दिवाळी तोंडावर आलेली असायची. गावात दिवाळसणासाठी माहेरवाशिणी मुराळ्यासोबत परतताना दिसायच्या. सण साजरा करण्यासाठी गोरगरीबांची जुळवाजुळव फार आधीपासूनच चाललेली असायची. एवढे करूनही सणाचा बाजार काही होत नसे. मग पुढच्या कामापोटी एखाद्या शेतमालकाकडून उचल घेतली जात असे. त्याचवेळी गावात तिन्हीसांजेला एखादा ट्रक आलेला असायचा. ज्यांनी ज्यांनी ऊसतोडणीसाठी उचल घेतली आहे अशांना मग या ट्रकमधून ऊसतोडणीसाठी जावे लागायचे. गावाच्या शेवटी उभ्या राहिलेल्या या ट्रकभोवती बाया-पोरांचा, माणसांचा वेढा पडायचा. कामासाठी बाहेर जाणाऱ्यांना निरोप देण्याकरिता अख्खा गाव लोटलेला असे. आधी ट्रकमध्ये बाया-पोरांना बसवले जाई. त्यानंतर मोठी माणसे बसत. गावातून पाय काढताना ही माणसे एकमेकांच्या गळ्यात पडून रडत. तरीही एखाद्याचा पाय घरातून निघत नसे. सगळी माणसे वाहनात बसल्यानंतरही अशा एकटय़ादुकटय़ासाठी पुन्हा वाहन ताटकळत उभे राही. जोरजोरात ‘हॉर्न’ वाजवला जाई. मागे राहिलेल्यांचा शोध घेण्यासाठी पुन्हा काहीजण वाहनातून उतरत असत. हे चित्र मनावर कायमचे कोरलेले. नेमकी दिवाळी दोन-चार दिवसांवर येऊन ठेपलेली असताना गावाबाहेर पडणाऱ्यांकडे पाहून त्यावेळी मनात प्रश्न उठत असत : ही माणसे दिवाळी कुठे साजरी करणार? पणत्या कुठे लावणार? जिथे कोठे ही माणसे ऊसतोडणीसाठी जात असतील तिथे खोपटात कसला उजेड पडणार? आणि रानातल्या अंधारात ही खोपटे उजळणार तरी कशी? आज हे प्रश्न पडत नाहीत असे नाही, पण त्यावेळी मात्र या प्रश्नांच्या खोलात जाऊन त्यांची उत्तरे शोधण्याचे वय नव्हते. अंधाराची भीती वाटण्याच्या वयात आणि अंधारातल्या सावल्यांची थरथर मनावर उमटण्याच्या काळात या दिवाळीच्या सणाचे भलतेच अप्रूप.
पूर्वी सगळी गावेच जणू अंधाराच्या वळचणीला असल्यासारखी. एकदा दिवस मावळतीला गेल्यानंतर गुरेढोरे आणि माणसे गावात परतायची. त्यानंतर अख्ख्या गावावर पेटत्या चुलींच्या धुराचा थर दिसायचा. घरातल्या माणसांचे चेहरे जेवताना चुलीपुढच्या उजेडात दिसायचे. एकदा सगळ्यांची जेवणं झाली की अख्खा गाव पुन्हा गुडूप अंधारात. रस्ते लगेचच सुनसान व्हायचे. अंधारावर जराही ओरखडा उमटणार नाही इतकी शांतता गावात पसरायची. सुरुवातीला अंधार पातळ असायचा. जवळच्या माणसाचा चेहरा निरखून पाहिला तरच ओळखू यायचा. हळूहळू अंधार दाट होत जाई. उजेडाचा पत्ताच दिसायचा नाही. हे चित्र बारमाही असायचे. गाव म्हणजे अंधाराच्या डोहात बुडालेली वस्तीच. दिवाळीच्या दिवसांतही माणसे शेतात कामाला जात असत. अशावेळी शेतातून गावात परतताना रस्त्याने जर नजरेच्या टप्प्यात गाव आला तर कुठे कुठे उजेड दिसू लागे. शेतात गेलेली सगळी माणसे गावात आली की प्रत्येकाच्या घरावर हे उजेडाचे ठिपके लकाकताना दिसू लागत. गावाबाहेरून पाहिल्यानंतर घरोघर लागलेल्या दिव्यांची रांग जणू आपल्यालाही उजळून टाकत आहे असे वाटायचे. चिरेबंदी वाडय़ाच्या िभतीवरही दिवे दिसत आणि एखाद्या झोपडीपुढेही दोन दिवे ठेवले जात. जी जागा अडगळीची आहे, जिथे कोणी जात नाही, किंवा एखाद्याचे पडके घरही दिवाळीच्या दिवसात झाडून, सारवून स्वच्छ केले जाई. जिथे कोणी माणूस राहत नाही त्या ठिकाणीही दिवा लावला जात असे. शक्य तितका आपल्याभोवतीचा अंधार दूर करावा. दिवाळीच्या दिवसात तरी आजूबाजूला अंधार नको असे प्रयत्न केले जात. जी जागा वर्षभर अंधारात खितपत पडलेली असे अशा जागेचाही कोपरा न् कोपरा उजळला जात असे. तरीही गावाकडच्या दिवाळीत डोळ्यांना खुपणारा उजेड कुठेच दिसायचा नाही. सगळीकडून कानठळ्या बसवणारा आवाज येत आहे.. आसमंतात आगीचे लोळ उठत आहेत आणि झगमगाटाने डोळे दिपून जात आहेत.. असे चित्र कधीच गावाकडे दिवाळीच्या दिवसांत दिसले नाही. मिणमिणत्या उजेडातच हा सण साजरा होत असे. दिवाळीचे दिवेही रात्रभर जळतील असे नसायचे. एकदा माणसांची जेवणे झाली आणि गाव स्थिरस्थावर होऊ लागले की हे दिवे विझून जात असत. गाव पुन्हा अंधाराच्या स्वाधीन. आणि रस्ते अजगरासारखे सुस्त पडलेले. रात्री उशिरापर्यंत दिवा पेटता राहील एवढे तेल कोणाकडे असणार? घराच्या िभतीवर दिसणारी दिव्यांची रांग खूपच अल्पजीवी असायची. पण हे सगळे दिवे उजळायचे तेव्हा अंधारावर मात केल्याचे समाधान सर्वाच्याच चेहऱ्यावर असायचे. कधी तीन, तर कधी चार दिवस दररोज दिवेलागणीच्या वेळेला हा असा उजेड दिसू लागे. एरवी दिवस मावळल्याबरोबर अंधारात आकंठ बुडणारे गाव अशावेळी मिणमिणत्या उजेडात दिसणाऱ्या एखाद्या चित्राप्रमाणे भासू लागे.
तसा गावांचा आणि अंधाराचा संबंध घट्ट. वर्षांनुवष्रे ही वीण अगदी पक्की. गडद असा अंधार गावांच्या पाचवीलाच पुजलेला. आता गावोगाव वीज आली असली तरीही भारनियमनाच्या विळख्यात बहुतांश गावे आहेतच. म्हणजे अजूनही अंधार लादलेला आहेच. गावांची अंधाराशी असलेली ही सोयरीक जणू तहहयात.
‘दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी’ असे म्हणतानाही केला जाणारा दिव्यांचा उजेड हाही अंधारावरचा एक कवडसा असे. दावणीच्या गुराढोरांना ओवाळण्यासाठी लव्हाळ्याची खास ‘दिवटी’ केली जात असे. लव्हाळ्याच्या हिरव्या, ओल्या काडय़ा विणून दिव्यासाठीची खास रचना केलेली असे. पहिल्या दिवशी दिव्याचा थर एकच राही. दररोज त्यात एकाने वाढ होई. या लव्हाळ्याने विणलेल्या दिव्यातून तेल सांडू नये म्हणून त्याला आतून शेण लावले जाई. दिवटी घेऊन गुराख्यांचे जथ्थे रस्त्याने चालताना जेव्हा दुरून दिसत, तेव्हा पाहणाऱ्याला केवळ दिव्याचा अंधुकसा उजेड आणि चालणारांच्या सावल्या तेवढय़ा दिसू लागत. दिवाळीच्या दिवसांत उजेडाचे ठिपके अशा वेगवेगळ्या रूपात जाणवायचे. या उजेडात रखरखीतपणा किंवा डोळ्यासमोर अंधारी दाटून येईल असा भगभगीतपणा नसायचा.
दिवाळीची पहाटेची अंघोळ तर अंधारातच होत असे. पूर्व दिशेला लालीही चढलेली नसायची त्यावेळी उठायचे आणि अंधार असतानाच अंगाला उटणे लावले जायचे. कधी तीळ, कधी तांदूळ वाटून हे उटणे केलेले असायचे. दिवाळीची अंघोळ झाल्यानंतर आकाश उजळायला प्रारंभ होत असे. आभाळाच्या कडा प्रकाशमान होत असत. अंधाराचे जाळे दूर होत असे.
थंडीच्या दिवसांत सगळे अंग बधिर झाल्यासारखे होई. या दिवसातला अंधार आणखी घट्ट जाणवायचा. थंडीच्या दिवसांत गाव लवकर सामसूम होत असे. त्यामुळे हा अंधार आणखीनच जडशीळ होई. दिवस मावळला की थंडी आणि अंधार यांची अनोखी सरमिसळ सर्वागाला जखडून टाकणारी असे. आपापल्या सुखदु:खाच्या डोहात बुडालेल्या माणसांना कधी कधी अंधाराचीही सोबत वाटे. अंधारातल्या एकटेपणात आतल्या आत तळ ढवळण्यासाठीचा निवारा ही माणसे शोधताना दिसत. दिवाळीचा उजेड या अंधाराच्या डोहावर काही तरंग उमटवणारा असे. सगळा अंधाराचा तळ ढवळून काढण्याएवढा जोम या उजेडातही नसायचा. जिथे गावात ही परिस्थिती, तिथे छोटय़ा-मोठय़ा वाडी-वस्तीवर आणि तांडय़ावर तर विचारायलाच नको. इथला अंधार तर युगानुयुगे घट्ट रुतून बसलेला. त्याची पाळेमुळे उजेडाला खणताच येत नाहीत.
नेमका दिवाळीच्या दिवसात शेतातला कापूस घरी येण्याला सुरुवात होई. पणतीसाठी तेवणाऱ्या वाती याच नव्या आलेल्या कापसाच्या बनवल्या जात. पण घरात कापूस म्हणजे त्याला आगीची भीती. त्यामुळे ठिणगीची पण धास्ती वाटावी अशी परिस्थिती. जास्त उजेड नको. आगीचा संबंध नको. घरात साठवलेल्या कापसापासून ठिणगीला कोसो दूर ठेवले जाई. कापसावर ठिणगी पडायला नको म्हणून खूपच खबरदारी घेतली जायची. इथेही आगीच्या लोळाला दूर ठेवण्याचाच प्रकार. उजेडाचा सोस बाळगायचा नाही. त्यासाठी प्रकाशाची धुळधाण करायची नाही. आणि डोळे दिपवून टाकणारी आरासही करायची नाही. केवळ अंग भिजेल एवढय़ाच तेलात बुडालेल्या वातीने तग धरून तेवत राहावे आणि आपल्याभोवतीचा अंधार भेदण्याचा प्रयत्न करावा, जमेल तेवढा सांदीकोपरा उजळावा, हीच इथल्या उजेडाची रीत. या उजेडात अंगावर येणारी उधळमाधळ आणि डोळ्यांना चुरचुरणारी आग नाही, अंधाराला चिरडून काढणारा, चिणून काढणारा उद्दामपणा नाही. फक्त मिणमिणत राहणे, हाच इथल्या उजेडाचा आणि जगण्याचाही स्थायीभाव!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा