जयदेव डोळे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कार्ल मार्क्स आणि महात्मा गांधी हे दोघे सोडले तर व्यक्तीच्या नावे राजकीय तत्त्वज्ञान अथवा वाद (इझम) तयार झालेला नाही. मार्क्सच्या परंपरेत लिऑन ट्रॉट्स्की, मानवेंद्रनाथ रॉय, माओ झेदाँग, व्लादिमीर लेनिन अशा नेत्यांची विचारधारा ‘वाद’ म्हणून वर्णिली जाऊ लागली. गांधीजींना मानणारे जयप्रकाश नारायण व डॉ. राममनोहर लोहिया हे नेते मार्क्सचेही अनुयायी होते. लोहियांना मानणाऱ्यांनी एक ‘लोहियावाद’ तयार केला. ‘समाजवादी- लोहियावादी’ असणारा एक मोठा पक्ष भारताने पाहिला. नेल्सन मंडेला, फिडेल कॅस्ट्रो, हो चि मिन्ह, अब्दुल नासेर, द गॉल, जोमो केन्याटा, जवाहरलाल नेहरू असे लोकनेते त्यांचे कार्य त्यांच्या नावे बंद अशा चौकटीत उभे करू शकले नाहीत. कारण त्यांची मुळे अन्य तत्त्वज्ञानात रुजलेली होती. इतकेच काय, आपले हिंदुत्ववादी कार्यकर्ते ना वाजपेयीवादी असतात ना दीनदयाळ उपाध्यायवादी, ना देवरसवादी! परंतु सावरकरवाद म्हणायला पसरला असला, तरी हिंदू महासभेपेक्षा तो कोणत्या मुद्दय़ांवर वेगळा होता, हे एक गूढच आहे. सुभाषचंद्र बोस यांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’ पक्ष काढला. परंतु त्यांचे अनुयायी ‘बोसवाद’ पसरवू शकले नाहीत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपरोक्त सर्व नेत्यांहून वेगळे. शिक्षण, संशोधन, संघटन, संपादन, कायदा व कायदे मंडळ अशा अनेक क्षेत्रांत प्रचंड कर्तृत्व गाजवलेले. परंतु त्यांनी आपले अभंग स्थान तयार केले ते अस्पृश्यता, चातुर्वण्र्य, जातिव्यवस्था, विषमता यांच्याशी झुंज देत. साहजिकच त्यांच्या राजकारणाला आणि समाजकार्याला त्यांच्या नावे सुस्थापित करण्याचा प्रयत्न होणार. ‘आंबेडकरवाद’ असा एक विचार उभा राहिला खरा, पण तो मांडणाऱ्यांना त्यास ‘तत्त्वज्ञान’ म्हणावे की ‘वाद’ म्हणावे की ‘विचारसरणी’, याचा पेच पडला. खुद्द आंबेडकरांना आपल्या नावे असा एखादा वाद निर्माण व्हावा असे वाटले असते का? ‘आपण मार्क्सिस्ट नाही ते बरेय’ असे मार्क्स म्हणाल्याचे सांगतात, तसे आंबेडकर बोलले असते का?
कोणताही वाद अथवा विचारधारा सांगायला फार फुरसत लाभते. मार्क्सला ती मिळाली. बाकीच्या नेत्यांचा वेळ प्रत्यक्ष राजकारणात खूप गेला. आंबेडकरांनाही आपले एखादे बांधीव, सूत्रबद्ध तत्त्वज्ञान उभे करायला वेळ लाभला नाही. त्यांचे प्रासंगिक विचार व प्रतिक्रियात्मक लेखन यातच त्यांचे तत्त्वज्ञान शोधावे लागते. मिलिंद कसबे यांनी ‘आंबेडकरवादापुढील नवी आव्हाने’ या त्यांच्या पुस्तकात वाद आणि त्यापुढील आव्हाने याविषयी लिहिले आहे.
म. गांधी, कार्ल मार्क्स यांची विचारधारा जशी अनेकांनी स्वत:स कळली तशी मांडली, त्याप्रमाणेच डॉ. आंबेडकरांचीही विचारधारा मांडली गेली आहे. आरंभ प्रा. रावसाहेब कसबे यांनी केलेला. त्यांनी डॉ. आंबेडकरांना ‘लोकशाही समाजवादी’ म्हणून सादर केले. जोडीला बौद्धमतही ठेवले. मिलिंद कसबे यांनी जागतिकीकरणानंतर पालटलेल्या परिस्थितीत डॉ. आंबेडकरांचा विचार कसा हाताळायचा, हे सांगितले आहे.
डॉ. आंबेडकर यांच्याभोवती पडलेला फक्त दलित जातींचा वेढा हे एक आव्हान कसबे मानतात आणि डॉ. आंबेडकर सवर्ण पुरोगामी नागरिकांसाठीही असले पाहिजेत असे बजावतात. मात्र, विद्यमान सत्ताधाऱ्यांचा ‘हिंदू राष्ट्रवादी विचार’ आणि साहित्यातून पसरू पाहणारा ‘देशीवाद’ हे दोन धोके आंबेडकरवादापुढे असल्याचेही सांगतात. बलाढय़ जातींचे पुन्हा सबलीकरणाचे मागणे, समाजात वाढत चाललेला हिंसाचार आणि धार्मिक कर्मकांडांचे पुनरुज्जीवन याला आंबेडकरवाद हे उत्तर असल्याचे कसबे मानतात. आंबेडकरांचे भक्त, पुजारी अथवा मूर्तिपूजक कसबे यांना एक संकट वाटते. ते खरेही आहे.
प्रचंड अभ्यास, त्याग आणि अफाट धाडस या गोष्टी आंबेडकरांच्या जीवनात दिसल्या. त्याच कार्यकर्त्यांनी आपल्या जीवनात अनुसरल्या पाहिजेत. त्यासाठी भारताची राज्यघटना जी मूल्यव्यवस्था देशाच्या उभारणीसाठी पाळायला सांगते, तीच आंबेडकरवादाचे प्रतिबिंब आहे असे लेखक सांगतो. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यांची प्रतिष्ठापना देशात करण्याचा प्रयत्न सदोदित करत राहणे हा आंबेडकरवादाचा कार्यक्रम असला पाहिजे, हे लेखकाचे म्हणणे योग्यच आहे.
प्रा. कसबे यांचे हे लेखन साधार, ससंदर्भ आणि तार्किक आहे. भावना आणि श्रद्धा बाजूला ठेवत डॉ. आंबेडकरांचे आजच्या संदर्भात केलेले हे मूल्यमापन अनुकरणीय आहे. शिक्षणावरचा कसबे यांचा निबंध डॉ. आंबेडकर, म. गांधी व अन्य यांची व्यवस्थित मीमांसा करतो. आजच्या खासगीकरणाच्या धडाक्यात कोणती मूल्ये शिक्षणाने टिकवली पाहिजेत, त्याचे मार्गदर्शनही कसबे करतात. एकुणात, विचार आणि व्यवहार यातून आंबेडकरवादाचा प्रत्यय येत राहावा असा कसबे यांचा या पुस्तकात मुख्य आग्रह आहे.
‘आंबेडकरवादापुढील नवी आव्हाने’- मिलिंद कसबे, सनय प्रकाशन,
पृष्ठे – १२८, मूल्य – १२० रुपये