खाष्ट सासू, पाताळयंत्री खलनायिका, प्रेमळ आई आदी नानाविध चरित्र-भूमिका लीलया निभावणाऱ्या अन् त्यावर आपली खणखणीत नाममुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री ललिता पवार यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने या बुजुर्ग अभिनेत्रीच्या चित्रपट कारकीर्दीवर टाकलेला साक्षेपी दृष्टिक्षेप..

 

village near Dombivli brother of private tution teacher sexually assaulted eight year old girl
डोंबिवलीत खासगी शिकवणी चालिकेच्या भावाचा बालिकेवर लैंगिक अत्याचार
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Kavita Badla murder case Vasai court sentences four accused to life imprisonment
कविता बाडला हत्या प्रकरण : चार आरोपींना वसई न्यायालयाने सुनावली जन्मठेप
Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; नेमकं प्रकरण काय?
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
Image Of Anjali Damania And Walmik Karad
Walmik Karad : “एका वाया गेलेल्या मुलाबरोबर…” आंदोलनाला बसलेल्या वाल्मिक कराडच्या आईला अंजली दमानियांचे ६ प्रश्न

‘साहित्यातली आई कुठे हरवली?’ असा व्याकुळ प्रश्न विचारणारा सुंदर लेख कुसुमाग्रजांनी एकेकाळी लिहिला होता. आज चित्रपटांबाबत असाच टाहो फोडण्याची वेळ आली आहे. आई काय, ताई, माई, अक्का, मावशी, वहिनी सगळ्याच रूपांतली स्त्री पडद्यावरून नाहीशी झाली आहे. कसं कोण जाणे, आजीचं मात्र पुनरुज्जीवन झालं आहे. मोठय़ा आणि छोटय़ा पडद्यावरसुद्धा!

ही ललिता पवार व दुर्गा खोटे या चरित्रनायिकांची पुण्याई! आज छोटय़ा-मोठय़ा पडद्यावर दिसणारी आजी ही या दोन धुरंधर कलावतींना अभावितपणे वाहिलेली आदरांजली म्हणावी का? साठ-सत्तरच्या दशकांमधल्या हिंदी चित्रपटांतल्या चरित्र-अभिनयावर या दोन मराठी अभिनेत्रींचं अधिराज्य होतं. एक काळ असा होता, की मुंबई आणि मद्रास (आजचं चेन्नई) इथल्या छोटय़ा-मोठय़ा निर्मात्यांच्या चित्रपटाचं रिळ या दोघींशिवाय हलत नव्हतं.

प्रसंगी थोडासा विशोभितपणा दिग्दर्शक पत्करायचे, पण ललिताबाईंनाच घ्यायचे. तितकी गुणवत्ता ललिताबाईंपाशी होती. तितकी गुणग्राहकता दिग्दर्शकांजवळ होती. ‘जिस देश में गंगा बहती है’चा चोळी-घागरा काय किंवा ‘आँखे’मधल्या विदेशी स्त्री-हेराचा स्कर्ट-ब्लाऊज काय, तसले पोशाख घालण्याचं ललिताबाईंचं वय नव्हतं आणि चेहराही नव्हता. पण राज कपूर आणि रामानंद सागर यांना त्या भूमिकांसाठी ललिताबाईंशिवाय दुसरं नावच मंजूर नव्हतं. शिवाय आपल्या शंभर नंबरी अभिनयातून बाईंनी त्या तालेवार दिग्दर्शकांचा विश्वास सार्थ ठरवला. विरुपतेची पुरेपूर भरपाई केली.

पन्नास, साठ आणि सत्तरचं दशक हा हिंदी चित्रपटांमध्ये मराठी अभिनेत्रींकरिता सुवर्णकाळ होता. नलिनी जयवंत, उषा किरण, नूतन, नंदा नायिका म्हणून पडदा गाजवत होत्या, तर ललिताबाई, दुर्गाबाई, लीला चिटणीस आणि शशिकला यांची चरित्र-भूमिकांबाबत मक्तेदारी होती. सफाईदार हिंदी बोलता येत नव्हतं म्हणून मोठमोठय़ा मराठी नटांची डाळ जिथे शिजत नव्हती त्या हिंदी चित्रपटसृष्टीत या अष्टनायिका दिमाखानं वावरत होत्या. (या श्रेयनामावलीत पुढे सुलोचनादीदींनी शानदार भर घातली. फक्त या अभिनेत्री हिंदूीत त्यांना ‘सीनिअर’ होत्या. त्यांच्या मानानं सुलोचनाबाई बऱ्याच उशिरा हिंदीत आल्या.)

अप्रूप वाटतं ललिताबाई आणि दुर्गाबाई यांचं. त्या काळातल्या ‘कपडे सिला सिला के’ नायकांना वाढवणाऱ्या आणि वर त्यांना ‘आलू के पराठे आणि गाजर का हलवा’ खिलवणाऱ्या गरीब गाईसारख्या माऊल्यांची चौकट त्यांनी मोडीत काढली. दुष्ट आणि सुष्ट व्यक्तिरेखा एकसारख्याच कौशल्यानं दोघी साकारायच्या. नायक-नायिका कितीही वलयदार असोत, या दोघी त्यांच्या बरोबरीनं उभ्या राहायच्या. कित्येकदा त्यांना पुरून उरायच्या. दोघींपाशी स्वत:चं वलय होतं. ते त्या मिरवत नव्हत्या; पण वेळप्रसंगी त्यांच्या अभिनयातून ते अचूक प्रकाशित व्हायचं.

‘मुगले आझम’मध्ये दिलीपकुमार, पृथ्वीराज कपूर, मधुबाला यांच्या भूमिकांची लांबी-रुंदी दुर्गाबाईंच्या भूमिकेला नव्हती. पण त्यांची जोधाबाई तेवढीच लक्षवेधी होती. ‘घराना’च्या वेळी राजेंद्रकुमार प्रस्थापित नायक बनला होता. पण सिनेमातलं सगळ्यात लोकप्रिय गाणं- ‘दादीअम्मा दादीअम्मा मान जाव’ ललिताबाईंचंच होतं. हे गाणं वाजल्याशिवाय पुण्यातली लग्नाची वरात त्याकाळी निघत नव्हती. ‘बिदाई’ आणि ‘दादी माँ’ या चित्रपटांना नाच-गाण्यांकरता तरुण नायिका होत्याच. मात्र, त्यांच्या खऱ्या नायिका दुर्गाबाईच होत्या. ‘जंगली’ आणि ‘प्रोफेसर’ या चित्रपटांमध्ये ललिताबाईंनी हाच मान मिळवला. ‘जंगली’ हा ‘स्वीट सेवन्टीन’ सायरा बानू हिचा पहिला चित्रपट होता. ‘ब्युटी क्वीन’ म्हणून तिची अफाट जाहिरात झाली होती. पण शेवटी तो चित्रपट पांढऱ्या केसांच्या ‘सिक्स्टी प्लस’ ललिताबाईंनी आपल्या नावावर करून घेतला. शम्मी कपूरची आभाळफाडू ‘याहू’ आरोळीदेखील ललिताबाईंचा प्रभाव कमी करू शकली नाही.

‘प्रोफेसर’मधली त्यांची प्रौढ अविवाहितेची व्यक्तिरेखा तर हिंदी चित्रपटातल्या त्या काळाच्या मानानं पुढे म्हणावी अशी होती. चक्क ‘बोल्ड’! तरुण भाचीवर डोळ्यात तेल घालून करडी नजर ठेवणारी ही मावशी पुढे स्वत:च प्रोफेसरसाहेबांच्या नाटकाला भुलते आणि त्यांच्या प्रेमात पडते. मग सोळा वर्षांच्या अल्लड तरुणीसारखी नटूथटू लागते. लाजूमुरडू लागते. ‘प्रेमनगर मैं जाऊँगी’ हा इरादा गुणगुणत आरशासमोर उभी राहून आपलं रूप न्याहाळू लागते.

हे दृश्य ललिताबाईंचं सारं कलावैभव घालून आलं होतं. ‘पब्लिक’ म्हणावं अशा प्रेक्षकांसाठी ते विनोदी दृश्य होतं. पण खरं म्हणजे त्या दृश्याला काळजात कालवाकालव करणाऱ्या कारुण्याची किनार होती. पण वठलेल्या वृक्षाला पालवी फुलवणारा अवेळी आलेला तो वसंत ऋतू फसवाच निघायचा होता. वसंताचं रूप घेऊन आलेली ती वीज वृक्ष उद्ध्वस्तच करते. तो विदारक क्षण ललिताबाईंनी विस्मयकारक कसबानं जिवंत केला आहे. आपल्या करारी स्वभावाला साजेशा ताठपणे ती मानिनी वास्तव अन् स्वत:चा पराभव स्वीकारते. त्या पराभूत क्षणात अपमानाचा अंगार लसलसतो आणि त्याच्या टोकावर कारुण्याचा इवलासा कण अंग चोरून उभा असतो.

‘चोरीचा मामला’ या सुंदर चित्रपटात ललिताबाईंनी असाच एक क्षण अविस्मरणीय केला आहे. आजकालच्या भाषेत ‘डार्क कॅरेक्टर’ म्हणावं अशी ती भूमिका होती. अठराविश्वं दारिद्रय़ भोगणारा एक हमाल आणि मोडकळीला आलेल्या खोपटय़ात त्याच्याबरोबर राहणाऱ्या त्याच्या आईचं आयुष्य एका रात्रीत बदलतं. आकस्मिकपणे चोरीच्या दागिन्यांचं गाठोडं त्यांच्या खोपटय़ात टाकून अज्ञात चोर फरार होतो. ते गाठोडं उघडल्यावर झळझळीत दागिन्यांचं घबाड नजरेला पडतं आणि ललिताबाईंच्या डोळ्यात जणू विद्युत्माळेची उघडझाप सुरू होते. नग्न लोभाचा तो लखलखाट बघणाऱ्याला भयचकित करतो.

नंतर तो हमाल आणि त्याची आई प्राप्त वैभवातून हॉटेलमधून चमचमीत बिर्याणी मागवतात आणि अधाशीपणानं तिच्यावर तुटून पडतात. बकाबका बोकाणे भरताना र्अधअधिक अन्न कपडय़ांवर सांडत असतं याची शुद्ध दोघांनाही नसते. अगदी विद्रुप अन् अभद्र वाटणाऱ्या त्या क्षणाचं ललिताबाई आणि निळू फुले यांनी सोनं केलं आहे. लोभ, लालसा, क्षुद्रता, मोह हे सारे शब्द त्या क्षणी शब्दकोशातून बाहेर पडून पडद्यावर सदेह दर्शन देतात.

स्वत: ललिताबाई म्हणजे दुष्टतावाचक शब्दांचा पडद्यावरचा साक्षात् कोश होत्या. क- कुटिलतेचा, कावेबाजपणाचा, कट-कारस्थानांचा आणि कपटीपणाचा राहिलाच नव्हता. त्या अक्षरांवर ललिताबाईंचा कॉपीराइट झाला होता. त्या शब्दांचे अर्थ माहीत करून घेण्यासाठी शब्दकोश बघण्याची गरजच उरली नव्हती. ललिताबाईंचा कोणताही चित्रपट बघणं पुरेसं होतं.

यवत नावाच्या आडगावात जन्मलेल्या, कोष्टी समाजातल्या अंबू सगण नावाच्या मुलीला शाळेचं तोंडही बघायला मिळालं नव्हतं. ललिता पवार म्हणून नावारूपाला आल्यानंतर तीच मुलगी अभिनयाचं विद्यापीठ बनली. भरत आणि त्याचं नाटय़शास्त्र, स्टॅनिस्लावस्की आणि मेथड अ‍ॅक्टिंग यांचा न् तिचा संबंध येण्याचा प्रश्नच नव्हता. तरी कायिक, वाचिक आणि मुद्राभिनय यांचे बारकावे तिनं कुठून आत्मसात केले असतील? या प्रश्नाचं उत्तर एकच असू शकतं.. तिला अभिनयाची जन्मजात देणगी होती! मूकपटांमध्ये तिचं सहज निभावून गेलं असेल. मूकपटातून ती बोलपटाकडे गेली तेव्हा पहिल्यापासून शेवटपर्यंत ती सेटवर आली की तिला दृश्य आणि संवाद ऐकवले जायचे. ते एकदा ऐकताच तिला तोंडपाठ व्हायचे.

या पद्धतीनं ललिताबाईंनी सात भाषांतल्या असंख्य चित्रपटांतून काम केलं. त्यात मुख्यत: हिंदी-मराठीतले शेकडो चित्रपट होते. कॅमेरा सुरू झाला की त्यांच्या शब्दांतून आसुडाचे फटके निघायचे. त्याचवेळी नजरेतून अंगार बरसायचा. दोन्हीचं ‘टायमिंग’ परफेक्ट! कॉम्बिनेशन बेमालूम! बऱ्याचदा तोंडाबरोबर त्यांचे हातही नायिकांच्या पाठीवर चालले आहेत. हिंदीतल्या मीनाकुमारी, वहिदापासून मराठीतल्या आशा काळे आणि उमा-सीमापर्यंत कोणतीही नायिका त्यांच्या तावडीतून सुटली नसेल. (मूकपटांमध्ये त्या नायिका होत्या म्हणून निभावलं!)

हुंडा-प्रतिबंधक आणि कौटुंबिक हिंसा वगैरे कायदे ललिताबाईंमुळेच अस्तित्वात आले असावेत असा संशय घ्यायला भक्कम रूपेरी-चंदेरी पुरावे आहेत. गंमत सोडा. पडद्यावर ललिताबाईंनी अनेक नायिकांना चौदावं रत्न दाखवलं असेल. प्रत्यक्षात मात्र एका चित्रपटाच्या सेटवर खलनायकाची सणसणीत चपराक खाताना त्यांना डावा डोळा गमवावा लागला होता. जबर दुखापतीमुळे तो डोळा कायमचा बारीक झाला. पण पुढे त्याचाही प्रभावी वापर करून त्यांनी खल- भूमिकांमध्ये रंग भरला. द्रोणाचार्याकडून धनुर्विद्या शिकण्याकरिता एकलव्याने अंगठा तोडून दिला होता. ललिताबाईंचे द्रोणाचार्य कोण होते, ठाऊक नाही; पण त्यांनी अभिनयकलेला डाव्या डोळ्याची गुरुदक्षिणा दिली. (आता ललिताबाई नाहीत. पण त्यांच्या त्या डोळ्याचा वारसा जॉन अब्राहमला देऊन गेल्या असाव्यात! हसताना जॉनचा डावा डोळा ललिता पवार स्टाईलमध्ये बारीक होतो. असो.)

ललिताबाईंच्या गुरुदक्षिणेची बूज अभिनयकलेनं राखली. ती देवता त्यांना प्रसन्न होती म्हणावं की वश होती म्हणावं? बाईंचा आवाका थक्क करणारा होता. ‘सासुरवाशीण’मध्ये सुनांवर अंगार ओकणाऱ्या त्यांच्या नजरेत ‘श्री ४२०’ आणि ‘अनाडी’ या चित्रपटांमधली (मानलेली) आई साकारताना त्यांच्या डोळ्यात मायेचं चांदणं दिसायचं. ‘श्री ४२०’मधली त्यांची केळेवालीची भूमिका लांबी-रुंदीनं मोठी नव्हती, पण महत्त्वाची होती. मनात ठसणारी होती. ‘दो आने के तीन केले’ घेण्याऐवजी ‘तीन आने के दो केले’ असा भाव करणाऱ्या नायकाला बघून त्या पहिल्या भेटीत फिदीफिदी हसत त्या म्हणतात, ‘अगं बया, येडंच दिसतंय पोरगं!’

‘अनाडी’मधली मिसेस डिसा ही ललिताबाईंच्या अविस्मरणीय भूमिकांमध्ये अव्वल ठरावी. चित्रपटाची अधिकृत नायिका होती अभिनयरत्न म्हणावी अशी नूतन! पण शेवटी ‘जंगली’ आणि ‘प्रोफेसर’ यांच्याप्रमाणे इथेही ललिताबाईच चित्रपटाच्या नायिका (ऑन मेरिट) ठरल्या. मिसेस डिसा म्हणजे  ‘श्री ४२०’मधल्या मायाळू व्यक्तिरेखेचं ‘अँग्लो एक्स्टेन्शन’ होतं. पेइंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या भाबडय़ा नायकाला (पुन्हा राज कपूर) मिसेस डिसा एकीकडे भाडं थकलं म्हणून ‘जागा खाली कर’ म्हणून दम देते आणि दुसरीकडे त्याला मदत करण्यासाठी त्याच्याकडून ‘पोट्र्रेट’ काढून घेते. तेव्हाही दमदाटी करून त्याला पैसे घ्यायला लावते! पुढे नायकाला नोकरी लागते आणि तो पहिला पगार ‘सेलिब्रेट’ करण्यासाठी तिला नवाकोरा ड्रेस व छान हॅट भेट म्हणून देतो. तिला हॉटेलमध्ये जेवायला नेतो. तिच्याबरोबर ‘न्यू इयर डान्स’देखील करतो.

‘अनाडी’मधला हा प्रसंग विलक्षण गोड आहे. पुन्हा पुन्हा पाहावासा वाटणारा आहे. जिभेवर फणसाचे काटे पेरलेल्या मिस डिसाच्या मनातले मायेचे रसाळ गरे त्या दृश्यात विखुरले आहेत. नायकाला खर्चिकपणाबद्दल ती तेव्हाही रागे भरत असते; पण चेहऱ्यावरचा सुखावलेला हसरा भाव लपत नाही. ‘अनाडी’च्या हृषिकेश मुखर्जीचा ललिताबाईंवर अपार जीव! ‘अनाडी’आधी ‘मेमदीदी’मध्ये त्यांनी बाईंना नायिका बनवलं. एका अनाथ मुलीवर मायेची पाखर घालणारी ही कडकलक्ष्मीछाप दीदी चार खतरनाक गुंडांना वठणीवर आणते; माणसात गणते आणि या मुलीचे पालकही बनवते. ‘आनंद’मधली बाईंची भूमिका दोन्ही अर्थानी मोठी नव्हती, तरीही कॅन्सर पेशन्ट असलेल्या नायकाला आईची माया देणारी ती नर्स प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.

त्यापूर्वी वर्ष- दीड वर्ष पडद्यावर आलेल्या ‘मझली दीदी’ या मुखर्जी-दिग्दर्शित चित्रपटात ललिताबाईंना पूर्ण वाव देणारी झकास भूमिका होती. मझली दीदी (मीनाकुमारी) ही त्या चित्रपटातली पडद्यावरची जाऊ. दोघींमध्ये सतत वाक्युद्ध चालू असतं. दोघी एकमेकांवर वाक्बाण सोडतात; खिडकी बंद करतात. दुसरीकडून बाण आला की खिडकीतून परतफेड करतात. मग पुन्हा खिडकी बंद! ‘मझली दीदी’ चालला नाही. त्यामुळे हिंदी चित्रपटातल्या या दोन महानायिकांमधल्या अनोख्या जुगलबंदीची दखल घेतली गेली नाही.

त्याआधी.. फार फार आधी एम. सादिक या जुन्या- जाणत्या दिग्दर्शकानं ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत हिंदी चित्रपटातल्या चिरंजीव कलाकारांची आपली निवड जाहीर करताना अशोककुमार, दिलीपकुमार आणि मीनाकुमारी यांच्याबरोबर ललिताबाईंचं नाव घेतलं होतं. त्यावेळी ते फार अनपेक्षित होतं. कारण एकतर त्यावेळी उठसूट कोणत्याही कलाकाराची (आपल्या सोयीसाठी) दखल घेणारा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, आणि दुसरं म्हणजे या निवडीला दाद देण्याइतकी समज माझ्यापाशी नव्हती. आज मात्र या निवडीबद्दल सादिकसाहेबांना सलाम करावासा वाटतो.

ललिताबाईंना चरित्रनायिका होण्याच्या अशा संधी वारंवार मिळाल्या नाहीत. पण त्यांच्यातल्या अभिजात कलाकाराला तशी गरजही नव्हती. प्रेक्षकांच्या मनात घर करायला त्यांना पडद्यावरची पाच-सात मिनिटंही पुरेशी होती. ‘बॉम्बे टू गोवा’मध्ये त्यांना फार तर तीन मिनिटांची भूमिका असेल; पण अंगात आलेल्या बाईच्या रूपात त्या तीन मिनिटांतही त्या आपली चुणूक दाखवून गेल्या. ‘जंगली’ व ‘घराना’ या चित्रपटांमध्ये अंगभर दागिने आणि भरजरी साडय़ा नेसणाऱ्या खानदानी बाईसाहेब म्हणून ललिताबाई जेवढय़ा विश्वासार्ह वाटायच्या, तेवढय़ाच या मळवट भरलेल्या, केस मोकळे सोडणाऱ्या अडाणी बाईच्या भूमिकेतही त्या लोकांना पटल्या. कोणत्याही भूमिकेत हरवून जाणं, विरघळून जाणं, एकरूप होणं म्हणजे काय, हे कळण्यासाठी ललिताबाईंचे चित्रपट पाहावेत.

बाईंपाशी शिक्षण नव्हते आणि चेहराही नव्हता. (पण ठसठशीत व्यक्तिमत्त्व होतं.) पण या उणिवाही त्यांना मोठं करून गेल्या. ‘रामशास्त्री’च्या महत्त्वाकांशी आनंदीबाईपासून ‘बॉम्बे टू गोवा’- सारख्या अतिसामान्य स्त्रीच्या भूमिकेत त्या चपखल बसल्या. दुर्गाबाईंकडे ललिताबाईंचं वैविध्य आणि सातत्य असूनही त्यांच्या राजस, खानदानी रूपामुळे चाकोरीबाहेरच्या भूमिका मिळण्यावर त्यांना थोडी मर्यादा पडली. ललिताबाईंचा दर्शनी सामान्य वाटणारा चेहरा श्रीमंत वा गरीब, शहरी वा ग्रामीण- कोणत्याही स्त्रीचं रूप लीलया धारण करत होता.

ललिताबाई योग्य काळात पडद्यावर आल्या. चेहऱ्यापलीकडे जाऊन अभिनेत्रींच्या गुणवत्तेचा विचार करणाऱ्या दिग्दर्शकांचा तो जमाना होता. त्यानं ललिताबाईंच्या असामान्य कलागुणांचं पुरेपूर चीज केलं. सहा दशकांची प्रदीर्घ कारकीर्द त्यांना दिली. त्यामागे ललिताबाईंच्या ‘स्ट्रीट स्मार्ट’ शहाणपणाचाही वाटा होता. त्याचा हा किस्सा अवश्य ऐकण्यासारखा आहे. सुलोचनाबाईंना हिंदीमधली पहिली ‘ऑफर’ आली ती ‘सुजाता’साठी. मराठीत नायिकेच्या भूमिका करणाऱ्या सुलोचनाबाईंपुढे पेचप्रसंग उभा राहिला. त्यांना हिंदीत तर जायचं होतं, पण चरित्र-भूमिकेत जावं का, त्यांना निर्णय घेता येत नव्हता. दीदींनी अनुभवी ललिताबाईंकडे धाव घेतली. बाई म्हणाल्या, ‘कसलाही विचार न करता ‘सुजाता’ घे. आई म्हणून इथे आलीस तर खूप काळ राहशील. नायिका म्हणून आलीस तर पाच-दहा वर्षांत परत जाशील.’ हा सल्ला सुलोचनाबाईंनी मानला आणि त्याचे ‘लाँग टर्म रीटर्न्‍स’ घेतले. स्वत:बाबत ललिताबाईंनी हाच शहाणपणा दाखवला होता. नायिका म्हणून त्यांनी केलेल्या चित्रपटांबद्दल आज कुणीही बोलत नाहीत. पण खाष्ट सासू आणि प्रेमळ आई या दोन्ही रूपात स्वीकारल्या गेलेल्या ललिता पवार नावाच्या चरित्र अभिनेत्रीची आज जन्मशताब्दी साजरी  होते आहे. ती अधिक चांगल्या रीतीने साजरी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या चित्रपट पुरस्कारांमध्ये चरित्र कलाकारांसाठी ललिताबाईंच्या नावानं पुरस्कार ठेवला जाईल अशी अपेक्षा करावी का?

अरुणा अन्तरकर

Story img Loader