विद्युत भागवत

‘बहुरूपिणी दुर्गा भागवत : चरित्र आणि चित्र’ हे अंजली कीर्तने लिखित पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. दुर्गा भागवत यांचे व्यक्तिमत्त्व असामान्य आणि गूढरम्य आहे. दुर्गाबाई नक्की कशा होत्या, हे समजून घेण्यासाठी ही शोधयात्रा लेखिकेने केलेली आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिले आहे की, ‘दुर्गाबाईंच्या जडणघडणीचा या पुस्तकात घेतलेला वेध म्हणजे एक नयनरम्य कॅलिडोस्कोप आहे.’ दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जाऊन यापूर्वी प्रतिभा रानडे यांनी त्यांच्याशी ‘ऐसपैस गप्पा’ मारल्या हे आपल्या परिचयाचे आहेच.  आधी ‘दुर्गा भागवत : एक शोध’ हा लघुपट आणि आता हे पुस्तक सिद्ध करताना अंजली कीर्तने यांनी संशोधकाच्या कसोशीने काम केले आहे.

What is ossification test How did the trial reveal the age theft of the suspect in the Baba Siddique murder case
‘ऑसिफिकेशन चाचणी’ म्हणजे काय? बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील संशयिताची वयचोरी या चाचणीने कशी उघडकीस आली?
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Charlotte Wood novel Stone Yard Devotional
बुकरायण: आस्तिक-नास्तिकतेचे मुक्त चिंतन…
Vishwas Ugle captured motherly moment on camera with little Tara lovingly cuddling her calf
ताडोबातील “छोटी तारा” च्या मातृत्वाचा क्षण…
Pahile Na Mi Tula Marathi Natak Preview
नाट्यरंग : पाहिले न मी तुला – दृष्टिकोनातील फरकाचा लोच्या
young man killed his friend in an argument over having an affair with his sister
“तुझ्या बहिणीशी माझे प्रेमसंबंध, आम्ही शारीरिक…” बोलणे ऐकताच भावाने केला मित्राचा खून
Art and Culture with Devdutt Pattanaik | What sculptures tell us about Indian culture
UPSC Essentials:हडप्पा ते चोल कालखंड: भारतीय शिल्पकृती इतिहास कसा उलगडतात?| देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृती
Pragya Daya Pawar opposition to the role of Vanchit Bahujan Aghadi which is protesting in front of the house of intellectuals
‘वंचित’च्या भूमिकेचा स्त्री लेखिका-कार्यकर्तींकडून निषेध

दुर्गाबाईंवरील लघुपट तयार करताना आलेले अनुभव ‘स्मृतिकोशातील दुर्गा भागवत’ या पहिल्या प्रकरणात मांडले आहेत. यात अनेक कविता व काही प्रसंग चित्रदर्शी पद्धतीने वर्णन केले आहेत. दुर्गाबाईंवरील लघुपट चित्रीकरण प्रक्रियेत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यावर लेखिकेने लिहिलेली कविता या प्रकरणात दिली आहे. दुर्गाबाईंचे लेखन महाराष्ट्रातील विशिष्ट वर्गातील शिक्षित समाजाने, विशेषत: स्त्रियांनी उचलून धरले असे दिसते.

दुसरे प्रकरण दुर्गाबाईंच्या घरांविषयी आहे. १९१० साली १० फेब्रुवारीला जन्मलेल्या दुर्गाबाई इंदूर संस्थानापासून प्रवास करत मुंबईच्या गावदेवी येथील फ्रेंचब्रिजजवळच्या डॉ. सखाराम अर्जुन यांच्या प्रशस्त तीन मजली घरात राहू लागल्या. धर्मभेद, जातीभेद यांचा स्पर्शही न झालेल्या आधुनिकतेत अग्रक्रमाने वावरणाऱ्या मुंबईच्या या भागात भागवतांचे हे घर आणि त्यातील स्त्रिया कशा मोकळ्या वातावरणात घडत होत्या, हे आपल्याला कळते. त्या काळात दुर्गाबाईंनी अनुभवलेली सुबत्ता आणि स्वायत्तता या प्रकरणात नेमक्या शब्दांत टिपली आहे. याबाबतचे संदर्भ तपासले तर दुर्गाबाईंचा सततचा लिहिता हात त्यामागे आहे, हे ध्यानात येते.

‘हिमालयाची वाणी’ या तिसऱ्या प्रकरणात दुर्गाबाईंची अनेक दुर्मीळ छायाचित्रे पाहायला मिळतात. या प्रकरणाच्या अखेरीस १९७५ सालच्या आणीबाणीपर्वात दुर्गाबाईंनी नागरी स्वातंत्र्याच्या बाजूने दिलेल्या वैचारिक लढय़ाचा नेमका उल्लेख येतो. वडिलांकडून तत्त्वनिष्ठेचा उत्तुंग वारसा मिळालेल्या दुर्गाबाईंनी इंदिरा गांधींना आव्हान दिले आणि त्यांनी रणचंडिकेचे रूप धारण केले, असे कीर्तने यांनी नमूद केले आहे. मात्र येथे त्या संदर्भातील प्रसंग वाचायला मिळत नाहीत.

‘विद्याव्रती’ या चौथ्या प्रकरणात दुर्गाबाईंच्या अभ्यासाचा प्रवास दिसतो. त्यांनी केलेला ‘प्राचीन बौद्ध न्यायशास्त्र’ या विषयावरील अभ्यास आणि त्यासाठी आत्मसात केलेली पाली भाषा याविषयीचे उल्लेख येतात. संस्कृत, पाली आत्मसात करणाऱ्या दुर्गाबाईंनी एम.ए.च्या पातळीवरच प्रबंध लिहिला. कीर्तने म्हणतात की, संशोधक दुर्गाबाईंची काही वैशिष्टय़े, गुणधर्म विशेषत्वानं जाणवतात; मुख्य म्हणजे वैचारिक शिस्तबद्धता! त्या आपल्या ग्रंथातील नऊ प्रकरणांत बौद्ध काळपूर्व भारतातील आर्यसंस्कृती, यज्ञसंस्था, ऋषिसंस्था, रानातील एकांतवासात तापसांनी निर्मिलेले वाङ्मय, चातुर्वर्णाश्रमाचं स्वरूप, वेदोपनिषदं यांचा धावता आढावा घेतात. यज्ञसंस्था आणि ऋषिसंस्था यांच्यातील संघर्षांचीही त्यांनी नोंद घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर बुद्ध आणि महावीर या धर्मसंस्थापकांचे माहात्म्यही त्यांनी स्पष्ट केले आहे. दुर्गाबाईंना एकूणच भारतातील स्त्रियांची अवस्था परस्वाधीन होती हे जाणवून बौद्ध भिक्षू-भिक्षुणींचे नाते कसे होते, हे स्पष्टपणे  मांडताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा नमूद केला आहे. खरे तर दुर्गाबाई स्त्रीवादी नव्हत्या, परंतु त्या लिहितात- ‘भिक्षुणींना व्यक्ती म्हणून मूलभूत हक्कच मिळाले नाहीत. माणूस म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला.’ भिक्षुणींवर दुर्गाबाईंनी स्वतंत्र प्रकरणच लिहिले आहे.

कीर्तने यांनी चौथ्या प्रकरणाच्या शेवटी दुर्गाबाईंचं संस्कृतीसंपन्न व्यक्तिमत्त्व पुढील काळात कसे घडले, यावरही प्रकाश टाकला आहे. पाचव्या प्रकरणात मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र विभागातील गुंतागुंत येते, विशेषत: डॉ. गो. स. घुर्ये आणि दुर्गाबाई यांच्या गुरु-शिष्य नात्यातील ताणतणावाविषयी वाचायला मिळते. दुर्गाबाईंनी केलेला आदिवासी समाजाचा व गोंडी भाषेचा अभ्यास, लोककला आणि कथा-कहाण्या यांचे संकलन याविषयी सहाव्या प्रकरणात उलट-सुलट पत्रव्यवहाराच्या साहाय्याने मांडणी येते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे डॉ. घुर्ये आणि दुर्गाबाई या आग्रही, तीव्र मनोवृत्तींच्या माणसांनी एकमेकांना कसा शह दिला, हे फार अचूकपणे कीर्तने यांनी मांडले आहे. त्या लिहितात, ‘स्वत:चे संशोधन, पुस्तकं, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा यासाठी हुशार व अभ्यासू विद्यार्थ्यांना बेसुमार राबवणं आणि त्यांना स्वत:चा अभ्यास करू न देणं; इतकंच नव्हे, तर त्यांच्या मार्गात अडचणी उभ्या करणं हे शिक्षकी पेशाला न शोभणारंच वर्तन होतं. दुर्गाबाई आणि श्रीनिवास यांच्या अनुभवांत खूप साम्य आहे. १९४२ साली घुर्यानी दुर्गाबाईंचा बळी घेतला आणि १९४४ साली श्रीनिवास यांच्याशी ते तोच खेळ खेळले.’

आठव्या प्रकरणात ‘गोखले इन्स्टिटय़ूट’मधील घटनांचे, तर नवव्या प्रकरणात ‘मुंबई-पुणे येथील तमाशा कलावंतांची पाहणी’ या दुर्गाबाईंच्या संशोधनाबद्दलचे तपशील येतात. दुर्गाबाईंना गोखले इन्स्टिटय़ूटमध्ये खोडून काढलं गेलं आणि दहाव्या प्रकरणात या अधुऱ्या राहिलेल्या कहाणीबद्दल कीर्तने स्वत: काही फारशी टीकाटिपण्णी न करता तपशील देतात. त्यातून महार समाजाविषयाचे दुर्गाबाईंचे संशोधन आणि विशेषत: तमाशांचा त्यांनी केलेला अभ्यास अधुरा राहिला एवढेच आपल्याला कळते.

या पुस्तकातील दुसऱ्या विभागात दुर्गाबाईंचे शब्दचित्र रेखाटण्याचा प्रयत्न दिसतो. दुर्गाबाईंचे लेखिका, अभिनेत्री, गायिका म्हणून असणारे व्यक्तिमत्त्व आणि त्याचबरोबर त्यांचे भरतकाम, कशिदा, विणकाम, स्वयंपाक-पाणी, निसर्गचित्रांची आवड या साऱ्यांचे वर्णन येते. दुर्गाबाईंचा अनेक भाषांचा अभ्यास आणि विविध रंगांबद्दलचे कुतूहल, निसर्गविषयक वाचन, तसेच नादलुब्धता या साऱ्यांवर लेखिकेने कौतुकाने लिहिले आहे.

मात्र, पुस्तक वाचून काही प्रश्नही पडतात- आदिवासींच्या परिस्थितीतील विपरितता किंवा विकासाच्या प्रक्रियेत त्यांची होणारी ससेहोलपट दुर्गाबाईंना दिसली कशी नाही? किंवा मोठय़ा धरणाविरोधात उभ्या राहिलेल्या नर्मदा आंदोलनाला, तसेच १९७५ नंतर मुख्य शहरांमध्ये आणि उपनगरांमध्ये आकाराला आलेल्या स्त्रीमुक्ती चळवळीला विरोध करण्याची भूमिका त्यांनी का घेतली? स्त्री आणि पुरुष या शब्दांचे एकसत्वीकरण करून ते निसर्गाशी जोडताना त्यांच्याही नकळत त्या स्त्रियांना पाककला, भरतकाम, विणकाम या साऱ्याशी कशा जोडत होत्या? त्यांच्या घरात वैज्ञानिकतेचा आणि बुद्धिनिष्ठेचा जो वारसा होता त्याचे त्यांनी काय केले? वेश्या व्यवसायासंदर्भातील भूमिकेबाबत नामदेव ढसाळ आणि दुर्गा भागवत या दोघांमधील चकमक कशी समजून घ्यायची? मात्र असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.

‘बहुरूपिणी दुर्गा भागवत : चरित्र आणि चित्र’ – अंजली कीर्तने,

मनोविकास प्रकाशन,

पृष्ठे – ३११, मूल्य – ३५० रुपये.