हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
२०१७ साल मावळताना आणि नवीन वर्षांचे स्वागत करत असताना सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रासमोरील आव्हानांचा परामर्श घेणे क्रमप्राप्त ठरते. या उद्देशाने ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांच्याशी केलेली ही बातचीत..
पेठे हे केवळ नाटय़कर्मीच नाहीत, तर प्रखर सामाजिक भान असलेले आणि त्यासंबंधात पोटतिडिकेने अभिव्यक्त होणारे तळमळीचे कार्यकर्तेही आहेत. ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘उजळल्या दिशा’, ‘चौक’, ‘दलपतसिंग येती गावा’, ‘सत्यशोधक’ आणि ‘समाजस्वास्थ्य’ यांसारख्या नाटकांतून त्यांनी आपली सामाजिक-राजकीय अस्वस्थता अभिव्यक्त केली आहे. अशी नाटके गावोगावी सादर करून तळागाळातील माणसांपर्यंत ती पोहोचवण्याचे काम ते गेली कित्येक वर्षे निष्ठेने करीत आहेत. स्वाभाविकपणेच त्यांना समाजाच्या तळरेषा जाणून घेण्यात रस आहे, हे ओघाने आलेच. अशा कार्यकर्त्यां रंगकर्मीने सभोवतालच्या समाजवास्तवाबद्दलची आपली निरीक्षणे नोंदवणे आणि सांस्कृतिक पर्यावरणाचे निदान करणे या घडीला अप्रस्तुत ठरू नये. म्हणूनच त्यांच्या मुलाखतीचा हा प्रपंच..
‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘उजळल्या दिशा’, ‘आनंदओवरी’, ‘चौक’, ‘दलपतसिंग येती गावा’, ‘सत्यशोधक’, ‘समाजस्वास्थ्य’सारखी सामाजिक जाणिवांची नाटकं तुम्ही केलीत. ती करताना तुम्हाला भवतालचा काय अनुभव आला? तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचलं का? की एक कलाकृती एवढय़ापुरतंच त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं?
– एक तर मी सामाजिक जाणिवांची नाटके आहेत म्हणून ही नाटके केलेली नाहीत. ही सारी नाटके माझ्या त्या, त्या वेळच्या जगण्याचा भाग आहेत. माझ्या जाणिवांमध्ये जसजशी भर पडत गेली त्यातून ही नाटके उगवली आहेत. बरं, ही नाटके माझी एकटय़ाची थोडीच आहेत? ती त्या, त्या लेखकांची आणि नटांचीही आहेत. म्हणजे त्यांनाही ते विषय मांडणे आवश्यक वाटले म्हणूनच आम्ही एकत्र आलो. ही नाटके त्या, त्या वेळच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीला सामोरी जाणारी आणि ती समजावून घेणारी आहेत. नव्वद सालानंतर भोवतालची परिस्थिती कमालीची बिकट झाली आहे. अनेक प्रकारच्या दऱ्या माणसामाणसांत जगभर तयार होत आहेत. भवताल हा विस्मयकारक गुंतागुंतीचा होत चाललेला आहे. त्याची धग सर्वानाच जाणवते आहे. वैचारिक आणि बौद्धिक बकालपणा सर्वत्र भरून राहिलेला आहे. त्यातच या ढासळत्या जगण्यातून नाटक कसे निर्माण करावे, हा खोलवर बोचणारा प्रश्न तयार होतो. त्यातून कमालीची निराशा आणि उदासीनता येत असते. काही गंभीर आतवर जाणवते, पण ते व्यक्त होण्याकरता आवश्यक असणारी गोष्टच घट्टपणे तयारच होत नाही. या जाणिवेतून मग मी धडका घेत राहतो. की ही अशी व्याकुळ करणारी स्थिती आमच्या साऱ्या पिढीचीच आहे? आधीच्या कुठल्याही पिढीपेक्षा भयानक काळाने आमचा गळा गच्च धरला आहे. तेव्हा व्यक्त होताना जी तगमग होते ती नाटकातून व्यक्त करायचा प्रयत्न असतो. मला जशी ती नाटकं जाणवली, तशी ती मी केली. ती सामाजिक वा राजकीय कलाकृती वगैरे अशी लेबले लावून मुळातच केलेली नाहीत. नाटके करणे ही माझी आंतरिक गरज होती. माझ्या नाटकांतून परिवर्तन झाले, दृष्टिकोन लाभला, किंवा रंगभूमीच्या कक्षा रुंदावल्या, वगैरे असे माझे काहीही भ्रम नाहीत. मला आणि माझ्या बरोबरीने हा प्रवास करणाऱ्या कलाकारांना आणि समसंवेदनशील मित्रमैत्रिणींना मात्र अशा विपरीत परिस्थितीतही जगायला त्यांतून उभारी मिळाली.. सकारात्मक सर्जनशील ऊर्जा मिळाली, हे निश्चित. इतकेच सत्य.
‘सत्यशोधक’सारखं नाटक तुम्ही पुणे महापालिकेतील न-नट असलेल्या सफाई कामगारांना घेऊन केलं. त्यामागे तुमची नेमकी काय भूमिका होती? किंवा, ‘दलपतसिंग..’सारखं ‘माहितीचा अधिकार’ या विषयावरचं नाटक दुर्गम खेडय़ातील कलाकारांना घेऊन करण्यात एक वेगळा अनुभव घेण्याचं थ्रिल होतं, की आणखी काही विचार त्यामागे होता?
– जगण्याच्या तडफडीतून माझी भूमिका तयार होत गेली. आपण नाटक कसे करायचे आणि का करायचे, हा यक्षप्रश्न होता. बदलत्या काळाचा फुफाटाच इतका जोरदार होता, की कुठल्या लव्हाळांना पकडून राहायचे, हा जीवनमरणाचा प्रश्न माझ्यासमोर होता. ‘अनुभव’ नावाची काही जिवंत गोष्ट नाटकाद्वारे द्यायची आणि घ्यायची असते, हेच मूल्य विरळ होताना जाणवत होते. नाटक करायला आवश्यक असणारी आजूबाजूची पोषक परिस्थिती ढासळत गेलेली मी अनुभवत होतो. यातून सुटका करून घेण्याकरता मी जे उपक्रम राबवले, ते म्हणजे आपल्याला फार माहीत नसलेल्या लोकांच्या विश्वाला नाटकातून जोडून घेणे! नाटक करण्याकरता मी सतत नव्या आणि समविचारी भूमीच्या शोधात फिरू लागलो. चौकटी सोडून स्वत:चे जग स्वत: शोधू लागलो. कणकवली, जालना ते सफाई कर्मचारी हा प्रवास त्यातूनच झाला. या सगळ्या प्रवासातून नाटकाचे अर्थ गवसले. वेगळे आवाज आणि चेहरेही समोर आले. आमच्या जाणिवांमध्येच मोठा फरक पडला. दृष्टिकोनांमध्ये बदल झाले. नवे नाटक करणे आणि त्याचे प्रयोग करणे हे मला कायमच ‘थ्रिल’ वाटत आले आहे. नाटकाला सर्वशक्तीनिशी भिडणे ही मला ग्रेट गोष्ट वाटते. ते करताना माझी जी काही वैचारिक, मानसिक, आर्थिक तारांबळ उडते तीही मला विलोभनीय वाटते.
तुम्ही कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर रिंगणनाटय़ाद्वारे त्यावर प्रतिक्रिया दिलीत. परंतु त्यातून काही साध्य झालं का?
– डॉ. दाभोलकरांचा खून, मग पानसरेंचा, त्यानंतर कलबुर्गीचा आणि परत गौरी लंकेशचा! शिवाय नाव नसलेले इतरही खून आहेतच. दिवसाढवळ्या खून होतात आणि सरकार आणि पोलीस त्यांचा काहीही तपास लावू शकत नाहीत! आता हे सारे तुम्ही निमूटपणे मान्य करा, अशी दहशत आहे. हे सहन करण्यापलीकडचे आहे. अशा क्रूर आणि निर्दयी परिस्थितीत माझी नागरिक म्हणून जबाबदारी काय? आणि कलावंत म्हणून भूमिका काय? हे प्रश्न मला सतावत असतात. त्यातून रस्त्यात येऊन ओरडावे वाटू लागले. माझ्याजवळ अभिव्यक्तीचा एकच मार्ग होता- नाटक! मी ‘रिंगणनाटय़’ कार्यशाळा घेतल्या. त्यातून अडीचशे कार्यकर्त्यां कलावंतांनी १६ नाटके सादर केली. त्या नाटकांचे एक हजारच्या आसपास प्रयोग केले. आता यातून नेमके काय साध्य झाले? ज्यांना खुनाचा निषेध करायचा होता त्यांना माध्यम मिळाले. भले क्षीण असेल, पण आवाज उठवायला अवकाश तर मिळाला! गावागावातले नवे मित्र-मैत्रिणी या घटनेनं अधिक घट्ट जोडले गेले. आपल्याला जिवंत राखायला असल्या गोष्टी आवश्यक असतात. आजूबाजूला सन्नाटा पसरलेला असताना साधी लकेरही जगण्याची नवी उमेद वाढवते.
तुम्ही तुमची नाटके स्वयंसेवी संस्था आणि गावागावांतले नाटय़गट यांच्यामार्फत सर्वत्र पोहोचवता. या स्वयंसेवी संस्थांचं काम योग्य दिशेनं चाललेलं आहे किंवा कसं याबद्दल तुमचे काय अनुभव आहेत?
– तिकीटबारीवर माझे नाटक चालत नाही. सरकारची मदत वगैरे तर शक्यच नाही. तेव्हा माझे नाटक व्हावे कसे, या प्रश्नाचे उत्तर मला काम करता करताच सापडत गेले. गावातील नाटय़गट, सांस्कृतिक मंडळे, काही संवेदनशील मंडळी आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्याद्वारेच माझे नाटय़प्रयोग मी घडवून आणतो. मी नाटकाबरोबरच इतर क्षेत्रांतील लोकांकरिता कार्यशाळाही घेत असतो. उदाहरणार्थ, आरोग्य क्षेत्र. त्यातून ‘आरोग्य-संवाद’ ही संकल्पना पुढे आली. महाराष्ट्रातील अत्यंत वेगळ्या रीतीने काम करणारे डॉक्टर्स आणि त्यांच्या संस्थांशी मी जोडला गेलो. तसेच माझ्या समकालीन मित्रमैत्रिणींच्या संघटनांकरताही मी अशा कार्यशाळा घेतल्या. नाटक या माध्यमाचा वापर करून समाजप्रबोधन आणि विचारप्रसार करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. या साऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्ती या भारतीय राज्यघटनेला आणि लोकशाहीच्या मूल्यांना केंद्रस्थानी मानणाऱ्या होत्या. त्या धंदेवाईक उद्देशाने स्थापन झालेल्या नव्हत्या. मी जेव्हा अशा स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करू इच्छितो तेव्हा मी त्या संस्थांचे काम अगदी नीट पारखून घेतो आणि मगच त्यांच्याशी जोडला जातो. काही छोटे मतभेद मान्य करूनही या स्वयंसेवी संस्थांना हुकूमशाही, एकाधिकारशाही, धर्माधता आणि दहशतीशी लढायचे आहे. वंचित, पीडित, शोषितांचे प्रश्न तळमळीने सोडवायचे आहेत. मला ही मूल्ये महत्त्वाची वाटतात. आणि ती मूल्ये मांडायला ‘नाटक’ ही जागा माझ्याकरता उपलब्ध आहे. या सगळ्यामुळे माझा दृष्टिकोन विस्तारायला मदत होत असते. जगण्यातले अनेक स्तर त्यातून कळतात.
आजचं सामाजिक वातावरण स्वतंत्र अभिव्यक्तीला कितपत पोषक आहे? ते तसं नसेल तर त्यावर काय मार्ग काढता येऊ शकतो? किंवा तुम्ही तो कशा प्रकारे काढता?
– अभिव्यक्तीला भीती बसावी अशीच इच्छा राज्यकर्त्यांची असते. चित्रकार, कवी, कादंबरीकार, नाटककार, चित्रपटकर्ते यांना या प्रकारचा तीव्र अनुभव सतत येत असतो. आता तर नुसते राज्यकर्ते नव्हेत, तर समांतर गुंडव्यवस्था जागोजागी उगवल्या आहेत. याला सरकार खतपाणी घालत असते. हल्ली ‘भावना दुखावणे’ हा परवलीचा शब्द झाला आहे. यातून राजकारण करणे आणि सरतेशेवटी पैसा उकळणे हेच उद्दिष्ट असते. यावर उपाय आपला आपल्यालाच काढायला हवा. माझी कृती आणि कलाकृती यांची जबाबदारीने मांडणी करायला हवी. आणि मग प्राणपणाने त्याची किंमतही मोजायला हवी. तसेच कलाकृती सादर करताना बौद्धिक आणि कलात्मक कस लागेल असा आपला प्रयत्न हवा.
थेट गोष्टी जशा सांगता येतात, तशाच त्या रूपकात्मकतेतूनही सांगता येतात, हे आपण विसरता कामा नये. इथे एक गोष्ट थोडक्यात सांगतो. संगीतातील ‘तराणा’ कसा निर्माण झाला त्याची गोष्ट! दरबारातील राजकवीसमोर नवा तरुण गायक गाऊ लागतो. अर्थातच त्याचे गाणे नवे आणि बंडखोर आहे. तर राजकारण होते. हा नवा गायक कैद केला जातो आणि त्याच्या जीभेचा शेंडा कापला जातो. पण जीभ कापली तरी गाणे कापता येऊ शकत नाही. गायकाच्या आत गाणे उसळी मारत असते. त्याला फक्त ‘त’ हे व्यंजन उच्चारता येते. त्या एका व्यंजनाच्या साहाय्याने तो गाऊ लागतो. ‘त’चा ‘तराणा’! अभिव्यक्ती जर उत्कट असेल तर ती कोणीच थांबवू शकत नाही, हे या गोष्टीचे सार!
तुम्ही गावोगावी नाटकानिमित्ताने जाता. तिथे सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण तुम्हाला काय दिसतं?
– आर्थिक दारिद्रय़ दिसतं, सामाजिक दारिद्रय़ समजतं आणि सांस्कृतिक दारिद्रय़ आकळतं! गावच्या एसटी स्टॅन्डवर गेलं की गावाची पत कळते आणि नाटय़गृहात गेलं की त्याचा पोत कळतो. आपल्याला मुळात नाटकाविषयी आस्था आणि समज कमीच आहे. वर्षांकाठची राज्य नाटय़स्पर्धा याव्यतिरिक्त गावात नाटक येत नाही अशी बहुतांश ठिकाणची परिस्थिती आहे. आम्हाला त्याची गरजच वाटत नाही. जिथे व्यावसायिक नाटकंही हल्ली जात नाहीत, तिथे प्रायोगिक नाटकाची अवस्था तर फारच गंभीर आहे. कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आणि औरंगाबाद अशा शहरांतही हीच परिस्थिती आहे. शहाद्यात तर आम्ही परवा २५ वर्षांनंतर नाटक केलं. म्हणजे विचार करा, की किमान पाच पिढय़ांनी नाटक नावाचा प्रकारच तिथे पाहिलेला नाही. या कलेकडे पाहण्याची दृष्टी विस्तारण्याचं तर सोडाच; पण अंध होण्याचंच प्रमाण यातून वाढीस लागणार आहे. नाटकच होत नसल्याने गावागावातल्या नाटक करण्याच्या आणि पाहण्याच्या व्यवस्था कमालीच्या कोलमडल्या आहेत.
आता नाटक करणं प्रचंड अवघड झाल्याची ओरड व्यावसायिक रंगभूमीवरील निर्मातेही करत असताना तुम्हाला गावोगावी प्रयोग करणं कसं काय परवडतं? ते व्यवहार्य ठरतं का?
– परवडत नाही आणि व्यवहार्यही ठरत नाही. नाटकावर पोट अवलंबून असलेली माणसे माझ्या गटात तुलनेने कमी असतात. तसेच भरमसाठ पैसे घेणारे प्रसिद्ध कलावंतही त्यात असत नाहीत. कारण ते मला परवडणार नाही. आम्ही सर्वजण आम्हाला शक्य तितके पैसे वाचवत जातो आणि पलीकडच्या व्यक्तींनाही ते वाचवायला लावतो. याव्यतिरिक्त आश्चर्य वाटेल, पण नाटकाला थोडी आर्थिक मदत देणारी अनेक भली लोकं मला भेटतात. साखळी प्रयोग केल्यानंही पैसे वाचत जातात. माझे कलाकार आणि सहकारी हे या कामाचे मोल जाणणारे आणि माझ्याइतकीच नाटकाची आवड असणारे आहेत. म्हणूनच मला गावोगावी नाटक करणे परवडू शकते.
स्वयंसेवी संस्थांची गळचेपी करण्याकडे सरकारचा कल वाढलेला दिसत असताना त्यांच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे असं तुम्हाला वाटतं का?
– होय. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ याचा प्रत्यय प्रत्येक क्षेत्रातील संवेदनशील व्यक्तीला आज येत आहे. स्वयंसेवी संस्थांनीही स्वत:चे मूल्यमापन नीट करणे आवश्यक आहे. पेव फुटावे तशा अनेक संस्था उदयास आलेल्या आहेत, हेही खरेच आहे. मात्र, चांगल्या सामाजिक संस्थांची गरज समाजाला आणि खरं तर सरकारलाही आहे. महाराष्ट्राला पुढे नेणाऱ्या अशा अनेक संस्था आपल्याला सुपरिचित आहेतच की! मात्र, सरसकट सामाजिक संस्थांना दूषणे देणे, ‘पुरोगामी’ हा शब्द शिवीसारखा वापरणे, राजकीय प्रश्न विचारणे म्हणजे ‘देशद्रोही’ असणे, हे या काळातील घातक राजकारण आहे. परंतु आपण साऱ्यांनी न घाबरता अभिव्यक्तिस्वातंत्र्य जबाबदारीने वापरून धीरोदात्त बाणा अंगी बाणवायला हवा. ‘टिकून राहिलो तर सारे शक्य आहे’ या बादल सरकारांच्या उक्तीचा अर्थ मगच आपल्याला उमगेल.