कोकणाने महाराष्ट्राला जेवढे कलावंत दिले तेवढे इतर प्रदेशांनी क्वचितच दिले असतील. कोकणची भूमी श्रीमंत आहे ती हिरव्यागार निसर्गाने, बहरलेल्या झाडाझुडपांनी आणि फेसाळत्या समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी! ज्या मालवणी मातीतून कोकणच्या साहित्याची पैदास झाली त्यात प्रामुख्याने भुतं, वेडी माणसं, तऱ्हेवाईक व्यक्तिरेखा, दारिद्रय़ाने पिचलेली, स्वत:वरच विनोद करणारी, प्रेमळ, मायाळू माणसं आणि हिरवागार निसर्ग यांचाच समावेश असतो. ‘भुईरिंगण’ कोकणदर्शन घडवीत असलं तरी ते यापूर्वीच्या प्रकटीकरणापेक्षा पूर्णत: वेगळं आहे. रिंगण घेणाऱ्या लेखिका रश्मी कशेळकर बालपणातल्या कोकणात भिजून एवढय़ा चिंब चिंब चिंबल्या आहेत, की त्यांच्यातला प्रौढपणाचा शुष्कपणा उडून गेला आहे. एक वेगळीच निरागसता आणि अवखळपणा त्यांची दृष्टी व्यापून राहिला आहे. माणसं ही माणसंच असतात, पण झाडं, गायी, वासरं, फुलं, फळं, किडे, मुंग्या, अंधार, उजेड, पाणंदी, पाचोळा अशा साऱ्या साऱ्या बिनमाणसांचीही माणसंच होतात. एक अद्वैतच निर्माण होतं. नात्याचा जिव्हाळा स्रवू लागतो. कोकणचा आसमंत वाचकाचा आप्त होतो.
शहरातल्या दीर्घ वास्तव्यामुळे अर्थ हरवून बसलेले मालवणी शब्द ‘हय गळ्याक मिठी मारतत आणि गुदमरवून टाकतत.’ लेखिकेचं बालपण कोकणातल्या खेडय़ात गेलं. त्या आठवणींची निर्मिती म्हणजेच हे ललितलेख. त्यांचं मालवणी बोलीवर इतकं प्रेम, की आजूबाजूची झाडं आणि पक्षीदेखील मालवणीच बोलतात. जांभळाचं झाड ‘जांभळीण’ होतं. आत्ता हेच बघा ना! ‘खरबी’ हे पिल्लेकरीण कोंबडीचं नाव. चौदा-पंधरा पिल्लांना घेऊन ही फटाकडी पडवीत फिरते तेव्हा मागे राहिलेल्या पिल्लाला फटकारते- ‘‘गो चल पट पट. मागे कित्याक ऱ्हवतस?’’ खरबीचा पिल्लांना शिकवण्याचा माऊंटेनियरिंग क्लब जितका प्रेक्षणीय, तितकाच तिच्या पिल्लांच्या शिकारीचा प्रसंग भेदक आणि नाटय़पूर्ण. खरबीचा ‘लॉस्ट अॅण्ड फाऊंड’चा खेळ अगदी हिंदी सिनेमाला तिच्यावरून ओवाळून टाकावा असा.
त्यांचं देवगडच्या वाडी गावातल्या आजीचं व्यक्तिचित्र तर मनात खोलवर कोरलं जातं. तिचं केंबळ्याचं घर. घराच्या डोक्यावरची बोटानं गर्रकन् फिरवावीशी वाटणारी गवताची छत्री.. दोन जाडजूड वाश्यांवर तोललेली. अत्यंत साधं असूनही वेगळं वाटणारं तिचं स्वयंपाकघर. जाहिरातीतल्या चकचकीत किचनपेक्षा कितीतरी जवळीक साधणारं. भाकरी भाजलेल्या गरम तव्यात कांदा-लसणीच्या फोडणीवर आजीनं परतलेली घोळीची भाजी वाचता वाचताच खावीशी वाटते. गावानं मारकुटी ठरवलेली आजीची गाय.. जगदंबा तिचं नाव. तिचे गायनामे औरच. तिची तक्रार करणाऱ्या शेजारणीला आजी खडसावून बाहेर काढायची आणि घसा सुकला असेल म्हणून तिला चहाही पाठवायची. आजीच्या घराची गवताची छत्री म्हणजे एक प्रतीकच. सर्वावर मायेचं छत्र धरणारी आजी.
‘गावमाय’ असणारी नईआजीची तऱ्हाच वेगळी. सगळ्यांसाठी सगळं करणारी. अगदी कुत्र्या- मांजरांसाठीसुद्धा! वाडीतल्या सगळ्याच बाळ-बाळतिणींना नईआजींनी न्हाऊमाखू घातलेलं. सगळीच तिची आतडय़ाची माणसं. तपशिलात वर्णन केलेला तिचा दिनक्रम भन्नाटच. या ललितलेखांना गोष्टीचं रूपडं आहे. पण गोष्ट न सांगता व्यक्तिरेखा इतक्या ठसठशीतपणे उभ्या राहतात, की गोष्टीची गरजच पडत नाही. अलक्याची आवस, बाळ्याची आई, मासेवाली मालग्या वाचकांशी प्रेमाने गप्पा मारतात. गुराढोरांना लळा लावणारा मारोत्या आणि नईआईची त्याच्याशी झालेली अखेरची मूक भेट वाचकाला चटका लावते. गावातल्या कुणाचंही निधन झालं की त्याचं अंत्यकर्म प्रामाणिकपणे करणारा सन्त्या म्हणजे आदर्श स्मशानाचं स्वप्न पाहणारं एक गूढ व्यक्तिमत्त्व.
देवगडच्या हापोसची रसवत्ता त्या शीर्षकलेखाच्या शब्दांतून पाझरते आणि ‘आंबा पिकतो रस गळतो’चा प्रत्यय देते. मोहोर येण्यापासून ते तोरांना (कैऱ्यांना) हनुवटी फुटेपर्यंत आणि आढीतल्या आंब्यांना रंग येण्यापासून ते त्यांचा खरपूस समाचार घेईपर्यंतचा प्रवास (व्हाया स्वयंपाकघर), रायतं, लोणचं, पन्हं आणि अखेरीस आमरस हा इतका चविष्ट आहे, की वाचकांच्या डोळ्यांचीच जीभ होते. पाणी सुटते. निसर्गाच्या देणगीत असलेल्या आनंद-सुखाची चव या लेखात चाखायला मिळते.
‘जांभुळ- देठी गाभुळलेले’ आणि ‘पपई’ या लेखांतूनही लेखिकेच्या सूक्ष्म, तपशीलवार अवलोकनाचा प्रत्यय येतो. ‘जिव्हाळ घरटं’मध्ये मावशीच्या घराचा एक चलत्चित्रपटच शब्दा-शब्दांतून पुढे सरकत राहतो. घराकडच्या वाटेवर लागणारी ‘तर’, त्यातले मासे, घराचा आसमंत, झाडाझुडपांचं मैत्रेय, घरातले सण, तवसाच्या पातोळ्या, भुताच्या गोष्टी सारे डोळ्यांसमोर येते. लेख संपल्यावर लांब जाणाऱ्या घराला कुकाऱ्या मारून परत बोलवावेसे वाटते. ‘टुरिंग टॉकीज’, ‘आइस्क्रीम रोमान्स’,. ‘मॅट काळोख’ हे लेख कालच्या कोकणातल्या शालेय विश्वातल्या मुलांच्या मानसिकतेचं दर्शन घडवणारे आहेत.
‘माझे सवंगडी’ या लेखात समुद्राकाठच्या किल्ल्याच्या लँडस्केपबरोबरच हायस्कूलमधल्या गाबीत मुलामुलींचं जे चैतन्यदायी सांस्कृतिक दर्शन घडतं आणि त्यांचा जो जीवनसंघर्ष जाणवतो, तो विलक्षण प्रत्ययकारी आहे. कोकणात गणपतीचा सण हा सर्वात मोठा सण. बावीस ललित लेखांच्या या संग्रहात सर्वात मोठा लेख हा ‘गणपतीची शाळा’ हाच आहे. मुंबईत ‘गणपतीचा कारखाना’ असतो. पुण्यात ‘चित्रशाळा’ असते. काही दिवसांनी ‘गणपतीची अकादमी’ असंही म्हटलं जाईल. पण ‘शाळा’ मनात रुतून बसणारी. या पुस्तकातल्या गणपतीच्या शाळेत वेगवेगळ्या वेशभूषेचे, भटाबामनाचे गणपती तर आहेतच, पण त्यांच्याबरोबर हरताळका (पार्वती) आहेत. म्हणजे को-एज्युकेशन आहे. शिवाय नागोबा आहेत आणि कृष्णदेखील. भेदाभेद नसे शाळेमाजी. लेखिकेचे बाबा गावातले नाणावलेले मूर्तिकार. सुमारे तीनशे मूर्ती त्यांना बनवाव्या लागत. काका आणि पुतणे मदतीला असत. लेखिकेच्या बालपणापासूनच ही शाळा तिच्या नजरेसमोर दरवर्षी भरत होती. शाळेचं प्रगतीपुस्तक दाखवण्यापूर्वी लेखिकेने दिपोटी साहेब झालेल्या वाचकाचंच तोंड गोड करून टाकलंय. गणपतीच्या पहिल्या दिवशी हिरव्यागार केळीच्या पानावर पांढरेशुभ्र तकतकीत, कळीदार एकवीस मोदक शंकू आकारात लावलेले पाहिल्यावर कुणाला गणपती व्हावेसे, बघावेसे वाटणार नाही? आणि मग अनंत चतुर्दशीपर्यंत तांदळाची खीर, डाळीचं पुरण, खाणपोळी, मालपोये असे एक-एक जिभाळ पदार्थ आणि क्लायमॅक्स म्हणजे अखेरच्या दिवशीची ऋषीपंचमीची मिक्स भाजी.. रेसिपीसह रसभरीत वर्णन वाचून कुणाची रसना चाळवणार नाही? लेख कितीही मोठा असला तरी वाचल्याशिवाय राहवणार नाही. चवीनं खाणार त्याला देव पावणार, नाहीतर त्याचा मोर्या होणार!
मातीचा ट्रक गावात आल्यापासून तो तयार गणपतीच्या विसर्जनापर्यंत प्रत्येक हालचाल, कृती म्हणजे एक खास आयटेमच. कार्यक्रमाचा प्रारंभ पाटावरच्या मातीपूजनानं होत असे. मग माती मळणं. ही मळलेली माती डुप्लेक्स होती. एका बाजूने ती गणपती व्हायला उत्सुक असायची, तर दुसऱ्या बाजूने ती घरातल्या मुलांचा भातुकलीचा संसार उभा करण्यात मग्न असायची. या भातुकलीत मुलींबरोबर मुलगेही असत. त्यामुळे भांडय़ाकुंडय़ांबरोबर शेतं असायची, प्राणी असायचे, कोंबडय़ा आणि बैलदेखील असायचे. कुणाच्या तरी रागानं पाय पडण्यानं किंवा दफ्तरातल्या धबडग्यानं जेव्हा या भातुकलीच्या संसाराची उद्ध्वस्त धर्मशाळा व्हायची, तेव्हा मालक कानठळ्या बसणारा विलाप करायचा. गणपती आकारास येत असतानाचा घरातल्या भातुकलीच्या संसाराचा हा समांतर खेळ मोठा मनोरंजक आहे. मातीकामानंतर मूर्ती घडतानाची अवयवबोली म्हणजे अगदी शरीरशास्त्र शिकून घ्यावे. साचे बनवले जातात. वेगवगळे अवयव तयार होतात. जोडले जातात. बालमूर्ती तयार होतात आणि लाकडी मांडणीवर जाऊन गुपचूप बसतात. बहुधा पहिला नंबर मिळाल्याच्या आनंदात!
स्त्रियांच्या समान हक्काची मागणी जुनी झाली नसती तर गणपतीबरोबरच्या हरितालिकांनीही गणपतीएवढय़ा समान उंचीची मागणी केली असती आणि मग घरातल्या बायकांचीच पंचाईत झाली असती. पण त्या हरताळका तयार करण्याच्या कामात ‘हम भी कुछ कम नहीं’ हे सिद्ध करून दाखवणाऱ्या. त्या कुणाचं ऐकणाऱ्यांपैकी नव्हेत. तेरी भी चूप, मेरी भी चूप! खरी गंमत मूषकमूर्तीची. त्याच्या विविध वेशभूषेची वेशभूषा स्पर्धा तुफान हसवणारी. गणपतीच्या पाटाखालच्या पाजव्या उंदरांची पळापळ तर मॅरॅथॉनच.
लेखिकेने घरातल्या गणपतीची ही जन्मकथा अगदी तपशिलात रेखणी- रंगकामापासून ते गणपतीच्या वर्षभरासाठीच्या परदेशगमनापर्यंत मोठय़ा वेधक रीतीने चितारली आहे. ती पुराणकथेतल्या गणेशकथेइतकीच, किंबहुना मोदकभर सरसच झाली आहे. गणपती नेणाऱ्यांची भाविकता, मुलांची भावुकता, नंतरचं घरातलं सुन्न वातावरण आणि तरीही आगामी आशेचा आनंद प्रकट करण्याची वृत्ती या सगळ्यांतून कोकणी माणूस पारदर्शकपणे दिसत राहतो. आजही तो तसाच आहे. कोकणातली गणपतीची आरती हा एक खास आयटेम असतो. तो लेखिकेने पुढच्या पुस्तकासाठी राखून ठेवला असावा. अधूनमधून चटका लावणारे सर्वच लेख प्रसन्न, आनंददायी आहेत. वेगवेगळ्या वेळी विविध मासिकांतून प्रकाशित झालेले हे ललित लेख एकत्र वाचताना काही ठिकाणं पुन: पुन्हा भेटत राहतात. त्यादृष्टीने ‘भूईरिंगण’ हे शीर्षक अन्वर्थक वाटतं. या कोकणातल्या स्वयंपाकघरात मासे फक्त फडफडताना दिसतात. चुलीवरच्या वायनात माशांची आमटी रटरटताना लेखात दिसत नाही. तळणाऱ्या तुकडय़ांच्या धुराचा वास अगरबत्तीच्या धुरासारखा वाचकाच्या नाकात शिरत नाही. लेखिका मत्स्यप्रेमी नसावी. समुद्र जवळ असून माशांशी वैर? खाऱ्या पाण्यात तोंड धुऊन यायची पाळी.. दुसरं काय!
चित्रकार रविमुकुल यांचं पर्जन्यधारांचा आनंद घेणाऱ्या निसर्गकन्येचं मुखपृष्ठावरचं चित्र वेधक आहे. लेखिका आजही कोकणातच सासरी आहेत. त्यांच्या तरुणपणीचं कोकण पुढच्या पुस्तकांतून दिसायला हवं. तेही भोवंडून टाकणारं असेल अशी अपेक्षा ‘भुईरिंगण’ निर्माण करते.
‘भुईरिंगण’- रश्मी कशेळकर, मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे- १८०, किंमत- २०० रुपये.
कमलाकर नाडकर्णी kamalakarn74@gmail.com
तांबडय़ा मातीत भोवंडून टाकणारं ‘भुईिरगण’
कोकणाने महाराष्ट्राला जेवढे कलावंत दिले तेवढे इतर प्रदेशांनी क्वचितच दिले असतील.
Written by कमलाकर नाडकर्णी
आणखी वाचा
First published on: 01-05-2016 at 01:30 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About konkan region in maharashtra