दिनेश गुणे
एकेकाळी प्रकाशझोतात वावरलेल्या व्यक्ती त्यातून बाहेर गेल्यावर पुढे आयुष्य कसं व्यतीत करतात, हे जाणून घेणारे लेखांक.. दूरदर्शनवरील कल्पक निर्मात्या म्हणून ख्याती प्राप्त करणाऱ्या विजया जोगळेकर-धुमाळे!
त्या दिवशी घाटकोपर स्टेशनवर उतरलो तेव्हा दुपारचे बारा वाजले होते. बाहेर गर्दीचा पूर. रिक्षासाठी लोक धावाधाव करत होते. त्या वाहत्या गर्दीत मीही घुसलो आणि दिसेल त्या रिक्षावाल्याला थांबवून ‘कुल्र्याला येणार का?’ विचारू लागलो. माझा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच रिक्षावाले न थांबता निघून जात होते. घडय़ाळाचे काटे पुढे सरकत होते. अगोदरच अर्धा-पाऊण तास उशीर झाला होता. शेवटी एक रिक्षा समोर येऊन थांबली. काचेवर शिवाजी महाराजांचा स्टिकर होता. रिक्षावाला थोडा वयस्कच होता. येणार का, वगरे न विचारताच मी रिक्षात घुसलो. त्याने शांतपणे मीटर डाऊन केला, रिक्षा चालू झाली आणि पाच-पन्नास फूट पुढे गेल्यावर समोरच्या आरशातून माझ्याकडे पाहत त्याने विचारलं, ‘‘कुठे जायचंय?’’
कधी कधी अनपेक्षितपणे आश्चर्याचे धक्के बसतात. मुंबईचा रिक्षावाला काही न बोलता आपल्यासमोर येऊन थांबतो काय आणि कुठे जायचंय याची चौकशीही न करता आपल्याला जिथे जायचंय तिथे सोडायला तयार होतो काय, हा तसा आश्चर्याचा धक्काच! भरदुपारी उन्हाच्या काहिलीने कावलेलो असताना हा सुखावणारा धक्का पचवायला मला वेळ देत त्याने मला ‘‘कुठे जायचंय?’’ असं विचारलं.
‘‘कुर्ला.’’ मी शांतपणे सांगितलं आणि रिक्षा निघाली. त्याने कुल्र्याचा नेमका पत्ता विचारला. मी तो सांगितला, तेव्हा ‘‘माहीत आहे,’’ असं पुटपुटत त्याने मान हलवली.
तेवढय़ात माझा फोन वाजला. ‘‘कुल्र्याला विजया धुमाळेंच्या घरी चाललोय..’’ मी फोनवरच्या पलीकडच्याला सांगितलं आणि रिक्षावाल्यानं वेग कमी केला.
‘‘म्हणजे त्या टीव्हीवाल्या?’’ समोरच्या आरशातून माझ्याकडे पाहत त्यानं विचारलं. मी मानेनंच ‘हो’ म्हटलं.
रिक्षाचा वेग त्यानं वाढवला. काही मिनिटांतच आम्ही विजयाताईंच्या सोसायटीसमोर पोहोचलो. फोनवर बोलणं झालेलं असल्याने विजयाबाई बाहेरच उभ्या होत्या. मी खाली उतरलो. ‘‘साहेब, थँक्यू..’’ माझ्याकडे पाहत रिक्षावाला म्हणाला आणि मी डोळ्यांनीच त्याला का, म्हणून विचारलं.
‘‘साहेब, यांचे टीव्हीवरचे कार्यक्रम पाहत मी मोठा झालोय. त्यांच्या एका कार्यक्रमात मी पत्रपण पाठवलं होतं. यांनी माझं पत्र वाचलं होतं. खूप आनंद झाला होता तेव्हा. आता त्यांना प्रत्यक्ष पाहिलं- तुमच्यामुळे. म्हणून थँक्यू!’’ एवढं बोलून रिक्षा वळवून तो गर्रकन् निघून गेला.
‘‘काय म्हणत होता तो?’’ दरवाजातून आत शिरताना विजयाताईंनी विचारलं. नुसतं हसून मी त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या घरात शिरलो. पोहोचायला उशीर झाला होता; पण तसं वाटावं असं काहीच जाणवलं नाही. पुढच्याच क्षणाला मोकळेपणानं आमच्या गप्पा सुरू झाल्या..
काही माणसं कधीच निवृत्त होत नाहीत. त्यांच्या पेशाशी त्यांचं जन्माचं नातं जडलेलं असतं. काही जणांना मात्र केव्हा एकदा रिटायर होतो, असं झालेलं असतं. त्यांना नोकरी ही मनापासून करायची गोष्ट वाटतच नसते. बहुधा चुकूनच त्या नोकरीत दाखल झालेले असतात.
विजयाबाई पहिल्या प्रकारातल्या होत्या!
योगायोगाने त्यांना मनासारखी, जशी पाहिजे होती तशीच नोकरी मिळाली आणि त्यांना आपल्या करियरचा नेमका रस्ता सापडला. तब्बल तीस वष्रे मुंबई दूरदर्शनवर- त्याचं ‘सह्य़ाद्री’ हे नामकरण झालं नव्हतं तेव्हापासून- विविध जबाबदाऱ्या पार पाडत दूरदर्शनच्या हजारो-लाखो प्रेक्षकांशी विजयाताईंनी नातं जोडलं होतं. त्या रिक्षावाल्याच्या बोलण्यातून ते मी आत्ताच अनुभवलंही होतं.
नोकरीनंतर प्रत्येकाला आपलं असं एक जग सापडतं. काही जण त्यामध्ये रमतात आणि त्या जगाचंही सोनं करतात. विजयाबाईंचं घर म्हणजे असंच एक सोनेरी जग आहे. तिथल्या वातावरणातूनच त्याची खात्री पटत होती. हे जग त्यांच्या भूतकाळाशी जोडलं गेलेलं आहे, हेही लक्षात येत होतं. कलावंतांचं घर! त्या घराला निर्मितीचा ध्यास आहे.
ही मुलाखत अशी नव्हती; फक्त विजयाताईंशी गप्पा मारायच्या होत्या. तरीही पुन्हा मी त्यांच्या भेटीमागचं कारण सांगितलं आणि विजयाताई बोलू लागल्या. आवडत्या दागिन्यांची पेटी तिजोरीतून अलगद बाहेर काढून त्यातले निवडक दागिने अलवारपणे बाहेर काढून न्याहाळावेत, तशा विजयाताईंनी आपल्या मनातली आठवणींची पुरचुंडी बाहेर काढली, अलगद उलगडली आणि एकेक आठवण बोलकी होत गेली.
संगीत आणि सायकॉलॉजीमध्ये एम. ए. केलेल्या विजयाताईंना १९७२ साली अनपेक्षितपणे दूरदर्शनवर नोकरी लागली आणि त्यांच्या आवडीचं विश्व नकळतपणे हाताशी आलं. ‘किलबिल’ या कार्यक्रमासाठी याकूब सईदना मदत करत असतानाच त्या या नोकरीत कायम झाल्या आणि त्यांच्या मनातल्या कल्पनांना जणू पंख फुटले. मराठीत कला, संगीत क्षेत्रात एवढी दिग्गज मंडळी आहेत, त्यांना दूरदर्शनच्या माध्यमातून रसिकांसमोर आणावं अशी कल्पना सुचली आणि ‘शब्दांच्या पलीकडले’ या कार्यक्रमाच्या निर्मितीचे वेध विजयाताईंना लागले. असं काही वेगळं करायचं असलं की दूरदर्शनवर तेव्हा रीतसर प्रस्ताव द्यावा लागायचा. मग त्याला मंजुरी मिळाली तरच तो कार्यक्रम पुढे नेता यायचा. कारण दूरदर्शन हे सरकारी माध्यम. तेव्हा खासगी वाहिन्या नव्हत्या. दूरदर्शनचं ‘बजेट’ हा कायमच चणचणीचा विषय असल्याने कार्यक्रम तोलूनमापूनच करायला लागायचे. पण विजयाताईंचा हा प्रस्ताव मंजूर झाला आणि ‘शब्दांच्या पलीकडले’मध्ये पहिल्याच लाइव्ह कार्यक्रमात विजयाताईंनी दूरदर्शनच्या पडद्यावरून यशवंत देव आणि श्रीनिवास खळे यांच्या संगीतविश्वाची सुंदर सफर घडवली. रसिकांनी हा कार्यक्रम डोक्यावर घेतला. याच कार्यक्रमात गायक सुधीर फडके ‘आज राणी पूर्वीची ती प्रीत..’ हे गाणं लाइव्ह गायले. अरुण दाते, अनुराधा पौडवालही या कार्यक्रमात गाऊन गेल्या. दूरदर्शनवरचा हा ‘प्रयोग’ कमालीचा यशस्वी झाला आणि विजयाताईंना हुरूप आला. मग युवकांसाठी वेगळा काहीतरी कार्यक्रम करावा असं त्यांना वाटू लागलं. आकाशवाणीवर तेव्हा ‘युववाणी’ चालायचं. दूरदर्शनवरील युवकांसाठीचा कार्यक्रम तेव्हा रटाळ होत होता. करिअरच्या नव्या वाटांची ओळख करून दिली तर तरुण प्रेक्षकवर्ग दूरदर्शनकडे वळेल या खात्रीनं ‘नवी दिशा’ हा कार्यक्रम विजयाताईंनी आखला. आणि अपेक्षेप्रमाणेच झालं. गावोगावच्या तरुणांकडून पत्रांचा पाऊस पडू लागला. नोकरी-व्यवसाय, तसंच कलाक्षेत्राच्या नव्या वाटांवर चालण्यासाठी शेकडो तरुण पुढे आले. काही वेगळ्या अभ्यासक्रमांची ओळखही यातून घडवण्यात आली आणि त्यांच्या प्रवेशासाठीही हजारोंची गर्दी उसळली. दूरदर्शनच्या त्याच त्या दळणाला आता वेगळं रूप मिळालं होतं. या यशानं निर्माती म्हणून आपण काही नवं, वेगळं करू शकतो, हा विजयाताईंचा उत्साह दुणावला.
‘किलबिल’ या लहान मुलांच्या कार्यक्रमात स्पर्धा सुरू झाल्या. मुलांच्या कलागुणांना दूरदर्शनच्या पडद्यावर संधी मिळू लागली. वेगवेगळ्या स्पर्धात असंख्य मुले सहभागी होऊ लागली. अशाच एका कार्यक्रमात माधुरी दीक्षितने केलेल्या कथ्थक नृत्याला दुसरं बक्षीस मिळालं होतं..
‘चिमणराव’ या मालिकेची निर्मिती हा विजयाताईंच्या आठवणींच्या पेटीतला हळवा कप्पा. या मालिकेची आठवण निघाली की त्या भूतकाळात हरवून जातात. आपल्या हातून एक दर्जेदार निर्मिती झाली याचं समाधान या आठवणीतून ओसंडू लागतं.
विजयाताई आता दूरदर्शनवरून निवृत्त झाल्या असल्या तरी आठवणींचे अनेक अलवार क्षण त्यांच्या सोबत आहेत. दृक् -श्राव्य माध्यमाचं ते एक कौतुक असतं. आपण कित्येक वर्षांपूर्वी निर्माण केलेली कलाकृती केव्हाही पुन्हा पाहता येते, लोकांना दाखवता येते, याचं ते अप्रूप असतं. ‘स्पोर्ट्स राऊंडअप’च्या निमित्ताने केलेली क्रीडा-पत्रकारिता व विविध क्रीडाविषयक कार्यक्रमांची निर्मिती, कवी कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळालं तेव्हा घेतलेली त्यांची मुलाखत, पं. कुमार गंधर्व यांच्या घरी तीन दिवस मुक्काम ठोकून त्यांच्यावर केलेली डॉक्युमेंटरी, आशाताईंसोबत केलेला ‘ऋतु बरवा’ हा नादमय कार्यक्रम आणि त्यांच्या सर्वात आवडीचा- या माध्यमाचा वापर करून आपण समाजासाठी काहीतरी करू शकलो याचं चिरंतन समाधान देणारा ‘अक्षरधारा’ हा प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम.. अशा कितीतरी दर्जेदार कार्यक्रमांच्या निर्मितीचं समाधान सोबत घेऊन विजयाताई आज त्यांच्या निवृत्तीनंतरच्या नव्या मोहिमांमध्ये रमल्या आहेत.
पुण्याच्या फिल्मस् अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमध्ये विद्यार्थ्यांना कॅमेऱ्याचा वापर करण्यातील कलेचे गुपित सांगण्यासाठी गेली काही वष्रे त्यांना तिथे निमंत्रित केले जाते. दूरदर्शनवरील काही दुर्मीळ जुने कार्यक्रम हा खरे म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे. तो जपला पाहिजे, या हेतूने आता त्यांतील काही निवडक कार्यक्रमांच्या डिजिटायजेशनचा कार्यक्रम दूरदर्शनने हाती घेतला आहे. सरकारी कामात नेहमी येणारा पहिला अडथळा म्हणजे बजेट! या मोहिमेतही बजेटचा अडथळा आहेच; पण त्यातूनही काटकसर करत हे काम पूर्ण झाले पाहिज असे विजयाताईंना वाटते. त्यासाठी अधूनमधून त्या दूरदर्शनवर जात असतात. या कामात आपलाही सहभाग असणे हे आपले कर्तव्य आहे असे त्यांना वाटते. दूरदर्शनवर काम केल्यामुळे निवृत्तीनंतर काय करायचे, हा प्रश्न विजयाताईंना पडला नसावा, हे त्यांच्या घरातील धामधुमीवरून लक्षात येते.
दरम्यानच्या काळात अनेक खासगी चित्रवाहिन्यांचा उदय झाला. काही खासगी वाहिन्यांनी विजयाताईंवर वाहिनीच्या उभारणीची जबाबदारी सोपवली. त्या तिथेही रमल्या.
दूरदर्शनवरच्या ‘अक्षरधारा’मुळे समाजशिक्षणाचा एक अनोखा मार्ग हाती लागला होताच. आता निवृत्तीनंतर त्या अनुभवाचा उपयोग करावा असे विजयाताईंनी ठरवले आणि आसपासच्या वस्त्यांमधील मुले विजयाताईंच्या घरी येऊन अभ्यास करू लागली. त्यांच्या घरी सकाळ-संध्याकाळी शिकवणी वर्ग चालतात. मुलांना शिकवताना होणारी त्यांची किलबिल विजयाताईंना ‘अक्षरधारा’ आणि ‘किलबिल’च्या आठवणींच्या मळ्यात घेऊन जाते. वर्तमानाचं भूतकाळाशी नातं जोडलं जातं ते असं!
जवळपास ३० र्वष विजयाताईंनी दूरदर्शनवर निर्माती म्हणून काम केलं आणि सर्जनाचे समाधान सोबत घेऊन १९९२ मध्ये त्या निवृत्त झाल्या. मुलाखती, व्याख्यानं, प्रशिक्षणं, नव्या प्रकल्पांची निर्मिती अशा मोहिमांमध्ये आता त्या व्यग्र असतात. नोकरीच्या काळात दिवसातला ठरावीक वेळच काम असायचं. आता उलट काम अधिक वाढलंय. वेळच पुरत नाही असंही कधी कधी होतं. पण या नव्या व्यग्रतेचा आनंदही त्या अगदी मनापासून उपभोगत असतात.
दूरदर्शनच्या कार्यक्रमांची निर्माती ही विजयाताईंची ओळख असली तरी ते त्यांचं पहिलं प्रेम नाही. या नोकरीच्या काळात विजयाताईंनी अनेक नवोदित आणि नावाजलेल्या गायक-गायिकांना छोटय़ा पडद्यावरून जगासमोर आणलं. संगीताचा अनोखा नजराणा आपल्या कार्यक्रमांतून रसिकांना पेश केला. एका अर्थाने संगीतसेवेचा वसा त्यांनी पूर्ण केला. संगीताचं शिक्षण घेतलेल्या विजयाताई स्वत: मात्र कधी फारशा दूरदर्शनच्या पडद्यावर गाताना रसिकांना दिसल्या नाहीत. आरती अंकलीकर-टिकेकर यांच्यासारख्या गायिकेच्या गुरू असलेल्या विजयाताईंनी आपली गायनकला रसिकांसमोर ठेवण्यासाठी निर्माती म्हणून हाती असलेल्या संधीचा कधीच स्वार्थी वापर केला नाही. त्यांनी किशोरीताईंसोबत अनेक मफली केल्या. त्यांच्या मफलींच्या निमित्ताने त्यांच्या सहवासात रमल्या, प्रवास केला. पण गाणं मात्र राहूनच गेलं.
‘गाणं हे माझं पहिलं प्रेम होतं,’ असं सांगताना विजयाताईंची नजर सहज भिंतीवरच्या किशोरीताईंच्या फोटोवर खिळते. भूतकाळात त्यांच्यासोबत छेडलेले सूर कदाचित त्यावेळी त्यांच्या कानात रुंजी घालत असावेत असं वाटत राहतं. ते राहून गेलेलं गाणं पुन्हा सुरू करायची त्यांची खूप इच्छा आहे; पण अलीकडे आवाज फारसा साथ देत नाही, सूर लागत नाही. पण त्यांनी उमेद सोडलेली नाही. सकाळी आणि संध्याकाळी शिकवणीसाठी घरी येणाऱ्या मुलांपकी काही जणांकडे गाता गळा आहे, हे त्यांनी हेरलं आहे. त्यांना गाणं शिकवून आपलं अधुरं राहिलेलं स्वप्न जगण्याचा प्रयत्न विजयाताई करत असतात. वय विसरलेल्या त्या घरात ‘किलबिल’ सुरू असतानाच गाण्याचे सूरही उमटतात आणि ‘शब्दांच्या पलीकडले’ अशी काहीतरी अनुभूती घेऊन घर मोहरून जातं. रोजच हे घडत असल्याने घराला आता त्याची सवय झाली आहे..
dineshgune@gmail.com