नरेंद्र भिडे
narendra@narendrabhide.com
मराठीजनांवर अधिराज्य करणाऱ्या नाटय़संगीतापासून लोकसंगीतापर्यंत विविध गानप्रकारांचा उगम, जडणघडण, त्यातली सौंदर्यस्थळे, त्यांचा सांस्कृतिक-सामाजिक प्रभाव आदीची चिकित्सा करणारे सूरमयी सदर..
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक मोठय़ा संगीतकारांनी वेगवेगळ्या धाटणीच्या चाली करून चित्रपटसंगीत एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यात सुधीर फडके, राम कदम, वसंत प्रभू, वसंत पवार, हृदयनाथ मंगेशकर, आनंद मोडक आणि अजय-अतुल ही प्रमुख नावं. इतरही बरेच मान्यवर संगीतकार होऊन गेले. पण वरील सर्व संगीतकारांच्या रचनांना स्वत:ची एक ओळख (आयडेंटिटी) आहे; ज्यामुळे अमुक एक गाणं याच संगीतकाराचं आहे, हे सहजपणे ओळखू येतं. पण काही मोजक्याच गाण्यांना चाली देऊन आपला स्वत:चा एक स्वतंत्र ठसा उमटवणारे काही संगीतकारही आहेत. यात एक मोठं आणि प्रमुख नाव आहे ते ‘आनंदघन’ म्हणजेच लता मंगेशकर!
आनंदघन यांच्या गाण्यांची संख्या पस्तीस-छत्तीसच्या वर नाही आणि त्या सर्व गाण्यांमध्ये एक समान सूत्र प्रकर्षांनं जाणवतं. बाकी सर्व संगीतकार हे आपल्या स्वररचनांकरता वेगवेगळ्या संगीतपद्धतींचा किंवा जॉनर्सचा वापर करताना दिसतात. उदा. बाबूजींच्या संगीतात आपल्याला बालगंधर्वाच्या कुळातील नाटय़संगीत आणि भावसंगीत यांचा संगम दिसतो. वसंत पवारांच्या संगीतामध्ये लावणीचा वापर भरपूर असला तरीही ‘जे वेड मजला लागले’सारख्या भावगीतप्रधान रचना, ‘घनघनमाला’सारखी शास्त्रीय गाणी किंवा ‘चांदण्या रात्रीतले’सारखी गझल ऐकायला मिळते. हृदयनाथ मंगेशकर आणि आनंद मोडक यांनी तर आपल्या संगीतामध्ये जुनं नाटय़संगीत, जुनं शास्त्रीय संगीत आणि बऱ्याचदा काही पाश्चात्त्य रचनांचा केलेला अभ्यासही पदोपदी जाणवतो. अजय-अतुल यांच्या संगीतात मराठी लोककला ते पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत असा एक मोठा मनोहारी पटच आपल्याला अनुभवायला मिळतो. पण आनंदघन यांचं संगीत मात्र या विविधतेपासून दूर आहे. तसं म्हटलं तर या सर्व रचना वरवर पाहता एकाच पद्धतीच्या आहेत; पण तरीही त्यांच्यात कुठंही एकसुरीपणा नाही.
लताजींनी संगीतकार म्हणून केलेलं काम हे बहुतकरून भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटांकरता केलेलं आहे. यात ‘तांबडी माती’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘साधी माणसं’, ‘मराठा तितुका मेळवावा’सारखे भालजींचे मलाचा दगड म्हणता येतील असे चित्रपट आहेत. लताजींनी गायिका म्हणून असंख्य संगीतकारांकडे वेगवेगळ्या प्रकारची गाणी वेगवेगळ्या भाषांमध्ये गायली. अगदी स्वत:च्या घरातसुद्धा बाळासाहेबांसारखा सख्खा भाऊ असतानाही त्यांच्या रचनांवर मात्र इतर कुठल्याही संगीतकाराचा किंचितही प्रभाव पडलेला दिसत नाही. गायिका म्हणून लताजी जे गाणं गातात, ते गाणं पूर्णपणे लता मंगेशकर यांचं होतं. ते त्या संगीतकाराचं राहत नाही. असा अनुभव इतर गायकांच्या तुलनेत लताजींच्या बाबतीत बराच जास्त आलेला दिसतो. तो प्रकार आनंदघन या संगीतकाराच्या बाबतीत मात्र होत नाही. त्यामुळे आनंदघन यांची गाणी आनंदघन यांचीच राहतात. अगदी लताजींनी ती गायली तरीही.
अस्सल मराठी वळणाच्या चाली आणि त्यानुसार जमवलेला वाद्यमेळ हा या संगीताचा आत्मा आहे. इतर संगीतकारांनी लावण्या, पोवाडे, भारूड यांसारखे पूर्णपणे मराठमोळे असलेले बरेच संगीतप्रकार हाताळले. लताबाईंची गाणी ही कुठल्याही अर्थाने अशा ढोबळ पद्धतीची मराठी गाणी नाहीत, पण तरीही ती पूर्णपणे मराठी आहेत. त्यातील ‘मराठीपण’ नक्की कशात दडलेलं आहे, हे शोधून काढणं तितकंसं सोपं नाही. आणि हे कोडंच त्या गाण्यांना एक अमूर्त सौंदर्य प्राप्त करून देतं. पण एक मात्र नक्की, त्या गाण्यांमध्ये लताजींमधल्या संगीतकाराने लताजींमधल्या गायिकेला नियंत्रित ठेवण्यात पुरेपूर यश मिळवलेलं आहे. एखादी अवघड चाल बांधणं आणि ती आरामात गाणं त्यांच्यासाठी अतिशय सोपंच असणार यात काहीच शंका नाही. सलील चौधरी, मदनमोहन, सी. रामचंद्र किंवा मराठीमध्ये हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे आणि वसंत प्रभू यांच्यासारख्या दिग्गजांची क्लिष्ट (मात्र, कोणत्याही अर्थाने वाईट नव्हे!), पण तरीही सुमधुर गाणी लताबाईंनी सहजपणे गायली आहेत. आणि इथं तर त्यांची स्वत:चीच गाणी होती. त्या स्वत:च गाणार होत्या. तेव्हा अत्यंत चमत्कृतीपूर्ण अशा रचना सादर करून लोकांना आश्चर्यमुग्ध करणं त्यांना थोडंच अवघड असणार? पण तरीही लताबाईंनी ‘आनंदघन’ म्हणून संगीतावर काम करताना खूप संयम पाळलेला दिसतो. किंबहुना, संयम हाच त्या गाण्यांचा स्थायीभाव आहे. एखाद्या घरंदाज घरातील कुलीन आणि स्वत:चा धाक असलेल्या, पण तरीही प्रेमळ आणि सर्वाना हव्याहव्याशा वाटणाऱ्या एखाद्या माऊलीसारखी ही गाणी आहेत.
म्हणजे ती गाणी सोपी आहेत का? तर- नाही! पण मला असं वाटतं, अवघडपणा आणि क्लिष्टपणा यांचे दोन प्रकार असतात. एक निर्मितीतला वा सादरीकरणातला अवघडपणा आणि दुसरा- एखादं संगीत ऐकताना, त्याचं रसग्रहण करताना येणारा अवघडपणाचा अनुभव. आनंदघन यांची गाणी ऐकली की ती गाणी आपल्याला खूप सहज वाटतात.. जोपर्यंत आपण ती स्वत: गायला जात नाही! उदा. ‘मागते मन एक काही..’ हे ‘तांबडी माती’मध्ये एक गाणं आहे. हे गाणं ऐकायला इतकं लोभस आहे, की माणूस सहजपणे ते गुणगुणायला जातो आणि गाण्याच्या दुसऱ्याच ओळीत फसतो. जिथे क्रॉस लाइन ध्रुवपदावर येते तो मधला सांधा इतका संयमित पद्धतीने बांधलेला आहे, की तो संयम पाळून जराशीही मर्यादा न ओलांडता त्यातलं सौंदर्य उलगडून दाखवणं ही गायकाकरिता एक अत्यंत कठीण परीक्षा आहे. लताजी ती सहजपणे पार पाडतात. आनंदघन यांच्या गाण्यांमध्ये अजून एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते, ती म्हणजे त्या गाण्यांचा वाद्यवृंद! इतका कमीत कमी वाद्यवृंद इतर संगीतकारांच्या गाण्यांमध्ये फार क्वचित ऐकायला मिळालेला आहे. काही ठिकाणी तर नुसतं व्हायोलिन किंवा कोकासारखं एखादं वाद्य किंवा बासरी आणि संतूर अशी एखाद् दोनच वाद्यं आहेत. पण तरीही त्या गाण्यांच्या चाली इतक्या अस्सल आणि सेंद्रिय आहेत, की त्यातच आपण गुंतून जातो. ‘ऐरणीच्या देवा तुला..’ हे गाणं तर मला कुठल्याही अर्थाने जुनं गाणं वाटतच नाही. मला या गाण्यात आणि आजच्या श्रेष्ठतम ए. आर. रेहमान यांच्या गाण्यांमध्ये कमालीचं साम्य वाटतं. उदाहरणार्थ, लोकसंगीतावर आधारित रेहमान यांची गाणी आणि त्यात केलेला साउंडचा वापर हा ‘ऐरणीच्या देवा तुला..’मध्ये केलेल्या लोहाराच्या भात्याच्या वापराशी खूप साधम्र्य सांगणारा आहे. पक्र्यूशन्स किंवा छोटी तालवाद्यं यांचा अत्यंत भन्नाट वापर आणि त्याला अर्थानुरूप बासरीची साथ हे अतिशयच जमून आलेलं आहे.
दुसरा एक प्रकार लताजींच्या गाण्यांमध्ये खूप छान पद्धतीने आढळतो, तो म्हणजे ‘मेडले’ किंवा मोंताज साँग. ‘मराठा तितुका मेळवावा’मधील ‘स्वराज्य तोरण चढे’ हे गाणं त्या अर्थाने वेगवेगळ्या अनेक गाण्यांचा गुंफलेला एक सुंदर हार आहे. या पद्धतीचं गाणं आधी मराठी चित्रपटसृष्टीत खूप अभावाने आढळत असे. आणि आढळलं तरी त्याची परिणामकारकता या गाण्याइतकी नाही. वेगवेगळ्या रागांत, वेगवेगळ्या तालांत आणि वेगवेगळ्या गायकांकडून (हेमंतकुमार यांचं कास्टिंग हा तर मास्टरस्ट्रोक आहे.) गाऊन घेतलेलं हे गीत खूप रोमांचित करणारं आहे.
लताजींच्या गाण्यांमध्ये तालाशी केलेला खेळ हा आणखी एक अत्यंत मोहक प्रकार आढळतो. ‘माझ्या कपाळीचं कुकू’ हे खेमटासदृश एका तालामध्ये सुरू होतं. अचानक ‘जीव भरला भरला भरला..’ या ओळीला त्यातला ताल पूर्णपणे बदलून एक निराळंच गतिमान रूप धारण करतो आणि त्या ओळीनंतर परत पूर्वपदावर येतो. हाच प्रकार आपल्याला ‘जा जा रानीच्या पाखरा..’ या गाण्यामध्ये सापडतो. आणि हे सर्व खूप सहजपणे, कुठल्याही अभिनिवेशाशिवाय घडतं. या सर्व सांगीतिक ट्रान्झिशन्समध्ये कुठंही तसूभरही फ्रिक्शन नाही. हा सोपेपणा हेच यातलं खरं आव्हान आहे.
लताजींची बहुतेक गाणी त्यांनी स्वत:च गायली आहेत आणि त्यामुळे संगीतकार आणि गायक यांच्यामध्ये होणारा ‘कम्युनिकेशन लॉस’ इथे संभवतच नाही. अभावानेच त्यांनी दुसऱ्या स्त्री-गायकाचा विचार केलेला दिसतो. त्यात एक अत्यंत सुंदर लावणी आह.. ‘रेशमाच्या रेघांनी..’ इथे मात्र त्यांनी आशाजींना गायला बोलावलं आहे. जिथे पुरुष गायक हवे होते तिथे त्यांनी पं. हृदयनाथजींसारखा गायक वापरला आहे. ‘नको देवराया, अंत आता पाहू’ किंवा ‘शूर आम्ही सरदार आम्हाला..’ किंवा ‘डौल मोराच्या मानंचा’सारखी अत्यंत गोड, पण तरीही त्यातला ‘रॉ’नेस कुठेही हरवू न देता तयार झालेली अशी खूप गाणी आनंदघन या संगीतकाराकडून आपल्याला ऐकायला मिळतात.
आनंदघन यांनी फार चित्रपटांना किंवा फार गाण्यांना संगीत दिलं नाही याची रुखरुख निश्चितच आहे. पण तरीही असं वाटतं की त्यांनी कमी गाण्यांना संगीत दिलं म्हणूनच त्यांच्यातलं वेगळेपण जास्त प्रकर्षांने जाणवतं. खूप जास्त संगीत दिलं असतं तर हा सहजभाव आणि ही अस्सलता (ओरिजिनॅलिटी) टिकली असती की नाही, हे मात्र सांगता येत नाही. कदाचित ‘प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी’ची केस निर्माण झाली असती. एक मात्र नक्की.. मोजकीच गाणी देऊन हिंदी चित्रपटसृष्टीत पं. रविशंकरजींना जे अढळ स्थान आहे, तेच मराठीमध्ये आनंदघन यांना आहे. त्यांची गाणी हरेक हंगामात बहर देणाऱ्या सुगंधी फुलांसारखी नसतील कदाचित; पण वर्षांतून एकदाच उमलणाऱ्या ब्रह्मकमळासारखी मात्र निश्चित आहेत. आणि त्यातच त्यांचं श्रेष्ठत्व आणि एकमेवाद्वितीयपण आहे, हे निर्विवाद!