प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या निधनाने गेली ५०-६० वर्षे ‘कॉमन मॅन’च्या व्यथा-वेदना, संताप, हतबलता, फसवणूक, जिद्द, चिकाटी आदी भावभावना मुखर करणारा त्यांचा प्रवक्ताच आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्या जाण्याने आज सामान्यांचा आवाजच हरपला आहे. या साऱ्याचं विश्लेषण करणारा व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांचा हा लेख..  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऐंशी-एक्याऐंशी साल असावं. बंगलोरला मेडिकल कॉलेजच्या बाजूला एका भव्य सभागृहात त्या दिवशी देशातले दिग्गज व्यंगचित्रकार जमले होते. इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत असताना हॉस्टेल मॅगेझिनमध्ये चार व्यंगचित्रं काढल्याने व्यंगचित्रकार म्हणून माझाही नुकताच जन्म झाला होता. अत्यंत उत्कंठेने मी त्या भरगच्च सभागृहात टाचा उंचावून त्या वलयांकित व्यक्तिमत्त्वांकडे पाहू लागलो. ‘डेक्कन हेरॉल्ड’चे राममूर्ती हे अत्यंत साधेपणाने व्यासपीठावर बसले होते. त्यांची चित्रं मी रोज पाहत असे. व्यासपीठावर तोंडात पाइप ठेवून लोकांकडे बेदरकारपणे पाहणारे ‘इंडियन एक्स्प्रेस’चे अबू अब्राहम होते. फ्रेंचकट दाढी ठेवून रुबाबदार दिसणारे ‘वीकली’चे मारिओ मिरांडा होते. आणि सर्व सभागृहाला ज्यांच्याविषयी अत्यंत उत्कंठा होती, उत्सुकता होती ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे आर. के. लक्ष्मणही होते. पाहताक्षणी नरजेत भरावे असे भव्य कपाळ, मागे वळवलेले काळे केस आणि चौकोनी चष्मा यामुळे ते बुद्धिमान वाटत. (आज हे चारही व्यंगचित्रकार आपल्यामध्ये नाहीत!)
लक्ष्मण यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक भाषणाच्या सुरुवातीलाच दाखवली. त्यावेळी अमेरिकेची अंतराळ प्रयोगशाळा ‘स्कायलॅब’ पृथ्वीच्या वातावरणात केव्हाही प्रवेश करेल आणि कोणत्याही देशावर, कोणत्याही गावावर, भागावर कोसळू शकेल अशी अनामिक भीती वृत्तपत्रांतून सतत व्यक्त केली जात होती. तोच धागा पकडून लक्ष्मण म्हणाले, ‘‘माझ्या मनात मघापासून हीच भीती आहे, की समजा ही स्कायलॅब या व्यासपीठावरच पडली तर देशातल्या वृत्तपत्रांतील सगळा ह्यूमर क्षणात नष्ट होईल!’’ त्याबरोबर संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. व्यंगचित्रकार कसा विचार करू शकतो याचं ते जणू एक प्रात्यक्षिकच होतं.

त्यानंतर अनेकदा लक्ष्मण यांच्या व्यक्तिमत्त्वातील व्यंगचित्रकार अनेक मुलाखतींतून भेटत राहिला. एका मुलाखतीत पत्रकाराने त्यांना त्यांच्या आत्मचरित्रातील काही तपशिलाविषयी विचारलं. लक्ष्मण यांनी उत्तर देण्याऐवजी उलट विचारलं, ‘अरेच्चा! तुम्हाला हे कसं माहिती?’ मुलाखतकार म्हणाले, ‘‘सर तुमच्या आत्मचरित्रात त्याचा उल्लेख आहे!’’ क्षणाचाही विलंब न लावता लक्ष्मण म्हणाले, ‘‘ओह! माफ करा, मी ते पुस्तक वाचलेलं नाहीये!!’’

अ‘सामान्य’ लक्ष्मणरेषा!

दुसऱ्या एका जाहीर मुलाखतीत शेवटी त्यांनी काही अर्कचित्रांचं प्रात्यक्षिक दाखवलं. त्यात लालूप्रसाद यादव आणि जयललिता यांच्या अर्कचित्रांचा समावेश होता. अर्कचित्रं भराभर रेखाटून झाल्यावर साहजिकच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर क्षणभर थांबून लक्ष्मण यांनी चक्क या दोघांच्या अर्कचित्रांवर जाड उभ्या रेषा मारल्या! ‘मला हे खरे असे- म्हणजे ‘बिहाइंड दि बार्स’ हवे आहेत..’ असं त्यांनी म्हटल्यावर प्रेक्षकांकडून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला! काही वर्षांपूर्वी लालूप्रसाद यादव आणि गेल्या वर्षी जयललिता हे दोन्ही नेते काही काळ तुरुंगात जाऊन आले तेव्हा लक्ष्मण यांच्या या कलाकृतींची (खरं तर कृतीची!) प्रकर्षांने आठवण झाली. आणि लोकशाहीमध्ये व्यंगचित्रकाराचं स्थान काय असतं, हे पुन्हा एकदा जाणवलं!!

‘तुम्ही कॉमन मॅन कसा शोधलात?,’ असं विचारल्यावर, ‘खरं तर त्यानेच मला शोधलं!’ असं त्यांनी म्हणणं, किंवा दस्तुरखुद्द राजीव गांधींनी, ‘तुम्ही मला खूपच जाडा माणूस दाखवता!’ अशी लाडिक तक्रार केल्यावर हजरजबाबीपणे ‘आय वुइल लुक इन् टू द मॅटर’!’ असं सरकारी प्रत्युत्तर देणं, हे सारं एका बुद्धिमान व्यंगचित्रकाराच्या हजरजबाबी प्रतिक्रिया आहेत हे जाणवतं.
लक्ष्मण यांनी नि:संशयपणे राजकीय व्यंगचित्रकलेला विलक्षण लोकप्रियता आणि प्रतिष्ठा दिली. वृत्तपत्रीय व्यंगचित्रांमध्ये मोठी व्यंगचित्रं आणि दररोजची पॉकेट कार्टून्स यामुळे त्यांच्या कलाकृतींवर देशभरातील लाखो वाचक दररोज लक्ष ठेवून असत. थोडीथोडकी नव्हे, तर पन्नासहून अधिक र्वष आपल्या कामाचा दर्जा टिकवून धरणं हे लोकोत्तर कलावंतच करू जाणोत.
कॅरिकेचर्स किंवा अर्कचित्रांचं रेखाटन हे लक्ष्मण यांचे फार मोठे शक्तिस्थान. पन्नास वर्षांच्या कालखंडात त्यांनी अक्षरश: हजारो व्यक्तिमत्त्वं अर्कचित्रांतून उभी केली. निव्वळ चेहऱ्याचे साम्यच नव्हे, तर त्यावरचे विविध भाव, शरीरयष्टी, उभे राहण्याची वा बसण्याची लकब, कपडय़ांच्या विविध तऱ्हा हे सारं अत्यंत नजाकतीने ते कागदावर उमटवत असत. त्यांच्या या कारकीर्दीविषयी बोलायचं तर पंडित नेहरूंपासून ते प्रियांका गांधींपर्यंतच्या चार पिढय़ांची अर्कचित्रं त्यांनी रेखाटली आहेत. मोरारजींच्या चेहऱ्यावरचे हेकट भाव, चंद्रशेखर यांची त्रासिक चेहरेपट्टी, इंदिराजींच्या चेहऱ्यावरचा अहंभाव, राजीवजींचा नवखेपणा, भांबावलेपण, लालूंचा उद्दामपणा हे सारं त्या चेहऱ्यावर येत असे. रोनाल्ड रेगन यांच्या चेहऱ्यावरच्या असंख्य बारीक सुरकुत्या किंवा झिया-उल-हक यांच्या चेहऱ्यावरचे जाड फटकारे किंवा अमर्त्य सेन यांचे नाजूकपणे रेखाटलेले डोळे, इम्रान खान यांचे विस्कटलेले केस, कपिलदेवचे दात, एम. एफ. हुसेन यांची पांढरीशुभ्र दाढी रेखाटताना जेमतेम दोन-तीन लयबद्ध रेषा वगैरे वगैरे मुद्दाम, वारंवार पाहण्यासारखे आहे.

या अर्कचित्रांचा वापर मोठय़ा राजकीय चित्रांमध्ये त्यांनी अत्यंत खुबीने केला. उदाहरणार्थ चरणसिंगांची रुरल पॉलिटिक्स पॉलिसी दाखवण्यासाठी त्यांनी बहुतेकदा कुठेही फिरताना नांगर घेऊन फिरणारा बेरकी नेता रेखाटला. अडवाणींच्या डोक्यातून रथयात्रा, मंदिर वगैरे पौराणिक विषय जात नसल्याने त्यांच्या डोक्यावर लक्ष्मण यांनी नेहमी देवादिकांचा (अर्थातच नाटकातल्या) मुकुट दाखवला अन् त्यांना अत्यंत हास्यास्पद बनवलं. देवेगौडांना नेहमी झोपलेलं दाखवलं, तर ठाकरेंच्या आजूबाजूला लपलेल्या वाघाची नुसती शेपटी दाखवून त्यांचं खरं व्यक्तिमत्त्व दाखवलं. राजकारणामध्ये नेमकं काय सुरू आहे, हे इतक्या सोप्या पद्धतीने जनतेला समजावून सांगणारा व्यंगचित्रकार लोकप्रिय झाला नसता तरच नवल!
मोठय़ा व्यंगचित्रांतून मोठा आशय थोडक्यात कसा समजावून सांगता येतो, यासाठी त्यांच्या हजारो व्यंगचित्रांतून कोणतंही एक चित्र पाहिलं तरी सहज कळेल. पन्नास वर्षांतील देशाची प्रगती दाखवणारं चित्र याचीच साक्ष आहे. त्यात अक्षरश: एका लेखाचा नव्हे, तर एका अवजड व अवघड ग्रंथाचा विषय व आशय सामावलेला आहे.

विशेष संपादकीय: कसे बोललात लक्ष्मण!

लक्ष्मण यांची पॉकेट कार्टुन्स अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांचे असंख्य संग्रह आजही तडाखेबंद खपतात. (यू सेड इट!) या सामर्थ्यांचं थोडं विश्लेषण करणं गरजेचं आहे. लक्ष्मण चित्रांची मांडणी अत्यंत प्रभावीपणे करतात. वास्तविक पॉकेट कार्टुन्समध्ये जागेच्या मर्यादेमुळे कॉम्पोझिशन अत्यंत कठीण असतं. पण तिथेही ते चित्रातील सर्व बारकावे कुशलतेने रेखाटतात.

एखाद्या फार्सिकल नाटकातील एखाद्या प्रवेशासारखं त्यांचं पॉकेट कार्टुन असतं. उदाहरणार्थ- नेपथ्य! म्हणजे प्रसंग कुठे घडतोय याचं रेखाटन! म्हणजे गावातील रस्ता, मंत्र्यांची केबिन, आदिवासी वस्ती, विमानातील अंतरंग, बहुराष्ट्रीय कंपनीची बोर्डरूम, मध्यमवर्गीय घरातील बैठकीची खोली, पोलीस स्टेशन, कोर्टाचा कॉरिडॉर, हॉस्पिटलचा वॉर्ड किंवा एखादी आंतरराष्ट्रीय परिषद, तिथल्या परिसराचं चित्रण मोजक्या रेषांत ते इतक्या परिणामकारकरीत्या उभं करतात, की वाचकांच्या मनात त्याविषयी काही संशय राहत नाही.
त्यानंतर पात्रं किंवा कॅरेक्टर्स! मला वाटतं, खरोखरच्या सामान्य माणसाचे किमान शंभर वेगवेगळे चेहरे विविध वेशभूषेसह ते सहज रेखाटू शकतात. उदाहरणार्थ भाजीवाला, नर्स, मंत्र्याचा पी. ए., बँक कर्मचारी, गृहिणी, शाळेत जाणारी मुलं, खुद्द मंत्रिमहोदय, परदेशी राजकीय पाहुणे, भिकारी मुलं इत्यादी पात्रं खरोखरच आपण कुठेतरी पाहिलेली आहेत, इतकी खरी वाटतात. इतकंच नव्हे तर हवालदार, इन्स्पेक्टर, पोलीस कमिशनर ही एकाच खात्यातील माणसं त्यांच्या देहबोलीसकट ते वेगवेगळी दाखवितात. या पात्रांच्या चेहऱ्यावरचे हावभावही वेगवेगळे असतात. आश्चर्य, संताप, त्रासिकपणा, निर्विकारपणा, केविलवाणेपणा, बेदरकारपणा, तुच्छता, कावेबाज, बेरकी इत्यादी हावभावांमुळे ही पात्रं जिवंत वाटतात.

शेवटचा व अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्युमर किंवा विनोद. यात तर ते अक्षरश: बापमाणूस आहेत. पॉकेट कार्टुनमध्ये ते ज्या पद्धतीने विसंगतीकडे लक्ष वेधतात, ती अक्षरश: अचंबित करणारी असते. स्वाभाविकपणे हास्यस्फोटकही! या विनोदातील ‘सरप्राइज एलिमेंट’ हे लक्ष्मण यांचं खरं बलस्थान आहे. फार्सिकल नाटकातील एखादा प्रवेश जर कॉम्प्रेस केला तर त्यातला ह्युमर जसा एखाद् दुसऱ्या वाक्यात कॉन्सन्ट्रेट होईल तशी त्यांची पॉकेट कार्टुनची कॅप्शन असते.

लक्ष्मण यांनी ‘कॉमन मॅन’ नावाचं कॅरेक्टर तयार केलंय ते अफलातून आहे. जणू काही आपणच खरे ‘लक्ष्मण’ आहोत, या थाटात व आविर्भावात हे पात्र त्यांच्या चित्रांतून डोकावत असते. त्यांच्या आजच्या चित्रात हे पात्र काय करतंय हे पाहणं हाही अनेकांच्या कुतूहलाचा भाग असे. तो कसा न बोलता सारं सहन करतो, याचंही मध्यमवर्गीय कौतुक अनेकदा होत असतं. ही सारी चर्चा किंवा कुतूहल हे लक्ष्मण यांच्या कल्पकतेचं यश आहे. (मात्र या अबोलपणासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘कॉमन मॅन’ला जेव्हा बोलायचं असतं त्यावेळी त्याच्याऐवजी त्याची पत्नी बऱ्याच वेळेला का बोलते, हे मला न उलगडलेलं कोडं आहे!)

लक्ष्मणांच्या ब्रशला धरुनच व्यंगचित्रांच्या प्रांतात आलो!

लक्ष्मण यांच्या पॉकेट कार्टुनमधील अनेक संदर्भ हे काळानुरूप बदलले. उदाहरणार्थ जुन्या काळी सरकारी कार्यालयात काळे, उंच, जड टेलिफोन ते दाखवायचे. ते नंतर छोटेखानी, डिजिटल झाले. टाइपरायटर्स जाऊन टेबलावर पी. सी. आले. अ‍ॅम्बेसेडर गाडी जाऊन मारुती आली. पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा बदलल्या. या साऱ्यांचं श्रेय त्यांच्या जबरदस्त निरीक्षणशक्तीला देता येईल. जवळपास साठ वर्षांच्या भल्यामोठय़ा कारकीर्दीत लक्ष्मण यांच्या पॉकेट कार्टुनमधील दोनच गोष्टी बदलल्या नाहीत. त्या म्हणजे- विषयातील ताजेपणा आणि विनोद! पण या सर्वापेक्षाही लक्ष्मण यांच्या कामाचा दर्जा लक्षात राहतो तो या पॉकेट कार्टुन्समधल्या भाष्यामुळे! यातील असंख्य व्यंगचित्रांतील भाष्य हे पन्नास वर्षांनंतरही पुरून उरतं, यातच लक्ष्मण यांचं अलौकिकपण सिद्ध होतं.

व्यंगचित्रकाराची डायरी किंवा स्केचबुक हा खूप उत्सुकता निर्माण करणारा प्रकार असतो. व्यंगचित्रकार आपल्या मनात येणारे हजारो विचार, कल्पना झटपट स्केचबुकात रेखाटत असतो, नोंद करत असतो. लक्ष्मण यांची प्रतिमा ही वादग्रस्त व्यंगचित्रकार म्हणून कधीच नव्हती. त्यांचं भाष्य हे निर्भीड असले तरी ते कधीही मर्यादा ओलांडून पुढे गेले नाही. अर्थातच या मर्यादांची ‘लक्ष्मणरेषा’ही त्यांनीच आखलेली होती हे त्यांच्या चित्रांवरून स्पष्ट होतं. मात्र, डायरीत चित्र रेखाटताना कलावंत मुक्त असतो. याचा प्रत्यय लक्ष्मण यांची दोन दुर्मीळ रेखाटने पाहून लक्षात येतं. मोरारजी देसाई यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक व्यंगचित्रकारांना राग होता असं म्हटलं तरी चालेल. त्यांचा तो ताठरपणा, कर्मठपणा, अहंभाव, दारूबंदी वगैरेचा अतिरेक या साऱ्यांचा परिपाक म्हणून लक्ष्मण यांची ही प्रतिक्रिया दिसते. त्याचबरोबर पी. व्ही. नरसिंह राव यांचा चेहरा रेखाटताना त्यांना मत्स्यावतार किंवा बेडूकवतार का आठवले, हेही पाहणं मजेदार आहे.

आरके लक्ष्मण व्यंगचित्रप्रदर्शन

लक्ष्मण यांनी फक्त राजकीय आणि सामाजिक संदर्भ असलेली व्यंगचित्रंच काढली असं नसून मॅनेजमेंट आणि सायन्स या विषयांवरही शेकडो व्यंगचित्रं काढली आहेत. त्यांनी जगभर व देशभर भरपूर प्रवास केला. या प्रवासात त्यांनी काढलेली रेखाटनेही पुस्तकरूपाने उपलब्ध आहेत. या रेखाटनांमध्येसुद्धा त्यांच्यातला व्यंगचित्रकार जागा असतो हे जाणवतं. हीच बाब त्यांनी रेखाटलेल्या इतर लेखकांच्या बाबतीतही खरी आहे. (उदा. मालगुडी डेज् किंवा शरू रांगणेकरांची पुस्तकं, वगैरे.) त्यांनी रेखाटलेले कावळे हाही एक औत्सुक्याचा विषय आहे. त्यांच्या घरीही मला एक टॅक्सीडर्मी केलेला कावळा दिसला. इतका तो त्यांच्या आवडीचा पक्षी होता.

गेली पन्नास-साठ वर्षे लक्ष्मण यांचा वाचकवर्ग किंवा कॉमन मॅन हा व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या नजरेतून समाज, राजकारण याकडे पाहत असे. आता या कॉमन मॅनपुढचा कागद कोरा आहे! कॉमन मॅनची ही विषण्ण अगतिकता अगदी मन हेलावून टाकणारी आहे.

– प्रशांत कुलकर्णी