विजया मेहता यांच्या ‘झिम्मा’ या आत्मकथनापर्यंत नाटय़कलावंतांची अनेक आत्मचरित्रे मराठीत प्रकाशित झाली. या सर्वापेक्षा ‘आणि मग एक दिवस..’ हे प्रख्यात अभिनेते नसीरुद्दीन शहा यांचे आत्मकथन खूपच वेगळं आहे. नसीरुद्दीन समांतर धारेतील चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. हे पुस्तकही त्या वेगळेपणाची प्रचीती देते. आत्मकथनात मी अपरिहार्यच असतो; पण या पुस्तकात तो इतर कथनांतल्या इंग्रजी कॅपिटलातल्या ‘क’सारखा आत्मप्रौढीसाठी येत नाही. तो तटस्थपणे आपल्याच ऱ्हासाकडे किंवा कारनाम्यांकडे पाहणारा वाटतो. अशी अलिप्तता अन्य आत्मकथनांमधून आढळून येत नाही. यापूर्वी ‘एक झाड, दोन पक्षी’ या विश्राम बेडेकरांच्या आत्मकथनात ती होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आत्मकथनाच्या पूर्वार्धात तर एक वाया गेलेला मुलगा अशीच नसीरची प्रतिमा उभी राहते. मुलाला चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून नसीरचे वडील सतत प्रयत्नशील असतात. त्यासाठी वाटेल तेवढा पसा ते खर्च करतात. त्यानं डॉक्टर, वकील, सनदी अधिकारी असं काहीतरी व्हावं अशी त्यांची मनस्वी इच्छा असते. पण मुलगा त्यांच्या सर्व अपेक्षा फोल ठरवतो. आणि तरीही ते आरडाओरडा करत नाहीत. असा सहनशील पिता मिळणं हे नसीरचं भाग्यच. बाबा आपल्याला समजून घेत नाहीत असं नसीरला त्या वयात वाटणं स्वाभाविक आहे; पण तो स्वत: बाप झाल्यावर तरी त्या काळातल्या आपल्या पित्याला त्यानं समजून घेतल्याची खूण पुस्तकात दिसायला हवी होती.
नसीरुद्दीन मूळात प्रायोगिकवाला आहे. प्रायोगिक नाटकाला दर्शनी पडदा नसतो. या पुस्तकातही नसीरुद्दीनने कसलाही आडपडदा न ठेवता सगळं खुल्लमखुल्ला सांगितलं आहे. ‘मन की बात’ लपवून ठेवलेली नाही. इतर आत्मचरित्रांत जे दडवलं जातं, ते त्यानं वाचकांना विश्वासात घेऊन सांगितलं आहे. शाळेतल्या शिक्षिकेच्या पायांचं आकर्षण होतं, हे सांगत असताना चोरून सिगारेट्स ओढत असल्याचंही तो नमूद करतो. गांजा, चरस, इ. अंमली पदार्थाच्या व्यसनांची केवळ कबुलीच देत नाही, तर सेवनानंतरचा धुंद अनुभवही कथन करतो. पुढे चित्रपटांत काम मिळाल्यानंतर शूटिंगच्या कालावधीत या गोष्टी निग्रहाने आपण बाजूला ठेवल्या हेही तो प्रांजळपणे सांगतो. या व्यसनांबद्दल कसलेही समर्थन तो देत नाही. शाळेतल्या शैक्षणिक ऱ्हासाचं ‘अधोगती पुस्तक’ तो उघड करतो. शाळेत असतानाच्या एकतर्फी प्रेमाची सुरस कहाणी तो सांगतो. त्याने तंबूतल्या ‘नटणी’बरोबर दोन रुपयात अनुभवलेल्या पहिल्या कामपूर्तीच्या फजितीची कथाही उत्कंठावर्धक आणि फार्सिकल आहे. अलिगढ विद्यापीठात भेटलेली पदवीधर परवीन.. त्याला सकस साहित्याची ओळख करून देणारी. त्याची मार्गदर्शक, त्याला ज्ञानसंपन्न करणारी. त्याच्यापेक्षा चौदा वर्षांनी मोठी. तो तिच्या प्रेमात पडतो. ही प्रेमकहाणी आगळी आहे. तो तिच्याशी लग्न करतो. त्याला मुलगी होते. हीबा तिचं नाव. हीबाच्या बालपणात त्याच्याकडून तिच्या झालेल्या अवहेलनेची त्याला आजही तीव्र टोचणी आहे. (पुस्तकाच्या शेवटी हीबा पित्याकडे राहायला येते. राष्ट्रीय नाटय़शाळेचा अभ्यासक्रम तिने पुरा केला आहे. आता ती व्यावसायिक नाटय़क्षेत्रात मग्न आहे. तिच्या पुनर्वसनाचे सर्व श्रेय लेखक आपल्या पत्नीला- रत्ना पाठकला देतो.).
मुंबईला जाऊन आश्रितासारखे जगत स्टुडिओच्या चकरा मारून अखेर अयशस्वी घरवापसीची गोष्ट तो लपवीत नाही. रत्नाबरोबरच्या प्रियाराधनाची हकिकत पहली नजरपासून तिच्याशी विवाह होईपर्यंतच्या सगळ्या तपशिलांसकट तो कथन करतो. अगदी जवळच्या मित्राने मित्राला सांगावी तशी. आपल्या आई-वडिलांबद्दल तो मोकळेपणाने लिहितोच; पण आपले बलदंड मामा, त्यांच्या बंदुका, त्यांचा शिकारीचा शौक, एकूण घराणं याबद्दलची माहितीही तो पुरवतो. त्याच्या नमुनेदार शिक्षकांची छोटी छोटी व्यक्तिचित्रे सुरेख उतरली आहेत. लखनौ, अजमेर, ननिताल, अलिगढ विद्यापीठ, इ. स्थलांतरांत तेथील सामाजिक वा राजकीय परिस्थितीबद्दल मात्र तो काहीच लिहीत नाही. नेहरूंचं निधन, जॉन केनेडी यांची हत्या अशा काही जुजबी कालदर्शक नोंदी तो करतो, इतकंच.
नटांच्या अन्य आत्मकथनांपेक्षा या कथनाचा विशेष हा, की याला एक स्वतंत्र अशी थीम आहे. आपल्यातल्या नटगिरीचा शोध घेणे हे कथनकाराचे एकमेव लक्ष्य आहे. वयाच्या पाचव्या वर्षांपासून या शोधाचा उगम झाला आणि पुस्तकाच्या शेवटापर्यंतच नव्हे, तर आजतागायत हा शोध सुरू आहे. लेखकाच्या लेखी अन्य सर्व गोष्टी दुय्यम-तिय्यम आहेत. त्यांचा तो केवळ पाश्र्वभूमी म्हणून वापर करतो.. सराईत नाटककारासारखा! त्याची बालपणाची पहिली आठवण उंच मंचावरून नाच करणाऱ्या विदुषकाची आहे. त्याच्या या पहिल्या अद्भुत अनुभवात तो नटालाही पाहतो. पुस्तकाच्या भरतवाक्यात तो जे भयस्वप्न पाहतो त्यातला म्हातारा त्याला म्हणतो, ‘तुला सगळे उत्तम नट मानत आले आहेत, हे निर्विवाद. पण..’ त्या ‘पण’नंतर काय? त्याचा थांग त्याला अजून लागलेला नाही. त्याचाच तो शोध घेतोय. रंगमंचाच्या पडद्याला आतून मिळणाऱ्या धक्क्यांनी त्याला आईच्या पोटात बाळ ढुशी मारते त्याची आठवण होते. जन्मापासून जणू नाटकच त्याच्या डोळ्यासमोर आहे. प्रसंग कुठलाही असो, स्थळ कुठलंही असो; त्याला प्रत्येक वेळेला तसतसे सिनेमातले प्रसंगच आठवतात. एखाद्या भक्ताला जळी-स्थळी-काष्ठी- पाषाणी देव दिसावा, तसा त्याला प्रत्येक ठिकाणी सिनेमाच दिसत राहतो. शाळेचे जिने चढताना तर तो दिसतोच; पण तंबूतल्या नटणीबरोबरच्या प्रसंगाअगोदरही दिसतो. आणि या स्वप्नरंजनातच तो सदैव असतो. स्वत:ला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये कल्पून तो प्रसंग साजरे करतो. एका परीनं स्वत:च्या नटगिरीकडेच तो बघत असतो. यादृष्टीनं ‘आरशाच्या पलीकडची दुनिया’ हे प्रकरण अत्यंत नाटय़पूर्ण तर आहेच; पण लेखक नट होण्याच्या वेडानं किती झपाटलेला आहे याचं ते प्रत्ययकारी उदाहरण आहे. पुस्तकात जागोजागी विखुरलेली नट होऊ पाहणाऱ्या लेखकाची स्वप्नरंजनं ही या संपूर्ण कथनाची मनोहर दृश्यात्मकता आहे.
शेक्सपिअरच्या नाटकांचा गावोगाव जाऊन प्रसार करण्याचे व्रत घेतलेल्या बिनव्यावसायिक नाटक कंपनीचे नट-मालक जेफरी केंडल जेव्हा त्याच्या शाळेत येतात तेव्हा तर तो त्यांच्याकडे ओढलाच जातो. त्यांच्याबरोबर फिरतीवर जाण्यासाठी मनाची तयारीही करतो. केंडल यांच्या अभिनयाचं गारूडच त्याच्यावर पडतं. शेक्सपिअरच्या नाटकांतील व्यक्तिरेखांचं त्यांच्याइतकं अभूतपूर्व प्रस्तुतीकरण अन्य कुणाचं त्याने पाहिलं नसल्याचं तो सांगतो. त्यांना पाहूनच ‘र्मचट ऑफ व्हेनिस’मधली शॉयलॉकची भूमिका तो तयार करून ठेवतो. शाळेतील वक्तृत्व स्पध्रेत शेक्सपिअरच्या नाटकातील उतारे पाठ करून त्यांचा वापर करून तो बक्षिसं मिळवतो तेही त्यांच्या प्रभावामुळेच. ‘नाटकावर प्रेम करणं आणि नाटय़कलेची सेवा करणं म्हणजे नक्की काय, याचा अंतिम धडा मला केंडल यांच्याकडूनच मिळाला,’ असं तो म्हणतो.
रंगभूमीच्या संदर्भात ज्या दोन थोरांची व्यक्तिचित्रे यात रंगवली आहेत त्यात जेफरी केंडलप्रमाणेच दुसरे आहेत- राष्ट्रीय नाटय़शाळेचे प्रमुख, रंगभूमीचे पितामह इब्राहिम अल्काझी. त्या रेखाटनातली ही दोन वाक्ये पाहा- ‘ते विद्यार्थ्यांना सौंदर्यदृष्टी आणि सुसंस्कृत आधुनिकता यांची महती सांगण्यासाठी झटत असत. मुख्य म्हणजे शिस्त, नेमस्त व्यवस्था यांची दीक्षा त्यांनी भारतीय रंगभूमीला दिली.’ अल्काझी यांच्या दोषांवरही त्यानं बोट ठेवलं आहे. एन. एस. डी.वर लिहिताना अभिनयशिक्षणाच्या बाबतीतला भोंगळपणाही त्याने परखडपणे मांडला आहे. एन. एस. डी.च्या विद्यार्थ्यांचं ‘कॉकेशियन चॉक सर्कल’ हे नाटक तो पाहतो आणि विलक्षण प्रभावित होतो. या नाटकातील शशिकांत निकतेच्या अभिनयाने तो भारावून जातो. असा अभिनय आपल्याला जमणार नाही याची कबुली देतो. (आता विस्मृतीत गेलेल्या मी पाहिलेल्या या नटाला तितक्याच समर्थ नटाकडून मिळालेली ही दाद वाचून माझे मराठी मन भरून आलं.)
नसीरुद्दीन यांनी जगभर पाहिलेल्या रंगमंचीय आविष्कारांमध्ये त्यांना सर्वश्रेष्ठ वाटणाऱ्या ज्या मराठी कलावंतांची व भूमिकांची नावं त्यांनी उद्धृत केली आहेत, ती अशी- डॉ. श्रीराम लागू (आधे अधुरे), डॉ. मोहन आगाशे (घाशीराम कोतवाल), चंद्रकांत काळे (बेगम बर्वे), भक्ती बर्वे (अजब न्याय वर्तुळाचा), सुलभा देशपांडे (शांतता कोर्ट..). आपल्या पुढील नाटय़प्रवासात छबिलदास रंगमंच, तिथे केलेले इंग्रजी नाटकांचे प्रयोग आणि अरविंद-सुलभा देशपांडे, काकडेकाका यांच्या आठवणीही जागवल्या आहेत.
सई परांजपे यांचे पटकथालेखन व दिग्दर्शनाची नसीरने प्रशंसा केली आहे. आपल्या पुस्तकाच्या अनुवादासाठी त्याच हव्यात याबद्दल नसीर का आग्रही होते याचं उत्तर या प्रशंसेत मिळतं. ‘जसपाल शहा’ असं सर्वानी चिडवण्याइतक्या त्याच्या जसपालबरोबरच्या जानी दोस्तीच्या शोकांतिकेची कथा चटका लावणारी आहे. कलावंतांमधील ईष्र्या व मत्सर यांचे हे रूप भेदक आहे. ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ (एफ. टी. आय. आय.) या संस्थेत दाखल झाल्यानंतर तिथल्या व्यवस्थेवर आणि शिक्षणपद्धतीवरही त्याने कोरडे ओढले आहेत.
दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’ किंवा गिरीश कार्नाड यांच्या ‘गोधुली’ या पहिल्यावहिल्या चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या वेळचे अनुभव लक्षणीय आहेत. तिथेही नटगिरीचा अविरत शोध लक्षात येतो. तिथे भेटलेल्या पं. सत्यदेव दुबे यांचे मिळालेले अभिनयाचे मार्गदर्शन तर अफलातूनच. स्टुडिओत रिकाम्या वेळेत ती, ती भूमिका वास्तवपणे जगण्याचा त्याचा प्रयत्न हास्यास्पद ठरला तरी तोच नसीरला त्याची भूमिका पुरस्कारप्राप्त ठरायला उपयोगी पडला असणार. काही सुमार व रटाळ चित्रपटांत काम केल्याची नोंदही त्यांनी केली आहे. ‘जनताजनार्दनी’ (हा शब्द अनुवादिकेचा) अर्थात लोकप्रिय चित्रपटांचा आपण हीरो होऊ शकलो नाही याची प्रारंभी त्याला तीव्र टोचणी होती. पण काही वर्षांच्या अनुभवाने ती बोथट झाली. हिंदी चित्रपटसृष्टीतील नट-नटय़ांच्या अभिनयाचं एकेका वाक्यात जे मूल्यमापन केलं आहे ते कमालीचं मर्मग्राही आणि अचूक आहे. प्राण सिकंदर हे दुनियेतले सर्वात उत्कृष्ट वाईट नट आहेत, या सत्यदेव दुबे यांच्या मताशी नसीर सहमत आहेत. ‘शोले’सारखा प्रथम आपटी खाल्लेला चित्रपट कालांतराने सर्वाधिक यशस्वी चित्रपट कसा ठरू शकतो, याबद्दल त्याला कुतूहल आहे. तो बॉलीवूडला फॉलीवूड म्हणतो. त्याने काम केलेल्या ‘जुनून’, ‘मासूम’, ‘अल्बर्ट पिंटो..’ इ. चित्रपटांच्या संदर्भात त्यानं यात लिहिलंय. पण ‘स्पर्श’ चित्रपटाच्या चित्रीकरणाअगोदरच्या अनुभवात अंध नायकाची त्याची ही भूमिका पूर्वीच्या सगळ्या अंध नायकांपेक्षा का वेगळी झाली, याचं उत्तर मिळतं. अन्य कलावंतांच्या आत्मवृत्तांमध्ये गाजलेल्या भूमिकांच्या पुरस्कारांची नोंद केली जाते; पण त्यासाठी अभ्यास काय केला, कोणतं अवलोकन केलं, कोणते परिश्रम घेतले, याचे सूतोवाचदेखील केलेलं नसतं. त्यामुळे त्याला ती भूमिका योगायोगाने जमून गेली, एवढंच म्हणता येतं. नसीरला अंधाच्या या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला तो त्या व्यक्तिरेखेला चोहोबाजूने भिडण्याच्या त्याच्या सवयीमुळेच, हे इथे स्पष्ट होतं. अस्सल कलावंत होऊ पाहणाऱ्यांनी यातून धडा घ्यायला हवा. रिचर्ड अॅॅटनबरोंच्या ‘गांधी’ चित्रपटासाठी नसीरची निवड झाली नाही. पण बेन किंग्स्लेचं गांधींचं काम पाहिलं तेव्हा तो अफाट ताकदीचा नट आहे याची कबुली नसीरनं दिली आहे. नाटय़वाटचालीत पोलंडच्या ग्रोटोव्हस्कीच्या थिएटरचा त्याने घेतलेला अनुभव थरारक आणि भयानक आहे. आपल्या ‘मॉट्ली थिएटर’बद्दलही त्याने लिहिलं आहे. ‘माझं स्थान- एक शोध’ या अखेरच्या प्रकरणात त्याच्यातला पारदर्शक प्रांजळपणा प्रकट होतो.
लहानपणापासूनच अभिजात पाश्चात्त्य चित्रपटांचं बाळकडू नसीरला मिळालंय. श्रेष्ठ पाश्चात्त्य नाटककारांच्या नाटकांचा सर्वागाने त्याने अनुभव घेतलाय. बेगडी हिंदी चित्रपटांत रुतून न बसता वास्तव चित्रपटांतील भूमिका जगण्याचा आनंद घेत त्याचे कलासक्त मन दशांगुळे वर राहिले.. स्वत:ला विकसित आणि समृद्ध करीत राहिले. अभिनयवेडानं झपाटलेले झाडच जणू! कसला अभिनिवेश नाही की कसला अहंभाव नाही. स्वत:वरच विनोद करत अनुभवांतून प्राप्त झालेले निष्कर्ष बेडरपणे मांडत केलेला आत्मशोध म्हणजे हे आत्मकथन. क्वचित भावाकुल, पण भावव्याकूळ नाही. मेलोड्रामा नाही.
सई परांजपे यांनी केलेला अनुवाद वाचताना कुठेही अडखळायला होत नाही, इतका तो ओघवता व रसाळ झाला आहे. काही ठिकाणी संस्कृतप्रचुर शब्दांचा वापर केल्यामुळे पुण्यातला ब्राह्मणच आपल्याशी बोलतोय असं वाटतं. त्यामुळे पांढरपेशी वाचकाला हा अनुवाद अधिक जवळचा वाटू शकेल. श्रेष्ठ नटांची अशी आत्मवृत्ते ही ऐतिहासिक दस्तावेज असतात. त्यामुळे त्यात प्रमुख घटना वा टप्प्यांना सन व तारखा देण्याची नितांत आवश्यकता असते. प्रकाशकानं याबाबतीत आग्रही राहून लेखकाला मदत करायला हवी. पुस्तकाला अॅकॅडमिक मोल प्राप्त करून देण्यासाठी अशा प्रयत्नांची गरज आहे. ‘आणि मग एक दिवस..’ हे कथन प्रामाणिक आणि परखड आहे; तितकेच ते रंजक आणि नाटय़पूर्णही आहे. त्याला रंगमंचीय रूप देऊन ते लेखकानेच सादर केले तर तुफान लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. पुस्तकाची निर्मिती दर्जेदार आहे. छोटय़ा छायाचित्रांच्या बारा पृष्ठांच्या दृश्य भागाने आशयाच्या सजीवतेत भर टाकली आहे.
‘आणि मग एक दिवस..’ – नसीरुद्दीन शाह,
अनुवाद- सई परांजपे,
पॉप्युलर प्रकाशन,
पृष्ठे- २८९, मूल्य- ६५० रुपये.
कमलाकर नाडकर्णी kamalakarn74@gmail.com