सुधीर शालिनी ब्रम्हे
आशा-निराशा या मानवी मनाच्या आदि-अनंत अवस्था! सुख-दु:खाच्या जाणिवांचा जन्म त्यातूनच होतो. निराशेतील अतीव दु:खाच्या क्षणी निष्क्रिय होऊन त्यास ललाटलेख, नियतीचे भोग मानतो माणूस. नियती हेच जीवनाचे आदिम वास्तव असे मानणारी वाङ्मयीन विचारधारा म्हणजे- अस्तित्ववाद! स्वातंत्र्योत्तर कालखंडातील साधारणत: दुसऱ्या दशकात मराठी साहित्यात सौंदर्यवाद, अतिवास्तववाद, अस्तित्ववाद या संकल्पना आणि त्या प्रतिबिंबित झालेले जे साहित्य प्रामुख्याने प्रकाशित झाले, त्यास ‘साठोत्तरी साहित्य’ आणि वाङ्मय प्रकारांस नवकाव्य, नवकथा अशी ओळख मिळाली. नवकथेत ज्यांचे नाव मोरपंखाने लिहिले गेले आहे, त्या जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांची आस्वादक अन् आकृतिबंधात्मक समीक्षा म्हणजे त्यांच्याच एका चाहत्याने (विजय पाडळकर) लिहिलेले ‘जीएंच्या रमलखुणा’ हे पुस्तक!
१९५५ ते १९७५ या दोन दशकांत जीएंनी वाचकांची एक पिढी भारावून टाकली. मराठी कथेने कात टाकली तीही याच कालखंडात. व्यंकटेश माडगूळकर आणि गंगाधर गाडगीळ यांचेही त्यात मोलाचे योगदान आहे. जीएंच्या कथा या नियतीशरण माणसांच्या व्यथा आहेत. ही माणसं निराश, हताश वा उद्विग्न झालेली नाहीत; ती जगताहेत जिण्याला दोष न देता. शोध घेताहेत त्यांच्या वाटय़ाला आलेल्या दु:खाचा. या जीवनव्यवहारातून जीए मानवी अस्तित्वाची निर्थकता उलगडतात ती विविध प्रतिमांद्वारे! मराठी अस्तित्ववादी साहित्यातील कथा वाङ्मयात जीए आणि कादंबरी प्रकारात भालचंद्र नेमाडे हे साहित्याभ्यासकांसाठी मैलाचे टप्पे आहेत.
जीएंच्या कथांचा प्रचंड पैस पकडण्यासाठी पाडळकरांनी त्यांच्या १२ कथांची निवड केली आहे. ‘गुंतवळ’, ‘पडदा’, ‘विदुषक’, ‘इस्किलार’, ‘वीज’, ‘ऑर्फियस’, ‘यात्रिक’, ‘स्वामी’, ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’, ‘गोरिला’, ‘बळी’ (‘पारवा’) व ‘बळी’ (सांजशकुन) या जीएंच्या गाजलेल्या आणि मैलाचा टप्पा ठरलेल्या कथा आहेत. गेल्या तीन दशकांत (जीएंच्या हयातीतसुद्धा) त्यांच्या कथांवर विविध अंगांनी भरपूर लेखन झाले आहे. पाडळकरांनी या कथांच्या रंग-रूप-पोताचे विश्लेषण केले आहे. कथेच्या गोषवाऱ्यासह कथेतील वेग-आवेग, निवेदन शैली, वाचकाला दोन-दोन पावलं पुढे नेणारी प्रवाही ऊर्जा, कथाबीजात प्रकटणारी जीएंची जीवनदृष्टी यांची अभ्यासपूर्ण मांडणी पाडळकरांनी केली आहे.
पाडळकरांच्या या समीक्षेला अधिष्ठान लाभले आहे ते पाश्चात्त्य लेखकांचा अभ्यास आणि जीएंच्या थोडय़ाफार पत्रात्मक सहवासाचे! जीएंच्या साहित्याबद्दलच्या आत्मीयतेतून पाडळकरांच्या समीक्षेत आस्वादकता आली आहे. तर साक्षेपी विचार व सूक्ष्म निरीक्षणांतून शोधलेल्या कच्च्या दुव्यांमुळे ही समीक्षा आकृतिबंधात्मक मुद्दय़ांनाही स्पर्श करते. ‘जीएंचे स्तुतीकार’ हा दोष दूर झाल्याने हे लेखन समतोल झाले आहे. अभ्यासकांसाठी ‘जीएंच्या रमलखुणा’ हे पुस्तक उपयुक्त ठरते ते पाडळकरांच्या मांडणी व शैलीमुळे! कथेचे सार सांगून त्यातील मर्मस्थाने, कच्चे दुवे आणि प्रतिमासृष्टी यावर ते भाष्य करतात. त्यामुळे कथा पूर्णपणे वाचावी अशी वाचकाचीही मन:स्थिती होते.
उत्तरार्धातील ‘जीएंच्या कथेतील प्राणिजीवन’, ‘जीएंची प्रतिमासृष्टी व सिनेमा’, ‘कैरी : कथा आणि चित्रपट’, तसेच ‘जिव्हाळखुणा : जीएंची पत्रं- ग्रेससाठी’ हे लेख जीएंच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला स्पर्श करणारे असले तरी फारसे उद्बोधक ठरत नाहीत. अमोल पालेकरांनी केलेल्या ‘कैरी’च्या चित्रपट रूपांतरावरील लेख पुस्तकाच्या पठडीत बसणारा नाही. या दोन कलावंतांमध्ये असलेले मुदलातील मतभेद पाहताही हा लेख अप्रस्तुत ठरतो. लेखात कथेपेक्षा चित्रपटावरच अधिक भाष्य आहे. ‘पटकथेसंबधी ज्या नेमक्या सूचना (जीएंनी) केल्या आहेत, त्या पाहता चित्रपट या माध्यमाचा त्यांनी गंभीरपणे विचार केला होता हे स्पष्ट दिसते,’ हे पाडळकरांचे वाक्य एकूणच पार्श्वभूमीवर अधिक ‘गंभीर’ वाटते. अभ्यास असणे आणि तंत्र अवगत असणे यात फरक आहे. वास्तविक पटकथा लेखन हा जीएंचा पिंड नव्हता, परंतु पाडळकरांनी तो बादरायण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जीएंच्या कथेतर लेखनातील वैगुण्यच अधोरेखित झाले आहे. त्याऐवजी जीएंच्या कथांमधील प्रतिमांतील दृश्यात्मकतेवर विस्ताराने लिहिणे व्हायला हवे होते.
बहुतांश श्रेष्ठ लेखकांसाठी नियतीने लिहिलेला आत्मस्तुतीचा ललाटलेख आपल्या भाळी येऊ नये या भावनेने असेल कदाचित, नियतीच्या अनेक विभ्रमांचे बहुरंगी, बहुढंगी चित्र चितारणाऱ्या जीएंनी आत्मचरित्र लिहिले नाही. मात्र, जीएंच्या चाहत्या पाडळकरांनी आत्मस्तुतीचा दोष आणि प्रस्थापित लेखकाला निषिद्ध असणारा पुनरुक्तीचा दोष स्वीकारलेला दिसतो. प्रास्ताविकातील (पृ. ९) टॉलस्टॉयचे उद्धृत त्याच संदर्भात ‘वीज’ कथेच्या विश्लेषणात (पृ. ६५) पुन्हा आले आहे. जीएंच्या निधनदिनी त्र्यं. वि. सरदेशमुखांशी झालेल्या चर्चेचा उल्लेखही वेगवेगळ्या ठिकाणी एकाच संदर्भात दोन वेळा आला आहे. जीएंच्या पत्रव्यवहार खंडांसाठी लिहिलेल्या प्रस्तावनेचा उल्लेखही असाच अनावश्यकरीत्या पुन:पुन्हा (पृ. १७, १५७, १५९ आणि १८१) आला आहे. हे सर्व टाळता आले असते. श्री. पु. भागवतांसारख्या साक्षेपी संपादकांना समर्पित या पुस्तकात हा दोष विशेषत्वाने नजरेत भरतो.
जीए आणि ग्रेस या दोन सुहृदांच्या एकतर्फी पत्रव्यवहारावरील लेख, ग्रेस यांची जीएंना आलेली पत्रे उपलब्ध नसल्याने अधुरा ठरला आहे. अभ्यासूंनाही एका महत्त्वाच्या ऐवजाला मुकावे लागले आहे. आपापल्या साहित्य क्षेत्रातील हे दोन दिग्गज सुहृद आणि समकालीन. ग्रेस यांनी काव्याप्रमाणेच ललित लेखनातही लीलया आणि यथेच्छ संचार केला. त्यांच्या काव्याला लालित्याचा परीघ लाभला होता अन् ललित लेखनाला कथेचा पैसा मिळाला होता. जीएंच्या कथांचे क्षितिज कादंबरीएवढे विस्तीर्ण होते. या दोघांच्या प्रतिमासृष्टीचा तुलनात्मक अभ्यास एखाद्या लेखात मांडला असता, तर पुस्तकाला वेगळा आयाम लाभला असता.
‘जीएंच्या रमलखुणा’
– विजय पाडळकर,
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस,
पृष्ठे – २०२, मूल्य – २५० रुपये.
sudhir.brahme@gmail.com