विनायक पाटील

जंगलात राहणारे सर्व जीव गुण्यागोविंदाने नांदत असतात. त्यात वृक्ष, झाडेझुडपे, वेली, गवत, वाघ, कोल्हे, लांडगे, तरस, हरीण, ससे, माकडे, पक्षी आणि मनुष्यप्राणी असे सर्वच जण आले. हे सगळे एकमेकांच्या जगण्याचा आदर आणि गरजेपुरता वापर करीत जगतात. या सर्वाचे जगणे परस्परावलंबी आहे.

पूर्वी प्राणी, पक्षी, श्वापदे, माणसे फक्त उदरभरणासाठी आणि उदरभरणापुरतीच एकमेकांची शिकार करीत. एखादा वाघ नरभक्षक झाला तर जंगलनिवासी एकत्र येऊन त्याचा विचार करीत आणि पारंपरिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावीत. जगण्याची गरज म्हणून. छंद म्हणून नव्हे!

छंद म्हणून शिकारी केल्या त्या राजे-राजवाडय़ांनी, अमीर-उमरावांनी. विशेषत: लांब पल्ल्याच्या बंदुका अस्तित्वात आल्यानंतर वाघ मारणे हे प्रतिष्ठेचे लक्षण झाले. वाघ मारायचे आणि त्यांच्यासोबत आपले फोटो काढून वृत्तपत्रांना द्यायचे. स्वत:च्या घरातही टांगायचे. आणि भिंतीवर शिकार झालेल्या सांबरांची शिंगे, वाघांची कातडी, गळ्यात शोभेसाठी वाघनखे घालून मिरवायचे. म्हणूनच काही संस्थानिकांचे शिकार केलेल्या दहा-पंधरा वाघांचे मृतदेह रांगेत पुढय़ात ठेवून फोटो काढलेले दिसतात. त्यातून ते आपल्या मर्दुमकीचे दाखले मिरवायचे. आणि अशा फोटोंना आपणही दाद द्यायचो. है रे मेरे बहाद्दर!

पुढे वन्यप्राण्यांची संख्या अनेक कारणांनी कमी होऊ लागली. ‘प्राणी जगवा. मारू नका. शिकार करू नका. वन्यप्राण्यांचे रक्षण करा’ अशा चळवळी सुरू झाल्या. ‘प्राणी वाचवा’ चळवळीचा प्रचार आणि त्यात भाग घेणे हे प्रतिष्ठेचे लक्षण बनले. प्रतिष्ठेचे पुजारी त्यात सामील झाले. यात बहुसंख्य लोक प्राणी मारून प्रतिष्ठा मिळविणाऱ्या वर्गातले आहेत. प्रतिष्ठा हवी.. मग ती प्राणी मारून मिळो किंवा ‘प्राणी वाचवा’ असा प्रचार करून! जंगलवासीयांनी मात्र कधीच केवळ प्रतिष्ठेसाठी शिकार केली नाही. मात्र, ‘नरभक्षक वाघांनाही मारू नका’ ही मागणी अतिरेकी आहे.

भीम-बकासुराची सगळ्यांना माहीत असलेली कथा पुन्हा सांगावीशी वाटते. बकासुराला रोज गाडाभर अन्न आणि एक नरबळी लागत असे. सगळ्या गावाने रोज गाडीभर अन्न आणि प्रत्येक घरातील क्रमाक्रमाने एक नरबळी पाठवला. तसाच अतिरेकी व्याघ्रमित्रांच्या घरचा रोज एक नरबळी नरभक्षक वाघांसाठी पाठवावा म्हणजे असुरक्षित, गरीब आदिवासींचे मातीमोल ठरवलेले जीव वाचतील आणि वाघही वाचतील. आदिवासींच्या जीवावर तुळशीपत्र ठेवून नरभक्षक वाघ वाचवू नका.

अवनी वाघिणीच्या मृत्यूस जबाबदार ठरवण्यात येत असलेले वन मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्याबाबत बोलायचे झाले तर ते जन्मजात चंद्रपूरचे आहेत. त्यांचे बालपण तेथेच गेले आहे. जंगल, प्राणी, पक्षी, आदिवासी हे त्यांचे सगेसोयरे आहेत. प्राणीप्रेम शिकण्यासाठी त्यांना एन.जी.ओं.च्या पोपटांची आवश्यकता नाही.

Story img Loader