोक्यात विचार आले आणि ते क्षणाचाही विलंब न करता जसेच्या तसे गळय़ात उतरले की कुमार गंधर्व होतात. ते प्रत्येकाला शक्य नाही. त्यांच्यासारख्यांच्या सर्वच गोष्टी आत्मसात करता येत नाहीत. तीच मेख आहे आणि ती फार चांगली गोष्ट आहे, कारण आपण आपल्या क्षमतेतून त्याकडे पाहून त्यातून पुढचा मार्ग शोधू शकतो. नाही तर नक्कल होईल. त्यांनी कुठल्याही शिष्याला ‘मी गातो तसं तुम्ही गा,’ असं म्हटलं नाही. त्यांचं शिकवणं फारच ‘अॅबस्ट्रॅक्ट’ असे. त्यामुळे ते आत्मसात होणं फार अवघड होतं. अनेकदा असं होत असे की, मी त्यांच्यासमोर तंबोरा घेऊन गायला बसले आहे आणि खोलीच्या बाहेर येताना रडतच आले आहे. मला काहीही कळलेलं नसे. ते जे सांगत ते गळय़ातून निघत आहे, पण उमजत मात्र नाहीये, अशी अवस्था व्हायची. मग आई मला ते समजावून सांगायची आणि त्यानंतर ते ओळखीचं वाटू लागे. माझ्यासमोर कुमारजींनी उभा केलेला अवकाश इतका व्यापक आहे, तो पूर्णपणे समजून घेण्याच्याच प्रवासात मी आहे. आपल्या मुलांचं कौतुक करण्याचा पूर्वीचा काळच नव्हता. आम्ही त्यांच्या रूपानं समोर एक ‘एव्हरेस्ट’ पाहात होतो. मी त्यांच्याबरोबर १९८१-८२ मध्ये पहिला कार्यक्रम केला होता. पुष्कळ रियाज करून, समजून घेऊन मी तयारीनं गेले होते. प्रत्येक कार्यक्रमानंतर ते जवळच्यांना कार्यक्रम कसा झाला हे सांगायचे. खरं तर सगळय़ांना त्यांचं गायन आवडलेलं असायचं, पण ते म्हणायचे, ‘आज मी ७० टक्के गाऊ शकलो’, ‘आज ५० टक्केच जमलं’, ‘आज नाही जमलं’ वगैरे.. त्यांचा स्वत:चा असा वेगळाच मीटर होता. आम्हा दोघांच्या पहिल्या कार्यक्रमानंतर ते म्हणाले होते, ‘‘आज तुझं शंभर टक्के लक्ष माझ्याकडे होतं.’’ तीच शाबासकी! बाबांचे ओठ पाहा आणि त्याप्रमाणे आपला स्वर लावा, हे आईनं आम्हाला शिकवलं होतं.

रियाज करू नये, असं बाबा कधी म्हणाले नाहीत, पण तो किती करावा आणि काय करू नये, याबद्दल त्यांची ठाम मतं होती. वर्षांनुवर्ष मी जेव्हा जेव्हा डोळे उघडले तेव्हा वसुंधराताईंना रियाज करतानाच पाहिलं. मुकुल दादा, सत्यशील दादा, इतर शिष्य रियाजच करत असत; पण तो डोळसपणे करावा, असा बाबांचा आग्रह. म्हणजे गळय़ाचा बट्टय़ाबोळ होईपर्यंत खर्जाचा रियाज कशाला करावा?.. बाबा बागकाम खूप करायचे. त्यांनी एक मोठा, मूव्हेबल स्पीकर तयार करून घेऊन त्याला खूप मोठी वायर जोडली होती. घरात स्पूलवर दोन-अडीच तास तानपुरे रेकॉर्ड केलेले होते. कुमारजी आणि पं. वसंतराव देशपांडे यांनी स्वत: भानूपूरमध्ये रात्री एक ते अडीच वाजेपर्यंत बसून निव्वळ तानपुरे रेकॉर्ड करून ठेवले होते. ते स्पीकरवर वाजत आणि बाबा बागकाम करत रहात. त्यांचे शिष्यही आजूबाजूला काम करत असायचे. तेव्हाही बाबा संगीताच्या बाबतीत बऱ्याचदा लहान लहान गोष्टी सांगायचे. कुमारजी १९४८ ते १९५४ या कालावधीत आजारी होते. श्वसनाच्या त्रासातून ते बाहेर आले, त्यांचं एक फुप्फुस निकामी झालं, तरी त्यांच्या गाण्यावर त्याचा काही परिणाम झाला असं मला कुठेही वाटलं नाही. फार ताकदीनं कुमारजी त्यांचं गाणं सादर करायचे. अगदी सुरुवातीला ते निर्गुणी भजनं किंवा कबीर गात नव्हते. तेव्हा जो कबीर गायला जात होता, तो फार वेगळय़ा प्रकारचा होता. त्याच्या चालीही वेगळय़ा होत्या. माळव्यात आल्यावर स्थानिक लोकांची गायनपद्धती त्यांच्या कानावर पडली. माळव्यात कबीर पुरुष गातात आणि लोकगीतं ही स्त्रियांची असतात. त्या शैलीतला कबीर कुमारजींना वेगळा वाटला.

‘माझ्या गाण्याचा मी आनंद घेऊ शकत नसलो, तर इतरांना काय देणार,’ असं ते म्हणायचे. मी त्यांना कधी जपमाळ घेऊन बसलेलं पाहिलेलं नाही. रोज पूजाही करत होते असं नाही; पण त्यांना शिवाच्या देवळात जायला आवडायचं. सतत अध्यात्माबद्दल बोलताना मात्र मी त्यांना ऐकलेलं नाही; परंतु ते कोणत्याही पदाचा साहित्यिक अभ्यास भरपूर करायचे. तुलसीदास वाचताना दुपारी अडीच-अडीच वाजेपर्यंत, पाच-सहा तास वाचतच असायचे. शेवटी आई ‘अंघोळ करा, जेवायला या,’ म्हणून त्यांच्या मागे लागायची. हे सर्व कशासाठी? कवी कोणत्या आध्यात्मिकतेतून लिहितोय, हे त्यांना जाणून घ्यायचं असायचं. म्हणून ते सादर करताना गळय़ातून उमटायचं.

ते एकटे बसलेले असतानाही ‘एकटे’ नाहीत, याचा प्रत्यय वारंवार यावा, अशीच जादू ते स्वरांतून, रचनांतून निर्माण करत. मोगऱ्याच्या फुलांची देठं हळुवार खुडताना स्वरांच्या मुलायम लडी त्यांच्या डोक्यात तयार झालेल्या असत. ‘हरभज सुखसागर में अमीरस भरिया’ म्हणावं, तसा हा स्वरामृताचा सागर. दोन्ही हातांनी एकवटलं तरी आम्हाला तो किती घेता येणार?.. ते सर्व कवेत घेता येणार नाही असं काही प्रचंड, अवघड वाटायचं. आपला पदर किती तोकडा आहे याची जाणीव होऊन स्वत:वर चिडचिड व्हायची. त्यांचे निर्मळ सूर मात्र ऐकणाऱ्याला जणू विनवत असायचे, ‘हंसा मत जाओ रे पियासा!’
शब्दांकन- संपदा सोवनी
sampada.sovani@expressindia.com

Story img Loader