कोणत्याही खेळात, परीक्षेत घवघवीत यश मिळालं की आपण आनंदाने हरखून जातो. ‘यशासारखं दुसरं यश नाही’ म्हणतात ते उगीच नाही. भारताचा क्रिकेट संघ जिंकला की विशेष आनंदाचा सणच जणू देशभर साजरा होतो. (हे भाग्य फक्त ‘साहेबां’च्या खेळालाच! इतर खेळांना नाही.) बक्षिसांची खैरात होते. परीक्षेत यशस्वी होणाऱ्यांचा ठिकठिकाणी सत्कार होतो. वेगवेगळी बक्षिसे मिळतात. क्रिकेटमधल्या यशस्वी मुलांना तर ग्लॅमरची ‘चकाकती दुनिया’च खुली होते. त्यामुळेच आपल्यापकी बहुसंख्य लोकांच्या मनात हा (अ)विचार पक्का होण्यास मदत होते, ‘जो जिता वो ही सिकंदर’ आपले राजकारणी तर जिंकण्यासाठी ‘वाट्टेल ते’ करायला मागेपुढे बघत नाहीत ते यासाठीच! मध्यंतरी माझ्याकडे अक्षयचे आई-वडील आले होते. त्याचे वडील सांगत होते की, ‘डॉक्टर, आमचा अक्षय चौथीत आहे, त्याला स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवलं आहे. अर्थात त्याला पूर्ण कल्पना देऊन तो तयार झाला तरच, असंच ठरवलं होतं. त्याला सर्व सांगितल्यावर तो तयार झाला. त्यासाठी त्याला वेगळी शिकवणीही लावली. तो सर्व करत होता. अभ्यासही करत होता. पण त्याच्या आईला वाटतं की, त्याने अजून खूप मेहनत करायला पाहिजे. कारण त्याच्या क्लासमध्ये होणाऱ्या परीक्षेत त्याला इतर मुलांएवढे मार्क मिळत नाहीत. मग स्कॉलरशिप मिळणार कशी? आता बसला आहे तर त्याने स्कॉलरशिप मिळवलीच पाहिजे, असा तिचा अट्टहास आहे. मी तिला सांगतो, ‘अगं, आपण स्कॉलरशिपला बसवण्यामागे आपला उद्देश त्याला स्पर्धात्मक परीक्षांची सवय व्हावी एवढाच नव्हता का ठेवला? त्यातून मिळाली तर आनंदच आहे. पण त्यासाठी सतत त्याला ते बोलून दाखवणं, त्याला सतत अभ्यासाला अतिमागे लागणं, असा प्रकार होतो आहे. तो मला काळजीत टाकणारा आहे. अक्षयही त्यामुळे एकदम गप्प गप्प बसायला लागला आहे. नीट जेवत नाही. स्कॉलरशिपची गरज (पशांची) नाही. आपला हुशार मुलगा ‘स्कॉलर’ म्हणून गणला जाईल हे स्वप्न ती बघते आहे, त्याला दाखवते आहे, ते मला योग्य वाटत नाही. विशेषत: ज्या पद्धतीने ती मागे लागते त्यामुळे! मग दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना बसवून त्याला असेच दमवलं जाईल, अशी भीती मला वाटते आहे. डॉक्टर, प्लीज जरा तिला समजवा.’ अक्षयची आई बाहेर बसली होती, त्यामुळे वडिलांनी आपलं मत मोकळेपणाने मांडलं. नंतर अक्षयच्या आईला आत बोलावलं. आई म्हणाली, ‘डॉक्टर, अक्षयचे बाबा त्याची विनाकारण काळजी करतात. हा, तो सध्या गप्प गप्प झालाय, नीट जेवत नाही हे बरोबर आहे, पण तो दमत असेल. काही टॉनिक दिल्यावर होईल बरोबर, पण आता स्कॉलरशिपला बसवलं आहे आणि त्याच्यात क्षमता आहे तर त्याने ती मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावेत असं मी ठरवलं तर काय बिघडलं यात? स्पध्रेत उतरायचं आणि विजयी व्हायचं नाही, मग त्यात काय अर्थ उरला? आणि म्हणूनच मी त्याच्या मागे लागते आहे. आत्तापासून मागे लागले तरच तो करेल नाही का? त्यामुळे मला नाही वाटत, माझं काही चुकते आहे.’
आणखीन एका मुलाचेही आई-वडील असाच प्रॉब्लेम घेऊन आले होते. त्यांचा मुलगा उत्कृष्ट स्वििमग करतो. मध्यंतरी काही स्पर्धामधून त्यानं बक्षिसंही मिळवली होती. पण आता त्याला स्पर्धामध्ये भाग घ्यायचा नव्हता, नव्हे हळूहळू स्वििमगच टाळायचा त्याला कल दिसायला लागला होता. कारण एका स्पध्रेत त्याला बक्षीस मिळालं नव्हतं अणि त्याच्या वडिलांनी, सरांनी त्याला नाराजी बोलून दाखवली होती. असं कसं झालं वगरे. तू उत्कृष्ट जलतरणपटू आहेस, तुला बक्षीस मिळालंच पाहिजे, असं त्याला सतत बोलून दाखवलं गेलं. त्यामुळे त्याला स्पध्रेचाच नाही तर पोहण्याचा, त्याच्या लाडक्या छंदाचाच तिटकारा येऊ लागला होता.
थोडक्यात, दोनही उदाहरणांमधील पालक (आई/वडील) आपल्या मुलांचीच जणू ट्रॉफी करून त्याला नाचवण्याचं स्वप्न बघत होते वा इच्छा बाळगत होते. परंतु त्यातून त्याचा मुलावर अयोग्य परिणाम होऊ लागला होता. महत्त्वाकांक्षा बाळगणे हा गुन्हा नाही; पण प्रगती म्हणजे महत्त्वाकांक्षा किंवा महत्त्वाकांक्षा म्हणजे प्रगती असं समीकरण आपण मांडत असतो. मला चित्रकला येते म्हणजे मी उत्कृष्टच चित्र काढलं पाहिजे. माझी मुलगी नृत्य शिकायला जाते म्हणजे तिने सर्वोत्कृष्ट नृत्यच करायला पाहिजे ही महत्त्वाकांक्षा आपणास अंतिम फळाकडे बघायला भाग पाडते. त्या ‘जिंकण्यासाठी मग वाट्टेल ते’ करताना काही आपण निष्ठुर, अविचारी बनतो.
पण त्यातून त्या विषयाच्या अभ्यासाचे, कलेच्या रियाजाचे महत्त्व कमी होतं व महत्त्व फक्त अंतिम निकालाला उरतं. माझं नाव होणार, माझी प्रतिष्ठा वाढणार या गोष्टीलाच महत्त्व येतं. म्हणजेच थोडक्यात,Perfection can become enemy of excellence असं होतं. पूर्णत्वाचा, यशाचा, विजयाचा अट्टहास धरून आपण त्या अभ्यासातली, खेळातली, कलेतली गुणवत्ता, आनंद वाढवणं ही गोष्ट गमावून बसतो किंवा हिरावून घेतो. पण मग कोणी म्हणेल की स्पध्रेत भाग घ्यायचाच नाही का? तर त्यात उतरताना विचारांची, विवेकाची स्पष्टता असणं महत्त्वाचं आहे. शिकताना त्यातील जास्तीचं कौशल्य आत्मसात करणं महत्त्वाचं. कोणी स्तुती करावी, िनदा करू नये यासाठी ते शिकावं हा दृष्टिकोन असता कामा नये. या स्पर्धाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा, ‘हानिलाभ सुखेदुखे हारजीत करी सम’!, असा विवेकी असावा. या स्पर्धाकडे एक घटना म्हणूनच बघितलं पाहिजे. त्यात मिळणाऱ्या यशापयशाकडे एक ‘मलाचा दगड’ वा ‘टप्पा’ एवढय़ा अर्थाने बघितलं पाहिजे. उत्तम पद्धतीने अभ्यास शिकणं, विषय शिकणं, समजणं, त्याचा आनंद घेणं, खेळाची गुणवत्ता वाढवताना त्याचा आनंद घेणं महत्त्वाचं हा दृष्टिकोन योग्य ठरेल. असं झालं तर आपण आपल्या मुलाच्या बक्षिसाची महत्त्वाकांक्षा बाळगण्यापेक्षा त्याची कार्यक्षमता, दर्जा वाढवण्याला प्राधान्य देऊ. त्यातून गुणवत्तेला नम्रतेचं कोंदण मिळू शकेल. अन्यथा अहंभाव वाढीला लागेल, जो प्रगती खुंटवेल. कारण तुमची कार्यक्षमता, कार्यशक्ती वाढवणं म्हणजेच प्रगती. बक्षीस, विजयाची ट्रॉफी म्हणजे प्रगती नाही. ती फक्त प्रगतीला मिळालेली प्रशस्ती असते एवढंच.
असं झालं तरच, असा विवेकी विचार पालकांनी मनी रुजवला, त्याप्रमाणे कृती केली तर तो विचार पुढे त्या मुलांमध्येही रुजेल, वाढेल हे नक्की. त्यातून आत्मप्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. बुद्धी धर्या होय वैसोटा। तरी मनाते अनुभवाचिया वाटा॥ हळूहळू करी प्रतिष्ठा। आत्मभुवनी॥ या ओवीतून ज्ञानेश्वर हेच सुचवतात की, बुद्धी जेव्हा धर्याचा आश्रय बनते तेव्हा विवेकी विचार, भावना एकत्र येतात व या अनुभवाच्या वाटेवर मन आत्मप्रगतीची इच्छा प्रबळ बनवते! म्हणजेच आपल्या मुलांच्या बाबतीतही त्यांना मिळणाऱ्या बक्षिसांना, मार्काना अतिमहत्त्व देण्यापेक्षा त्यांना ते जो अभ्यास, खेळ किंवा कला शिकत आहेत, त्यात ते जास्तीत जास्त प्रावीण्य, कौशल्य मिळवतील, याला प्राधान्य दिलं पाहिजे. या विवेकी विचाराची मनात प्रतिष्ठापना केली व त्याला अनुरूप भावनांची जोड दिली तर मुलांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल. हा प्रगतीसाठी गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा विवेकी विचार अंगी बाणवण्याचा सल्ला मी या पालकांना दिला व त्यांना तो पटला!
प्रगतीचा प्रशस्त मार्ग
कोणत्याही खेळात, परीक्षेत घवघवीत यश मिळालं की आपण आनंदाने हरखून जातो. ‘यशासारखं दुसरं यश नाही’ म्हणतात ते उगीच नाही.
First published on: 18-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व माझिया मना बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leading way towards development