‘लवकर किंवा नंतर प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे चाखावीच लागतात,’ या रॉबर्ट लुई स्टीव्हन्सनच्या विधानाने ही कादंबरी सुरू होते. आणि हे विधानच या कादंबरीचे सार आहे.
ही कादंबरी कोकणातील सारंगपूर या तालुक्यात आकार घेते. तालुक्यातली महसूल व्यवस्था कोणत्या स्वरूपाची आहे याचा प्रत्यय देणारी ही कादंबरी बाजीराव डोईफोडे या तहसीलदारपदावर काम करणाऱ्या व्यक्तिरेखेभोवती उभी राहिली आहे. जरी अशोक चौगुले या होतकरू वृत्तीच्या तलाठय़ाच्या आत्मनिवेदनातून कादंबरीचा आशय मांडला जात असला तरी संपूर्ण कादंबरीवर तहसीलदाराची दाट सावली आहे. निवेदन प्रारंभीचा काही काळ फक्त प्रथमपुरुषी वाटते, पण नंतर ते तृतीयपुरुषी असल्याचे लक्षात येते. निवेदनाची सरमिसळ आणि निवेदक-नायकाला अत्यंत अल्प अवकाश हा या कादंबरीचा महत्त्वाचा भाग आहे.
सर्वसाधारणपणे कथा-कादंबऱ्यांचा नायक किमान गुणसंपन्नता असणारा असतो. त्याच्या दृष्टीबिंदूतून कादंबरीतला अवकाश भरला जातो. इथेही अशोक चौगुलेचा दृष्टिकोन आहे. पण त्याचा ‘आवाज’ खूपच क्षीण आहे. तहसीलदाराचा आवाज मात्र गडद आहे. तहसीलदाराच्या व्यक्तिमत्त्वाला आणि महसूल व्यवस्थेची चिकित्सा करताना कादंबरीकार तहसीलदाराच्या आवाजाला जे महत्त्व देतात ते लक्षणीय आहे. कारण अत्यंत भ्रष्ट असलेली व्यक्तिरेखा सहसा कादंबरीचा नायक होत नाही. पण इथे तसा प्रयत्न झालेला आहे. तो जमूनही गेला आहे.
नुकतेच रुजू झालेले तहसीलदार बाजीराव डोईफोडे सर्व व्यवस्था समजावून घेण्याचा प्रयत्न करतात. प्रारंभीच एमपीएससीमार्फत नव्यानेच रुजू झालेल्या नायब तहसीलदार अनुजा देशमुखांना समजावून सांगताना ते म्हणतात, ‘‘मॅडम, तुम्ही या खात्यात नवीन आहात. तुम्हाला मी एक गोष्ट सांगून ठेवतो की, तुम्ही कुणावर फाजील विश्वास मुळीच ठेवू नका. आपल्या हाताखाली काम करणारे शिपाई, कारकून, अव्वल कारकून ही मंडळी महाबिलंदर असतात. तलाठी आणि मंडल अधिकारी हे आर्थिक व्यवहारात गुंतलेले असतात. वेळप्रसंगी ते आपल्याला गोत्यात आणायला मागेपुढे पाहणार नाहीत. त्यांच्यापासून सावध राहा.’’.
सावधानतेचा इशारा देणारा हा तहसीलदार स्वत: मात्र प्रचंड भ्रष्ट आहे. आमदार दादासाहेबांचा निरोप येताच त्यांना भेटून त्यांची कृपादृष्टी राहावी म्हणून तो यशस्वी प्रयत्न करतो. आमदारांच्या भावाचे अवैध धंदे तो स्वत: सांभाळून घेतो. प्रशासन अधिक सोपं जावं म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या तलाठी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरतो. ते कायम अडचणीत कसे येतील यासाठी लटपटी-खटपटी करत राहतो. तर तलाठी संघटनेच्या नेत्यांना हाताशी धरून आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडपडतो. संपूर्ण प्रशासनावर पकड जमवून आमदारांना आणि पत्रकारांना खूश ठेवून मिळेल तेथे भ्रष्टाचार करीत राहतो. त्यासाठी तो सुरुवातीला स्वत:चा अंदाज येऊ देत नाही. जी माणसं किंवा अधिकारी, कर्मचारी त्याच्या हाताशी लागत नाहीत, त्यांच्यामागे अचानक तपासण्या लावून कारवाईच्या धमक्या देतो. पत्रकारांशी संधान साधून भ्रष्ट व्यवस्थेकडे त्यांना डोळेझाक करायला लावतो.
केवळ तहसीलदारच भ्रष्ट आहे अशातला भाग नाही. शिपायापासून प्रांत, कलेक्टर यांच्यामार्फत सगळीच व्यवस्था कशी सडून चालली आहे यावर या कादंबरीतून प्रकाश टाकला आहे. महसूलमधला कोणताही कागद पैशांचं वजन ठेवल्याशिवाय हलत नाही, याचं प्रत्यंतर इथे सातत्याने येत जाते. रेशनचे धान्य असो, दगडी खाणी असोत किंवा कोणतीही शासकीय योजना असो.. प्रत्येक कामात ‘अर्थ’पूर्ण व्यवहार होतात. या व्यवस्थेत सामील न होणाऱ्यास सातत्याने धारेवर धरले जाते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नायब तहसीलदार अनुजा देशमुख. त्या सरळ सेवेत भरती झाल्यामुळे त्यांना भ्रष्टाचार पसंत नाही. पण तरीही तहसीलदार डोईफोडे त्यांना भ्रष्टाचार करण्यास भाग पाडतात. इतकेच नाही तर गोडगोड बोलून सहलीला घेऊन जातात. त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवतात. त्यापासून देशमुख मॅडमना दिवसही जातात. एखादी सडलेली व्यवस्था चांगल्या माणसांनाही कशी संपवू शकते याची ही कादंबरी उत्तम उदाहरण आहे.
असे असले तरी चौगुलेसारखी काही मंडळी आपल्या विचारांपासून दूर जात नाहीत. त्यांना त्रास होतो, तरीही ती हा त्रास सहन करीत राहतात, पण मागे हटत नाहीत. अंतिमत: निसर्ग नावाची एक व्यवस्था असते आणि ती काहीएक न्यायनिवाडा करीत असते, असा काहीसा सूर ही कादंबरी अधोरेखित करते. अत्यंत मग्रुरीने भ्रष्ट कारभार करणारा डोईफोडे स्वत:ची मुलगी पळून गेली तरी बळ बांधतो. मुलीच्या जाण्याने त्याची बायको वेडय़ासारखी वागत असूनही तिकडे दुर्लक्ष करतो. पण रूढ भाषेत त्याचा घडा भरल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून लाच घेताना तो पकडला जातो. थेट गृह मंत्रालयाकडून हालचाली सुरू झाल्यामुळे त्याची सुटकाही कठीण होऊन बसते. अशातच तो घरी येतो; तर त्याचा मुलगा मंदार घर सोडून निघून गेलेला असतो.. आणि कादंबरीचाही समारोप होतो.
भ्रष्ट व्यवस्थेत राहूनही आपली भूमिका खंबीरपणे वठवू पाहणारा तहसीलदार कादंबरीकाराने नेमकेपणाने उभा केला आहे. कसलंही सोयरसुतक वाटून न घेणारा माणूस उभा करतानाचा गडद रंग कादंबरीकाराने सहजपणे हाताळला आहे. त्यामुळे अपराधभाव असूनही चेहऱ्यावर न दाखवणाऱ्या माणसांचे एक स्वतंत्र विश्वच ही कादंबरी उभी करते. आदर्श किंवा नकार देणारा नायक उभारण्याऐवजी भ्रष्ट व्यवस्थेलाच नायकाच्या भूमिकेत उभं करण्यात ही कादंबरी यशस्वी होते.
 मात्र, कादंबरीची एकंदर गुणवत्ता पाहता काही असमाधानही हाती येते. मराठी कादंबरी आजही वास्तववादी आणि आदर्शवादी लेखनातच कशी अडकली आहे, याचा नमुना ‘कुरण’च्या रूपाने समोर येतो. प्रयोगाचा कसलाही प्रयत्न केलेला नाही. अर्थात प्रयोग करायलाच हवा असं नाही, पण कादंबरी ही रचण्याची प्रक्रिया आहे. तसे ‘रचित’  कुठे दिसत नाही. सुष्ट विरुद्ध दुष्ट आणि त्यात पुन्हा निसर्गाचा विजय असे काहीसे पारंपरिक सूत्र दिसते. पात्रांची ठळकता, भाषेची विविधता, मांडणीचे कौशल्य अशा घटकांमध्ये ही कादंबरी उणी पडते. त्यामुळे चांगला विषय परिणामकारकतेने वाचकांपर्यंत पोहोचत असला तरी त्याचे विविध कंगोरे आणि काहीएक अबोधत्व मात्र प्रत्ययास येत नाही.
 ‘कुरण’ – रामचंद्र नलावडे, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पृष्ठे – २६०, मूल्य – ३०० रुपये.

Story img Loader