भारतीय चित्रपटांच्या शताब्दीची कालपरवाच सांगता झाली. त्यानिमित्तानं चित्रपट माध्यमाच्या वेगवेगळ्या पैलूंवर निरनिराळ्या माध्यमांतून गेले वर्षभर सर्वागीण ऊहापोह झाला. स्मरणरंजनापासून चित्रपट माध्यमाचे व्यक्तिगत ते सामाजिक परिणाम, त्याची उपलब्धी, सिनेमाची वाटचाल अशा विविधांगी बाबी यानिमित्तानं चर्चिल्या गेल्या. गावोगावची चित्रपट संस्कृतीही प्रांत-व्यक्ती-समाजपरत्वे, त्यांच्या आस्वादानुभवांनुसार भिन्न असल्याचं आढळतं. त्याचा परामर्श आम्ही पान ३ वर घेत आहोत. त्याचबरोबर चित्रपटाच्या गारुडाची सार्वत्रिकता टिपणारा हा विशेष लेख लिहिला आहे- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी.. खास ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी!
मा झा जन्म १९२७ सालचा.. कराचीतला. सुरुवातीचं शिक्षण कराचीमध्येच झालं. विद्यार्थीदशेत कराचीत असेपर्यंत मी दोनच भाषांशी परिचित होतो. माझी मातृभाषा सिंधी आणि दुसरी- शिक्षणाची भाषा.. इंग्रजी. तोपर्यंत हिंदूीत लिहिणं-वाचणं मला माहीत नव्हतं. मी हिंदूीशी पहिल्यांदा परिचित झालो तो हिंदी सिनेमांमुळे! शालेय जीवनापासूनच मला चित्रपट बघण्याचा प्रचंड शौक होता. हिंदूी आणि हॉलीवूडचे चित्रपट मी भरपूर बघायचो. वयाच्या विसाव्या वर्षी- १९४७ साली देशाला स्वतंत्र होताना मी पाहिलं. त्यावेळी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात पूर्णवेळ सक्रीय झालो होतो. ती दहा वर्षे मी राजस्थानमध्ये प्रचारक म्हणून काम करत होतो. याच काळात मी हिंदूी लिहायला आणि वाचायला शिकलो. लोकांना सांगितलं तर आश्चर्य वाटतं की, मी रामायण, महाभारत आणि भागवत सर्वप्रथम सिंधी भाषेतून वाचलंय. त्यानंतर गोरखपूरच्या गीता प्रेसचं रामायण, महाभारताचं भाषांतर वाचलं. हिंदीत तर ते नंतरच वाचलं. या गोष्टीचा उल्लेख करणं यासाठी आवश्यक आहे- कारण हिंदूी सिनेमा हेच राष्ट्रभाषा  हिंदूीच्या प्रचाराचे प्रमुख साधन ठरले आहेत असं मला वाटतं.  
हिंदूी सिनेमांची निर्मिती देशातल्या कुठल्याही हिंदूीभाषिक प्रांतात होत नाही, हा खरं तर एक विचित्र योगायोग आहे. सुरुवातीला हिंदूी सिनेमा कोलकात्याला न्यू थिएटर्समध्ये निर्माण होत. नंतर ते मुंबईत तसेच दक्षिणेत हैदराबाद आणि चेन्नईत निर्माण होऊ लागले. परंतु आजतागायत कुठल्याही हिंदूीभाषिक प्रांतांत हिंदूी चित्रपटसृष्टी विकसित झालेली नाही. ‘निदान मध्य प्रदेशमध्ये तरी एक फिल्मसिटी निर्माण करा,’ असं मी आमच्या सहकाऱ्यांना सांगत असतो.
चित्रपटांशी माझा संबंध विद्यार्थीदशेपासूनच आला. पुढे जाऊन मी पत्रकार झालो तेव्हा विशिष्ट राजकीय विचारधारेला वाहून घेतलेल्या ‘ऑर्गनायझर’मध्ये मी काम करायचो. एकदा आमचे संपादक म्हणाले की, ‘आपली सारी पाने राजकारणानेच भरलेली असतात. कुणाला इतर विषयांमध्ये स्वारस्य असेल तर त्यात वाचण्यासारखं काही नसतं. आपण सिनेमाविषयी नाही लिहू शकत काय?’ मी म्हटलं, ‘अनेक वर्षांपासून मी चित्रपट पाहिलेले नाहीत. पण तुम्ही म्हणत असाल तर मी चित्रपटावर स्तंभ सुरू करू शकतो.’ ते म्हणाले, ‘ठीक आहे.’ मग मी ‘नेत्र’ या नावाने चित्रपटविषयक स्तंभ लिहू लागलो. त्यासाठी मी पुन्हा एकदा चित्रपट बघायला सुरुवात केली. तेव्हाही मी विचार करायचो की, ज्या विविध क्षेत्रांमध्ये भारत जगात सर्वात आघाडीवर आहे, त्यात चित्रपटसृष्टी हे क्षेत्रही असू शकतं. केवळ चित्रपटांशी संबंधित सॉफ्टवेअर निर्मितीमध्येच आम्ही आघाडीवर राहू असं नाही; तर आमच्याकडे इतक्या समृद्ध भाषा आणि त्यांचं साहित्य आहे. त्या साहित्यात अग्रणी असणारे सिनेमातही महत्त्वाचं योगदान देऊ शकतात. एवढंच नव्हे तर माझ्या मते, तंत्रज्ञानाच्या बाबतीतही आमचा अनुभव आम्हाला हॉलीवूडच्या स्पर्धेत उभा करू शकतो.
मी शाळेत असताना तांत्रिकदृष्टय़ा सरस असलेल्या इंग्रजी चित्रपटांचा मनावर खूप प्रभाव पडायचा. ‘माय फेअर लेडी’ आणि ‘ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ यांसारखे त्याकाळातले चित्रपट आठवतात. सर्वात चांगला चित्रपट कोणता, असं कुणी त्यावेळी विचारलं तर मी नेहमी ‘ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ हेच उत्तर द्यायचो. पुढे क्वाय नदी बघायची संधी मिळाली तेव्हा मी ती आवर्जून जाऊन पाहिली.
आज चित्रपटाची शंभर वर्षे पूर्ण करणारा भारत हा आंतरराष्ट्रीय चित्रपटजगतात निश्चितपणे एक सशक्त देश आहे याबाबत माझ्या मनात मुळीच शंका नाही. आज भारतीय चित्रपटांना जगभरात मान्यता लाभली आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीनंही आम्ही भरपूर प्रगती केलेली आहे. संगीत हे भारतीय आणि हिंदूी चित्रपटांचं महत्त्वपूर्ण अंग आहे. भारतीय चित्रसृष्टीचं ते एक वैशिष्टय़ आहे. जगभरातील देशोदेशींच्या सिनेमांत चित्रपटांमध्ये आपल्यासारखं संगीत, गाणी नसतात. हॉलीवूड चित्रपटांमध्ये संगीत असेल तर त्याचा खास गट असतो. ती सामान्य बाब मानली जात नाही. पण भारतात मात्र चित्रपटांमध्ये संगीत नसेल तर त्याचा खास उल्लेख केला जातो.. एकही गाणे नसलेला चित्रपट म्हणून!
माझ्या लेखी हिंदूीतील संस्मरणीय चित्रपटांमध्ये व्ही. शांताराम आणि राज कपूर यांच्या सर्व चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. इंग्रजी चित्रपटांमध्ये आल्फ्रेड हिचकॉकचेही सर्व चित्रपट मी पाहिले. चार्ली चॅप्लिनचे सर्व नसले तरी ‘मॉडर्न टाइम्स’सह बरेच चित्रपट मी बघितलेत.
हिंदू चित्रपटांमध्ये मला राज कपूरचे सगळेच चित्रपट आवडले. येथे मला एक किस्सा सांगावासा वाटतो. दिल्लीत १९५८ साली महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर १९६०-६१ ची गोष्ट असेल. महापालिकेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होती. त्यात मी आणि अटलजी आपल्या उमेदवाराच्या प्रचारात अनेक दिवस गुंतलो होतो. त्यावेळी अजमेरी गेटला आमच्या पक्षाचे कार्यालय होते. पोटनिवडणूक तिथल्याच भागातली होती. अनेक दिवसांच्या आमच्या मेहनतीनंतरही निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा आम्ही पराभूत झालो होतो. त्यामुळे आम्ही दोघंही दु:खी होतो. आपण एवढी मेहनत केली आणि तरीही हरलो. अटलजी म्हणाले, ‘चला- आज जवळपासच्या थिएटरमध्ये चित्रपट बघायला जाऊ.’ पहाडगंजमधील इम्पिरीअल नावाच्या जुन्या थिएटरमध्ये कोणता चित्रपट लागला आहे, हे न बघताच आम्ही तिकीट काढून चित्रपटाला जाऊन बसलो. चित्रपट सुरू झाला. त्याचं नाव होतं- ‘फिर सुबह होगी.’ प्रसिद्ध रशियन कादंबरी ‘क्राइम अँड पनिशमेंट’वर आधारीत हा चित्रपट होता. मी अटलजींना म्हणालो, ‘चला, काही हरकत नाही. आज आपण हरलो; पण फिर सुबह जरूर होगी.’ मला आठवतं- १९९८ मध्ये आमचा पक्ष सर्वप्रथम सत्तेत आल्यानंतर माझ्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचं अधिवेशन झालं तेव्हा मी म्हटलं होतं, ‘फिर सुबह हुई है!’ आमच्या राजकीय जीवनात प्रेरणा देणारा तो चित्रपट होता. अटलजींसोबत मी अनेक चित्रपट पाहिलेत. चित्रपट आणि पुस्तकं ही आमची समान रूची होती.
बदलत्या जमान्याचं प्रतिबिंब आपल्या चित्रपटांमधून नेहमीच उमटत राहिलंय. मी त्यानंतरही नवनवे चित्रपट आवर्जून पाहत राहिलो. मात्र, कालांतरानं अशी परिस्थिती आली की, सुरक्षेच्या कारणास्तव सिनेमागृहात जाण्याऐवजी अनेकदा घरीच डीव्हीडीवर चित्रपट बघणं भाग पडू लागलं. कधी कधी दिल्लीतील महादेव रोडवरील सभागृहात मी चित्रपट बघायचो. राजकीय धकाधकीतही माझा चित्रपटांचा शौक मात्र कायम राहिलाय. आमीर खानचे सर्व चित्रपट मी पाहिले आहेत. विशेषत: ‘तारे जमीं पर’ मला खूपच आवडला. आजकाल मी चित्रपट कमी बघतो. पण माझी मुलगी प्रतिभा टेलिव्हिजनसाठी चित्रपटनिर्मिती करते. आणि ती चित्रपटही बघते भरपूर. सुरुवातीपासून ती या क्षेत्रात आहे. कधी कधी एखादा चित्रपट मी बघायला हवा असं वाटलं तर ती तसं मला सुचवते. ज्या चित्रपटगृहामध्ये जायचं असतं तिथं आम्ही चित्रपट सुरू झाल्यानंतर पोहोचू, असा आधीच निरोप दिलेला असतो.
चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांच्याशी अनेकदा अनेक निमित्तानं भेटीगाठी होतात. एकेकाळी संजीवकुमार माझे आवडते कलावंत होते. पुढे अमिताभ बच्चनव्यतिरिक्त दुसरा कुणी आवडला नाही. अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदूुस्थानी’ त्यांच्या आई तेजी बच्चन यांनीच आम्हाला महादेव रोड ऑडिटोरियममध्ये दाखवला होता.
मला आठवतं, आणीबाणीच्या काळात एका चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. तो गांधीजींच्या हत्येवर आधारीत चित्रपट होता. त्या चित्रपटावरचं नाटक मी पाहिलं होतं. त्या नाटकाचं नाव होतं : ‘हत्या- एक आकार की!’ गांधीजींच्या हत्येच्या षड्यंत्रात गुंतलेल्या लोकांमध्ये ज्याच्यावर हत्येची जबाबदारी सोपवण्यात आली होती त्याच्या मनात असा भाव निर्माण होतो की, मी करतो आहे ते योग्य आहे काय? त्या घटनेवर एक बनावट खटला चालवला जातो. त्यात तो स्वत:चा बचाव करताना नथुराम गोडसेच्या निवेदनातील काही वाक्यं बोलतो. ते नाटक खूप चांगलं होतं. फाइन आर्ट्स थिएटरमध्ये मी ते पाहिलं होतं. त्या नाटकावर आधारीत ‘फाइव्ह पास्ट फाइव्ह’ नावाचा हिंदूी आणि इंग्रजीतही चित्रपट बनवला गेला होता. कम्युनिस्टांच्या मागणीवरून त्या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. त्यावेळी इंद्रकुमार गुजराल माहिती व नभोवाणी मंत्री होते. या चित्रपटावर बंदी का घातली, असं मी गुजराल यांना विचारलं असता ते म्हणाले, ‘माझ्यावर दबाव होता. काय करणार?’ मी विचारलं, ‘मी पाहू शकतो?’ गुजराल म्हणाले, ‘जेव्हा पाहायचा तेव्हा पाहू शकता.’ पण त्यानंतर काही दिवसांनी आणीबाणीच लागू झाली आणि आम्ही तुरुंगात गेलो. तुरुंगातून बाहेर आलो आणि त्यानंतर निवडणूक जिंकून आमची सत्ता आली. मी माहिती व नभोवाणी मंत्री झालो. मी म्हटलं- ‘तो चित्रपट आणा.’ तो आम्ही पुण्याच्या फिल्म अर्काइव्ह्जमधून मागवला आणि पाहिला.
आणीबाणीच्या काळात चित्रपटातील िहसेवर काहीएक बंधन घालण्यात आलं होतं. चित्रपटांमध्ये एका मर्यादेपलीकडे िहसा नसावी असे निर्देश देण्यात आले होते. पण कलेच्या संदर्भात खरं तर असं बंधन हास्यास्पदच ठरतं. िहसा मुळातच चांगली गोष्ट नाही. पण जीवनात िहसा असतेच. रामायण किंवा महाभारत सादर करताना िहसा दाखवू नका, किंवा एकदाच दाखवा, असं म्हणता येणार नाही. पण केवळ िहसेसाठी िहसा दाखवणं, बीभत्सपणा दाखवणं हेही योग्य नाही.
आपल्या सिनेमाने हिंदूचा खूप चांगला प्रचार केला. संगीताविषयी लोकांची रूची वाढवण्यात सिनेमाचं मोठंच योगदान आहे. भारताचं ऐक्य मजबूत करण्याचं  काम सिनेमांनी केलं आहे. गेल्या शंभर वर्षांत आमच्या चित्रपटांनी बरीच प्रगती आणि उन्नती केलेली आहे. एकूणच भारतीय समाजावर चित्रपटांचा प्रचंड प्रभाव आहे. तो प्रभाव समाजात विकृती निर्माण करणार नाही याची खबरदारी घेणं हे चित्रपट निर्मात्यांचं कर्तव्य आहे. दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटातून नुसताच उपदेश देण्याची आवश्यकता नाही. ते शक्यही नाही. त्यांचं काम प्रामुख्याने मनोरंजन करणं हे आहे. पण ते मनोरंजन चांगलं, निरोगी असायला हवं. त्यात अश्लीलता नसावी. चित्रपटांमुळे लोक जे संस्कार ग्रहण करतात ते विकृत नसतील याचं भान चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी बाळगायलाच हवं.

pakistan google search indian movie 1
भारतीय चित्रपट व वेब सीरिजचं पाकिस्तानला वेड; बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे सीमेपल्याड ठरले सुपरहिट, पाहा यादी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Theatre canteen owner bites man's ear over food bill during 'Pushpa 2' screening.
Pushpa 2 : चित्रपटगृहाच्या कॅन्टीन मालकाने घेतला पुष्पा २ पाहायला आलेल्या प्रेक्षकाच्या कानाचा चावा, मध्यांतरावेळी नेमकं काय घडलं?
Veteran Telugu Actor Mohan Babu
दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बड्या कुटुंबात वाद; ज्येष्ठ अभिनेत्याने पत्रकारावर केला हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग
Story img Loader