‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’चा अखिल भारतासह जगातील पुस्तकशौकिनांना एकत्र आणण्याचा हेतू महोत्सवाच्या अठराव्या वर्षीदेखील परिपूर्ण झालेला पाहायला मिळतोय. या अशा महोत्सवातून मराठी संमेलने कधी शिकणार? आपलं साहित्य व्यापाराचं दारिद्र्य कधी संपणार? इतका प्रगल्भ श्रोता कधी लाभणार? त्यांना एकत्र आणण्यासाठी आपण खरेच प्रयत्न करणार का, हे प्रश्न नव्याने उपस्थित होतायत. आपल्या भवतालापलीकडचे जग समजून घेण्याची इच्छा आता तरी होईल?
आपण रस्त्याने चाललो आहोत. रस्त्यात खूप गर्दी जमली आहे. आपण खूप मागे आहोत. अशा वेळी कधीतरी आपल्याही मनात कुतूहल जागे होते आणि तेथे काय चालले आहे हे पाहण्याची इच्छा जागृत होते. मग आपण जरा टाचा उंच केल्या की जे काही चालले आहे ते आपल्याला दिसते आहे का ते पाहण्याचा प्रयत्न करतो… ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’ या पाच दिवसांच्या सोहळ्याबाबतीत हेच म्हणावे लागेल की, दिवसेंदिवस रटाळ होत चाललेली संमेलने अधिक सकस, समाजाभिमुख, साहित्यप्रेमींना आपल्याकडे ओढू शकणारी करायची असतील तर अशा प्रकारच्या साहित्य महोत्सवाकडे टाचा उंच करूनच पाहावे लागेल.
जयपूरच्या क्लार्क्स आमेर हॉटेलच्या भव्य वास्तूत पाच दिवस जी साहित्य मैफल सजते, ती आता सर्वार्थाने अखिल भारतीय होत चालली आहे. दोन दशकांत भारतातील साहित्य मैफल परंपरांना तिने बदलून टाकले आहे, याची झलक दोन वर्षे पुण्यात भरलेल्या पुस्तकमेळ्यातून दिसून आली. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे फक्त भारतातीलच नव्हे तर परदेशातले मान्यवर साहित्यिक, पत्रकार, विचारवंत हजेरी लावतात… आणि त्यांना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी विशेषत: तरुण वर्गाची गर्दी फुलते… प्रवेशद्वारापासूनच छान सजावट, कलाकारांच्या उत्तम कलाकृती, अर्थपूर्ण चित्रांची सजावट, विक्रीसाठीचे आकर्षक स्टॉल्स, विशेष मांडणी केलेले पुस्तकांचे स्टॉल्स…अनेक सुविधांनी युक्त सभागृह, मंडप… ही नेटकी मांडणी… कुठल्या राजकीय पक्षाचा बॅनर नाही की कुठल्या राजकारण्याच्या कौतुकांचा फलक नाही. केवळ आणि केवळ साहित्य-कला महोत्सव वाटावा असा सजलेला परिसर… त्यात साहित्याबाबत आस्था असलेल्यांचाच वावर.
एखाद्या साहित्य उत्सवाकडे आजचा तरुणवर्ग कोणत्या नजरेने पाहील असे वाटते? मोबाइल आणि इतर गॅझेट्सच्या अद्यायावत आवृत्त्या बाळगणे प्रतिष्ठेचे झालेले असताना आणि अवांतर रिल्सचा मारा जगण्याचा किंवा श्वासाचा भाग बनलेला असताना ही सारी ‘गॅझेटियर्स’ बाळगणारी तरुणाई वाचन आणि लिखाणाबाबतचा ओतप्रोत उत्साहात जयपूर महोत्सवासाठी आलेली पाहायला मिळतात. दक्षिण आणि पूर्वेकडच्या राज्यांतील मुला-मुलींची संख्या पाहून अचंबित व्हायला होते. आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या आपला महाराष्ट्र प्रगत असल्याचा भ्रम मग तुटायला लागतो.
यातले काही तरुण-तरुणी चार-पाच वर्षे सलग येथे येतायत. आपल्या वैचारिक, बौद्धिक आणि साहित्यिक आकलन कक्षा वाढवतायत. भारतातीलच नव्हे तर जगभरातील नवनवीन साहित्याचा परिचय करून घेतायत. आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर लेखकांना प्रश्न विचारून आपल्यातल्या साहित्यजाणिवांची कक्षा रुंदावतायत. केवळ साहित्याचा अभ्यास करणारेच नाही, तर विज्ञान, तंत्रज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांनादेखील हा महोत्सव खुणावतोय.
जगभरातील साहित्य वाचणारे या साहित्यपंढरीची आवर्जून वारी करतात. एक मराठी मुलगा सुट्टी घेऊन नेदरलँडहून भारतात आलेला. पण त्यातही दोन दिवस वेळ काढून जयपूर साहित्य महोत्सवात कुतूहलानं आलेला… मित्रांकडून इथल्या माहोलाची कथा ऐकलेली… ती या वेळेस अनुभवावी म्हणून तो इथे सहभागी झालेला… मुंबई, पुणे, कोल्हापूरहून काही मराठी मुले-मुली, त्यांच्या अन्य भाषिक मित्र-मैत्रिणींना घेऊन आले होते ते जयपूर साहित्य महोत्सवाचा ऐकलेला ‘महिमा’ प्रत्यक्षात जाणून घेण्यासाठी. इथे नेमके काय चालते, त्याच्या कुतूहलापोटी.
या महोत्सवाचे वेगळेपण ते काय? उत्तम नियोजन आणि कार्यक्रमांची आखणी. भारतात, जगभरात काय काय चालले आहे, कोणता पुस्तक व्यवहार सुरू आहे, कोणत्या प्रकारची नवनवी पुस्तके बाजारात आली आहेत, युद्धाने देशोदेशीच्या लहानग्यांची अवस्था काय आहे याचा लेखाजोखा, त्याविषयी व्यक्त केेली गेलेली चिंता, बदलत्या वातावरणाने पुढच्या पिढीच्या आरोग्याची स्थिती कशी असेल, डिजिटल पुस्तकांचे युग, पालक-मुलांमधील संवाद, मुलांनी वाचावं यासाठी पालकांनी काय काय करावे… असे खूप काही ऐकण्या-पाहण्यासारखे. श्रोत्यांनी भरून वाहणारे सभागृह असेच अनेक ठिकाणचे चित्र… आणि निव्वळ गर्दी नाही, तर दहा मिनिटांची सजग प्रश्न-उत्तरेही उद्बोधक. आपल्या विचारमितींच्या पलीकडे नवे सापडू देणारी! प्रश्न विचारण्यासाठी तरुण आणि बुजुर्ग मंडळींची अहमहमिका प्रत्येक मंडपात जवळजवळ सारखी. वक्तेही उत्तरांत कसलेले. सध्या आपल्याकडे अशा प्रकारच्या चर्चा ऐकण्यासाठी श्रोत्यांची वानवा असताना, हे पाहायला अभूतपूर्व वाटावे असेच. इथे बसण्यास जागा नसल्यास उभे राहून श्रोत्यांची श्रवणभक्ती सुरू होते. ऐकू न येणाऱ्या प्रेक्षकांसाठी चर्चासत्रांत वक्त्यांचे विचार सांकेतिक भाषेेत मांडणारी मंडळी होती. हा सर्वसमावेशक श्रोत्यांचा विचार या महोत्सवाला अधिकाधिक गुण मिळवून देणारा. इथे आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे, शालेय आणि कॉलेजमधल्या मुलांचा सहभाग. शाळकरी मुलांच्या पुस्तकांसाठी लागलेल्या रांगा. तर कॉलेजकुमार-कुमारींच्या पुस्तकाविषयी, लेखकांविषयीच्या रंगलेल्या चर्चा. गेल्या वर्षीचे आणि आताचे वक्ते, त्यांची भाषणे, त्यांच्या दर्जाविषयी चाललेली समीक्षा… नव्या पिढीला विचारास प्रवृत्त करणे म्हणजे आणखी दुसरे काय असते?
इथल्या चर्चासत्रांमध्ये एरवी आपल्याला भेटू शकतील अशी धुसर शक्यताही नसलेले वक्ते, विचारवंत, संशोधक यांचा सहभाग हाच उपस्थितांसाठी आकर्षणाचा विषय ठरतो. भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वेंकटरामन अर्थात वेंकी रामकृष्णन, भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी, जावेद अख्तर, कैलाश सत्यार्थी, एम. के. रैना तसेच अॅथनी सॅटिन यांसारखे परदेशी लेखक, पत्रकार, पर्यावरणतज्ज्ञ यांना ऐकायला, पाहायला मिळणं ही श्रोत्यांसाठी पर्वणीच होती.
काटेकोर नियोजन
इथली चर्चासत्रे, मुलाखतींसाठीचा वेळ फक्त ५० मिनिटांचा… या ५० मिनिटांचे बंधन प्रत्येक वक्त्याने पाळलेले… मग तो वक्ता कितीही मोठा असो. नोबेल मिळालेले असो वा बुकर. पण ठरलेल्या शिस्तीची समानता सर्वांसाठी सारखी. मग पुढच्या दहा मिनिटांत दुसरे सत्र सुरू. वाहावत जाणाऱ्या आणि इशस्तवनापासून वक्ता-सूत्रसंचालकाच्या नमनाला टँकरभर तेल ओतणाऱ्या आपल्याकडच्या ‘अखिल-भारतीय’ नाव लावणाऱ्या कार्यक्रम-उपक्रमांची गरिबी इथून सुरू होते. पाश्चात्त्य लेखक, विचारवंतांचा मोजक्याच शब्दांत आपला विचार मांडण्याचा, सोबतच्या वक्त्याचा आदर राखण्याचा आणि वेळ प्रसंगी श्रोत्यांचेही कौतुक करण्याचा गुण दिसून आला. आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे, आपण मंचावर कशासाठी बसलो आहोत, श्रोत्यांना आपण काय देऊ शकतो, याची पुरेपूर तयारी या वक्त्यांमध्ये प्रकर्षाने दिसली. कुठल्याही राजकारण्यांचा सन्मान-सत्काराचे, त्याच्या भोवतीच फिरण्याचे प्रकार दिसले नाहीत. व्यासपीठावर वक्त्यांशिवाय इतर कुणी अवांतर नसण्याचे दुर्मीळ प्रकार इथेच अनुभवायला मिळतात.
बिनधास्त मतांची बरसात…
आताशा हळूहळू भारतात बेधडकपणे विचार मांडणारे वक्ते दुर्मीळ होत चालले आहेत; आणि याची पक्की जाणीव भारतीय श्रोत्यांना आहे. परंतु इथले व्यासपीठ या धारणेस अपवाद असते. जावेद अख्तर, अमोल पालेकर, शशी थरूर, शांता गोखले यांसारख्या वक्त्यांनी थेटपणे आपली मते मांडली. काहींनी सध्याच्या समाज, राजकीय परिस्थतीवर उघडपणे परखड भाष्यही केले. तर काहींनी कोपरखळी मारत सत्य मांडले. अनेकांनी राज्यकर्त्यांसमोर आरसा ठेवला. त्यांच्या या भूमिकेला श्रोत्यांकडूनही कौतुकाची थाप मिळाली. म्हणजे समाजातील जाणत्यांनी समाजात सुरू असलेल्या अनिष्ट गोष्टींबद्दल भूमिका घेतली पाहिजे, त्यांनी उघडपणे बोलले पाहिजे… समाजाला एक दिशा दिली पाहिजे… कारण त्यांचे असे व्यक्त होणे समाजालाही अन्यायाविरोधात, चुकीच्या गोष्टींबद्दल आवाज उठविण्याचे बळ देते.
मराठीची नगण्य उपस्थिती…
या संमेलनात भारतात ठळकपणे प्रसिद्ध असलेल्या साहित्य प्रांतातील साहित्यिक, वक्ते यांचा चर्चासत्रामध्ये सहभाग होता. विशेषत: हिंदी. पंरतु नुकताच अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीचे प्रतिनिधित्व इथे फारसे दिसले नाही. अमोल पालेकर यांच्या पुस्तकानिमित्त त्यांची मुलाखत, शांता गोखले यांना वाणी प्रकाशनाने दिलेल्या अनुवादाच्या पुरस्कारासाठी त्यांचा सन्मान आणि ‘दलित किचन्स ऑफ मराठवाडा’ या पुस्तकाचे लेखक शाहू पाटोळे यांची मुलाखत… यापलीकडे मराठी साहित्यिक, कलावंताचा सहभाग नगण्यच. इथे भेटलेल्या मराठी मंडळींशी चर्चा झाली तेव्हा त्यांचेही हेच मत होते की, इथे मराठीचा सहभाग कधी वाढणार, आपण या महोत्सवातून कधी शिकणार? मराठीत अशा प्रकारचे महोत्सव कधी भरणार? मराठीतील साहित्य व्यवहारात कधी प्रगल्भ होणार… आपलं साहित्यव्यापाराचं दारिद्र्य कधी संपणार? आणि असा प्रगल्भ श्रोता कधी लाभणार… त्यांना एकत्र आणण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार का? मराठीत खूप उत्तम वक्ते, लेखक, अभ्यासक आहेत, त्यांना अशा प्रकारच्या व्यासपीठापर्यंत नेण्यासाठी मराठीतले साहित्य-वैचारिक विश्व समाजमाध्यमांच्या पलीकडे मोठे होण्याचा विचार करेल काय?
संगीताचा श्रवणीय माहोल…
या साहित्य उत्सवात ‘साहित्य एके साहित्य’ असे वातावरण नसते. त्यात कला-संगीतही दरवळते. सकाळच्या चर्चासत्रांची सुरुवात श्रवणीय शास्त्रीय संगीताने होते. यंदा मराठी माणसांसाठी एक कौतुकास्पद गोष्ट ठरली ती म्हणजे ‘विठ्ठल विठ्ठल’ गजर. कर्नाटकी शास्त्रीय गायक संदीप नारायण यांनी सुरुवातीला कर्नाटकी संगीत सादर केलं. मधेच ‘कानडा राजा पंढरीचा’ सादर केलं. तेव्हा त्यांच्या ‘विठ्ठल’ गजराला श्रोते इतके भारावून गेले या गाण्याला ‘स्टँडिंग ओव्हेशन’ मिळालेच परंतु श्रोत्यांनी त्यांना हे गाणं पुन्हा सादर करण्याची विनंती केली. इथली संध्याकाळ मात्र पाश्चात्त्य संगीताने भारलेली बनते… गाणं… वादन… आणि सौम्य मदिरामाहोलमध्ये बुडालेले संगीतप्रेमी जागोजाग दिसू लागतात.
‘मरगळी संमेलनां’ना शिकण्यासाठी काय?
आपल्या अवती-भोवती सध्या काय चालले आहे हे जरा आपल्या टाचा उंच करून पाहायला हवे. त्याची मराठी साहित्यिकांना, साहित्यप्रेमींना, मराठी जनांना नितांत गरज आहे. अशा महोत्सवातून अगदी नव्वद नाही, पण पन्नास टक्के तरी आपण काही शिकलो तरी मराठीतला साहित्यव्यववहार अधिक समृद्ध होईल, नेटका आणि व्यापक होईल. मराठी समजाही अधिक प्रगल्भ होत जाईल. तो भरकटणार नाही, विचार करायला लागेल… साहित्य संमेलनाची ९० वर्षांची परंपरा मिरविण्यात काय हशील? ज्यावेळेस तो साहित्यव्यवहार निरर्थकपणे फक्त काहींचे भले करण्यासाठी, जेवणावळींसाठी सुरू राहत असेल… अशा वेळी केवळ १८ वर्षांची परंपरा असलेल्या जयपूर साहित्य महोत्सवाकडून आपल्याला खूप काही घेण्यासारखे आहे. साहित्य संमेलनाची शंभरी गाठताना तसे झाले नाही, तर आपण निरुत्साहाने साजऱ्या होणाऱ्या ‘मरगळ संमेलनां’ची केवळ वर्षेच मोजण्यात समाधान मानू. साहित्यिक, वैचारिक प्रगल्भतेला पारखे होण्याचे दु:खद ओझे तर सध्या आहेच, ते वाढवायचे की कमी करायचे, हेच ठरायचे बाकी.
स्वाक्षरीसाठी गर्दी…
आपण ज्या लेखकाचे पुस्तक वाचतो आहोत, त्याला प्रत्यक्ष पाहतो ऐकतो आहोत. आणि विशेष म्हणजे त्यानेच लिहिलेल्या पुस्तकावर त्याची स्वाक्षरी घेऊन ते पुस्तक आपल्या संग्रही ठेवणार आहोत, चारचौघांत मानाने मिरवणार आहेात याचा कोण आनंद वाचकांमध्ये होता. हे लेखकही काही साधेसुधे नाहीत. आपल्या लेखनाने साहित्य क्षेत्रात दबदबा निर्माण करणारे… असा लेखक आपल्याशी संवाद साधतो, आपले दोन शब्द ऐकून घेतो याचा आनंदच विरळा… आणि तो पुस्तकप्रेमींच्या चेहऱ्यावर दिसत होता. काहींनी या वर्षी खास आपल्या मुलांना इथे काय घडतं आहे हे दाखविण्यासाठी आपल्या सोबत आणलं होतं हे कौतुकास्पद!
lata.dabholkar@expressindia.com