राजेंद्र येवलेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लदाख हा खरे तर भूलोकीचा स्वर्ग. वर्षांतील काही महिने बर्फाच्छादित असलेला हा प्रदेश म्हणजे भारताचा मुकूटमणीच. एरवी पर्यटन कंपन्यांच्या सहलीत फारसे स्थान नसलेला हा प्रदेश निळ्या-जांभळ्या पर्वतरांगांचा, नितळ, पारदर्शक, नीलवर्णी सरोवरांचा, अगत्यशील व अहिंसावादी माणसांचा आहे. लदाख आधी जम्मू-काश्मीरसोबत जोडलेला होता. त्यामुळे त्याची परवड होत होती. ती आता थांबणे अपेक्षित आहे. कारण हा प्रदेश ५ ऑगस्ट २०१९ रोजी अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर ३१ ऑक्टोबर २०१९ पासून केंद्रशासित प्रदेश झाला आहे. या प्रदेशाशी आपले नाते आता अधिक दृढ होणे गरजेचे आहे. निसर्गरम्य, परंतु खूप उंचीवर असल्याने दुर्गम असलेल्या या प्रदेशाचा परिचय करून देणारे माहितीपर पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. लदाखचं निसर्गसौंदर्य, तेथील लोकसंस्कृती, वन्यप्राणिजीवन, कारगिल म्युझियम यावर प्रकाश टाकणारे ‘लदाख : भारताचा अद्भुत मुकुटमणी’ हे सीमंतिनी नूलकर यांचे हे पुस्तक. चित्रदर्शी शैलीतले हे पुस्तक एकदा तरी लदाखची सफर करण्याची इच्छा मनात रुजविल्यावाचून राहत नाही. लेखिकेने लदाख किमान सात ते आठ वेळा उभा-आडवा पायाखालून घातला आहे. त्यामुळे ही मुशाफिरी म्हणजे केव्हातरी एकदा तेथे जाऊन आलेल्या एखाद्या हौशी पर्यटकाचे अनुभव नाहीत. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या या प्रदेशातील निसर्ग, इतिहास, पशुपक्षी, धर्म, लोकसंस्कृती, लदाखचे सामरिक महत्त्व आणि तिथले लोकजीवन जाणून घेण्याच्या कुतूहलातून चितारलेले हे शब्दचित्र आहे. लदाख परिसरातील गोम्पा, चांगथांग पठार, फुलांनी सजलेली नुब्रा व्हॅली, तसेच भारताचा मानबिंदू असलेली सिंधू नदी लेखिकेला सतत खुणावते. या प्रत्येक ठिकाणच्या ऐतिहासिक व पौराणिक संदर्भाचे बारकावे पुस्तकात टिपलेले आहेत. उदा. नारदांच्या नदीस्तुतीत ‘सुशोमा’ असा ज्या नदीचा उल्लेख आढळतो, त्या सिंधू नदीचा दबदबा आणि तिचे दैवी रूप असे आहे की, कुणीतरी म्हणून ठेवलंय- Sindhu is too divine to be it.. चांद्रभूमी लदाखमधील सूरजताल व चंदरताल या सरोवरांबाबत लेखिका म्हणते की, सूरजतालमध्ये भागा नदीचा उगम आहे, तर चंदरतालमध्ये चंद्रा नदीचा. चंद्रा आणि भागा यांचा संगम होऊन ती होते.. चंद्रभागा. काश्मीर खोऱ्यात ‘चिनाब’ या नावाने ती तोऱ्यात उतरते. अबूल फजलने ‘आईन-ए-अकबरी’मध्ये या मोहमयी चंद्रभागेचे वर्णन करून ठेवले आहे.

भारताचा अविभाज्य भाग असलेला व सामरिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या अशा या प्रदेशातील सियाचीन व कारगिलमध्ये पाकिस्तान व चीनने भारताची काही वेळा कुरापत काढल्या खऱ्या, परंतु आपल्या शूर जवानांनी त्या हाणून पाडल्या. त्याकामी आपल्या जवानांना लदाखी लोकांची मोठी मदत झाली होती. मुळात कारगिलमधील गुराख्यांनीच कारगिलमध्ये पाकिस्तानने आक्रमण केल्याचे लक्षात आणून दिले होते. ही सगळी पार्श्वभूमी लेखिकेने मांडली आहे. ‘दौलतबेग ओल्डी’ हे नाव चिनी घुसखोरीच्या बातम्यांमध्ये चर्चेत येते. या भागाला हे नाव पडण्यामागे एक कथा आहे. दौलतबेग हा श्रीमंत व्यापारी या मार्गावरून जाताना मरण पावला. त्यावरून या भागाला ‘दौलतबेग’ नाव पडले. सियाचेन हे नाव कसे पडले याचाही उलगडा पुस्तकात आहे. या भागात तापमान उणे पन्नास, उणे त्रेपन्न इतके असते. त्यामुळे गरम चहा किंवा कॉफी हवेत फेकली तरी त्याचे स्फटिक खाली पडतात. सियाचेन हे जगातील सर्वाधिक उंचीवरचे युद्धक्षेत्र. तेथे सैनिकांना विस्मरण, हिमदंशासह अनेक अकल्पित समस्यांना तोंड द्यावे लागते. त्याबद्दलचा तपशील या पुस्तकात आहे. लेहमधील लोकांच्या गरजा भागवण्यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ‘डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ हाय अल्टिटय़ूड रीसर्च’ या संस्थेचे पालटलेले रूप या पुस्तकात कथन केले आहे. ‘थ्री इडियट्स’मधील पँगॉंग लेक व इतर भागाबद्दलची माहिती यात मिळते. ‘ The Last Post’ हे प्रकरण तर कारगिल लढाईच्या भावस्पर्शी आठवणी जागवते. लेहच्या हवाई क्षेत्राजवळ ‘हॉल ऑफ फेम’ नावाचे युद्धसंग्रहालय आहे. तिथे कारगिल युद्धाच्या वेळी हस्तगत केलेले पाकिस्तानी ग्रेनेड, पाकिस्तानी सैनिकांच्या डायऱ्या असे बरेच काही ठेवलेले आहे. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या कॅ. विजयंत थापरने लिहिलेले पत्र तिथे आहे. त्यात तो म्हणतो, ‘If you can, please come and see where the Indian Army fought for your tomorrow.’ या भागात कारगिल विजय स्मारकही आहे.

याखेरीज येथील प्राणिसृष्टी, वनस्पती आणि लोकजीवन यांचा बारकाईने केलेला अभ्यास या पुस्तकातून जाणवतो. पुस्तकातील रंगीत छायाचित्रे लाजवाब आहेत. लदाखमध्ये आढळणारे पक्षी, सस्तन प्राणी, पॅलेस, म्युझियम, खिंडी (ला), उत्सव, ट्रेकचे मार्ग, त्यासंबंधीचे नकाशे, लदाख व लेहचा नकाशा, राफ्टिंगचे मार्ग, सरोवरे, सर्किट्स, व्हॅली, अभयारण्ये, नद्या, पर्वतरांगा, लदाखमधील गोम्पा आदी पर्यटकांना उपयोगी पडेल अशी बरीच माहिती सचित्र दिलेली आहे. त्यामुळे या पुस्तकाला संदर्भ व उपयुक्तता दोन्ही मूल्ये आहेत. लदाखमध्ये भटकंतीला गेलात तर कोणत्या समस्या येऊ शकतात, किंवा काय काळजी घ्यावी लागते, यावरही एक प्रकरण आहे.

लदाखला परदेशी पर्यटक जास्त येतात. पण आपण भारतीय तेथे का जात नाही, असा प्रश्न लेखिकेला पडला आहे. तो योग्यच आहे. कारण त्यामुळेच या दूरस्थ प्रदेशातील लोकांच्या मनात देशापासून वेगळे पडल्याची भावना निर्माण होते. लदाख आता केंद्रशासित प्रदेश झाल्याने तेथील परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे. आपणही लदाखची सफर करून तिथले देवदुर्लभ निसर्गसौंदर्य अनुभवावे, ही ओढ हे पुस्तक जागवते.

‘लदाख- भारताचा अद्भुत मुकुटमणी’

– सीमंतिनी नूलकर, अनुभव अक्षरधन प्रकाशन, पृष्ठे- १४३, किंमत- ४५० रुपये.