ऐतिहासिक चित्रपट करताना दिग्दर्शकाने प्रत्येक समाजाची काही मानचिन्हे असतात, आदर्श असतात, प्रेरणास्थाने असतात, याचे भान ठेवायला हवे. ती जपून दिग्दर्शकाने कलाकृती साकारायला हवी. त्यांना धक्का पोहोचला तर चाहते दुखावले जातात, याचे भान ठेवायला हवे.
संजय लीला भन्साळी ह्यांनी बाजीराव-मस्तानी यांच्या प्रेमकथेवर आधारित ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट बनविला आहे. त्यातील एक गाणे ‘पिंगा गं पोरी पिंगा’ हे अलीकडेच प्रदर्शित झाले आहे. महाराष्ट्रात या गाण्यातील दृष्यांवर विविध स्तरांतून असंतोष नोंदवला जात आहे. पेशवा बाजीराव यांची पत्नी आणि मस्तानी ह्यांना पडद्यावर एकत्र नाचताना पाहून हसावे की रडावे ते कळत नाही. संजय लीला भन्साळी ह्यांनी हे दृश्य दाखविण्यासाठी कलात्मक मुभा घेतली आहे असे म्हटले, तर या कलात्मक मुभेची लक्ष्मणरेषा त्यांनी ओलांडली आहे असे वाटते. उदा. हॉलीवूडचा एखादा दिग्दर्शक जॉन. एफ. केनेडींवर चित्रपट बनवताना त्यांच्या पत्नी जॅकलीन ह्यांना त्यांची मत्रीण मíलन मन्रो हिच्या संगे रॉक-एन-रोल नाचताना दाखवेल काय? किंवा ब्रिटिशांचे एक प्रेरणास्थान असलेल्या डय़ुक ऑफ वेिलग्टन ऊर्फ लॉर्ड आर्थर वेल्सली ह्यांच्या पत्नी लेडी वेल्सली ऑपेरा गात आहेत आणि लॉर्ड वेल्सलीसाहेब त्याला दाद देत आहेत, असे कोणी ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक दाखवू धजेल काय?
अशा प्रकारचा ऐतिहासिक चित्रपट करताना भरपूर संशोधन (रिसर्च) करण्याची गरज असते. इतिहासातील घटनांवर कथा, कादंबरी, नाटय़ किंवा चित्रपट लिहिताना तर अधिक संशोधन करावे लागते. कारण जन-सामान्यांना इतिहास अधिक सोप्या व मनोरंजक पद्धतीने अशा माध्यमांतून अधिक चांगल्या पद्धतीने समजावून देता येतो.
‘गांधी’ चित्रपट करण्याआधी अॅटनबरोची रिसर्च टीम जवळ जवळ २० वष्रे त्या विषयावर संशोधन करीत होती, असे सांगतात. इथे नेमका उलटा प्रकार आहे. भन्साळी यांनी ना. सं. इनामदारांच्या ‘राऊ’ या कादंबरीवरच चित्रपट बेतण्याची मूलभूत चूक केली आहे. कारण सहसा कथा-कादंबऱ्यांतून बाजीरावाचे चित्रण हे बाजीराव-मस्तानी प्रेमप्रकरणापुरतेच मर्यादित असते. अवघे ४० वष्रे आयुष्य लाभलेल्या बाजीरावाने त्याच्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत ४१ लढाया केल्या आणि त्या सगळ्या जिंकल्या ह्याची दखल फारशी कोणी घेत नाही. म्हणून मी ‘अजिंक्य योद्धा बाजीराव’ हे बाजीरावाचे चरित्र लिहिताना मस्तानीबद्दल योग्य तो आदर बाळगून (असे पुस्तकात सुरुवातीला नमूद करून) तिचा उल्लेख टाळला आणि योद्धा बाजीरावाचे चरित्र लिहिले.
वास्तवात मस्तानीला बाजीरावाच्या कुटुंबाने, अगदी त्याचे जिवलग बंधू चिमणाजी ह्यांनीसुद्धा अव्हेरले होते. काशीबाई आणि मस्तानी या एकत्र नांदल्याच नाहीत तर त्या एकत्र कशा नाचतील? चिमणाजींनी मस्तानीला अटक केली, ह्या धक्क्याने बाजीरावाने दूर रावेरला एकांतवासात जाऊन राहणे पसंत केले आणि नर्मदेच्या पुरात पजेपोटी उडी घेऊन जवळ जवळ आत्महत्याच केली. फुप्फुसात पाणी जाऊन त्यांना न्यूमोनिया झाला होता. शिवाय, बाजीरावाच्या पत्नी काशीबाई ह्या एका पायाने अधू होत्या. त्यांना क्षयाची बाधा झाली होती. त्या कशा काय िपगा घालतील? शिवाय हा िपगा लावणी स्टाईलने आणि पेहेरावात दाखवला आहे, अशा प्रकारचा नाच काशीबाई किंवा मस्तानी कशा करतील? त्या काळी दरबारातील नाचाची परंपरा ही एका समाजापुरती मर्यादित होती. राजघराण्यातील स्त्रिया तर निश्चितच नाचत नसत!
भन्साळी गल्ला भरण्यासाठी काही लीला करतील, पण बाजीरावाच्या कुटुंबाच्या जीवनावर हा अधिक्षेप करण्याचा अधिकार त्यांना नाही! भन्साळी बाजीरावाचे नाव चित्रपटासाठी वापरून त्याचे गुडविल (पुण्याई) वापरीत आहेत; कोणासही काहीही रॉयल्टी न देता! तेव्हा ते खराब करण्याचा त्यांना अधिकार नाही. ऐतिहासिक सत्यापासून फार दूर जाऊन चित्रपटाची कथा रचण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. ऐतिहासिक वास्तव तर ते डावलू शकत नाहीत. त्यात वाट्टेल ते फेरफारही करू शकत नाहीत. बॉक्स ऑफिस (गल्ला) पेक्षा ऐतिहासिक सत्य हे चिरंतन आहे. त्यापलीकडे जाऊन ते जर कोणाच्या भावना दुखावणार असतील तर ते िनदनीय ठरते. अजिंक्य योद्धा बाजीरावाविषयी आदर असणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांना हे मनस्तापजनक आहे. टॉलरन्सच्या नावाखाली काहीही सहन करीत राहिलो तर स्वाभिमानच काय, पण अस्तित्वसुद्धा गमवायची पाळी येईल!
असाच आणखी एक खेदजनक संदर्भ म्हणजे- आकार पटेल ह्या प्रसिद्ध स्तंभलेखकाने एशिअन एज ह्या वृत्तपत्राच्या १५ नोव्हेंबर २०१५च्या अंकात टिपू सुलतानविषयी लिहिताना kHistorically challengedl या लेखात ‘When we read the works of our last great historian of the period, Sir jadunath Sarkar, it becomes clear that unlike the Marathas, Tipu was a real warriorl असे लिहिले आहे. म्हणजे मराठे योद्धे नव्हते, तर काय युद्धावर भाकऱ्या बडवायला जात होते? सर जदुनाथ सरकारांचा हा संदर्भ पानिपत युद्धाच्या पराभवाच्या संदर्भातील आहे. पटेल यांनी त्याचा बेमालूम विपर्यास केला आहे. हे आत्ताच का? कुठून तरी मुद्दामहून आणि जाणूनबुजून लोकांची डोकी भडकवायची, लोकांनी तिखट प्रतिक्रिया दिली की मग त्यांना ‘इनटॉलरन्ट’ म्हणावयाचे, हे पटत नाही. एकमेकांचा मान राखायची भारतीय परंपरा आहे आणि ती विसरू नये!
आता प्रस्तुत सिनेमातील गाणे ड्रीम सिक्वेन्स, स्वप्नवत किंवा सिनेमाच्या शेवटी ते एक गोड इफेक्ट म्हणून टाकले आहे, असा कोणत्याही प्रकारचा बचाव भन्साळी यांनी केला तरी तो मान्य होऊ शकत नाही. कारण त्यांच्या मार्केटिंगसाठी अशा प्रकारचा ‘टीजर’ (फसवा) खेळ ते करीत असतील, तर आत्तापर्यंतच्या त्यांच्या चाळ्यांमुळे दुखावलेल्या मनांची जागा भडकलेली डोकी घेतील आणि हा एकंदर समाजस्वास्थ्याचा विषय होईल. भन्साळींनी बहुधा ह्या लीला त्यांच्या अजाणतेपणातून आणि इतिहासाविषयीच्या अपरिपक्वतेमुळे केलेल्या असल्या तरी ते योग्य नाही. ‘देवदास’ ह्या चित्रपटाच्या तपशिलातही त्यांनी अशा काही अक्षम्य चुका केल्या होत्या. परंतु ‘देवदास’ हा काही बंगाली समाजाचा आदर्श नव्हता. त्याची तुलना बाजीरावांशी करता येत नाही.
कलात्मक मुभा अनेक मोठय़ा दिग्दर्शकांनी अनेक कलाकृतींतून घेतलेली आपल्याला दिसते. मग ते राज कपूर असोत, गुरुदत्त असोत, अमरोही असोत, डेव्हिड लीन असोत किंवा स्पिलबर्ग असोत! ह्यांनी अशी मुभा घेताना कोणाच्याही अस्मितेला किंवा भावनांना धक्का पोहोचविल्याचे दिसत नाही. प्रत्येक समाजाची काही मानचिन्हे असतात, आदर्श असतात, प्रेरणास्थाने असतात. त्यांना जपून कलाकारांनी कलाकृती सादर करायला हवी. त्यांना धक्का पोहाचला तर त्यांचे चाहते दुखावले जातात, एवढे तरी भान भन्साळींना हवे होते. ह्या विषयात भन्साळींनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे होते. कारण त्यांची प्रतिष्ठा आणि त्यांचे २०० कोटी रुपये आता स्टेकला लागलेले आहेत.
(लेखक ‘अजिंक्य योद्धा बाजीराव’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा