पडद्यावर दिसणाऱ्या चित्रपटाविषयी आपल्या मनात जितकी उत्सुकता असते, तितकीच त्याच्या निर्मितीबद्दल, चित्रपट तयार होतानाच्या गमतीजमतींबद्दलही असते. विशेषत: जुन्या हिंदी चित्रपटांविषयी हे औत्सुक्य अधिकच असते. ते चित्रपट ‘दो बिघा जमीन’, ‘प्यासा’, ‘दो आँखे बारह हाथ’ किंवा अगदी ‘मदर इंडिया’ अशा ‘क्लासिक’ चित्रपटांच्या मांदियाळीतील असतील तर रसिक आजही त्यांच्यावर जीव ओवाळून टाकतात. अशा रसिकांसाठी ‘दहा क्लासिक्स’ हे पुस्तक बाजारात दाखल झाले आहे.
दिग्गज दहा दिग्दर्शक आणि त्यांच्या अभिजात कलाकृती याविषयी या पुस्तकातून जाणून घेता येते. बिमल रॉय यांचा ‘दो बिघा जमीन’, गुरुदत्त यांचा ‘प्यासा’, व्ही. शांताराम यांचा ‘दो आँखे बारह हाथ’, मेहबूब खान यांचा ‘मदर इंडिया’, के. आसिफ यांचा ‘मुघल-ए- आझम’, विजय आनंद यांचा ‘गाइड’, शैलेंद्र यांचा ‘तिसरी कसम’, हृषिकेश मुखर्जी यांचा ‘आनंद’, कमाल अमरोही यांचा ‘पाकिज़ा’ आणि मुजफ्फर अली यांचा ‘उमराव जान’ या सिनेमांचा निर्मितीप्रवास, त्यातील रंजक गोष्टी यात वाचायला मिळतात. या चित्रपटांशी संबंधित कलाकार, त्यांचे आप्तेष्ट यांच्याशी बोलून, संशोधन आणि अभ्यासातून अनिता पाध्ये यांनी हे पुस्तक लिहिले आहे. या चित्रपटांची पोस्टर्स, छायाचित्रे आदींचाही समावेश यात आहे. चित्रपट प्रदर्शनाचे वर्ष, त्यातली गाणी, मिळालेले पुरस्कार ही माहितीदेखील आहे. ‘मदर इंडिया’च्या चित्रीकरणाच्या वेळी नेमके काय झाले, ‘प्यासा’मध्ये दिलीपकुमार यांनी काम का केले नाही, ‘पाकिज़ा’ बनायला १४ वर्षे का लागली, ‘उमराव जान’ हा चित्रपट अभिनेत्री रेखा हिला जवळचा का वाटतो.. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हे पुस्तक वाचून मिळतात.
- ‘दहा क्लासिक्स’ – अनिता पाध्ये
- देवप्रिया पब्लिकेशन, पृष्ठे- ३२०, मूल्य- ४८० रुपये.