‘पाचूचा देश’ अशी ख्याती असलेला आणि भारतीय संस्कृती तसेच बौद्ध धर्माशी आतडय़ाचे नाते असलेला श्रीलंका हा आपला चिमुकला शेजारी देश. मध्यंतरीच्या काळात तमीळ फुटीरवाद्यांच्या दहशतवादी कारवायांमुळे जरी त्याचे आपले संबंध ताणले गेले असले तरी आता पुनश्च उभयतांचे मनोमीलन होत आहे. उद्या- ४ फेब्रुवारी हा श्रीलंकेचा स्वातंत्र्यदिन. त्यानिमित्ताने तिथली अगत्यशील माणसे, रमणीय निसर्ग आणि समाजव्यवहार याबद्दलचा हृद्य अनुभव कथन करणारा लेख..
‘इंडियातून आलात?’ हॉटेलची खोली साफ करता करता त्यानं मोडक्यातोडक्या इंग्रजीत विचारलं. मी मान हलवूनच ‘हो’ म्हटलं. त्याचा चेहरा खुलला. त्याचे हसरे डोळे आणखीनच चमकले. त्यानं हात पुढं केला. पण क्षणात तो मागंही घेतला. आपण हॉटेलचे नोकर आहोत याची त्याला जाणीव झाली असावी.
मग मी हात पुढे केला. हस्तांदोलनासाठी. त्यानं संकोचतच आपला हात पुढे केला. माझ्या हातात हात मिळवत तो खळखळून हसला.
‘अवर बिग ब्रदर..’ तो म्हणाला. ते अर्थात भारताविषयी होतं. नमस्कार करून तो बाहेर पडला.
..नंतर दिवसभर हॉटेलमध्ये तो माझी सरबराई करत होता. गप्पा मारत होता. आपल्या देशाचा, इथल्या संस्कृतीचा अभिमान त्याच्या शब्दा-शब्दातून व्यक्त होत होता.
नोव्हेंबर-डिसेंबरात श्रीलंकेतील प्रत्येक कोपरा पर्यटकांनी फुलून गेलेला असतो. इथे फिरताना एखादं आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संमेलन असावं असा भास होतो. डोंगरदऱ्यांत, समुद्रकिनाऱ्यांवर, चहाच्या मळ्यांत आणि नारळाच्या बागांमध्ये दिवसभर विसावणाऱ्या सूर्यकिरणांचं कोवळेपण संध्याकाळी सूर्य मावळतीला जाईपर्यंत टिकून असतं. मधूनच एखादी पावसाची सर कोसळते आणि पानापानांवरील कोवळ्या किरणांतून पाण्याचे थेंब मोत्यासारखे चमकू लागतात. श्रीलंकेच्या मातीतलं हिऱ्या-माणकांचं हे वैभव पर्यटकांना भुरळ घालू लागतं.
भारताच्या संस्कृतीत श्रीलंकेचं महत्त्व अधोरेखित झालेलं आहे. या टिकलीएवढय़ा देशाचा भारताच्या पायथ्याशी असलेला नकाशा अश्रूच्या थेंबासारखा दिसतो म्हणून त्याला ‘भारताचा आनंदाश्रू’ म्हटलं जातं, असं कुणीतरी एकदा सांगितलं होतं. श्रीलंकेत पाऊल ठेवल्या क्षणापासून भारतात परतेपर्यंत या देशाचं हे वर्णन मला सारखं आठवत होतं. या देशाला ‘दुखाच्या अश्रूं’चं वावडं असावं हेही सतत जाणवत होतं. कारण आठवडाभराच्या तिथल्या भटकंतीत मला भेटलेला, मी दूरवरून पाहिलेला, किंवा आसपास वावरणारा एकही माणूस दु:खानं रडवेला झालेला मी पाहिला नाही. प्रत्येकजण हसणारा. आयुष्य हे हसण्यासाठीच आहे, हे तत्त्वज्ञान सहजपणे आचरणारा.
श्रीलंका ही लक्ष्मीची बहीण असल्याचं वर्णन आपल्या पुराणांत आहे. ऐश्वर्याचं प्रतीक असलेली अशी ही सुवर्णमय लंका. इथल्या खनिजांमध्ये कुबेराचा खजिना दडलाय. इथल्या निसर्गात स्वर्गाचं रम्यपण ओसंडून वाहतंय. इथल्या माणसांच्या मनांत आपल्या देशाच्या या वैभवाचं समाधान वसलंय.
..कोलंबो विमानतळावर उतरून पहाटे मी बाहेर पडलो तेव्हा त्याच विमानानं श्रीलंकेच्या भूमीवर पाऊल टाकणाऱ्या असंख्य पर्यटकांच्या स्वागतासाठी स्थानिक यजमान हसतमुखाने बाहेर उभे होते. हातात प्रवाशांच्या नावाचा फलक घेतलेले अनेकजण आपापल्या पाहुण्याची वाट पाहत होते. गंमत म्हणजे समोरून पुढे सरकणाऱ्या प्रत्येकाचंच आदरानं आणि सौम्य स्मितहास्यानं सहजतेनं ते स्वागत करत होते. श्रीलंकेच्या पर्यटन खात्याचा कुणीतरी माझ्यासाठी विमानतळावर येणार होता. त्या गर्दीतून माझ्या नावाचा फलक घेतलेला कुणी दिसतो का, म्हणून शोधत मी पुढे सरकत होतो तेव्हा या अनुभवानं मी सुखावलो. मला हॉटेलवर घेऊन जाण्यासाठी आलेला पर्यटन खात्याचा तो कर्मचारी अखेर मला दिसला आणि मी लांबूनच हात हलवला. लगबगीनं पुढे येऊन त्यानं माझ्याशी हसतमुखानं हस्तांदोलन केलं, आणि क्षणात मागे वळून काही मिनिटांतच तो गाडी घेऊन आला. त्यानं हक्कानं माझ्या हातातलं सामान उचललं आणि गाडीत ठेवून अदबीनं मला बसण्याची खूण केली.
विमानतळावरून हॉटेलपर्यंतच्या त्या पंधरा-वीस मिनिटांच्या प्रवासातील गप्पांमुळे आपण परदेशात आलो आहोत, ही जाणीव पुरती पुसून गेली होती.
तोवर बाहेर उजाडलं होतं. नुकतीच पावसाची एक सर पडून गेली होती. कोलंबो कसं धुतल्यासारखं स्वच्छ दिसत होतं!
श्रीलंकेच्या राजधानीचं हे देखणं, नीटनेटकं शहर. चकचकीत. कुठेही कचरा नाही. शिस्तीत, शहाण्यासारखी धावणारी वाहनं. लांब-रूंद रस्त्यांवर वर्दळ सुरू होती. वाहनांची गर्दीही बऱ्यापैकी जाणवू लागली होती. पण मोजक्याच चौकांत सिग्नल. बाकी मधे मधे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे.. पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी. वाहनांची कितीही मोठी झुंबड रस्त्यावरून वाहत असली तरी क्रॉसिंगवरून निर्धास्तपणे रस्ता ओलांडणारी माणसं आणि समजूतदारपणे थांबणारी वाहनं.. हा पहिलाच अनुभव तोंडात बोटं घालायला लावणारा होता. इथल्या वाहतूक संस्कृतीनं पादचाऱ्यांचा सन्मान ठेवलाय हे जाणवलं आणि अक्षरश: गदगदायला झालं. मग मी उगीचच एक-दोन वेळा गर्दीच्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असताना झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडण्याचा आनंददायक अनुभवही घेतला. आपण जीव धोक्यात घालतोय असं जरासुद्धा वाटलं नाही!
हॉटेलवर गेल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने माझा निरोप घेतला आणि ‘आता तुम्ही निवांत विश्रांती घ्या,’ असं सांगून तो बाहेर पडला. ‘काही लागलं तर नि:संकोच फोन करा,’ असं सांगून तो निघून गेला. रात्रभरच्या जागरणामुळे डोळ्यावर झोप होती. पण डोळे मिटतच नव्हते.
कोलंबोच्या जुन्या पार्लमेंट हाऊससमोरील गलदारी नावाच्या त्या आलिशान हॉटेलच्या खिडकीतून समोरचा अथांग, निळाशार समुद्र शांतपणे पसरलेला दिसत होता. किनाऱ्याला समांतर जाणाऱ्या एका रेखीव रस्त्यावरून वाहनांची वर्दळ सुरू होती. पलीकडच्या बाजूला विस्तीर्ण मैदानावर भुरळ घालणारी हिरवळ पसरली होती. त्यातूनच एक लहानसा कालवा वाहत होता. त्यात हंस विहरत होते. बगळ्यांच्या रांगा आकाशात घिरटय़ा घालत होत्या. खिडकीबाहेरचं हे भुलवणारं दृश्य पाहताना झोप पळाली आणि तयार होऊन मी बाहेर रस्त्यावर आलो.
समोरच्या मैदानावर श्रीलंकेच्या नौदलाच्या कवायती सुरू होत्या. हॉटेलच्या काऊंटरवर स्वागतकक्षातील तरुणाकडे मी सहज चौकशी केली. भारताच्या नौदलाचे प्रमुख त्या दिवशी कोलंबोत होते. त्यांच्या मानवंदनेचा सराव सुरू होता.
‘भारत आमचा मोठा भाऊच आहे..’ तो म्हणाला, आणि मला खोलीत त्या सफाई कर्मचाऱ्याशी झालेल्या संवादाची आठवण झाली. मी हसून मान हलवली. त्यानंही लगेच हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. मी त्याच्या हातात हात दिला. बराच वेळ त्यानं माझा हात पकडून ठेवला होता. नंतर एकदम भानावर आल्यासारखा त्यानं माझा हात सोडला आणि माझ्यासोबत हॉटेलबाहेर आला.
‘फिरून येणार?’ त्यानं विचारलं. मी मानेनंच ‘हो’ म्हटलं.
मग त्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाला खुणेनंच जवळ बोलावलं आणि सिंहलीतून त्यांचं काहीतरी बोलणं झालं. बहुधा तो माझी ओळख करून देत होता. त्या तरुणानं माझ्याकडे बघून ओळखीचं हास्य केलं, हलकंसं हस्तांदोलन केलं आणि आपल्याबरोबर यायची खूण करून तो चालू लागला.
मीही त्याच्या मागोमाग निघालो. भारताबाहेरच्या एका देशात, एका अनोळखी शहरात, एका अनोळखी तरुणाबरोबर काहीही माहिती नसताना आपण चाललो आहोत असं मला त्यावेळी जरादेखील जाणवलं नाही.
काही पावलं चालल्यानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या. मोडक्यातोडक्या इंग्रजीतून तो संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता. चार-पाच पिढय़ांपूर्वी कधीतरी त्याचे पूर्वज तामिळनाडूतून श्रीलंकेत आले होते. आता तो श्रीलंकन होता. पण आपलं भारताशी नातं आहे, त्या मातीत आपलं मूळ रुजलं आहे, हे सांगण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. मी त्याच्या भावना जाणल्या. आणि त्याचा हात नकळत हातात घेतला.
क्षणभर त्याला भरून आल्याचं मला जाणवलं.
नंतरचे तीन-चार तास तो माझ्यासोबत होता. त्यानं मला सगळं कोलंबो शहर फिरवलं. एका रिक्षावाल्याशी बोलून त्यानं रिक्षा ठरवली आणि आम्ही फिरू लागलो. कोलंबो हे बेटांचं शहर आहे. शहरातून लहान-मोठय़ा नद्या वाहतात, समुद्रात मिळतात. प्रत्येक बेटाचा इतिहास जणू त्या तरुणाला अवगत होता. त्यानं कोलंबोतले शॉपिंग मॉल्स दाखवले. रत्ने, मोत्यांची दुकाने दाखवली. लोककला आणि हस्तकलांच्या अड्डय़ांवर फेरफटका घडवला. दुपारनंतर कधीतरी त्याला एकदम आठवण झाली.. ‘तुमचं जेवण व्हायचंय ना?’ त्यानं विचारलं; तेव्हा आम्हालाही भुकेची जाणीव झाली. लगेचच त्यानं रिक्षावाल्याला काहीतरी सांगितलं. गल्ल्याबोळ फिरून एका मॉलसमोर रिक्षा थांबली.
‘इथे आतमध्ये एक रेस्टॉरंट आहे. परवडणारं! खास श्रीलंकन सीफूड तिथे मिळेल. फार महागही नाही. तुम्ही जेवून या. आणि तुमचं हॉटेल आता इथून फार लांब नाही. सरळ गेलात की काही मिनिटांवरच आहे..’
मी त्यालाही सोबत जेवणाचा आग्रह केला. पण त्यानं नकार दिला. ‘मी इथे बाहेरच थांबतो. तुम्ही जेवून या..’ तो म्हणाला.
आम्ही आत गेलो आणि श्रीलंकेच्या सागरी अन्नसंपदेचं चटकदार वैभव आम्हाला अनुभवायला मिळालं.
तृप्त होऊन बाहेर आलो, पण तिथे तो नव्हता. आजूबाजूलाही कुठे नव्हता. रिक्षावालाही दिसला नाही. खूप शोधलं, पण तो गायब झाला होता. मग चालतच निघालो. हॉटेलवर पोहोचलो. रिसेप्शन काऊंटरवरच्या ज्या तरुणानं आम्हाला त्या तरुणाकडे सोपवलं होतं, त्याला हा प्रकार सांगितला. तो मंद हसला. माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. अशा भावनांना भाषेची गरज नसते. त्यानं ते ओळखलं.
‘तुम्ही काही काळापुरते त्याचे पाहुणे होता. त्यानं तुमचा पाहुणचार केला..’ काऊंटरवरचा तो तरुण म्हणाला.
‘पण त्यानं ठरवलेली रिक्षा.. त्याचे पैसे न घेताच ते गायब झाले..’ मी काहीसा नाराजीनंच म्हणालो.
‘तोच तर पाहुणचार! तुम्ही बरोबर असताना त्यानं रिक्षाचे पैसे देऊ केले असते तर तुम्हाला ते आवडलं नसतं. म्हणून त्यानं असं केलं..’ तो म्हणाला.
‘पण मला त्याला भेटायचंय..’ मी म्हणालो. त्यानं त्याची भेट घडवायचं कबूल केलं.
दुपारी हॉटेलच्या खोलीत पहुडलो असताना फोन वाजला. मी खाली आलो. तो तरुण काऊंटरवरच्या तरुणाशी गप्पा मारत होता. मला बघून हसतच तो पुढे आला. त्यानं पुन्हा हातात हात घेतले. माझ्या डोळ्यांत बघत तो बराच वेळ स्वस्थ उभा राहिला.
‘तुम्ही भारतातून आलाहात ना, म्हणून त्यानं तुमचा पाहुणचार केला..’ काऊंटरवरचा तो तरुण म्हणाला. पहिल्या ओळखीत त्यानं तेच नातं जोडलं होतं. भारताविषयीच्या त्याच्या भावनांना आमच्या ओळखीमुळे वाट मिळाली होती. एका अनोळखी देशातील एका नवख्या शहरात जुळलेला आपलेपणाचा एक अनोखा धागा पहिल्याच दिवशी माझ्या मनावर कोरला गेला. पुढे अशाच अनेक अनुभवांनी हा धागा आणखीनच घट्ट होत गेला..
दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही तयार झालो आणि श्रीलंका पर्यटन खात्याच्या कर्मचाऱ्याचा फोन आला. कालचाच माणूस पुढच्या प्रवासात आमच्यासोबत राहणार होता. आम्ही खूश झालो. त्याचं नाव- प्रसाद. त्याच्या मोटारी आहेत. श्रीलंका टुरिझमसोबत कंत्राट असल्यामुळे जगभरातल्या पर्यटकांना देश फिरवण्यात तो धन्यता मानतो. आम्ही तर भारतातून आलेले; त्यामुळे त्याला आमच्याविषयी वेगळाच जिव्हाळा वाटत होता असं जाणवत होतं. सहज बोलता बोलता त्याचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आणि उत्तरही मिळालं.
प्रसाद बौद्धधर्मीय होता. श्रीलंकेत सिंहलींपाठोपाठ बौद्धांची संख्या मोठी आहे. बौद्ध धर्माचा जन्म भारतातला. म्हणून प्रसादला भारताविषयी प्रचंड आत्मीयता. आपल्या पवित्र धर्माचा पाया जिथे रचला गेला, त्या पवित्र देशातले लोकही पवित्र- असा त्याचा सरळ-साधा हिशेब होता.
कोलंबोतील गलदारी हॉटेलमधून पुढच्या प्रवासासाठी बाहेर पडताना आदल्या दिवशी खोली साफ करायला आलेला तो मुलगाही समोर हजर होता. मी खिशात हात घातला हे पाहताच तो झपाटय़ाने वळून गायब झाला. गाडीत बसताना मी सहज मागे बघितलं. तो तिथे उभा होता. त्यानं हात हलवून निरोप दिला. काही भावनांना भाषेची गरज नसते, हे पुन्हा एकदा मला उमगलं.
कोलंबोहून आमचा पुढील प्रवास सिगिरीया नावाच्या एका ऐतिहासिक स्थळाकडे सुरू झाला होता. जवळपास ३०० कि.मी.च्या या प्रवासात श्रीलंकेच्या पर्यटन विकासाच्या नियोजनबद्धतेचं पुरेपूर दर्शन घडतं. आखीव, स्वच्छ, गुळगुळीत रस्ते, जाणीवपूर्वक जपलेली आणि जोपासलेली निसर्गसंपदा आणि पर्यटकांचा हसतमुख पाहुणचार करणारी माणसं- ही इथल्या पर्यटनविकासाची त्रिसूत्री!
या प्रवासात वाटेवर एक लहानसं पक्षीअभयारण्य लागतं. निबीड जंगलात एके ठिकाणी एका लहानशा टपरीवर आम्ही थांबलो. दुपार झाली होती. लगेचच एका माणसानं समोर एका वेताच्या लहानशा परडीत गरमगरम रोटी आणून ठेवली. बाजूला झणझणीत चटणी. त्या मस्त वातावरणात त्या खास गावरान श्रीलंकन जेवणानं तृप्ततेचा आगळा अनुभव दिला. नारळाचा कीस मिसळून नारळाच्याच पाण्यात मळून थापलेल्या त्या रोटीचा स्वाद अफलातून होता. जेवणानंतर नारळपाण्याने तृप्त होऊन आम्ही पुढे निघालो. नंतर बराच वेळ उजव्या हाताचा तळवा नाकाशी नेत मी त्या स्वादाचा आनंद पुन:पुन्हा अनुभवत होतो.
संध्याकाळी सिगिरीयाला पोहोचलो तेव्हा अंधार पडू लागला होता. श्रीलंकेच्या जंगलात असंख्य पशू आहेत. बिबटे, हत्ती आणि अन्य जंगली प्राणी हे पर्यटकांचे खास आकर्षण. पण इथे सिंह नाहीत. तरीही श्रीलंकेच्या संस्कृतीचं सिंहाशी नातं आहे. सिंहली संस्कृतीचा उगम सिंहापासून झाल्याची इथे भावना आहे. इथल्या माणसाच्या अंगात सिंहाचं रक्त सळसळतं अशी समजूत प्रत्येकाच्या मनात जाणीवपूर्वक जागी ठेवली जाते. त्यामुळे इथला माणूस निर्भय आहे, त्याला पराक्रमाचं वेड आहे, असं सिगिरीयाला पोहाचताना प्रसादनं सांगितलं.
सिगिरीया हे श्रीलंकेतल्या एका पुरातन कथेचे मूळ आहे. सोळाशे वर्षांपूर्वी कश्यप नावाच्या राजाने बापाची हत्या करून राज्य बळकावले. या कश्यपाला पाचशे बायका होत्या. इथल्या उंच पहाडावर त्याने आपल्या बायकांसाठी सुसज्ज असे महाल उभे केले. त्यांच्यासाठी तरणतलाव बांधले. उन्हाळ्यात पहाडाच्या टोकाला आणि अन्य काळात पहाडाच्या मध्यावर असलेल्या महालांमध्ये कश्यपाचे विलासी जीवन व्यतीत होत असताना त्याच्या परागंदा भावाने काही भारतीयांच्या साह्य़ाने कश्यपावर हल्ला केला आणि दहा वर्षांत त्याचे राज्य संपवले, अशी कथा आहे. कश्यपाच्या या विलासी संस्कृतीचे असंख्य अवशेष सिगिरीयाच्या पहाडावर अजूनही आढळतात. या पहाडावर कोरलेली रंगचित्रे अजंठा-वेरुळ संस्कृतीशी नातं सांगतात. श्रीलंकेच्या इतिहासाची वैभवचिन्हे असलेली ही चित्रं न्याहाळताना भारताचं श्रीलंकेसोबतचं नातं आणखीनच जवळचं होऊन जातं. सिगिरीयाच्या प्रवेशद्वारापाशीही सिंहाच्या पुढच्या पंजाची भव्य शिल्पं आहेत. येथूनच आपल्याला इतिहासाच्या या पाऊलखुणांमध्ये प्रवेश करावा लागतो. आणि पुढच्या काही तासांत आपण इतिहासात हरवून जातो.
सिगिरीया ते कॅन्डी हाही आल्हाददायक प्रवास आहे. श्रीलंकेत लांबच्या प्रवासात रस्त्याच्या एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला डोंगराच्या कुशीतली कंच, हिरवीगार, फुलांनी बहरलेली झुडपं असं सुखावणारं दृश्य सतत सोबतीला असतं. डोंगरातून वाहणारे झरे कुठं कुठं धबधब्याचं रूप घेऊन कोसळताना दिसतात. दुसऱ्या बाजूला दरीत धुक्याचे पदर उलगडत असतात. कॅन्डी हे श्रीलंकेतलं कोलंबोखालोखाल मोठं असलेलं दुसरं शहर. आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर मेळ या शहरात जाणवतो. अर्थात पर्यटन व्यवसायाची गरज म्हणूनच तो जाणीवपूर्वक जपला गेलाय. इथल्या श्री दालदा मलिगावा नावाच्या आलिशान राजेशाही प्रार्थनास्थळाला बौद्ध-धर्मीयांमध्ये तीर्थक्षेत्राचं स्थान आहे. भगवान बुद्धाचा पवित्र दात या मंदिरात आहे. त्यामुळे जगभरातल्या पर्यटकांबरोबरच बौद्ध भाविकांचीही इथे रीघ लागलेली असते. वास्तुकलेचा अप्रतिम नमुना म्हणूनही या वास्तूचे आगळे माहात्म्य आहे. कॅन्डी ही सिंहली साम्राज्याची अखेरची राजधानी आणि जागतिक वारसा- यादीतील एक महत्त्वाचे स्थान म्हणून जगप्रसिद्ध आहे. या पवित्र अवशेषांना राजकीयदृष्टय़ाही विशेष महत्त्व आहे. ही वास्तू ज्याच्या ताब्यात असते, त्याचे देशावर राज्य असते अशी येथील समजूत आहे.
कॅन्डीजवळील शाही वनस्पती उद्यान हे आधुनिकतेने प्राचीनतेशी जपलेल्या नात्याचे एक अद्भुत उदाहरण आहे. श्रीलंकेच्या शेकडो वर्षांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले असंख्य पुरातन वृक्ष या उद्यानात जपलेले आहेत. जवळपास दीडशे एकर क्षेत्रातील या उद्यानाच्या परिसरात वर्षांतील २०० दिवस पावसाळाच असतो. त्यामुळे तेथील हिरवाई ही पर्यटकांसाठी अनोखी अपूर्वाई आहे. ‘प्रसादने’ या उद्यानाचा फेरफटका मारताना अनेक झाडांची पाने हळुवारपणे उलटीसुलटी करून त्यांच्या गुणावगुणांची माहिती दिली जाते. श्रीलंका हे निसर्गसुंदरच नव्हे, तर निसर्गसंपन्न बेट आहे याची पहिली चुणूक इथे अनुभवायला मिळाली.
कॅन्डी शहरात एक थिएटर आहे. दिवसभराच्या पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर संध्याकाळी जगभरातून इथे आलेले पर्यटक इथे गोळा होतात.. श्रीलंकेचं वैशिष्टय़ असलेल्या लोकनृत्याच्या तालावर थिरकतात आणि शारीरिक कसरती पाहून थक्क होतात.
पुढच्या दिवशी कॅन्डीहून आमचा मुक्काम नुवाराएलिया नावाच्या एका थंड हवेच्या शहरात हलला. वाटेवरचे चहाचे मळे, मसाल्याच्या बागा, चहाचे कारखाने पाहताना श्रीलंकेचं नैसर्गिक वैभव विकासाला उपकारक ठरल्याची आणि या देशातील प्रत्येकजण निसर्ग व विकासाची सजग सांगड घालत असल्याची साक्ष पटत राहिली. श्रीलंकेच्या पश्चिम किनारपट्टीवर दक्षिणेला असलेला चारशे वर्षांपूर्वीचा गाल किल्ला या देशाच्या पारतंत्र्याच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. श्रीलंकेचं हे ऐतिहासिक वैभव पुरातन वास्तुकलेचा उत्तम नमुना तर आहेच; पण शेकडो वर्षांच्या संस्कृतीच्या जपणुकीचं एक उदाहरणही आहे. गाल येथील कोसेनबर्ग हॉटेलमधील मुक्काम हाही एक अवर्णनीय आनंद असतो. त्याच्या सज्जातून संध्याकाळी समुद्रात बुडणाऱ्या सूर्याची सोनेरी किरणे थेट खोलीत अवतरतात. समुद्राच्या लाटांच्या तालावर ती खोलीत तरंगू लागतात, तेव्हा सगळा शीण दूर झालेला असतो.
नारळ, अननस, मासे, मसाले, मौल्यवान खडे, तसेच जवाहिरांचे नैसर्गिक खजिने हे श्रीलंकेचं वैभव. इथल्या मधु नदीच्या पात्रात वसलेल्या ६४ लहान-मोठय़ा बेटांपैकी प्रत्येकावर निसर्गाचं एक-एक आश्चर्य अवतरलेलं आहे. या नदीच्या पात्रातील जलजीवन न्याहाळणं हा पर्यटनातला आगळा आनंद आहे. एका बेटावरच्या मसाल्याच्या बागांना भेट देणं, तिथल्या अस्सल मसाल्याचे पदार्थ खरेदी करणं, ही विशेषत: महिला पर्यटकांना पर्वणी असते. काही वर्षांपूर्वी त्सुनामी संकटानं श्रीलंकेच्या किनारपट्टीवरील काही गावे उद्ध्वस्त झाली होती. समुद्राच्या आधारानं जगणाऱ्या कुटुंबांतील अनेकांना समुद्राच्या लाटांनीच गिळलं. अशा काही गावांमध्ये त्सुनामीच्या संकटाच्या जखमा अजूनही जाणवतात. इथे त्सुनामीच्या बळींची मूक स्मारके आहेत. ती पाहताना, तेथील भग्न घरांशेजारी उभे राहताना नकळत डोळ्यांतून दोन अश्रू टपकतात, तेव्हा देशाच्या भौगोलिक सीमांना भावनांचे बंधन नसते, हे उमगतं. समुद्राशी श्रीलंकेचं अतूट नातं आहे. म्हणूनच त्सुनामीनं बळी घेतले तरी श्रीलंका समुद्रावर नाराज नाही. समुद्रातील असंख्य जीव जगवण्याचा वसा घेतलेली माणसंही इथे जागोजागी भेटतात, ती त्यामुळेच!

Story img Loader