भारतीय स्वातंत्र्यलढय़ात देशाच्या विविध भागांतील लहान-मोठय़ा क्रांतिकारी गटांनीही आपापल्या शक्तीनुसार सक्रिय सहभाग घेतला. केवळ महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर, स्वातंत्र्यलढय़ात त्यावेळच्या अनेक तरुणांनी आपले सर्वस्व झोकून दिलेले दिसते. कोल्हापूरसारख्या संस्थानाला तर एकीकडे राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक सुधारणावादी मार्ग आणि त्याच वेळी ब्रिटिशविरोधी तरुणांचा क्रांतिकारी मार्ग असा समांतर इतिहास आहे. त्यावर मराठी व इंग्रजीतही बऱ्यापैकी लिहूनही आले आहे. मात्र, यातल्या काहींच्या कर्तृत्वाची दखल विस्तारित स्वरूपात घेतली जाणे आवश्यक होते; तशी ती घेतली गेलेली नाही. परसू सुतार हे असेच एक क्रांतिकारक. स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या या क्रांतिकारकाचा व त्यांच्या कार्याचा चरित्रात्मक वेध घेणारे ‘परसू : एक अनाम क्रांतिकारक’ हे पुस्तक ज्ञानदा नाईक यांनी लिहिले आहे. त्यातून परसू सुतार यांची क्रांतिगाथा वाचकांसमोर आली आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कोल्हापुरातील क्रांतिकारी कारवायांत सक्रिय असलेल्या सुतारांना तुरुंगवासही भोगावा लागला. साहसी वृत्तीचे सुतार जसे सशस्त्र क्रांतिकारी मार्गावर चालले तसेच अहिंसात्मक सत्याग्रहाची वाटही त्यांनी चोखाळली. १८८० साली जन्मलेल्या सुतारांचे निधन १९६५ साली झाले. म्हणजे स्वातंत्र्यलढा त्यांनी पाहिला, त्यात ते सक्रिय राहिले, पुढे स्वातंत्र्य आणि त्यानंतरचा काळही त्यांनी पाहिला. या साऱ्या काळातील राजकीय, सामाजिक आणि क्रांतिकारी इतिहास या चरित्रापर पुस्तकातून सोप्या शैलीत लेखिकेने चितारला आहे.
‘परसू : एक अनाम क्रांतिकारक’ – ज्ञानदा नाईक,
उत्कर्ष प्रकाशन,
पृष्ठे – १५८, मूल्य – २०० रुपये.