अगदी लहानपणापासून आपण सर्वानी हत्ती आणि सात आंधळे यांची गोष्ट ऐकलेली आहे. कोणाला हत्ती सुपासारखा, तर कोणाला दोरखंडासारखा, तर कोणाला झाडाच्या बुंध्यासारखा वाटला. याचे कारण वस्तुस्थितीचे यथार्थ आणि संपूर्ण अवलोकन करून आपल्या जाणिवा जागृत ठेवून निर्णय घेण्याची क्षमता त्या आंधळ्यांनी गमावलेली होती. आपण डोळस मंडळीही रोजच्या आयुष्यात अनेकदा आंधळे अनुकरण करतो. परवा फेसबुकवर एक नवी गोष्ट वाचली. एका खोलीमध्ये शास्त्रज्ञांनी पाच माकडे बंदिस्त केली. खोलीच्या मधोमध एक उंच शिडी ठेवली आणि त्या शिडीच्या माथ्यावर केळ्यांचा घड ठेवला. माकडेच ती; केळी पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. एक माकड शिडीच्या पायऱ्या चढून वर जाऊ लागले. तेवढय़ात शास्त्रज्ञांनी खोलीमध्ये पाण्याचे फवारे सुरू केले आणि सर्व माकडे भिजून ओलीचिंब झाली. वर चढणाऱ्या माकडाने केळी काढण्याचा आपला प्रयत्न सोडून दिला. ज्या- ज्या वेळेस त्यांच्यापकी कोणीही केळी काढण्याचा प्रयत्न केला, त्या- त्या वेळेला पाण्याच्या फवाऱ्यांनी माकडे भिजून गेली. झाले! माकडांच्या डोक्यात दोन गोष्टींचा परस्परसंबंध अगदी घट्ट बसला. आता त्या पाचांपकी कोणीही केळी काढण्याचे धाडस करीना. शास्त्रज्ञांनी मग त्या पाच माकडांपकी एकाला बाहेर काढले आणि त्याच्याऐवजी नवे माकड िपजऱ्यात सोडले. या नव्या माकडाला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. ते शिडीवर केळ्यांसाठी चढू लागताच इतर माकडांनी त्याला यथेच्छ चोप दिला. आपण का मार खातो आहोत, याचीही कल्पना नव्या माकडाला नव्हती. पण हळूहळू त्याच्या लक्षात आले, की केळी काढायला गेले की मार खावा लागतो. शास्त्रज्ञांनी एक-एक करीत सर्व माकडे बदलून नवी माकडे िपजऱ्यात ठेवली. आता िपजऱ्यात असलेल्या माकडांपकी कोणीही पाण्याच्या फवाऱ्याला तोंड दिले नव्हते. परंतु तरीही कोणतेही माकड शिडीवर चढून केळी काढायला धजावले नाही. एक गोष्ट ते परंपरागत शिकले होते, की ही केळी काढावयाची नाहीत. ‘का?’ याचे उत्तर कोणाकडेही नव्हते आणि ते मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचीही कोणाची तयारी नव्हती. वर्षांनुवष्रे परंपरागत चालून आलेल्या पद्धती डोळ्यांवर पट्टी बांधून कोणतेही स्पष्टीकरण न मागता पुढे चालू ठेवण्याच्या समाजाच्या प्रवृत्तीवर ही गोष्ट नेमकी बोट ठेवते.
विद्यापीठाचे प्रशासन सांभाळावयास लागून मला दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. केंद्रीय विद्यापीठे, राज्यस्तरीय शासकीय विद्यापीठे, दूरस्थ विद्यापीठे, खासगी विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठ दर्जा मिळालेल्या संस्था अशा शैक्षणिक संस्थांनी आपल्या देशातील उच्च आणि उच्चतम शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. पण सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचा एकंदर पवित्रा हा डोळ्यांवर पट्टी बांधून घेतलेल्या गांधारीसारखा आहे, हे मला सखेद नमूद करावेसे वाटते. परिणामत: दरवर्षी जून-जुल महिना आला की प्रवेशासाठी तारांबळ सुरू होते. पालकांचे फोन, अनेक आर्जवे, ओळखीपाळखीच्या मध्यस्थांमार्फत केलेल्या अर्ज-विनंत्या या सगळ्याने मी अस्वस्थ होतो. १५ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील उद्याच्या भविष्याच्या आशा एखाद्या मेणबत्तीच्या ज्योतीप्रमाणे मला फडफडताना दिसतात. आणि यांना नेमका प्रकाश दाखविण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांची आणि पर्यायाने विद्यापीठांची आहे, हा विचार मला अस्वस्थ करतो.
विद्याशाखा कोणतीही असो; तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्या स्नातकाला तात्काळ रोजी-रोटी मिळण्याची संधी उपलब्ध होणे हे अतिशय गरजेचे आहे. एखाद्या विद्यापीठाचे मूल्यमापन करताना Efficiency, Effectivity आणि त्याचबरोबर Employability या त्रिसूत्रीचा विचार करणे गरजेचे आहे. पर्यायाने ती विद्यापीठाची जबाबदारी आहे असे मला वाटते.
एकंदरीतच शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची वेळ आलेली आहे. आपण ज्या गोष्टींचे शिक्षण देत आहोत, ते ज्या पद्धतीने देत आहोत आणि त्याचा अंतिम परिणाम काय होतो आहे, याचा लेखाजोखा मांडायला हवा. आíथक गणिते जुळण्यासाठी प्रत्येक वेळेला शैक्षणिक संस्थेत किंवा विद्यापीठात प्रवेश घेऊन रोजची उपस्थिती लावायला हवी असेही नाही. दूरस्थ विद्यापीठांचा पर्याय खुला आहे. पण दुर्दैवाने तेथील स्नातकांना नोकरीवर ठेवण्याच्या वेळी निवड करताना दुय्यम वागणूक मिळते, हे सत्य आहे. वास्तविक पाहता एखाद्याला रोजगार कमावणे आवश्यक असेल तर त्यामुळे त्याची शिक्षणाची संधी हिरावून घेता कामा नये. काही वर्षांपूर्वी शासनाने सुरू केलेल्या ‘हुन्नर से रोजगार तक’ या प्रकल्पालाही मोठय़ा प्रमाणात चालना देणे गरजेचे आहे. मग एखादा दहावी पास झालेला विद्यार्थी जर उत्तम बेकरी तंत्रज्ञान शिकला, किंवा व्यावसायिक पद्धतीने लाँड्री कशी चालवावयाची, याचे शिक्षण घेता झाला तर आपण त्याचे स्वागत करावयास हवे आणि अशा अल्प कालावधीच्या व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांवर विद्यापीठाने आपली शाल पांघरावयास हवी. जे पारंपरिक अभ्यासक्रम विद्यापीठातून शिकवले जात आहेत, तेथेही तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करून ई-लìनगच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकविले जाणे गरजेचे आहे. खडू आणि फळा यांनी आपले कार्य केले आहे. मी त्यांना पूर्णपणे रजा देऊ इच्छित नाही; पण त्यांची रदबदली करण्यासाठी मला प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट असणे आता आवश्यक वाटते. पारंपरिक शिक्षणाचा एकंदरच कल ज्ञान देण्याकडे आहे. तो आता तेथून कौशल्यवर्धनाकडे झुकवावयास हवा. याला फार मोठय़ा प्रमाणात विरोध होतो आणि अध्यापकवर्ग खुशीने हा बदल स्वीकारत नाहीत असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. पण ही काळाची गरज आहे, हे लक्षात घेता विद्यापीठांनी कात टाकणे गरजेचे आहे. जी बाब शिकविण्याच्या बाबतीत, तीच परीक्षा घेण्याच्या बाबतीतही सत्य आहे. पेपरफुटीची प्रकरणे, उत्तरपत्रिका गहाळ होणे, पुरवण्या सुटणे या सर्व बाबी संगणकाने भरून गेलेल्या आपल्या आजच्या आयुष्यात शोभनीय आणि स्वीकारार्ह नाहीत. त्यामुळे परीक्षा संपूर्णपणे संगणकीय स्वरूपात करणे याचाही विचार आपल्याला करावा लागेल. अडचणी येतीलच; पण त्यातून मार्ग काढणे शक्य व्हावे.
एकंदर काय, ज्याला ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करणे म्हटले जाते अशा स्वरूपाच्या विचारधारांची आणि निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा एमएस्सी, एम.बी.ए. यांसारख्या पारंपरिक, उत्तमोत्तम पदव्युत्तर पदव्या हातात घेऊन नोकरीच्या शोधात वणवण भटकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाईल आणि पारंपरिक अंधानुकरणाचे आपण सर्वजण बळी ठरू. फेसबुकवरची गोष्ट आईला सांगितली. ती हसली आणि एवढेच म्हणाली, ‘तुझ्यासारख्या माकडाने शिडी पाडून केळी फस्त करण्याची वेळ आली आहे.’
शिडी आणि केळी
अगदी लहानपणापासून आपण सर्वानी हत्ती आणि सात आंधळे यांची गोष्ट ऐकलेली आहे. कोणाला हत्ती सुपासारखा, तर कोणाला दोरखंडासारखा, तर कोणाला झाडाच्या बुंध्यासारखा वाटला.
आणखी वाचा
First published on: 20-07-2014 at 01:11 IST
मराठीतील सर्व जनात...मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ladder and banana