सचिन रोहेकर
भारतीय कंपन्यांमध्ये कुटुंब, मित्र व नातलगांकडून संचालित कंपन्यांचे प्रमाण हे तब्बल ८५ टक्के आहे. आता इतक्या मोठय़ा आकारामध्ये मराठी मातीतील नावाजलेल्या उद्योग घराण्यांच्या (काही अपवाद केल्यास) दुसऱ्या, तिसऱ्या पिढीनंतर व्यवसायाची वाताहत झालेली दिसून येईल. पहिली पिढी उद्योगाला आकार देते, दुसरी पिढी तिचा विस्तार करते आणि नंतरच्या पिढय़ा कौटुंबिक कलह आणि त्यायोगे होणारा भांडवलाचा ऱ्हास पाहण्यात मग्न होतात. उद्योग घराण्यांच्या उतरत्या टप्प्यांवर टाकलेला दृष्टिक्षेप..
लाज, संकोच, भीड बाळगली नाही. पडेल ते काम केले. माल विकला जायचा तर गाठोडी डोक्यावर वाहून न्यावीच लागतात; तेव्हा तेही अनेकदा केले. खुशालबापू यांनी अपार मेहनत, चिकाटी आणि ध्येयासक्तीने व्यवसायगाडा हाकला. व्यवसायाचे चक्र हलते राहील अशी त्याला एक गती मिळवून दिली. पुढे आधुनिक शिक्षण, प्रशिक्षण मिळविलेली मुलेही त्यांनी व्यवसायात आणली. मुलांनी वडिलांचे बोट धरत व्यापार शिकून घेतला. बघता बघता धंदा दुप्पट-तिप्पट केला. यातून उत्साह भरलेल्या मुलाने- विशालने देशा-परदेशात व्यवसायाच्या विस्ताराच्या योजनेवर काम सुरू केले. तर मुलगी वृषालीने नवकल्पनांसह व्यवसायात विविधतेचे रंग भरण्यासाठी कंबर कसली. काळानुसार व्यवसायात करावयाचे बदल म्हणून त्यांनी सर्वप्रथम वडिलांनाच घरी बसविले आणि सर्व सूत्रे हाती घेतली. नव्या कल्पना व विस्तार सफल करायचा तर भांडवल हवेच. व्यवसायाची जुनी प्रस्थापित घडी पाहता धनकोंद्वारे कर्ज उभारणी विशालसाठी सहज साध्य ठरली. तर काही मुरब्बी गुंतवणूकदारांकडून कंपनीतील काही हिश्शाच्या बदल्यात भागीदारीसाठी पुढे आलेल्या प्रस्तावाचे वृषालीने सहर्ष स्वागत केले. एकाचे दोन व्यवसाय झाले; पण बापूंच्या घाम, मेहनत आणि नावावर बोळा फिरवूनच हे घडले..
या कथेतील बापू आणि त्यांची मुले विशाल, वृषाली या पात्रांची नावे बदलली तर कमी-अधिक फरकाने मराठी मातीतील नावाजलेल्या उद्योग घराण्यांच्या (काही अपवाद केल्यास) दुसऱ्या, तिसऱ्या पिढीनंतर व्यवसायाची अशी वाताहत झालेली दिसून येईल. मराठीच काय, भारताच्या उद्योगजगतात अंबानी बंधू, रणबक्शीचे सिंग बंधू, बजाज, बिर्ला, बांगर, थापर, नंदा, कन्वर, हिंदूजा, सिंघानिया यांच्याबाबतीत हेच घडताना दिसले आहे. ही यादी आणखीही लांबवता येईल. एकुणात कुटुंबात भांडणाचा सुकाळ आणि संपत्तीचा क्षय याची उदाहरणे आपल्याकडे काही कमी नाहीत.
गेल्या आठवडय़ात विक्रम किर्लोस्कर यांच्या अनपेक्षित जाण्याने जवळपास पाव शतकभर चाललेल्या वाहन उद्योगातील सर्वात यशस्वी भागीदारीच्या भवितव्यावर दाट छाया पसरली. इतकेच नाही, तर शतकाहून मोठय़ा वारशानंतर विखुरलेल्या किर्लोस्कर घराण्यात समेट-सौहार्दाच्या पुसटशा शक्यतेलाही संपुष्टात आणले गेले.
सार्वजनिकरीत्या चव्हाटय़ावर आलेल्या भाऊबंदकी आणि तंटय़ाचा शाप महाराष्ट्रात ज्यांनी उद्योग आणला आणि रुजवला अशा किर्लोस्कर, गरवारे घराण्यालाही लागला. विमाननिर्मिती, जहाजबांधणीतील आजच्या ‘नवरत्न’ कंपन्यांचे जनक असलेल्या वालचंद हिराचंद दोशी, पारलेचे मालक चौहान कुटुंब.. ही यादी खूप मोठी असून, त्यांच्या कथा काही वेगळय़ा नाहीत. काही घराणी अशीही ज्यात वरकरणी भांडणे नसली तरी काळाच्या ओघात ती मागे पडली आणि व्यवसायावरील मालकीच गमावून बसल्याची प्रकरणे आहेत. तर काहींच्या बाबतीत घराण्याचे नाव राहिले, पण कुटुंबातील एकही सदस्य व्यवसायाशी संलग्न राहिलेला नाही अशी अवस्था आहे. राजकारणाप्रमाणे उद्योगधंद्यातही घराणेशाही आणि पर्यायाने आपापसांत भांडण-तंटे असतात. याचा शेवट कसा होतो, त्याचा परिणाम काय, ही गोष्ट मात्र राजकारणापेक्षा कर्मचारी, गुंतवणूकदार, विक्रेते, वितरक, ग्राहक असा मोठा परिवार संलग्न असणाऱ्या उद्योगधंद्यांच्या बाबतीत व्यापक प्रभाव साधणारी ठरत आली आहे. किंबहुना त्यामुळेच उद्योगघराण्यातील भांडणं ही अधिक पारदर्शीपणे व निर्णायक रूपात अंतिम टोक गाठताना दिसली आहेत.
कुटुंबाद्वारे संचालित कंपन्यांचा भारतातील उद्योगधंद्यांच्या एकूण मिळकतीत २५ टक्के हिस्सा आहे, तर करोत्तर नफ्यात ३२ टक्के वाटा आहे. अशा कंपन्यांकडून बाळगल्या गेलेल्या मालमत्ता आणि त्यांच्याकडील राखीव गंगाजळीचे प्रमाण हे अनुक्रमे १८ टक्के आणि ३७ टक्के इतके आहे; पण हा केवळ शेअर बाजारात व्यवहार होणाऱ्या सूचिबद्ध कंपन्यांबाबतचा तपशील आहे. प्रत्यक्षात भारतीय कंपन्यांमध्ये कुटुंब, मित्र व नातलगांकडून संचालित कंपन्यांचे प्रमाण हे तब्बल ८५ टक्क्यांच्या घरात जाणारे असल्याचे वेगवेगळी सर्वेक्षणे सांगतात. यावरून उद्योगधंद्यातील कौटुंबिक कलह आणि त्यायोगे होणारा भांडवलाचा ऱ्हास ही समस्या आपल्यासाठी किती मोठी किंमत मोजायला लावणारी आहे, हे लक्षात यावे.
किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर काळाच्या किती पुढे होते, याचे उदाहरण त्यांनी तयार केलेला लोखंडी नांगर अथवा शेतीसाठीची अन्य अवजारे हीच केवळ नाहीत. शेतकऱ्यांनी जुनाट धारणा सोडून लोखंडी नांगराचा वापर सुरू करावा यासाठी त्यांना मोठा सांस्कृतिक संघर्ष करावा लागला. त्यांचा एकही कारखाना मुहूर्त अथवा पंचांग पाहून त्यांनी सुरू केला नाही. किंबहुना इच्छित फळ देत नाही अशी धारणा असणाऱ्या होळाष्टकाच्या दिवसांमध्ये त्यांनी किर्लोस्करवाडीच्या कामाला सुरुवात केल्याचे दाखले आहेत. ओसाड, निर्जल आणि माणूस काय जनावरही फिरकत नाही अशा कुंडलच्या माळरानावर त्यांनी किर्लोस्करवाडीच्या रूपात देशातील दुसरी मोठी औद्योगिक गृहवसाहत वसवली. (पहिली अर्थातच जमशेदजी नसरवानजी टाटा यांनी स्थापित केलेली जमशेदपूर अथवा टाटानगर वसाहत होय.) त्यांचे सुपुत्र शंतनुरावांकडे धुरा येईपर्यंत उद्योगसमूहाचा २० हून अधिक कारखान्यांपर्यंत पसारा वाढला. ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ ही आद्य व्यावसायिक मासिके त्यांच्याच पाठबळातून उभी राहिली. इतकेच नव्हे कोणा उद्योगाने स्वत:च्या गृहपत्रिकेचे प्रकाशन करावे, हीदेखील त्या काळातील अभिनव संकल्पनाच होती.
लक्ष्मणराव मुंबई सोडून बेळगावला परतले आणि त्यांनी कारखानदारीत पाऊल टाकले ते भावाच्या मदतीनेच. त्यांच्या कंपनीचे नावही म्हणूनच ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ असेच होते. तथापि याच नावावरील हक्कासाठी सध्या भांडत असलेल्या त्यांच्या पतवंडांना त्यातून अभिप्रेत बंधुत्वाचा मात्र पुरता विसर पडल्याचे दिसून येते. किर्लोस्कर समूहात आठ सूचिबद्ध कंपन्या आहेत आणि डझनभर भांडवली बाजारात नोंदणी नसलेल्या कंपन्या आहेत. किर्लोस्कर ब्रदर्स (केबीएल), किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड (केआयएल), किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड, किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड, किर्लोस्कर इलेक्ट्रिक कंपनी लिमिटेड,
एनव्हायर इलेक्ट्रोडाइन लिमिटेड आणि जीजी दांडेकर मशीन वर्क्स लि. अशा या सूचिबद्ध कंपन्या आहेत.
कुटुंबाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी संजय यांचे राहुल आणि अतुल या भावंडांविरोधात मालमत्तेसह अनेक मुद्दय़ांवर अनेक वर्षांपासून भांडण सुरू असून, त्याचे कज्जे देशातील विविध न्यायालयांत सध्या प्रलंबित आहेत. संजय यांचे केबीएल या कंपनीवर नियंत्रण, तर किर्लोस्कर ऑइल इंजिन्स आणि किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज या कंपन्या अतुल यांच्याकडे, तर राहुल हे किर्लोस्कर न्यूमॅटिकचे व्यवस्थापन करतात. विक्रम किर्लोस्कर हे त्यांचे चुलत भाऊ हे किर्लोस्कर सिस्टीम्स लिमिटेड सांभाळत होते, ज्यायोगे त्यांनी जपानच्या टोयोटा मोटर कॉर्पसह भारताच्या वाहन उद्योगातील सर्वात प्रदीर्घ व यशस्वी भागीदारीतून टोयोटा किर्लोस्कर मोटर्स लि. हा संयुक्त उपक्रम उभा केला. १३४ वर्षांचा वारसा असलेल्या किर्लोस्कर कुटुंबातील हे भांडण कायदेशीरदृष्टय़ा गुंतागुंतीच्या बनलेल्या इतर व्यावसायिक कौटुंबिक कलहांपेक्षा फारसा वेगळे नाही. कुटुंबातील या भांडणाला कारण कोण ठरले आणि खापर कुणावर फुटणार हा प्रश्न तसा गौण आहे. घराण्याकडून वारसारूपात आलेल्या व्यवसायाची यातून अधोगती झाली की भरभराट हा कळीचा मुद्दा ठरतो. पण दुसऱ्या पैलूबाबत भरभरून सांगितले जावे, अशी स्थिती मात्र नाही.
जगातील इतर ठिकाणचा अनुभवदेखील मैत्री आणि कुटुंबात कधीही व्यवसाय करू नका, याच शिकवणीचा कित्ता गिरवणारा आहे. जसे दुसऱ्या महायुद्धापूर्वी अडॉल्फ आणि रूडॉल्फ हे दोन जर्मन बंधू वाटा वेगळय़ा करून विभक्त झाले, पण त्यांच्याकडून प्युमा आणि अदिदास या पादत्राणांच्या दोन स्वतंत्र जगप्रसिद्ध नाममुद्रा उदयास आल्या. हॅरिसन आणि वॉलेस या बंधूंच्या सत्तासंघर्षांतून वेगळे होण्याने फ्रोझन फ्रेंच फ्राइजच्या मॅककेन आणि मेपल लीफ फूड्स या दोन नाममुद्रा जगाला दिल्या. असे काही भारतातील कुटुंबातील संघर्षांतून घडत असल्याचे दिसत नाही. कुटुंब कलहातून विभाजित झालेल्या मुकेश आणि अनिल अंबानी यांचेच उदाहरण पाहा. कुटुंबाला तडे गेलेल्या हिंदूजा बंधू, सिंघानिया, एम. पी. बिर्ला यांच्या व्यवसायांचे सध्या काही खरे नाही, तर वेव्ह समूहाच्या चढ्ढा बंधूंतील भांडण तर त्यांच्या जिवावरच बेतले.
सर्वसामान्य कुटुंबांप्रमाणेच श्रीमंतांच्या कुटुंबांमध्ये आपापसांतील संबंधांत ताणतणाव असू शकतात आणि यात आश्चर्यकारक असे काही नाही. खूपच लाड होणाऱ्या बहिणीला दोष देत मुलगा उपेक्षा होत असल्याची कुरकुर करू लागतो. बिघडलेली मुलं आणि त्यांच्या दौलतजादा उधळपट्टीचे किस्से अगदी ऊसपट्टय़ातील छोटय़ा-मोठय़ा खेडय़ांत अनेकांनी अनुभवले असतील. सर्व वाईटाचे मूळ पैसा नाही हे जरी मानले, तरी ते अनेकदा श्रीमंत कुटुंबांमध्ये संघर्ष, ताण आणि चिंता वाढवणारे ठरू शकते.
अलीकडच्या काळात उद्यमपटलाचा विस्तार होत तो आजवर परिघाबाहेर राहिलेल्यांना उत्तरोत्तर सामावून घेणारा निश्चितच बनला आहे. नव्वदीनंतर प्रादेशिक पक्षांच्या उदयासह राजकारणाचा तोंडवळा जसा बहुजनवादी बनत गेला; त्याचप्रमाणे आर्थिक आघाडीवरही १९९१ च्या खुलीकरणाच्या धोरणाने परिणाम साधला. त्यामुळे भारतीय भांडवलदारी जगताचा सामाजिक पायादेखील काही दशकांपूर्वी जसा होता त्या तुलनेत खूपच सर्वसमावेशक बनलेला दिसून येतो. हेही खरे की, परंपरेने चालत आलेल्या व्यवसायांची घडी आणि नवनवीन व्यवसायाचे क्षेत्र त्यानंतर इतक्या वेगाने विस्तारत, बदलत आले की ‘जुन्या भांडवलदारां’ना नवीन तंत्रज्ञानाची जाण असलेल्या पिढीला अपरिहार्यपणे वाट आणि पिढीजात जपलेले प्रांगणही मोकळे करून देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. प्रांगण खुले झालेली ही पिढी कुटुंबातीलच असेल तर वारसदारांकडून घराण्याचाच व्यवसाय विस्तारल्याचा परिणाम पाहता आला, अन्यथा घराणेच अस्तंगत झाले.
आर्थिक सुधारणा आणि त्या घडून आलेल्या बदलांनी साधलेल्या परिणामांचा आणखी एक मासला पाहा. भारतीय प्रवर्तकांद्वारे संचालित आणि २०१४-१५ मधील महसुलाच्या आधारे त्या समयी देशातील अव्वल २०० कंपन्यांच्या पंगतीत स्थान असलेल्या तब्बल ५७ कंपन्या आज पूर्णपणे लोप पावल्या आहेत. न पेलवणारे कर्ज घेतले गेले आणि दिवाळखोरी व नादारी संहितेनुसार राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाने या कंपन्या एक तर मोडीत काढल्या किंवा त्यांची मालकी इतरांना सोपविली. नामशेष झालेल्या या कंपन्यांमध्ये अनेक उल्लेखनीय उद्योग घराण्यातील कंपन्याही आहेत. जसे एस्सार (रुईया), व्हिडीओकॉन (धूत), जेपी (गौर), फ्यूचर रिटेल (बियाणी), डीएचएफएल (वाधवान बंधू) तसेच ब्रज बिनानी, अनिल अंबानी, मल्या, गौतम थापर, भूषण, मलिवदर व शििवदर सिंग बंधू आदींना त्यांच्या कंपन्यांची मालकी गमावावी लागली आहे. निर्नियंत्रण, आरक्षण-मुक्तता, परवाना-मुक्तता वगैरेतून सरकारचा अर्थव्यवस्थेतील हस्तक्षेप कमी होणे हे खरे तर तोवर मर्जीतील असलेल्या उद्योगांचे सुरक्षा कवच काढून घेणारेही ठरले. त्यांना एक तर स्थलांतर करावे लागले किंवा नव्या स्पर्धकांना जागा मोकळी करून द्यावी लागली.
संक्रमण हा निसर्गनियम असून, त्याला अनुसरून वेळीच वारसदाराला निश्चित करून त्याच्याकडे टप्प्याटप्प्याने जबाबदाऱ्या संक्रमित करण्याकडे झालेल्या दुर्लक्षातून पुढे अनेक समस्या डोके वर काढतात. नफ्यासारख्या अंतर्गत स्रोतांच्या प्रभावी वापरातून मूल्यवृद्धी, नावीन्यतेच्या ध्यासासह मूल्याधारित शाश्वतता, कालसुसंगत बदलांचा स्वीकार, अद्ययावत तंत्रज्ञानांचा अवलंब आणि मुख्य म्हणजे मालकी आणि व्यवस्थापन अर्थात कारभार यांत फरक करून मनाने नव्हे तर तर्कसुसंगत बुद्धीने निर्णय घेणे वगैरे कोणत्याही धंदा-व्यवसायाने टिकाव धरण्याचे आधारस्तंभ आहेत. एक तर बाजारात सूचिबद्ध आणि कोटय़वधी भागधारक असणारी सार्वजनिक कंपनी ही पिढीजात वारसा म्हणून जरी कोणी चालवत असला तरी तो गुंतवणूकदार, भागधारकांनी दायित्व सोपविलेला त्यांचा प्रतिनिधी आहे, याची त्याने कायम जाणीव ठेवायला हवी. यालाच ‘उद्यम सुशासन’ म्हणतात, ज्याबद्दल आपल्याकडे सामान्य भागधारक अनभिज्ञ आहेच, पण कंपन्यांचे संचालक व व्यवस्थापनही बेगुमान असल्याचे दिसून येते. कारभाराचा हाच आदर्श जुमानला गेला नाही, तर वारसा इतिहासाच्या पानात जाईल आणि ‘घराणी’ अटळपणे संपुष्टात आलेली दिसून येतील. त्याबद्दल तक्रार किंवा दु:ख तरी का कुणी करावे?
sachin.rohekar@expressindia.com