शफी पठाण

असे नेमके काय घडते आहे काश्मिरात, की तेथील नागरिक निवडणूक नाकारण्याच्या निर्णयाप्रत आलेत? काश्मीर प्रश्न आता तक्रार, संतापाच्या पलीकडे गेला आहे? ..अशा अनेक अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात राजधानी श्रीनगरपासून दहशतवादग्रस्त अनंतनाग, पुलवामापर्यंतचा प्रदेश पालथा घालून काश्मीरच्या धगधगत्या वास्तवाचा घेतलेला मागोवा..

दिल्लीहून निघालेले विमान श्रीनगरच्या आकाशात पोहोचले तेव्हा दुपारचे चार वाजले होते. श्रीनगर हे राजधानीचे शहर. त्यामुळे शहरात चौफेर वर्दळ अपेक्षितच होती. परंतु विमानातून त्याच्या अगदी उलट चित्र दिसत होते. इतक्या उंचावरून तसेही काही कळणार नव्हते. प्रत्यक्ष शहरात शिरल्यावरच राजधानीचा खरा ‘फील’ अनुभवता येणार होता. त्यामुळे विमान उतरण्याची प्रतीक्षा होती. विमानाचे उतरले. सामानही हाती आले. परंतु विमानातून उतरलेल्या माणसांखेरीज इतर कुणी फारसे दिसेनात. विमानतळाहून बाहेर पडल्यावर प्रथम शहरात दिसले ते लष्कराचे जवान! शस्त्रसज्ज. सभोवताल बख्तरबंद वाहनांच्या रांगा. कुठून आलात, कुठे जाणार, किती दिवस राहणार, काम काय इकडे? नुसते प्रश्न! उत्तरांचे रतीब घालून झाल्यावर अखेर वाट मोकळी झाली. विमानतळ मागे पडले, पण माणसे अजूनही विरळच होती. वाहन शहराच्या मुख्य मार्गावर आले तरीही टप्प्या-टप्प्यांवर चार-दोन माणसांपलीकडे फारसे कुणी दिसत नव्हते. खळाळत वाहणारे शुभ्र कालवे, नुकताच बहरलेला चिनार आणि बर्फ पांघरू पाहणाऱ्या पवर्तरांगांचे सुंदर वर्तुळ असे देखणे रूप निसर्गाने या शहराला दिले आहे. परंतु शहरातली माणसे मात्र कायम भेदरलेली. भीती आणि संतापाचे विचित्र मिश्रण चेहऱ्यावर फासून जगणारी. धावत असलेल्या आमच्या वाहनातही एक गूढ शांतता अस्वस्थ करीत होतीच. ती भंग करायची, तर कुणाशी तरी बोलणे गरजेचे होते.

ज्याच्याशी बोलता येईल असा पहिला स्थानिक माणूस वाहनचालकच होता. अब्बास आलम त्याचे नाव. त्याला विचारले, ‘‘इतके सैनिक रोज असतात रस्त्यावर, की आज काही विशेष घडलेय?’’ तो संतापाच्या स्वरात म्हणाला, ‘‘ये हमारा शहर अब कहां रहा साहब? ये बोलते है तब सो जाते है, ये जगाते है तब जागना पडता है. हमारी सात पुश्ते काश्मीर की ही वादियों में दफन हो गई. पर फिर भी लगता है, मानो हम यहां मेहमान है. मालिक तो ये लोग है, जिन्हे हिंदुस्थान की हुकुमत ने हम पर राज करने की लिये भेजा है!’’

‘‘हिंदुस्थान की हुकुमत ने म्हणजे? का? तू भारतीय नाहीस?’’ असे विचारल्यावर मात्र त्याने जो संवाद थांबवला तो पुढे हॉटेल आले तरी तो मौनच होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलमधून बाहेर पडल्यावर तडक ‘शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर’ गाठले. जगप्रसिद्ध ‘डल लेक’च्या शेजारी ही देखणी इमारत मोठय़ा दिमाखात उभी आहे. काश्मीर पर्यटन विभागाच्या एका कार्यक्रमाचे उद्घाटन येथील नवनियुक्त राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते होणार होते. प्रवेशद्वारावरच दोन तरुण भेटले. यातला एक जुनैद व दुसरा आफ्रिदी. दोघेही येथे होणारा ‘म्युझिकल शो’ बघायला आले होते. परंतु त्यांच्याकडे प्रवेशपत्र नसल्याने सुरक्षारक्षकाने त्यांना अडवून ठेवले होते. त्यांना विचारले, ‘‘शिक्षण कसे सुरू आहे?’’ तर जुनैद उत्तरला, ‘‘कुछ मत पूछिये! हर दो दिन में कर्फ्यू लग जाता हैं. पढाई पुरी चौपट हो गई हैं. यहां पर साक्षरता का प्रमाण शतप्रतिशत हैं. हर जवान बंदा आपको पढा-लिखा मिलेगा. पर नौकरीया नहीं हैं. क्या करे?’’

‘‘अरे, पण नोकऱ्या, रोजगार निर्माण करण्यासाठी राज्यात सक्षम सरकार हवे आणि सरकार नावाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी स्थानिकांचा निवडणुकीत शंभर टक्के सक्रिय सहभागही हवा. पण तुम्ही तर थेट निवडणूकच नाकारली. हे कसे?’’ असे विचारल्यावर जुनैद काही बोलणार, इतक्यात आफ्रिदीने त्याला थांबवले व स्वत: बोलू लागला, ‘‘ये ट्रेलर था. इस बार चार पर्सेट वोटिंग हुआ है. अब जल्दही पंचायत चुनाव है. वहां झीरो होगा और आगे असेंब्ली, लोकसभा में भी..’’ असे का, म्हणून विचारल्यावर म्हणाला, ‘‘तमाम काश्मीर की अवाम को अब चुनाव नहीं चाहिये. ये अवाम सिर्फ ‘हाकी खुदारियत’ चाहती है.’’

‘हाकी खुदारियत’ या शब्दाचा अर्थ लागेना. अर्थ विचारल्यावर कळले- ‘हाकी खुदारियत’ म्हणजे ‘आमचा हिरावलेला हक्क परत द्या!’ तो कसा परत मिळणार, असे विचारल्यावर जुनैद व आफ्रिदी एकाच सुरात म्हणाले, ‘‘एकही रास्ता हैं.. आझाद कश्मीर!’’ डोक्याला झिणझिण्या आल्या. वाटलं, पोरं तरुण आहेत, रक्त गरम आहे. बोलले असतील भावनेच्या भरात. तिकडे कार्यक्रमाची नांदी झाली होती. राज्यपाल सभागृहात पोहोचले होते. त्यांचे राष्ट्रप्रेम जागवणारे प्रेरणादायी भाषण झाले आणि लगेच उद्घाटनीय सत्राच्या समारोपाला राष्ट्रगीत वाजायला लागले. सभागृहातील निवडक सरकारी कर्मचारी सोडले तर बाकी सर्व आपल्या जागेवरच बसून होते. राष्ट्रगीताला उभे राहायची तसदी त्यांनी घेतली नाही. मिनिटभरापूूर्वी आपल्या प्रखर भाषणातून राष्ट्रप्रेम जागवणारे राज्यपाल हे सर्व उघडय़ा डोळ्यांनी बघत होते.

उभे न राहणाऱ्यांमध्ये समोरच्या रांगेत एक जानभाई नावाचा तरुण होता. तो काश्मिरात ट्रॅव्हल्स एजन्सी चालवतो. त्याला विचारले, ‘‘राष्ट्रगीताला उभे राहण्यात काय अडचण आहे?’’ तो म्हणाला, ‘‘कुठल्या राष्ट्राचे गीत? फाळणीचा इतिहास वाचा. तत्कालीन राजा हरी सिंह यांनी काश्मीरच्या विलीनीकरणावर नव्हे, तर सामीलनाम्याच्या करारावर सही केली होती. जम्मू-काश्मीर हे संस्थान संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण या विषयांपुरतेच भारतात सामील झाले होते. एरवी आमचे काश्मीर स्वतंत्र होते व आजही ते तसेच असले पाहिजे. आमची घटना वेगळी, आमचा झेंडा वेगळा. मग केवळ राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याचा आग्रह धरून काय होईल?’’ त्याला म्हटले, ‘‘ऐकले नाहीस? राज्यपाल आता म्हणाले, काश्मीर भारताचा अविभाज्य अंग आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष होणार नाही. जिथे समस्या असेल तिथे चर्चेतून मार्ग काढता येईल.’’ जानभाईचेही उत्तर तयार होते. तो म्हणाला, ‘‘वर्तमान राज्यपाल दिल्लीची ‘लाइन’ चालवताहेत. त्यांना खास निवडून अन् ठरवून काश्मिरात पाठवण्यात आले आहे. याआधीचे राज्यपाल एन. एन. व्होरा चांगले काम करीत होते. त्यांना काश्मीरचे सामथ्र्य व न्यूनत्व चांगले ठाऊक होते. त्यांना का हटवले, याच्या खोलात जाल तर तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे सापडतील..’’ असा दावाही जानभाईने केला. सभागृहाच्या खिडकीतून बाहेर पाहिले. दूर पहाडांवर मावळतीचे रंग गहिरे होत चालले होते. हॉटेलवर परतावे लागणार होते. दुसऱ्या दिवशीची पहाट पहलगामच्या उंबरठय़ावर उगवणार होती.

लिडर नदी आणि शेषनाग झऱ्याच्या काठावर वसलेल्या पहलगाममध्ये पहिली गाठ पडली ती पर्यटकांना खच्चरस्वारी घडवणाऱ्या शमसुद्दीनशी. त्याला थेटच विचारले, ‘‘आता निवडणूक झाली. तू मत दिलेस का?’’ तो म्हणाला, ‘‘नहीं साहब, और आगे भी नहीं दूंगा.’’ का, म्हणून विचारताच त्याने हातातला खच्चर खुंटीला बांधला आणि सांगू लागला, ‘‘२०१६ में बुरहान वानी मारा गया. तब से वादीयों में कुछ भी ठीक नहीं है. मन्नान वानी का भी वही हश्र हुवा हैं. आये दिन हालात बद से बदतर होते जा रहे है. फौज हमे शक की निगाहों से देखती है. कभी बारामुला से फायरिंग की खबर आती है, तो कभी उरी से. हमें एक बात समझ नहीं आती, अगर बॉर्डर पर बीएसएफ बैठी है तो सरहद पार से इतने दहशतगर्द और असलात (शस्त्रे) इस पार इतने आसानी से आते कैसे है?’’

त्याच्या प्रश्नाने डोक्याचा पार भुगा झाला. सीमेवर बीएसएफ डोळ्यांत तेल घालून बसलीय. मग हे इतके लोक शस्त्रास्त्रांसह सीमेपार कसे येतात? बरं, या दहशतीची धग आता खोरे ओलांडून राजधानी श्रीनगर आणि त्याही पुढे थेट जम्मूपर्यंत जाणवायला लागली आहे. हे वास्तव कसे नाकारायचे, हाही प्रश्नच होता.

पुढच्या दहा पावलांवर सरफराज भेटला. त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. आता पहलगाममध्ये  तो काश्मिरी शाली विकतो. त्याला कमी मतदानाबद्दल विचारल्यावर जाम भडकला. ‘‘चुनाव का बायकॉट ये आम लोगों का फैसला था. बाद में पीडीपी और नॅशनल कॉन्फरन्स ने लोगों के सूर में सूर मिलाया. वर्ना उन्हें तो सिर्फ कुर्सी चाहिये. देखा नहीं, मेहबूबाजी ने कुर्सी के लीये भाजपा तक से हात मिला लिया.’’ भाजपशी हातमिळवणीत काय गैर आहे, या प्रतिप्रश्नावर तर सरफराजचे डोकेच फिरले.

‘‘अब जादा मूह मत खुलवावो साहब, वर्ना आप के लिये ठीक नहीं होगा..’’ अशी जवळजवळ त्याने तंबीच दिली. पहलगामच्या दिवसभराच्या मुक्कामात भेटलेल्या प्रत्येक माणसाच्या प्रतिक्रिया जवळपास अशाच टोकाच्या आणि तीव्रतेच्या होत्या.

काही नवीन प्रश्नांसह पुढचा मुक्काम गुलमर्गला होता. समुद्रसपाटीपासून २,७३० मीटरवर वसलेले हे ठिकाण बातम्यांमध्ये रोज चर्चेत असलेल्या बारामुला जिल्ह्य़ात येते. गुलमर्गला पोहोचलो तेव्हा मोबाइलमधील तापमानाचा आकडा पाचवर होता. हॉटेलवर सामान ठेवून गोंडोला गाठले. केबल कारद्वारे जमिनीपासून १४ हजार फुटांवरील अफरवात टोकावर पहिली भेट झाली ती पर्यटकांसाठी ‘केहवा’ (हे आपल्याकडच्या चहासारखे काश्मिरातील प्रसिद्ध पेय आहे.) बनवणाऱ्या अब्दुल अजीजशी. वळणावळणांनी गप्पा थेट फुटीरवाद्यांपर्यंत पोहोचल्या. अब्दुल म्हणाला, ‘‘वो जमाना और था, जब कश्मीर के लोग सय्यद शाह गिलानी और हुर्रियत को तव्वजो देते थे. पर अब उनकी बातों से सिर्फ पाकिस्तान झलकता हैं. उन्होने हमारे हातों में पत्थर थमाकर खुद के घर भरे. सरहद के उस पार भी काश्मीर है. वो भी पाकिस्तान से आझादी की जंग लड रहा है. हम भी आझादी चाहते हैं. पर हमारे आझाद कश्मीर की खिलाफत हम हुर्रियत को नहीं देना चाहेंगे. आझाद कश्मीर पर आम कश्मिरी लोगों की हुकुमत होनी चाहिये.’’

याच अफरवात टोकावर आणखी एक मध्यमवयीन गृहस्थ भेटले. इब्राहिम त्यांचे नाव. त्यांचा मुलगा पदवीपर्यंत शिकला होता. त्यांना विचारले, ‘‘मुलाच्या डोक्यात काय चाललंय, काही सांगतो का तुम्हाला?’’ ते म्हणाले, ‘‘क्या चलेगा? नोकरी नहीं, धंदे के लिए पैसे नहीं. दिन भर मोबाइल से चिपका रहता है. डर लगता है.’’

मी विचारले, ‘‘मोबाइलची कसली भीती?’’ तर म्हणाले, ‘‘मोबाइल का नहीं, उस में जो फेसबुक है उसका डर लगता है. पहले सिर्फ अनपढ लोग दहशतगर्दो की बातों में आ जाते थे, अब तो डॉक्टर और इंजिनीअर भी बंदूक थामने लगे है. बुरहान को फेसबुकनेही कश्मीर का हिरो बनाया था. ये जवान बच्चे ऐसीही खबरे पढते रहेंगे तो इनका दिमाख भी खराब होगा. कश्मीर आझाद हो या हिंदुस्थान में रहें, ये मसला नहीं है. इन बच्चों को काम मिलना चाहिये. अगर ये काम में मश्गुल हो जायेंगे तो दहशतगर्द बंदूक थामनेवाले हात कहां से लायेंगे?’’

या संपूर्ण प्रवासात इब्राहिम पहिला असा माणूस होता, ज्याने काश्मीरच्या मूळ दुखण्यावर नेमके बोट ठेवले होते. पण संख्यात्मकदृष्टय़ा अशा विचारांची माणसे येथे कमी आहेत. ती वाढवायची असतील तर आधी काश्मिरींच्या मनातील परकेपणाची भावना घालवावी लागेल. येथील तरुणांच्या हाताला काम देणारे ठोस धोरण राबवावे लागेल आणि त्यांच्या सभोवताली असलेले लष्कर त्यांच्यावर पॅलेट गन चालवण्यासाठी नाही, तर पाकिस्तानी उखळी तोफगोळ्यांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी आहे, हा विश्वास नियोजनपूर्वक त्यांच्या मनात रुजवावा लागेल.

परंतु आज काश्मिरात तशी स्थिती आहे का? या प्रश्नाचे उत्तर फारसे सकारात्मक नाही. मात्र, इब्राहिमसारखा विचार करणारी माणसे खोऱ्यात असेपर्यंत अगदीच नकारात्मकसुद्धा नाही.

lokrang@expressindia.com