पॉप आणि पैसा! अनुप्रासाच्या सोसासाठी मी हे दोन शब्द एकापुढे एक ठेवलेले नाहीत. सध्याच्या काळात ते समानार्थी शब्द आहेत. त्यांचा ‘अर्थ’ सारखाच आहे. कोणे एके काळी अमेरिकेमधली माध्यमं ‘पॉप म्युझिक अॅक्टस्’ असा शब्दप्रयोग वापरत असत. काळाच्या ओघात त्यामधला ‘अॅक्टस्’ शब्द गळून गेला आणि त्याची ‘पॉप म्युझिक इंडस्ट्री’ झाली. आता आता तर पुष्कळदा फक्त ‘पॉप इंडस्ट्री’ एवढंच म्हणतात. त्यातलं संगीतही आता गळून पडलं आहे! पॉप इंडस्ट्री! पॉप्युलर इंडस्ट्री- जनांना रिझवणारी आणि त्याबदल्यात मुबलक नफा ओढणारी अवाढव्य इंडस्ट्री. रीहाना, बियॉन्से, मॅडोना, जस्तीन बिबर अशांसारखे गायक-गायिका हे त्या ‘इंडस्ट्री’चं दृश्य-रूप. त्याच्या आत लपलेले- एजंट्स, निर्माते, पब्लिसिस्ट (या शब्दाला एक मराठी अचूक प्रतिशब्द शोधण्याची वेळ आली आहे.), म्युझिक चॅनेल्स, म्युझिक व्हिडीओ निर्माते, मेक-अप आर्टिस्ट, फॅशन डिझायनर्स, ‘लाइव्ह शो’ मॅनजर्स, प्रायोजक असे अनेक स्तर! आणि या साऱ्याच्या आत-बाहेर वारा खेळावा तितक्या सहजतेने खेळणारा पैसा! ‘पॉप इंडस्ट्री’ हे नामाभिधान या चित्राच्या पाश्र्वभूमीवर काही चुकीचं नाही. किती साधी गोष्ट आहे? एखादा गायक असतो, एखादी गायिका असते. त्या कलाकाराच्या आतले सूर बाहेर पडायला, सर्वदूर पोहोचायला अधीर असतात. त्याच्या जगण्याचा हिस्सा बनलेले त्याचे जिवंत सूर काही मोजक्यांना प्रथम आवडतात. मग यू-टय़ूब वगैरेवर त्याचा आवाज ऐकून अजून पुष्कळांनाच तो कलाकार आवडतो. पण सर्जकाच्या आतली उबळ ही बहुतेकदा केवळ सर्जनाचीच नसते, ते नवनिर्माण दहा जणांना, शंभर जणांना, हजारोंना पोहोचवण्याची आकांक्षा असते. मग तसं गाणं पोहोचवणं एकटय़ा-दुकटय़ाच्या आवाक्यातलं नसतं. ते गाणं लाखोंपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याला काही एक शिस्तशीर व्यवस्था लागते. त्या व्यवस्थेमागे पैशांचं अचूक गणित मांडावं लागतं आणि मग जी मंडळी ही यातायात करतात, त्यांना त्यामधून नफा मिळवण्याच्या शक्यता साहजिकच दिसत राहतात. मग ते गाणं आणि तो गायक ‘स्टार’च बनतो एकदम. त्याचा आवाज, तो एखादा जॉकी घोडय़ाला पळवेल, तसा चालवत राहतो. त्याच्यावर पैसे मिळवणारे अमीर, प्रतिभावंताची ती अद्भुत जीवघेणी घोडदौड निवांत कडेला बसून निरखत राहतात. एखादा जॉकी पडला तर दुसरा असतोच. कुठल्याही काळात, कुठल्याही संस्कृतीमध्ये कलाकार आणि पैशांचं हे अडनिडं गणित सुकरपणे सुटलेलं दिसत नाही. हुशार कलाकार सुवर्णमध्य काढतात- पैसा स्वत: मिळवतात, स्वत: निर्माते बनतात आणि तरी पैशाने सर्जनावर मात करू नये यासाठी प्रयत्नशील असतात. अर्थात हे चित्र अलीकडचंच. पूर्वी तर राजाश्रयच असायचा. राजा जो कंठा घालेल तो आनंदानं मिरवायचा आणि कलासाधना करीत राहायचा. मुक्त भांडवलशाहीमुळे कला मारली जात असल्याची हाकाटी सततच उठत असते. तशी ती कुठल्या व्यवस्थेत मारली गेली नव्हती? धार्मिक, मार्क्सिस्ट, हुकूमशाही, लोकशाही, हिप्पी, विद्रोही अशा साऱ्या व्यवस्थांमध्ये कला दाबली जाण्याचे अनेक दाखले इतिहास देतो. निदान भांडवलशाही जागतिकीकरणाच्या पाश्र्वभूमीवर मॅडोनासारखे काही कलाकार स्वत:ची कला स्वत:च्या अटींवर गाजवून-वाजवून घेताना दिसत आहेत.
शिवाय इंटरनेटनं एक मोकळीक साऱ्याच अर्थव्यवहारामध्ये आणलेली दिसते. पूर्वी गाण्याची सी.डी. (किंवा त्याआधी कॅसेट- त्याआधी रेकॉर्ड) विकली गेली की तात्त्विकदृष्टय़ा त्याचा अमुक एक हिस्सा पैशांच्या रूपात कलाकाराला मिळायचा. प्रत्यक्षात ते गणित कलाकारांच्या फायद्याचं कधीच नव्हतं. कारण नक्की किती सी.डी. विकल्या गेल्या, हे कुठल्याच गायकाला अचूकपणे शोधता येत नसे. मग निर्माता विक्रीची जी रक्कम रॉयल्टी म्हणून हातात देई, ती घेण्याखेरीज पर्याय नसे. आता जर मी ‘आय-टय़ून्स’वर एखादं गाणं विकत घेऊन डाऊनलोड केलं तर अमुक अमुक सेंट्स त्या गायकाच्या बँक खात्यामध्ये परस्पर जमा होतात. ही व्यवस्था भले खूप नफादायी नसेल, पण ती पारदर्शक आहे आणि पैशाचा काळाबाजार कमी करणारी आहे. अर्थात, बेकायदेशीर डाऊनलोडनं कंपन्यांचं कंबरडं मोडलं आहे, हे खरं. (या संगीत कंपन्यांनी जो अवाढव्य नफा मागच्या काही दशकांपर्यंत मिळवला, त्यावरची ही प्रतिक्रिया म्हणावी का? मार्क्स असता तर त्यानं कदाचित ही घटना ‘जनतेचा सांगीतिक उठाव’ या सदरात गणली असती!) पण तरीही यू-टय़ूब, स्पॉटीफाय, रडिओ (Rdio), पँडोरा यांसारख्या साइट्सवर लोकांना गाणी मोफत मिळाली, तरी कलाकारांपर्यंत नफ्याचा वाटा हळूहळू करत पोहोचतो. एका अंतस्थ माणसानं स्टीव्ह नॉपर या पत्रकाराला या संबंधात जो तपशील दिला आहे तो कितपत खरा आहे हे माहीत नाही. पण आर्थिक चित्राचा थोडाफार अंदाज त्यावरून येऊ शकतो. एखादं गाणं ६० वेळेला अशा वेबसाइट्सवर प्रसारित झालं की १९ सेंट रेकॉर्डिग आर्टिस्टकडे जातात (गायक/ संगीतकार/ ध्वनिमुद्रक- यांपैकी नियमानुसार); १९ सेंट संगीत कंपनीला मिळतात आणि (अहाहा!) गीतलेखकाला नऊ सेंट मिळतात! नऊ सेंट म्हणजे कमी लेखू नका. गाण्याची अनेक वर्षे अनेक आवर्तने होत राहतात आणि गीतकाराला पैसे मिळत राहतात. व्हीटने ह्यूस्टन या गायिकेनं डॉली पार्टनचं एक गाणं ‘कव्हर व्हर्जन’ म्हणून पुन्हा गायलं. त्याची रीतसर फी डॉलीला मिळाली. खरं तर एल्व्हीस प्रेसलेनं तेच गाणं तिच्याकडे मागितलं होतं, पण त्यानं निम्मी रॉयल्टीच कबूल केल्यानं डॉलीनं ते गीत त्याला विकलं नाही. तिचा अंदाज दूरदर्शी ठरला. व्हीटनेनं ‘देन आय लव्ह यू’ हे गाणं असं काही म्हटलं की जग पाहत राहिलं. आजही ते गाणं रेडिओवर, टी.व्ही.वर, नेटवर वाजतं आहे. आणि १९७४ साली लिहिलेल्या त्या गीतावर आजही डॉली रोखीत पैसे मिळवते आहे! अर्थात हे सारं इतकं सरळ-सोपं नाही. आता तर चांगल्या पॉप-स्टार्सच्या दिमतीला त्यांची त्यांची वकिलांची फौज हजर असते आणि रेकॉर्डिग काँट्रॅक्ट्स ही दोन देशांमधल्या व्यापारी कराराइतकीच जटिल असतात! कलमांचा कीस पाडला जातो, रॉयल्टीवरून घासाघीस केली जाते, दर पाडले-उंचावले जातात, बॅकअप काँट्रॅक्ट्स ठरतात आणि मग सरतेशेवटी तो गायक आणि ती कंपनी यांची सोयरीक ठरते! संगीत कंपन्या आपल्या ‘माला’च्या वितरणावर, प्रक्षेपणावर चोख नजर ठेवतात. अगदी हॉटेल आणि बारमध्ये वाजणाऱ्या गाण्यांवरही त्यांची नजर असते. सव्र्हे घेणं अवघड म्हणून सरळ स्थानिक रेडिओचे दर लावून तिथूनही वसुली केली जाते! (हे भारतात कुणी कल्पिणारही नाही! आणि गावोगावचे शेट्टी, कामत आणि सिंग कॅसेट कंपन्यांवर मोर्चे नेतील.) खेरीज १९९५ मध्ये अमेरिकेत Digital Performance right in Sound recordings act हा नियम पास झाल्याने कंपन्यांना संरक्षण आहेच!
गाणं हे काही केवळ रॉयल्टीपुरतं अर्थकारण जाणतं असं नाही. स्टॉक मार्केटच्या ‘इंडिकेटर’ यादीत पॉप संगीताचा समावेश हलके हलके होतो आहे! जेव्हा समाजामध्ये चैतन्य असतं, टिन-पॉप गाणी गाजू लागतात, हलकी-उडती-आनंदी गाणी संचार करतात, तेव्हा ते वरवर जाणाऱ्या अर्थव्यवस्थेचं निदर्शक असतं. बुल मार्केट आणि टिन पॉपचा सांधा २००२ च्या मंदीनंतरच्या काळात अनेक समाजशास्त्रज्ञांनी, अर्थतज्ज्ञांनी दाखवून दिला. याउलट नैराश्याची, आत्मवंचनेची रॉक गीतं गाजू लागतात तेव्हा मार्केट खाली सरकण्याचं ते निदर्शक असतं. उघडच आहे, ही एक ‘थिअरी’ आहे. अनेकांनी नाकारलेलीही आहे ती. अनेक अर्थतज्ज्ञांना ती अवास्तव वाटते. पण मला यासंबंधात कुणा तज्ज्ञाला ‘लयपश्चिमा’च्या प्रांगणात सन्मानानं पाचारण करायला हवं. असा अर्थतज्ज्ञ ज्याला समाज आणि संस्कृतीही समजते. रूपा रेगे-नित्सुरे अशा मोक्याच्या क्षणी माझ्या मदतीला धावून आल्या. बँक ऑफ बरोडाच्या ‘चीफ इकॉनॉमिस्ट’ आणि ‘जनरल मॅनेजर’ असलेल्या रूपाताई म्हणाल्या, ‘‘ही थिअरी मला अशक्य कोटीमधली वाटत नाही. पण बघ, तो इंडिकेटर म्हणून वापरायचा असेल तर अनेक पूर्वअटी आहेत. एकतर ते संगीत त्या समाजामध्ये व्यापक तऱ्हेनं पसरलेलं असलं पाहिजे. शिवाय तो समाजही एकजिनसी हवा. भारतासारख्या देशात मायकेल जॅक्सनचं गाणं इंडिकेटर होऊ शकत नाही, पण अमेरिकेत होऊ शकतं. ‘इंडिकेटर’ संकल्पनेपेक्षाही महत्त्वाचं आहे ते संगीत आणि समाज-अर्थव्यवस्थेचा मूड यांचं नातं. एखादी अर्थव्यवस्था ‘अपटर्न’ असेल आणि बऱ्यापैकी equitably संपत्ती वाढत असेल (विषमपणे नव्हे) तर त्या देशातील संगीत हे उत्साही होऊ शकतं. भारतात १९९१-९२ नंतर तसं झालेलं आपण बघतो आहोत आणि खेरीज, संगीताकडे इंडस्ट्री म्हणून बघणं हेही आवश्यक आहे. संगीतकलेला पसरायचं असेल तर पैसा लागेल. पैसा हवा असेल तर ‘मार्केट’ लागेल. पैसा मिळाला नाही तर ती ‘इंडस्ट्री’ कोसळेल आणि कलेचंही नुकसान होईल. अर्थात व्यावसायिक यश ही कलेची आवश्यक आणि अपुरी पूर्वअट आहे. नुसतं व्यावसायिक यश हे अर्थातच कलेला पुरेसं नाही. समाजाची अभिरुची रुंदावणारे कलोपासक हेही गरजेचे आहेतच!’’
रूपा रेगे-नित्सुरे यांच्या या मुळाशी जाणाऱ्या विवेचनानंतर मला गोंधळ कमी झाल्यासारखा वाटतो आहे (आणि माझ्या शिक्षणामध्ये अर्थशास्त्र हा विषय कधीच नसल्याची खंतदेखील! किती सुंदर बाजू आहेत या विषयाला!!) अर्थात, हिमेश रेशमिया आणि विशाल-शेखरच्या गाण्यांमुळे मुंबईचा सेन्सेक्स ओळखून पोर्टफोलिओ सांभाळणारा इसम दिसणं आज तरी दुरापास्त आहे!
इतकं लिहितो आहे मी आणि मग जाणवतंय या आजच्या लेखात एकही गाणं आलं नाही, कवितेचा कैफ दिसला नाही, गायकाची तान कानात घुमली नाही. त्यामुळे चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आहे! तर मग प्रतिभेचे जे धनी कलेच्या आणि अर्थकारणाच्या आहोटी-भरतीमध्ये कलासागराला अघ्र्य देत निष्ठेनं पाय रोवून उभे असतात, त्यांना याचा किती ताण येत असेल? कसा येत असेल? ‘गद्य जिण्याच्या जाळावरती, स्वरमद्याची भरतो सुरई’ (थँक्स, बाकीबाब!) असा प्रत्यय त्यांना येत असेल?
चंगळवादाला पुष्कळदा नाकं मुरडणारे आपण भारतीय, लक्ष्मीपूजन काही चुकवत नाही, पॉपला ते चुकवणं कसं शक्य आहे? वाटतं एवढंच, की एखाद्याचं गाणंच त्या धांदलीत हरवून जाऊ शकतं. पी. विठ्ठल यांची ‘झीरो डेसिबल आकांत’ ही अर्थपूर्ण कविता मी नुकतीच वाचली. कुठलंही सच्चं गाणं माणसाच्या दु:खाचा सार्वकालिक आकांत मांडत असतं. बाजारात, व्यवहारात, स्पर्धेत, अर्थकारणात यशस्वी होताना कलाकाराला तो ‘झीरो डेसिबल आकांत’ ऐकू येणं-येत राहणं ही त्या कलाकाराचीच नव्हे तर चांगल्या संस्कृतीचीही गरज आहे, नाही का?
लक्ष्मीपूजन: पॉप स्टाईल!
पॉप आणि पैसा! अनुप्रासाच्या सोसासाठी मी हे दोन शब्द एकापुढे एक ठेवलेले नाहीत. सध्याच्या काळात ते समानार्थी शब्द आहेत. त्यांचा ‘अर्थ’ सारखाच आहे. कोणे एके काळी अमेरिकेमधली माध्यमं ‘पॉप म्युझिक अॅक्टस्’ असा शब्दप्रयोग वापरत असत.
First published on: 05-10-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व लयपश्चिमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laxmi poojan pop style